शनिवार, १७ जानेवारी, २०२६

नाटक : प्रकार 2

 

अध्ययन आणि अध्यापन

                                                      नाटकाचे प्रकार 2

                                                                                              डॉ. अक्षय घोरपडे.



नाटकाचे आशयानुसार प्रकार


    मागील भागात आपण नाटकाचे मुख्य प्रकार सुखात्मिका आणि शोकांतिका हे प्रकार अभ्यासले. या भागात आपण आशयानुसार नाटकाचे प्रकार पाहणार आहोत.


१.   पौराणिक नाटके :

मराठी रंगभूमीची सुरुवात मुळातच पौराणिक नाटकांनी झाली. इ.स. १८४३ ला कै. विष्णुदास भावे यांनी मराठीतील पहिले पौराणिक नाटक 'सीता स्वयंवर' लोकासमोर सादर केले. तत्कालीन लोकमानसावर धर्म, तत्त्वज्ञान, पुराणकथा, देव-देवता यांचा मोठा पगडा होता. त्यामुळे पौराणिक नाटकांमधून विविध देव-देवतांच्या व्यक्तिरेखा साकारण्यात आल्या, पौराणिक नाटकांतील कथासूत्र हे पद्यात्मक स्वरूपाचे होते. कालांतराने नाटकांतील कथासूच मांडण्यासाठी नेपथ्यासाठी पडद्यावर देखावे साकारण्यात आले. पौराणिक नाटकांतील महत्त्वाची व लोकप्रिय व्यक्तिरेखा म्हणजे 'नारद'. अनेक पौराणिक नाटकांत पुराणातील संदर्भ व नाटकांतील कथासूत्र यथायोग्य मांडण्यासाठी या व्यक्तिरेखेचा उपयोग करण्यात आला. हळूहळू पौराणिक नाटकांचे स्वरूप बदलत गेले. १८८० नंतर अण्णासाहेब किर्लोस्करांनी 'शाकुंतल' या अनुवादीत नाटकाचा प्रयोग केला. त्यानंतर त्यांचे 'संगीत सौभद्र' हे पौराणिक नाटक लोकांच्या पसंतीला उतरले. अण्णासाहेबांनी आपल्या नाटकांना घटना, प्रसंग, संवाद, पद्यरचनांना लयबद्ध चाली इ. वैशिष्ट्यांनी सादर केले. पौराणिक नाटकांचा विकास अण्णासाहेबांनी केला. कृ.प्र.खाडिलकर यांनी पौराणिक नाटकांत विनोदी उपकथांचा समावेश केला. खाडिलकरांनी नाटकांचे सादरीकरण पाश्चात्त्य नाटकांप्रमाणे केले. त्यामुळे खाडिलकरांच्या नाटकांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. पौराणिक नाटकांतून सादर होणाऱ्या नाट्यगितांमुळे अनेक शास्त्रीय संगीतकार, गायक, वादक नावरुपास आले. 'किचकवध', 'विद्याहरण', 'पहिला पांडव', 'संगीत स्वयंवर', 'पहिला पांडव' या काही गाजलेल्या पौराणिक नाटकांचा आवर्जून उल्लेख करावा लागतो.

२) ऐतिहासिक नाटके :

ऐतिहासिक नाटकांत इतिहास आणि नाटक यांचा मेळ आपणांस पहायला मिळतो. वि.ज. कीर्तने यांनी 'थोरले माधवराव पेशवे' हे नाटक लिहून ऐतिहासिक नाटकांची पायाभरणी केली. भूतकाळातील घटनांची नोंद इतिहासात सापडते. त्यामुळे इतिहास जाणून घेण्याचे कुतूहल, इतिहासाबद्दलचे प्रेम, ऐतिहासिक वारसा यामुळे ऐतिहासिक नाटके लोकप्रिय झाली. ऐतिहासिक नाटकांवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्राचा मोठा प्रभाव जाणवतो. शिवकाळातील घटना, प्रसंग, युद्ध यावर आधारित नाटके खूप लोकप्रिय झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित नाटकांसोबतच छत्रपती संभाजी महाराजांचाही विशेषप्रभाव ऐतिहासिक नाटकांवर जाणवतो ऐतिहासिक नाटकात भारदस्त भाषणली, कौटंबिक चर्चा राजकारण युद्धप्रसंग पक्ष सामाजिक परिस्थिती, मुस्लीम राजवट ३. पटना प्रसंग वास्तवरुपाने साकारण्यात आल्या इतिहासाचे वास्त ऐतिहासिक नाटकातून साकारण्यात आले. कृ.प्र. खाडीलकर यांचे 'भाऊबंदकी', रा.ग.गडकरी यांचे 'राजसंन्यास’,  'सवाई माधवराव यांचा मृत्यू’, 'कांचनगडची मोहना’, वसंत कानेटकर यांच 'रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘जेथे गवताला भाले फुटतात’ या काही निवडक ऐतिहासिक नाटकातून ऐतिहासिक नाटकाचे स्वरूप-विशेष जाणून घेता येतात.

 

३) सामाजिक नाटके :

२० व्या शतकात सामाजिक नाटकाना महत्त्व प्राप्त झाले सामाजिक प्रश्नांची मांडणी या नाटकांनी प्रामुख्याने केली. समाजमनावर असलेल्या पारंपरिक रूढी, परंपरा, अनिश चालीरीती, श्री समस्या, वी पुरुष समानता या प्रश्नांचा ऊहापोह सामाजिक नाटकांतून रंगभूमीवर करण्यात आला. समाज मनाला जागे करून समाजात जागृती करण्याचे काम या नाटकांनी केली. सामाजिक प्रश्नांची गंभीरतेने दखल या नाटकांनी घेतली. समाजव्यवस्थेसोबत ढासळणाऱ्या कुटुंबव्यवस्थेचेही बित्रण या नाटकांनी केले. भ्रष्टाचार, व्यसनाधीनता व्यभिचार, सामाजिक नैतिक मूल्याचा होणारा हास हा विषयांनाही सामाजिक नाटकांतून मांडण्यात आले. सामाजिक स्वरूपाचे नाटक मराठीत मोठ्या प्रमाणात लिहिल्या गेले. इ.स. १८८५ ला म. फुले यांनी लिहिलेले 'तृतीय रत्न' नाटक हे पहिले सामाजिक नाटक पण त्याचा प्रयोग झाला नाही. १९ व्या शतकांत सामाजिक नाटके फारशी तयार झाली नाही परंतु २० व्या शतकांत सामाजिक नाटकांचा प्रवाह मोठ्या जोमाने सुरू झाला. समाजाचे भीषण वास्तव नाटकरुपाने प्रेक्षकांसमोर मांडण्यात आले. श्री.कृ. कोल्हाटकर, पु.ल.देशपांडे, अनंत काणेकर, वि.वा. शिरवाडकर, वसंत कानेटकर या महत्त्वाच्या नाटककारांनी मराठी सामाजिक नाटकांना एक वेगळी ओळख प्राप्त करून दिली. श्री.कृ. कोल्हाटकरांनी 'मतीविकार', 'प्रेमशोधन', 'मूकनायक', इ. नाटके श्री समस्या प्रधान सामाजिक नाटके आहेत. अनंत काणेकर यांचे 'घरकुल', आचार्य अत्रे यांचे 'लग्नाची बेडी' वि.वा. शिरवाडकरांचे 'नटसम्राट' या काही नाटकांनी सामाजिक प्रश्नांना संवेदनशीलतेने समाजासमोर मांडले.

 

४) राजकीय नाटके :

कृ.प्र. खाडिलकर यांच्यापासून राजकीय नाटकांची सुरुवात मराठी भाषेत दिसते. लोकमान्य टिळकांच्या जहाल वृत्तीचा त्यांच्यावर प्रभाव होता. त्यामुळे टिळकांचे अनुयायी म्हणून त्यांची ओळख होती. राजकीय विचार नाटकांतून मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. इंग्रजी राजवट, स्वातंत्र्याची चळवळ, इंग्रजी सत्तेला आव्हान, इग्रजी सत्तेचा भारतीय समाजव्यवस्थेवर झालेला परिणाम इ. विषय खाडिलकरांनी आपल्या नाटकांतून हाताळले. पौराणिक, ऐतिहासिक नाटकांतून त्यांनी राजकीय संदर्भ दिलेत. क्रांतीची भाषा, क्रांतिकारक नायक, बलिदान, क्रांतीची चळवळ, देशभक्ती यासारखा राजकीय विचार त्यांच्या नाटकांनी प्रेक्षकांसमोर मांडला. टिळकांचा जहाल विचार खाडिलकरांच्या नाटकांनी मांडला. हळूहळू राजकीय नाटकांचे स्वरूप बदलले आणि राजकारण, सत्तांतर, सत्तासंघर्ष, असे विषय असणारी राजकीय नाटके निर्माण व्हायला लागली. भा.वि. वरेरकरांनी १९४४ ला 'सिंगापुरातून' हे पहिले राजकीय वातावरणाचे नाटक लिहिले. स्वातंत्र्योत्तर काळात बदलत्या राजकीय व्यवस्थेचे चित्रण, राजकारण आणि खेडे, सत्तास्पर्धा, निवडणूका, राजकारण आणि पैसा, भ्रष्टाचार, जातीयवाद इ. विषय प्रकर्षाने मांडले गेले. आचार्य अत्रे यांचे 'मी मंत्री झालो', जयवंत दळवी यांचे 'सूर्यास्त', 'पुरुष', या नाटकांतून राजकीय संघर्ष आपणांस पहावयांस मिळतो. लोकशाहीप्रधान देशात राजकीय महत्त्वाकांक्षेसाठी लोकशाहीची थट्टा कशाप्रकारे राजकीय मंडळी करतात याचे भयावह वास्तव राजकीय नाटकांतून दाखविण्यात आले.

 

५) विनोदी नाटके :

लोकांचे मनोरंजन करमणूक व्हावी यासाठी विनोदी नाटकांची निर्मिती करण्यात आली. मानवी स्वभावातील संगती, विसंगती खाचाखोचा नेमकेपणाने टिपून उपहासात्मक, विडंबनात्मक पद्धतीने नाटकांतून दाखविण्यात आले. सुरुवातीला नाटकांत विनोद हा प्रसंगानुरूप व आवश्यकतेनुसार होता. परंतु नंतर स्वतंत्र विनोदी नाटकांची निर्मितीच करण्यात आली. हजरजबाबीपणा, खटकेबाज संवाद, खेळकर वातावरण, सहजपणे केलेला कोटीबाजपणा हे विनोदी नाटकांचे विशेष आहे. समाजातील विविध वृत्तीप्रवृत्तींवर विनोदाच्या साहाय्याने उपहासात्मकपणे टीका करुन विनोद निर्माण केला जातो. राम गणेश गडकरी, आचार्य अत्रे, पु.ल. देशपांडे इ. नाटककारांनी विनोदी नाटकांची निर्मिती करुन प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

 

६) दलित नाटके :

१९६० ला मराठी साहित्यात दलित साहित्य प्रवाह निर्माण झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा दलित साहित्याला मिळाली. तिच प्रेरणा १९८० च्यानंतर दलित रंगभूमीला आहे. दलित चळवळीतून दलित रंगभूमीची निर्मिती आणि दलित नाटके निर्माण झाली. दलित नाटकांचे महत्त्वाचा विशेष म्हणजे ते मनोरंजनासाठी नव्हते तर ते दलित चळवळ अधिक तीव्र करण्यासाठी होते. दलित नाटके ही रंगभूमीवर सादर होण्याऐवजी दलित सभा, संमेलनातून, अधिवेशनातून सादर झाली. १९५६ ला म.भा. चिटणीस यांनी 'युगयात्रा' हे नाटक नागपूरच्या दीक्षाभूमीवर सादर केले. हा दलित नाटकाचा पहिला प्रयोग जातिव्यवस्था, जातिभेद, धर्मातर, वर्णव्यवस्था, यासारखे विषय दलित नाटकाने हाताळले. डॉ. बाबासाहेबांचे विचार सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचविण्याचे काम दलित नाटकाने केले. प्रेमानंद गज्वी यांचे 'तनमाजोरी', रामनाथ चव्हाण यांचे 'बामणवाडा', दत्ता भगत यांचे 'बाटापळवाटा', प्रकाश त्रिभुवन यांचे 'थांबा रामराज्य येतयं' याशिवाय 'काळोखाच्या गर्भात', 'किरवंत', 'कोण म्हणतो टका दिला?' या दलित नाटकांनी दलित रंगभूमी समृद्ध केली.




गुरुवार, १५ जानेवारी, २०२६

नामदेव ढसाळ यांचा स्मृती दिन

नामदेव ढसाळ यांचा स्मृती दिन 







कधी तरी सुखाविषयी


कधी तरी मीही सुखाविषयी 

कवितेत लिहिले 

ते असून नसून सारखेच होते 

माझ्यासाठी

नाही क्षणिक सुखदुःखाचा खेळ 

तो आहे सनातन 

जगताना नाही फरक पडत आयुष्यात माझ्या 

आयुष्य आणि कवितेची गोष्ट सांगायचीच झाली तर 

जमिनीवर स्थिर असतो की पाय रोवून 

जरी असले डोक्यावर फाटके आभाळ 

तरी अंदाज येत नाही लोकांना माझ्या 

भुकेचा 

मी मोजतो भुकेल्या आतड्याची लांबी 

त्यातला एकेक तुकडा तोडून बनवतो बासरी 

गड्यांनो, भुकेचं गाणं 

किती असतं मंजुळ 

मग सृष्टीच्या घडामोडीची वाटत नाही भीती 

पृथ्वी माझ्यासाठी असते मेरी गो राउंड

आणि मी झालेला असतो धावत्या 

घोड्यावर स्वार

माझ्यासाठी जग फिरत असतं चक्राकार 

आणि मिणमिणता उजेड 

होतो संपूर्ण पांढरा.

                 - नामदेव ढसाळ 

🍁🍁🍁


सदर कविता ही 'मी मारले सूर्याच्या रथाचे सात घोडे' या काव्यसंग्रहातील आहे. 

मंगळवार, ६ जानेवारी, २०२६

नाटक : प्रकार

 

अध्ययन आणि अध्यापन

                                                      नाटकाचे प्रकार

                                                                                              डॉ. अक्षय घोरपडे.

प्रस्तावना 

भरतमुनींच्या 'नाट्यशास्त्र' या ग्रंथाचा अभ्यास करुन अॅरिस्टॉटल या अभ्यासकाने नाटकाचे सुखात्मिका आणि शोकात्मिका हे दोन प्रमुख प्रकार मानले आहेत. नाटक हे जीवन अनुभवाचे वास्तव प्रकट करणारे असते. त्यामुळे वास्तव जीवनातील सुख, दुःख घटना, प्रसंग, अनुभव यांचे सादरीकरण नाटकांतून होत असते. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनावर नाटकांचा परिणाम होतो. प्रेक्षक नाटक पाहता-पाहता; त्याचा अनुभव घेताना त्याचा भाग बनून जातो. सुख, दुःख, विचार, बोध, समस्या, रंजन यांचा ठसा नाटकांतून प्रेक्षकांच्या मनावर उमटतो. दृश्य स्वरूपाचा हा आविष्कार सामूहिक स्वरूपाचा असतो. नाटकांच्या रचनेवरून नाटकाचे प्रमुख प्रकार पडतात.

 

१) शोकात्मिका :

'शोकात्मिका' या नाट्यप्रकारासाठी इंग्रजीत Tragedy' हा पारिभाषिक शब्द आहे. नाटक पाहिल्यावर प्रेक्षकांच्या मनावर जो दुःखद परिणाम होतो. त्या परिणामाचा विचार शोकात्मिकतेत होतो.

शोकात्मिका हा जीवनातील दुःख, भोग यांच्या अनुभूतींचे चित्रण करते. मराठीत शोकात्मिका, शोकांतिका, शोकनाट्य असे पर्याय 'Tragedy' साठी वापरले जातात. ग्रीक संस्कृती आणि साहित्यातून शोकात्मिका हा नाट्यप्रकार निर्माण झाला. ग्रीक तत्त्वज्ञ अॅरिस्टॉटलने शोकात्मिकेचे स्वरूप मांडले. शोकात्मिकेची व्याख्या करताना अॅरिस्टॉटलचे विवेचन पुढीलप्रमाणे- 'शोकांतिका ही गंभीर, स्वयंपूर्ण व विशिष्ट आकारमान असलेली कर्माची अनुकृती असते तिची भाषा प्रत्येक जातीच्या कलात्मक भूषणाने सुशोभित असते आणि त्या निरनिराळ्या जाती नाटकाच्या वेगवेगळ्या भागात सापडते ती नाट्यरूप असते. निवेदनात्मक नसते आणि ती करुणा व भीती ह्यांच्या साहाय्याने त्या भावनांचे योग्य ते विरेचन घडवून आणते.

शोकात्मिका नाटकातील कथानकाशी प्रेक्षक एकरूप करून त्यांच्या भावनांचे विरेचन घडवून आणते. त्यामुळे प्रेक्षक नाटक पाहताना भावनाविवश होतो आणि त्याच्या मनातील भीती, दुःख नाहीसे होऊन त्याला अंतिमतः एक प्रकारचे मानसिक भावनिक समाधान लाभते. शोकात्मिकेत नाटकाचे संवाद हे प्रभावी असायला हवे. शब्दातील सामर्थ्य शोकात्मिकेला प्रभावी बनवत असते. शोकात्मिकेतील घटना, प्रसंग हे परिणामकारक असतात. शोकात्मिकेतील नायकाबद्दल प्रेक्षकांना सहानुभूती वाटते. प्रेक्षकही आपल्या जीवनातील दुःखद घटनांची, आठवणींची तुलना शोकात्मिका पाहताना करत असतो. त्यामुळे शोकात्त्म नाटकही प्रेक्षकांच्या पसंतीला उतरत असतात. मराठी साहित्यात राम गणेश गडकरी यांची नाटके, खाडिलकरांची नाटके शोकात्मिकेला जवळची आहे. उदा. एकच प्याला, उद्ध्वस्त धर्मशाळा, अंधारयात्रा, नटसम्राट या नाटकांचा समावेश शोकात्मिकेत करता येईल.

 

२) सुखात्मिका :

सुखपर्यवसायी नाटकाला सुखान्तिका किंवा सुखात्मिका असे म्हणतात. सुखात्मिका प्रेक्षकांना आनंद देण्याचा काम करतात. या प्रकारच्या नाटकांतील बराचसा भाग हा सुखदायी घटनांचाच असतो. शोकात्मिका आणि सुखात्मिका हे दोन्ही शब्द नाटकांचा अंत सुचविणारे आहे. नाटकांतील घटना, प्रसंगांचीकल्पना आपल्याला या संज्ञांमधून येते. काही नाटकांचा बराचसा भाग हा दुःखद असतो परंतु त्यांचा शेवट हा आनंददायी असतो. विनोद आणि हास्य हे प्रामुख्याने सुखात्मिकेत आढळतात. प्रेक्षकांना हसवत ठेवणे हे सुखात्मिकेचे प्रमुख धोरण असते. विनोदीपणा हे सुखात्मिकेच्या यशाचे गमक आहे. विनोदाचा उपयोग करून समाजातील दोष-दिग्दर्शन, मानवी स्वभावातील विक्षिप्तपणा, यांवर हसतहसत विनोदातून प्रहार केला जातो. सुखात्मिकेचा जन्मच हा प्रेक्षकांना आनंद देण्यासाठी होतो. सुखात्मिकेचा नायक हा विवेकशील असतो. सुखात्मिकेत नायकाचा शेवट हा करुण पद्धतीने होत नाही किंवा तो दुःख, यातना भोगत नाही. मानवी भावभावनांचे विडंबन आणि उपहास सुखात्मिकेत येतात. शोकांत्मिका आणि सुखात्मिका ह्या दोघांमध्ये नाटकाचे समान घटक असतात. शोकात्मिकेत दुःख हे अंतिम असते तर सुखात्मिकेत विनोद, विडंबन, उपहास आणि आनंदी शेवट हे अंतिमतः असते. मराठी साहित्यात आचार्य अत्रे, पु.ल. देशपांडे यांची नाटके सुखात्मिका या प्रकारात येतात. उदा. 'लग्नाची बेडी', तुझे आहे तुजपाशी, प्रेमा तुझा रंग कसा?, बटाट्याची चाळ इ.

शोकात्मिका आणि सुखात्मिका हे नाटकाचे प्रमुख २ प्रकार आहेत. शोकात्मिकेला दोन हजार वर्षापूर्वीचा इतिहास आहे तर सुखात्मिकेला चारशे वर्षापूर्वीचा इतिहास आहे. शाश्वत मानवी मूल्ये, भावभावना चित्रित करण्यासाठी शोकात्मिकेचा उपयोग होतो तर, बदलत्या सामाजिक पर्यावरणाचा लोकांच्या इच्छा आकांशाचा विचार सुखात्मिकेत होतो. नाटक हा दृक-श्राव्य साहित्य प्रकार आहे. सामूहिकपणे प्रेक्षक नाटकाचा आस्वाद घेतो. रसिक प्रेक्षक हे सुखात्मिकेला जवळची असणारी विनोदी नाटके, हास्यप्रधान नाटके, फार्स अभिरुचीच्या दृष्टीने लोकप्रिय ठरतात. प्रेक्षकांची करमणूक, मनोरंजन या प्रकारच्या नाटकांतून घडत असते. त्यामुळे शोकात्मिकेपेक्षा सुखात्मिक प्रेक्षकांच्या पसंतीला जास्त उतरतात.

नाटकाच्या लिखित स्वरूपाचा विचार केला तर नाटक हा एक साहित्यप्रकार आहे, पण नाटकाच्या प्रयोगाचा विचार केला तर नाटकांत सादरीकरणाला महत्त्व आहे. आणि हे सादरीकरण रंगमंचावर केले जाते. त्यामुळे नाटक ही एक प्रयोगसिद्ध कला आहे. नाटकांच्या वरील दोन प्रमुख प्रकारांसोबत कलेच्या अंगाने किंवा सादरीकरणाच्या अंगाने विचार केला तर नाटकाचे काही उपप्रकार  पाहावयास मिळतात. नाटकाचे उपप्रकार हे सादरीकरणाच्या वैविध्यातून निर्माण झाले आहेत. उदा. एकांकिका, दीर्घाक, पथनाट्य, एकपात्री प्रयोग, नाट्यछटा, संगीतिका, नभोनाट्य. या काही उपप्रकारांचा समावेश नाटकाच्या उपप्रकारात होतो.



रविवार, ४ जानेवारी, २०२६

सावित्रीबाई फुले यांची कविता 'तयास मानव म्हणावे का ?'

 तयास मानव म्हणावे का ?



तयास मानव म्हणावे का ?

 

ज्ञान नाही विद्या नाही

ते घेणेची गोडी नाही

बुध्दी असुनि चालत नाही

तयास मानव म्हणावे का?

 

देरे हरी पलंगी काही

पशुही ऐसे बोलत नाही

विचार ना आचार काही

तयास मानव म्हणावे का?

 

पोरे घरात कमी नाही

तयांच्या खाण्यासाठीही

ना करी तो उद्योग काही

 तयास मानव म्हणावे का?

 

सहानुभूती मिळत नाही

मदत न मिळे कोणाचीही

पर्वा न करी कशाचीही

तयास मानव म्हणावे का?

 

दुसऱ्यास मदत नाही

सेवा त्याग दया माया ही

जयापाशी सद्गुण नाही

तयास मानव म्हणावे का?

 

ज्योतिष रमल सामुद्रीकही

स्वर्ग नरकाच्च्या कल्पनाही

पशुत नाही त्या जो पाही

तयास मानव म्हणावे का?

 

बाईल काम करीत राही

ऐतोबा हा खात राही

पशू पक्षात ऐसे नाही

तयास मानव म्हणावे का?

 

पशुपक्षी माकड माणुसही

जन्ममृत्यु सर्वांनाही

याचे ज्ञान जराही नाही

तयास मानव म्हणावे का?

-         सावित्रीबाई फुले

गुरुवार, १ जानेवारी, २०२६

नाटक : घटक

 

अध्ययन आणि अध्यापन

                                                               नाटक : घटक

डॉ. अक्षय घोरपडे.



Happy New Year !!



नाटकाचे घटक :

        नाटक हा वैशिष्ट्यपूर्ण साहित्यप्रकार आहे रंगमंचावर नाटकाचे सादरीकरण नाटकाला वेगळा आयाम देते. साधारणपणे पुढील घटकांमुळे नाटक अस्तित्वात येते.


१) शीर्षक: 

        शीर्षक हा नाटकाचा महत्त्वाचा घटक आहे. शीर्षकावरून प्रेक्षक नाटकाकडे आकर्षीत होतात. कारण शीर्षकावरून नाटकाची पूर्वकल्पना होते. नाटकाचे शीर्षक हे नाटकाचा विषय आणि नाट्यआशय प्रेरित करणारे असते.

उदा. 'रायगडाला जेंव्हा जाग येते', 'ती फुलराणी', नटसम्राट

२) नाटकाचे कथानक : 

        कथानकाला संविधानक असेही म्हणतात. कथानकाची सहेतुक केलेली मांडणी म्हणजे संविधानक. कथानक हा नाटकाचा आत्मा असतो. कथानकामुळेच एका उत्कृष्ट नाटकाची निर्मिती होते. कथानकाला समृद्ध करण्यासाठी नाटकांत संवाद तंत्राचा वापर केला जातो. पात्रांच्या साहाय्याने संवादातून कथानक दृश्य स्वरूपात प्रेक्षकांसमोर सादर केले जाते. नाटकातील घटना, प्रसंग नाट्यपूर्ण रीतीने कथानकाला योग्य न्याय देतील. अशाप्रकारे मांडावे लागतात. कथानकाच्या स्वरूपानुसार नाटकाची सुस्पष्ट मांडणी करावी लागते. कथानकाच्या साहाय्याने नाटककार नाटकांत रंगत आणण्याचे काम करतो. चांगल्या कथानकावरच नाटकाचे यश व लोकप्रियता अवलंबून असते.

३ ) पात्रचित्रण/व्यक्तिचित्रण :
 
        नाटक हे संवादातून घडत असते.संवादामुळे नाटकांत जिवंतपणा येतो. नाटकांतील संवाद पात्राद्वारे व्यक्त होतात. पात्र ही नाटकाला सजीव बनवतात. कथानकातील मुख्य सूत्रधाराला नायक व नायिका असे म्हणतात. याशिवाय नाटकांत इतर पात्रही असतात. नाटकांतील घटना, प्रसंगाला अनुरूप पात्र नाटकांत असतात. पात्रचित्रण नाटककाराला करावे लागते. योग्य ते पात्र निवडून पात्रांचे चित्रण केले जाते. नाटकांतून पौराणिक, ऐतिहासिक,सामाजिक, विनोदी राजकीय यासारखे विषय हाताळले जातात. त्यामुळे विषयानुरूप पात्र चित्रण नाटकांत करावे लागते. पात्रचित्रण हे प्रेक्षकांच्या  मनावर परिणाम करीत असते त्यामुळे वास्तव पात्रचित्रण नाटकांत अपेक्षित असते. नाटकांतील व्यक्तिचित्रण किंवा पात्रचित्रण हे नाटकाला जीवंत ठेवत असतात. आजही नाटकांतील अनेक व्यक्तिचित्रण लोकांमध्ये जीवंत आहेत. उदा. पौराणिक नाटकांतील 'नारद', 'विद्याहरण' नाटकातील 'शुक्राचार्य', 'भाऊबंदकी' नाटकातील राघोबा, 'नटसम्राट' नाटकातील अप्पासाहेब. 'प्रेमा तुझा रंग कसा' या नाटकातील प्रा. बल्लाळ इ. नाटकांतील व्यक्तिचित्रण अजरामर झाली आहेत.

४) संवाद : 

        संवाद हा नाटकाचा आत्मा तर मध्यवर्ती सूत्र हा नाटकाचा प्राण असतो. संवाद आणि मध्यवर्ती सूत्र यांच्या समन्वयातून नाटकाचा संवाद केवळ अर्थपूर्ण होत नाही तर संवादामुळे नाटकाला गती मिळते. संवाद हा नाटकाचा महत्त्वाचा घटक आहे. नाटकाच्या कथानकाला साजेशे असे संवाद नाटकांत असतात. नाटकांतील घटना, प्रसंग, स्थळ, काळ प्रेक्षकांपर्यंत संवादातून पोहचत असतात. नाटकातील पात्रांचा समन्वय संवादातून घडत असतो. त्याचप्रमाणे संवादातूनच पात्रांचा आपआपसातील परिचय प्रेक्षकांना होत असतो. प्रभावी, परिणामकारक, खटकेबाज, विनोदी, गंभीर अशा स्वरूपाचे संवाद नाटकाला प्रभावी बनवतात. मानवी स्वभाव, नातेसंबंध यांचे कंगोरे संवादातून प्रेक्षकांसमोर मांडले जातात.

५) नेपथ्य : 

        नाटक हा दृक-श्राव्य प्रयोगशील प्रकार आहे. प्रेक्षकांसमोर रंगमंचावर नाटक सादर करावे लागते. नाटकाचा अनुभव प्रेक्षक सामूहिकरीत्या घेतात. नेपथ्याला नाटकांत अत्यंत महत्त्व आहे. नाटकाच्या सादरीकरणाच्या वेळेस म्हणजेच प्रयोगादरम्यान रंगमंचावर केलेली सजावट, कथानकाला अनुरूप घटना, प्रसंग दाखविण्यासाठी तयार केलेले चित्रांचे पडदे, सचित्र साकारलेले देखावे या सर्वांचा समावेश नेपथ्यात होतो. नाटकाच्या विषयानुसार नेपथ्यरचना केली जाते. पौराणिक किंवा ऐतिहासिक नाटकांतील साकारलेला प्रासाद, महाल, नक्षीदार खांब, मोठमोठे पडदे यासारखी नेपथ्य रचना रंगमंचावर साकारावी लागते. तर इतर नाटकांत प्रसंगानुरूप नेपथ्य असते. उदा. घरांची रचना, स्वयंपाकगृह, कार्यालय, दिवाणखाना, खिडकी, दरवाजे इ. नेपथ्य असतात. नाटकाचे बरेचशे यश हे नेपथ्यावर अवलबून असते. त्यामुळे नेपथ्यकार सतत नवनवीन नेपथ्याचा वापर नाटकांत करीत असतो.

६) प्रकाश योजना : 

        रंगमंचावर नाटकाचा प्रयोग सादर करताना योग्य ती प्रकाश योजना करावी लागते. नाटकाच्या कथानकाला अनुरूप प्रकाश योजना महत्त्वाची असते. नाटकांतील विविध प्रसंग दाखविण्यासाठी प्रकाश योजनेत वैविध्य ठेवावे लागते. उदा. रात्रीचा प्रसंग असेल तर अंधार, भीतीदायक प्रसंग असेल तर उजेड अंधार यांचा खेळ.

७) संगीत : 

        सुरुवातीच्या काळात मराठी रंगभूमीवरील नाटके ही संगीत प्रधान होती. नाटकांतील कथानक हे बहुतांश पद्यमय होते. त्यामुळे पद्याला संगीताची जोड देऊन नाट्यगितांतून नाटकांचे सादरीकरण होत असे. पदरचनाकार, संगीतकार, वादक, गायक यांना संगीतप्रधान नाटकांत फार महत्त्व होते. संगीतप्रधान नाटकांतून अनेक नामवंत शास्त्रीय गायक, संगीतकार नावारुपास आले. नाटकांतील कथानकाला अनुरूप संगीत योजना केली जाते. आधुनिक नाटकांत नाटकांतील घटना, प्रसंगानुसार पार्श्वसंगीत दिले जाते. संगीतामुळे नाटकांत वातावरण निर्मिती, पात्रांच्या संवादातील विषय त्यातील भाव पटकन लक्षात येतात. आणि संगीतामुळे नाटकातील प्रसंग उठावदार होतो.

८) दिग्दर्शन : 

        दिग्दर्शन हे व्यक्तिकेंद्री असते. नाटकाच्या प्रयोगाचे यशस्वी सादरीकरण दिग्दर्शकाच्या हाती असते. नाटकाचा विषय हा प्रेक्षकांसमोर वास्तव रूपाने मांडण्याची किमया दिग्दर्शनात असते. नाटकांचा प्रयोग हा निर्दोष पद्धतीने बसविण्याचे काम दिग्दर्शकाचे असते. नाटकांत प्रयोग सादर करतेवेळी काही वेळेस संवादाऐवजी कलाकारांचे अव्यक्त भाव प्रेक्षकांना अर्थबोध करुन जातात. अपेक्षीत अर्थ हा प्रेक्षकांना समजतो व नाटक गतिमान होते. ही सचोटी दिग्दर्शनाची असते. दिग्दर्शन करणाऱ्याला दिग्दर्शक म्हणतात. नाटकाच्या अंगाने आवश्यक गुण दिग्दर्शकाजवळ असायला हवेत. दिग्दर्शन हे स्वकर्तृत्वाचे क्षेत्र आहे. दिग्दर्शकाला नाटकाच्या प्रयोगावेळेस नेपथ्य, प्रकाश, संगीत या सर्व घटकांचा विचार करावा लागतो.

        वरीलप्रमाणे नाटकांचे घटक आहेत. नाटक हे आधी लिहिले जाते नंतर त्याचा प्रयोग होतो. रंगभूमीवर नाटकांचा प्रयोग सादर होताना नाटकाचे घटक महत्त्वाचे ठरतात. नाटकाची परिणामकारकता आणि वातावरणनिर्मिती या घटकांच्या साहाय्याने होते.

Happy New Year !!
नववर्षाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा !!

जागतिकीकरण आणि आदिवासी

  जागतिकीकरण आणि आदिवासी डॉ . अक्षय किशोर घोरपडे. ·        गोषवारा  (Abstract) :- १९९० नंतरचा कालखंड हा भारतीय समाज जीवनात फार मोठा सा...