नामदेव ढसाळ यांचा स्मृती दिन
कधी तरी सुखाविषयी
कधी तरी मीही सुखाविषयी
कवितेत लिहिले
ते असून नसून सारखेच होते
माझ्यासाठी
नाही क्षणिक सुखदुःखाचा खेळ
तो आहे सनातन
जगताना नाही फरक पडत आयुष्यात माझ्या
आयुष्य आणि कवितेची गोष्ट सांगायचीच झाली तर
जमिनीवर स्थिर असतो की पाय रोवून
जरी असले डोक्यावर फाटके आभाळ
तरी अंदाज येत नाही लोकांना माझ्या
भुकेचा
मी मोजतो भुकेल्या आतड्याची लांबी
त्यातला एकेक तुकडा तोडून बनवतो बासरी
गड्यांनो, भुकेचं गाणं
किती असतं मंजुळ
मग सृष्टीच्या घडामोडीची वाटत नाही भीती
पृथ्वी माझ्यासाठी असते मेरी गो राउंड
आणि मी झालेला असतो धावत्या
घोड्यावर स्वार
माझ्यासाठी जग फिरत असतं चक्राकार
आणि मिणमिणता उजेड
होतो संपूर्ण पांढरा.
- नामदेव ढसाळ
🍁🍁🍁
सदर कविता ही 'मी मारले सूर्याच्या रथाचे सात घोडे' या काव्यसंग्रहातील आहे.

.png)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा