परिवर्तनवादी चळवळींचा वर्धमान आलेख : ‘परिवर्तनवादी चळवळी चिंतन आणि
प्रबोधन’
डॉ. अक्षय किशोर घोरपडे.
" जगाच्या पाठीवर कोठेही गेलात तरी दोन प्रवृत्ती
पहावयास मिळतात. एक रचनात्मक ( Constructive ) आणि दुसरी विध्वंसक (Destructive ). रचनात्मक प्रवृत्ती ही सदासर्वदा समाजाचे सामंजस्य कसे टिकून राहील
यादृष्टीने प्रयत्न करीत असते, तर विध्वंसक प्रवृत्ती ही व्यक्ती कोठेही त्याच प्रवृत्तीने कार्य करीत असते, मग ते धार्मिक, सामाजिक, राजकीय असो; प्रत्येक क्षेत्रात या प्रवृत्तीचा वावर असतो. या प्रवृत्तीला जेथे वाव मिळेल
तेथे ती आपला प्रभाव कायम कसा टिकून राहील यासाठी प्रयत्नरत असते. या प्रवृत्तीला
कोणत्या जातीची, धर्माची, पंथाची आवश्यकता ठरत नाही " ( पृ. ७३
)
गेल्या काही
वर्षापासून या दोन प्रवृत्तीपैकी विध्वंसक प्रवृत्ती ही समाजात विलक्षण वेगाने वाढत आहे. विध्वंसक
प्रवृत्तीचे वाढीस लागणे हे सामाजिक अस्वास्थाचे लक्षण असले तरी ही प्रवृत्ती
निर्माण होण्यामागची कारणमीमांसा शोधली जाणे आवश्यक आहे. रचनात्मक व विध्वंसक प्रवृत्ती या एकाच नाण्याच्या
दोन बाजू आहेत. द्वंद्वात्मक असे स्वरूप या दोहोंचे दिसते. या दोन्ही प्रवृत्ती एकाएकी निर्माणही होत नाहीत
तसेच नष्टही होत नाही. कालनिहाय त्यांचे स्वरुप बदलत जाते. या प्रवृत्तींना
सुक्ष्मपणे समजावून घ्यावयाचे असेल, त्यातील चढ-उतार आणि बदलते स्वरूप जाणून घ्यावयाचे असेल तर काळाच्या विविध
टप्प्यावर या दोन्ही प्रवृत्तींचा मागोवा घेणे गरजेचे असते. नुकत्याच प्रकाशित
झालेल्या सुरेश साबळे लिखित ‘परिवर्तनवादी चळवळी चिंतन आणि प्रबोधन’ या ग्रंथातून सुरेश साबळे यांनी रचनात्मक तसेच विध्वंसक प्रवृत्तीची कारणमीमांसा शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे.
सुरेश साबळे हे ‘कवी, समीक्षक, चिंतनशील लेखक व आंबेडकरी चळवळीतील एक सक्रीय कार्यकर्ता म्हणून ते सर्वांना
परिचित आहेत.’ सातत्याने लिहीत राहणे, वर्तमान डोळसपणे समजावून घेणे आणि त्या अनुषंगाने आपले चिंतन लेखनातून मांडणी
हे साबळे यांच्या लेखनीचे खास वैशिष्ट्य आहे. त्यांनी प्रसंगोपात केलेल्या लेखांचा
संग्रह म्हणजे हा सदरचा ग्रंथ. या ग्रंथात एकूण चोवीस लेख असून लेखांची विभागणी
समाज, साहित्य, प्रबोधन अशा तीन विभागात केलेली आहे. या तीनही विभागातील लेखांचे नीट आकलन
केले तर सुरेश साबळे यांच्या लेखनातून निश्चित अशी काही सूत्र सापडतात.
सूत्र
१) ‘चळवळ आली म्हणजे ते
एका विशिष्ट विचाराने, ध्येयाने , तत्त्वज्ञानाने प्रवासास निघालेली असते.’
२) ‘व्यक्ती आणि समूहाशी
चळवळीचे अतूट असे नाते असते.’
३) ‘चळवळीशिवाय जगणारा
समूह आणि व्यक्ती या दिशाहीनतेत वाटचाल करीत असतात.’
४) चळवळीतून प्रबोधन व्हावे.
५) चळवळीतून होणाऱ्या प्रबोधनाचे मुख्य साधन हे साहित्य आहे.
या पंचसूत्रानुसार साबळे यांच्या
एकूण लेखनाचा आढावा घेता येतो किंबहुना घ्यावा लागतो.
सामाजिक अस्वस्थतेच्या रेट्यातून चळवळी निर्माण होतात. विध्वंसक प्रवृत्ती ही
समाज कायम स्थितिशील राहावा यासाठी कायम धडपडत असते. जगण्याचा, स्वातंत्र्याचा, अभिव्यक्तीचा संकोच करून सामान्यजनांना अंकित करणे हा मूठभर लोकांचा अजेंडा
असतो. यात जात, धर्म, वर्ण, वर्ग, वंश आदींच्या
खोट्या प्रतिष्ठेचे अवडंबर मोठ्या प्रमाणात माजवले जाते. तेच अवडंबर लोक
मानसिकतेवर बिंबवले जाते. यासाठी विविध प्रसार माध्यमांचा वापर केला जातो. आजच्या काळातील
सोशल मीडिया हे त्याचे प्रभावी उदाहरण आहे. याआधारे व्यक्तीत
दुही निर्माण करून, त्याच्या मनात
द्वेष पेरून एकसंध समाज हा मानसिक व सामाजिक पातळीवर दुभंगवला जातो. खोट्या प्रतिष्ठेत अडकलेला समाज स्व परीघाच्या पल्याड पाहू शकत
नाही. त्यामुळे अशा अंकित झालेल्या बहुजन समाजातील साधन संपत्तीवर मुठभर विध्वसकांचे वर्चस्व निर्माण होते. येथूनच व्यक्तींचे हीनत्व सुरू होण्याची प्रक्रिया सुरू
होते. ही प्रक्रिया दीर्घकाळ चालणारी असली तरी या व्यवस्थेला प्रतिआव्हान देणारी चळवळ
समाजात रुजली जाते. या प्रति चळवळीला परिवर्तन हवे असते. एका स्थितीतून बाहेर पडून
दुसऱ्या स्थितीत पोहोचणे एवढेच यात अपेक्षित नसते तर परिवर्तन चळवळीत मानवाची आत्मोन्नती व कल्याण अपेक्षित असते. मानवी कल्याणाचा झेंडा हाती घेतलेल्या परिवर्तनवादी चळवळी कुठल्याही एका
जातीत, धर्मात किंवा
वंशापूरतीच अडकून न पडता ती समग्र सामूहिक जीवन हिताचा विचार करते. व्यक्तिचे
स्वातंत्र्य व अभिव्यक्ती उन्नत करण्याबरोबरच व्यक्तिची विशिष्ट मनोअवस्था
घडविण्याकडे चळवळीचा कटाक्ष असतो. " विचार करणारा
विवेकी माणूस निर्माण व्हावा, जो इतरांच्या कल्याणासाठी झटेल! इतरांचे दुःख
पाहून त्याच्या मनामध्ये करुणा निर्माण होईल, इतरांचा आनंद पाहून त्याच्या मनात समाधान निर्माण
होईल. त्यातून विवेकी समाज निर्माण होईल ----- इतरांना सुखी करण्यातला अंगभूत आनंद हा स्वतः वेगळा आनंद असतो " (पृ. २५-२६ ) हा अंगभूत आनंद
निर्माण करणे हे परिवर्तनवादी चळवळीचे ध्येय असते.
सदर ग्रंथात सुरेश साबळे ‘इतरांना सुखी करण्यातला अंगभूत आनंद’ देणाऱ्या तीन परिवर्तनवादी चळवळीविषयी भाष्य करतात. यात भ. बुद्धांची धम्म
चळवळ, म.फुलेंची
सत्यशोधक चळवळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ
या चळवळीच्या अनुषंगाने काही ठोस निरीक्षण ते नोंदवतात. या तीनही चळवळींचे व्यक्ती
आणि समूह यांच्याशी अतूट असे नाते आहे. या तीनही चळवळींची व्यापकता व त्यांना
मिळालेला जनाधार व या चळवळीतील
विचारांची समाजात खोलवर झालेली रुजवण पाहता समाजाशी या चळवळींचे असलेले घट्ट नाते नाकारता येत नाही.
भ. बुद्धाचा " धम्म हा समानतेचा विचार मांडतो, समाजात समतेचा विचार रुजविणे हा सदधम्म होय. माणूस
जन्माने नव्हे; तर कर्माने
श्रेष्ठ अथवा कनिष्ठ ठरतो, हा विचार सदधम्म विचारातून पुढे आलेला आहे. ज्याचे कर्म चांगले तो प्रगती
करणार, त्याचा विकास
होणार, त्याला समाजात मान
मिळणार. केवळ जन्माने कोणाला श्रेष्ठत्व अथवा कनिष्ठत्व मिळता कामा नये. कनिष्ठ स्तरात जन्मलेल्या
माणसाने सदाचार केल्यास त्याला श्रेष्ठत्व प्राप्त होऊ शकते. मानवाचे अशाप्रकारे
मूल्यमापन हे सद्धम्माद्वारे करण्याचे काम बुद्ध सिद्धांताद्वारे मांडण्यात आलेले
आहे. " (पृ.२८) बुद्धाचा हा सदधम्माचा विचार जगभर
पोहोचला. त्याने मानवाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली, विचार करण्याचे स्वातंत्र्य दिले. सम्यक आचरणाच्या
तत्वज्ञानावर उभा असलेला हा विचार सकारात्मक जगण्याचे धडे देतो, म्हणून तो व्यापक आणि लोकप्रिय आहे. कथित कर्मकांड व
धर्ममार्तंडांच्या चौकटीत या धम्माला बसवता येत नाही. ते एक तत्त्वज्ञान व विचार
म्हणून समाजात रुजले गेले. परिवर्तनाचे माध्यम झाले. म्हणून कर्मठ धर्माभिमानी
विध्वंसक वृत्तीने काळाच्या ओघात बौद्ध धम्माचा पाडाव केला. भारतातून हा धम्म
हद्दपार होईल अशी सनातनी कर्मकांडं निर्माण केली गेली. परंतु विसाव्या शतकात डॉ.
बाबासाहेब आंबेडकरांनी या धम्माला पुनरुज्जीवित केले. त्यात ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ हा ग्रंथ लिहून नव्या विचारांची भर टाकली. डॉ.
बाबासाहेब आंबेडकरांना व्यक्तिविकासासाठी बौद्धधम्म आवश्यक होता. म्हणून तर आज " आर्थिक स्तर उंचावलेल्या समूहात अनेक चांगली मंडळी बौद्ध धम्माचे कार्य
करण्यासाठी पुढे येताना दिसत आहेत. इतर जातीसमूहातील विचारवंत, अभ्यासक, संशोधक बौद्ध धम्माचा विचार पडताळून पाहताना दिसतात. जगात आणि भारतात काही
प्रमाणात असा एक वर्ग आहे की, जो कोणताच धर्म मानत नाही. तो वर्ग विज्ञानवादी, भौतिकवादी, सेक्युलर मानला जातो. संशोधन आणि अभ्यासाअंती निर्मळ, नितळ विचारांसोबत केवळ बुद्धत्व तेवढेच हाताशी येते.
रॅशन्यालिटीवर आधारलेली सार्वत्रिक नैतिकता केवळ बौद्ध
धम्माशिवाय इतरत्र शोधूनही कुठेच सापडत नाही म्हणून अवघे वैचारिक जग बौद्ध
धम्माकडे आज कुतूहलाने पाहत आहे. " (पृ. ३२-३३) हे एकीकडे होत
असताना ज्या आंबेडकरी चळवळीने बौद्ध धम्माची पताका उंचावली, त्या आंबेडकरी चळवळीतील " काही राजकीय नेते बौद्ध धम्माच्या एकाही तत्वाचे आचरण न करताही तासनतास
धम्मविषयक संस्कारावर आम जनतेसमोर अवाजवी भाष्य करताना दिसत आहे. " (पृ. ३४) येथे उक्ती आणि कृतीत समन्वय दिसत नाही. परिणामी आंबेडकरी चळवळीतील
बौद्ध धम्म विकासाच्या संदर्भात विचार केला तर " आंबेडकरोत्तर कालखंडात काहीच काम झाले नाही असे नाही; परंतु ते प्रतिक्रियात्मक स्वरूपाचे दिसते, आपापले सवते सुभे घेऊन झालेले दिसते. "( पृष्ठ ३२) हे साबळे यांनी नोंदवलेले निरीक्षण आंबेडकरी चळवळी संदर्भात
अंतर्मुख करणारे तर आहेच, शिवाय बौद्धधम्माच्या प्रसारविषयी उदासीन होत चाललेल्या आंबेडकरी
चळवळीला धम्म कार्याची, प्रसराची आठवण करून देणारेही आहे.
परिवर्तनवादी चळवळीचा इतिहास पाहिला, तर आधुनिक काळातील माणसाची मांडणी करणारे बुद्ध तत्वज्ञान म. फुले यांच्या
सत्यशोधक समाज चळवळीच्या मार्गाने पुढे जात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र
लढ्यात येऊन मिसळते. या मधल्या कालखंडात अनेक पुरोगामी, क्रांतिकारक चळवळी निर्माण झाल्या, त्यांचे योगदान नाकारता येणार नाही. यासर्व
चळवळींच्या विचारांचा सार आपणास आंबेडकरी चळवळीत पहावयास मिळतो. असे असले तरी डॉ.
बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्ध आणि महात्मा फुले यांच्याच चळवळींना
प्रामुख्याने का? पुनरुज्जीवित केले असावे, तर याला महत्त्वाचे कारण आणि यातील समान दुवा असा की, या दोन्ही चळवळीतील मार्गदर्शकांनी स्वतःला सामान्य
माणूस म्हणून संबोधलेले आहे. ईश्वरी अवतार नाकारलेला आहे. " महात्मा फुले यांचा
सत्यशोधक समाज सत्यवर्तन करणारा. परिवर्तन आपले आपणच करायचे असते. ज्ञान व
विज्ञाननिष्ठ नवा विचार समाजाला नव्या प्रकाशमय जगाकडे घेऊन जाण्याचे स्वप्न दिले
होते. जोतीराव फुले सतत म्हणत की, मी स्वतः धर्म संस्थापकही नाही, तर एक सत्यशोधक
आहे. हीच बाब यापूर्वी तथागतांनी ही नोंदविली होती. ते म्हणतात की, मी म्हणतो म्हणून माझे म्हणणे तुम्ही ऐकू नका.
तुम्हाला पटते का? ते आधी ठरवा. नंतर
आचरण करा. " (पृ. ३९) म. फुले यांचा सत्यशोधक समाज हा धर्माची मानसिक
गुलामगिरी नाकारणारा होता. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तिला धर्माचे स्वातंत्र्य
असायला हवे आणि हे स्वातंत्र्य घेऊनच त्यांनी कुटुंबात एकत्रित नांदले पाहिजे असा
क्रांतिकारक विचार त्यांनी मांडलेला होता. ‘परंपरागत समाज नष्ट करा’ असे म्हणत फुल्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली
होती. फुले यांनी मांडलेली ‘निर्मिक’ ही संकल्पना
बुद्धीवादी विचारवंतांना व परिवर्तनवादी चळवळीतील धुरीणांना कायम अडचणीची ठरत आलेली
आहे. फुले हे तर स्वतः निरीश्वरवादी, मग ते ‘निर्मिक’ संकल्पना कशी काय मांडतात किंवा स्वीकारतात? आणि ‘निर्मिक’ म्हणजे नेमके काय
समजायचे? कारण ईश्वर समजले
तर पुन्हा कर्मकांड, पाप-पुण्य, जन्म-पुनर्जन्म याबरोबरच कुठेतरी अलौकिक शक्ती
कार्यरत आहे या बाबी मानणे आलेच म्हणजे मानसिक पंगुत्व आले. म्हणून मग साबळे यावर
सूचक भाष्य करतात. ते म्हणतात, " वाचक आणि
अभ्यासकांनी ‘निर्मिक’ ही संकल्पना त्या त्या काळाची मर्यादा ओळखून
अभ्यासली पाहिजे अथवा विश्लेषण करायला पाहिजे उगाच त्या शब्दाचा बाऊ करू नये " ( पृ. ४०) ही काळाची मर्यादा फुले यांना नव्हती, तर काळाच्या ओघात सृष्टीजन्माची जी विज्ञानवादी तथ्ये
समोर येतील त्यांना ‘निर्मिक’ संबोधले पाहिजे. बुद्धाचा कार्यकारणभाव हा ‘निर्मिक’ आहे. या अनुषंगाने पाहिल्यास फुल्यांचा ‘निर्मिक’ विचार समजावून घेता येतो. काळाची किंवा प्रदेशाची मर्यादा फुल्यांना असती तर
त्यांचा सत्यशोधक समाज हा भारतभर पसरलाच नसता ' समग्र मानवी कल्याणाचा हेतू हाच सत्यशोधक समाजाचा हेतू असल्यामुळे जाती
धर्मातीत मूल्याची निर्मिती सत्यशोधक समाजाच्या मुळाशी होती ' मानवी समतेच्या आणि स्वातंत्र्याच्या विश्वव्यापी जाणिवेने हा सत्यशोधक समाज
भारलेला होता. कालांतराने महात्मा फुले नंतर सत्यशोधक कार्यकर्ते हे सत्ताशोधक झाले ' परिणामी निष्ठेने काम करणाऱ्या सत्यशोधक मंडळींकडे वंचिततेची अवस्था आली ' आणि सत्यशोधक समाजाला घरघर लागली.
परिवर्तनवादी चळवळीत महत्त्वाचा टप्पा असलेल्या आंबेडकरी चळवळीने
पूर्वसुरीतल्या परिवर्तनवादी चळवळींना पुनरुज्जीवित केले. जगाच्या पाठीवर जे जे
शोषित, वंचित घटक आहेत
त्यांचा स्वर मुखर केला; आवाज बुलंद केला. धर्म जातीय शोषणावर आधारलेल्या प्रस्थापित व्यवस्थेला
आव्हान दिले. शेतकरी, आदिवासी, कष्टकरी, कामगार, स्त्रिया यांच्या
उत्थानासाठी आंबेडकरांचा विचार प्रभावी व प्रेरणादायी ठरला. या वंचित घटकांना
विकासाची नवी दिशा मिळाली. या वंचित घटकांच्या संदर्भात सदर ग्रंथात आलेले लेखकाचे
लेख अंतर्मुख व आत्मपरीक्षण करणारे आहेत. केवळ चळवळीच्या चांगुलपणाचे गुणगान साबळे
करत नाहीत तर तटस्थ राहून आंबेडकरी चळवळीचे परीक्षणही करतात. या अनुषंगाने ‘आंबेडकरी चळवळीने सावरणे काळाची गरज’ हा त्यांचा लेख विशेष महत्त्वाचा वाटतो.
प्रबोधन हे चळवळीचे साध्य असते. प्रबोधन घडवून आणावयाचे असेल तर साहित्य हे
त्याचे प्रभावी साधन ठरते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एके ठिकाणी ' मला समाज धारणेकरिता साहित्यिकांची गरज आहे ' असे म्हटलेले होते. कारण साहित्यिक हा संवेदनशील असतो. मानवी भावनांचा उद्गार
तो व्यंजनेने रसिक मनावर ठसवतो. समाजातील दुःख, व्यंग हा त्यांच्या लेखनाचा आशय विषय असतो. म्हणून ' साहित्यिक आणि साहित्याला समाजाचा आणि राष्ट्राचा आरसा संबोधले जाते. ' भारतीय समाजाचा विचार केला तर येथील समाजव्यवस्था ही चातुर्वर्ण्य
जातीव्यवस्थेवर आधारित आहे. या व्यवस्थेत विभिन्न प्रकारचे वंश, वर्ण, जाती-पोटजातींचे समूह, त्यांच्या परंपरा, बोलीभाषा, रूढीनुसार बहुसांस्कृतिक
जीवन जगत आहेत. प्रत्येकाची जातनिहाय संस्कृती भिन्न-भिन्न आहे. एकंदरीत काय तर
साहित्यिकांसाठी व्यापक व विपूल जीवनद्रव्य लेखनासाठी उपलब्ध आहे. परंतु केवळ
मराठी साहित्यिकांचा महाराष्ट्रापुरता जरी विचार केला, तरी मराठी साहित्याची काय स्थितीगती दिसते, तर दलित साहित्याच्या निर्मितीपर्यंत मराठी साहित्य
हे एका विशिष्ट पांढरपेशा सदाशिवपेठी चौकटीत अडकलेले होते. या साहित्याचा बारकाईने
विचार केला, तर " बहुजन हा खलनायक, टिंगलटवाळी आणि
हास्यास्पद असलेली पात्रे या साहित्याने दिली. शुद्र हा तुच्छतेचा, तिरस्काराचा विषय आहे तो हास्यास्पदच रेखाटला पाहिजे
या भावनेतून मराठी साहित्य लेखन केले गेले. " ( पृ. १०७ ) समग्र मानवी
जीवनचित्रण या साहित्यातून कधीही आलेले नाही. जे काही आले ते अपवादात्मक व
सहानुभूतीपूर्ण होते. याला कारण काय तर कुठलाही लेखक हा विशिष्ट जातसमूहातून आलेला
असतो. त्या जातसमूहाच्या पलीकडील जीवन त्याला दिसूच नये असे एक वातावरण
लहानपणापासूनच त्याच्या भोवती निर्माण केले जाते. ‘स्व’ जातीची अस्मिता व संस्कार मनावर बिंबवले जातात. त्यामुळे लेखकाचा दृष्टीकोन मर्यादित होतो, म्हणून मग या ' साहित्य प्रवाहातील लेखक, साहित्यिकांनी वर्णवर्चस्वादाविरुद्ध बोलणारा शूद्र का दिसला नाही?' असा
खोचक पण रास्त प्रश्न विचारणार्या सुरेश साबळे यांना
वरील उत्तर देता येते. कोणीतरी आपल्यापेक्षा श्रेष्ठ व कोणीतरी आपल्यापेक्षा
कनिष्ठ आहे हा विचार मानवाला माणसाकडे माणूस म्हणून पाहू देत नाही. फुले-आंबेडकरी प्रेरणेचे
साहित्य जेव्हा मराठी साहित्यात लिहिले गेले तेव्हा कुठे मराठी साहित्याच्या कक्षा
रुंदावल्या, जाणिवा विकसित
झाल्या. प्रस्थापित लेखकांनाही त्याची दखल घ्यावी लागली व आपल्या लेखनाचा नूर
बदलावा लागला. 'जागतिक पातळीवरचे संदर्भ मराठी साहित्यात केवळ फुले
आंबेडकरी साहित्यिक चळवळीमुळे लाभलेले आहेत ' कारण हे साहित्य स्वानुभवावर आधारलेले तर आहेच, शिवाय शोषित, वंचित घटकांचे दु:ख मांडणारे आहे.
हा झाला एक भाग, साहित्य व्यवहार
हा लेखक आणि वाचक या दोहोंच्या परस्पर आंतरसंबंधावर अवलंबून असतो. दलित साहित्य
निर्मितीपर्यंत मराठी साहित्यही एका विशिष्ट पांढरपेशा सदाशिवपेठी चौकटीत अडकलेले
होते असे जे आपण आधी विधान केलेले आहे त्याचा विचार करता असे साहित्य निर्माण
होण्यासाठी जितका लेखक जबाबदार आहे तितकाच वाचकही त्याला जबाबदार आहे. वाचकांनी
लेखकांना अमुक पद्धतीच्याच जीवनाचे चित्रण साहित्यातून येते या संदर्भात काही प्रतिप्रश्न
का विचारले नाहीत? असे साहित्य का
झिडकारले नाही? याला सुद्धा
आपल्याला वरीलप्रमाणेच उत्तर देता येते. याचा अर्थ असा की, मराठी साहित्य व्यवहार हा एका संकुचित पोकळी आवर्तात बंदिस्त होता. समाजजीवनाशी
त्याची नाळ तुटलेली होती. वास्तविक इतर भाषांतील साहित्य व्यवहार हा तेथिल सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक चळवळीला गती देणारा होता. मराठीत मात्र दलित साहित्य
निर्मितीपर्यंत असे चित्र दिसत नाही. (अपवादात्मक वारकरी व महानुभाव या साहित्य चळवळीना यातून
आपल्या वगळावे लागते.)
वास्तविक साहित्य व्यवहार हा मानवी जीवनातला महत्त्वाचा व्यवहार आहे. " साहित्य ही समाजाची सांस्कृतिक भूक असते. संस्कृती घडविण्यात साहित्याचे
योगदान अत्यंत महत्त्वाचे असते. म्हणून साहित्यावर कुणाचे वर्चस्व आहे, यावरून समाजकारणाच्या वर्चस्वाची पातळी ठरत असते.
साहित्याकडे जो समाज कानाडोळा करतो, त्या समाजातील लोकांमध्ये एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण होत असतो. कारण, त्यांना कोणतीही सांस्कृतिक परंपरा नसते. त्यामुळे
समाजात वैफल्यग्रस्तताही निर्माण होते. म्हणून साहित्य ही समाजाची सांस्कृतिक भूक
भागविण्यासाठी पोषक आणि आवश्यक ठरत असते " ( पृ.१०९-११० ) अव्वल
इंग्रजी कालखंडात आधुनिकतेची कास धरणार्या मराठी साहित्यात म. फुले, लोकहितवादी, बाबा पद्मनजी आदी सन्माननीय
लेखकांचा अपवाद वगळता निर्माण झालेल्या मराठी साहित्याने आपल्या साहित्य संस्कृती परंपरेपासून
नाळ तोडली. वारकरी व महानुभाव संप्रदायाने निर्माण केलेल्या साहित्य परंपरेस
अव्हेरून पुढे मराठी साहित्य परंपरा प्रगत झालेली दिसते. विशिष्ट वर्णातील
लेखकांचेच वर्चस्व मराठी साहित्यावर राहिले त्यामुळे मराठी समाजाची सांस्कृतिक भूक
तर भागली नाहीच, पण त्याचबरोबर
समाजही मानसिक व सामाजिक पातळीवर वैफल्यग्रस्त बनला. वि. स. खांडेकरांची ‘ययाती’ ही कादंबरी हे त्याचे उदाहरण म्हणून नोंदवता येते.
सदर ग्रंथात साबळे यांनी भारतातील तसेच महाराष्ट्रातील कामगार विश्व आणि
कामगार चळवळ या संदर्भात दोन लेख लिहिलेले आहेत. हे लेख महत्त्वाचे असून
त्यासंदर्भात येथे काही भाष्य होणे गरजेचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ०९ नोव्हें. १९४० च्या ‘जनता’ पत्रात असे लिहिलेले आहे की, " जगात कोणत्याही देशात शेतकरी व कामकरी लोकांचीच बहुसंख्या असल्याने खरी
लोकशाही जगात नांदवायची असल्यास कामगारशाहीचा उदय व्हावयास हवा. " त्यातच पुढे त्यांनी असे म्हटले आहे की, कामगारशाही निर्माण व्हावयाची असल्यास तिचा पाया
लोकशाहीच्या तत्त्वावर रचला गेला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ असा की, भारतात निर्माण होणारी कामगारशाही ही लोकशाहीच्या
अनुषंगाने विकसित झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्वतंत्र मजूर पक्ष, मजूर मंत्री म्हणून त्यांनी कामगारांसाठी केलेली
कामे, त्यांच्या हिताचे
घेतलेले निर्णय, आपल्या पाक्षिकातून
सातत्याने कामगार चळवळीचा त्यांच्या जीवनाचा त्यांनी घेतलेला आढावा आणि विविध कामगार
युनियन समोर त्यांनी दिलेली भाषणे पाहता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची कामगार
चळवळीकडे पाहण्याची एक विशिष्ट दृष्टी होती असे लक्षात येते. आणि यादृष्टीने
त्यांचा विकास व्हावा हे त्यांना अभिप्रेत होते. कामगार चळवळीला ही अस्पृश्यतेची
बाधा होती, कामगार नेते
कामगाराविषयी, त्यांच्या
प्रश्नाविषयी, त्यांच्या
समस्यांविषयी पोटतिडकीने बोलत असत. मात्र कारखान्यात अस्पृश्य कामगारांना इतर
सवर्ण कामगारांपेक्षा मिळणाऱ्या हीन वागणूकीविषयी मात्र ब्र शब्दही काढत नसत.
म्हणून बाबासाहेबांनी मागासवर्गीयांसमोर बोलताना स्वावलंबी कामगार चळवळ निर्माण
करण्याचा सल्ला मागासवर्गीयांना दिला होता. ब्राह्मणशाही बरोबरच भांडवलशाही हे
मागासवर्गीयांची दोन मोठे शत्रू आहेत असे प्रतिपादन त्यांनी त्यावेळी केले होते. बाबासाहेबांच्या कामगारविषयक विचारांचा
जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर विचार केला, तर बाबासाहेबांचे विचार; त्यांचे द्रष्टेपण सहज लक्षात येते. जागतिकीकरण हे
भांडवलशाहीचा हात पकडून आलेले आहे. खाजगीकरणाच्या माध्यमातून साधन संपत्ती ताब्यात
घेऊन प्रचंड नफा कमावणे व उर्वरित जनतेस आपल्यावर अवलंबून ठेवणे हे त्याचे साध्य आहे. भारताच्या
दृष्टीने विचार केला तर या भांडवलशाहीला जातीधर्माची व वर्णश्रेष्ठत्वाचीही किनार आहे. या
व्यवस्थेत दलित, अस्पृश्य, भटके -विमुक्त यांना कोणतेच स्थान नाही.
गुणवत्ता असूनही केवळ जातवास्तवाने तो स्पर्धेतून बाद होतो. इथे ब्राह्मणशाहीचा
वरचष्मा पहावयास मिळतो. आरक्षण, कामगार कायदे हे खाजगीकरणात धाब्यावर बसवले जातात. सरकारी सार्वजनिक
क्षेत्रेही तोट्यात जात आहेत असे भासवून त्यांच्या खासगीकरणाचा घाट मोठ्या
प्रमाणात घातला जात आहे. पर्यायाने श्रमिक, कष्टकरी, कामगार जीवन धोक्यात आलेले आहे. हे एकीकडे घडताना पारंपारिक औद्योगीकरणाचे
स्वरूप बदलत आहे. संगणक क्रांती, नॅनोटेक्नॉलॉजीने
उत्पादन क्षेत्रात आमूलाग्र क्रांती घडवली आहे. कल्पनांचा बाजार मांडता येतो हे
लक्षात घेऊन त्या अनुषंगाने सेवाक्षेत्राची निर्मिती मोठ्या प्रमाणात होत आहे.
दूरसंचार, संगणक क्षेत्र, बँकिंग, अन्न- औषधी विक्रीत तसेच इलेक्ट्रॉनिक जगतात रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर करून
उत्पादन वाढविले जात आहे. ' जड यंत्राचा वापर
करून कारखान्यांमधून कामे करणारे कामगार आता नाहीत ' की काय? अशी शंका आता
उद्योग क्षेत्रात निर्माण होते आहे. आणि त्याचबरोबर असा कामगार आता बाद होणार हे
वास्तवही नाकारता येत नाही. या नव्या
उद्योगक्षेत्रात पारंपरिक कामगाराची व्याख्याही बदलली आहे. पूर्वीचा
निळे कपडे घालणारा कामगार जाऊन आयटी क्षेत्रातला लाखोंचे पॅकेज कमावणारा सुट, बुट, टायवाला कामगार उदयास आलेला आहे. या कामगाराला पॅकेजच्या तुलनेत बारा घंटयाहूनही अधिक काम दिले जाते किंवा करून घेतले जाते.
पॅकेजच्या कृतक प्रतिमेत अडकलेल्या या कामगाराच्या आपण कामगार आहोत हे ध्यानीमनीही
येत नाही. त्यामुळे महाराष्ट्रासह भारतातील कामगार चळवळ ही मोडकळीस निघालेली आहे.
आणि यात बळी जात आहे तो दलित, अस्पृश्य, भटक्या-विमुक्तांचा.
यादृष्टीने साबळे यांनी सदर लेखांमधून मांडलेले चिंतन अतिशय चिंतनीय आहे.
सदर ग्रंथातील इतर लेखांचा विचार केला, तर ‘अस्मितादर्श : वाङ्मयीन आणि सांस्कृतिक चळवळ’, ‘समाज विकासाची
प्रेरणाभूमी : माणगाव परिषद’, ‘मराठी वृत्तपत्रसृष्टीतील पाक्षिक : मूकनायक’, ‘व्यापक सामाजिक संदर्भ लाभलेली डॉक्टर बाबासाहेबांची बुलढाणा जिल्हा भेट’ इत्यादी लेख हे परिवर्तनवादी चळवळीतील महत्त्वाच्या
थांब्यांचे गौरवीकरण करणारे आहेत. त्यातून त्यांनी परंपरेचा धावता आढावा घेऊन
वर्तमान परिस्थितीत त्यांची असलेली आवश्यकता प्रतिपादन केलेली आहे. या लेखांचे
स्वरूप तपशीलात्मक असले तरी त्यातील काही नोंदी निश्चितच दखल घेण्याजोगे आहेत.
यासंदर्भात यातीलच ‘भारतीय मानस : मुस्लिम समाज’ या लेखात त्यांनी मुस्लिम मानस शोधतांना काश्मीरच्या
इतिहासाचा धांडोळा घेतला आहे. यात जर हिंदू धर्ममार्तंडांनी १४ व्या शतकात दूरदृष्टीपणा दाखवला असता तर आज
काश्मीरमध्ये ही परिस्थिती जन्मास आली नसती. अशी मांडणी साबळे यांनी केलेली आहे ती
निश्चितच नोंद घेण्याजोगी आहे.
‘मानसिक व सामाजिक
परिवर्तन आणि शिवधर्म’ या लेखात त्यांनी
शिवधर्माच्या संदर्भात काही एक मांडणी केलेली आहे. हा लेख त्रोटक आहे. यात त्यांना
अधिक भाष्य करण्यासाठी निश्चितच वाव होता परंतु फारशा दीर्घपणे त्यांनी शिवधर्माची
चिकित्सा केलेली नाही. शिवधर्म हा फुले - आंबेडकरी विचार
प्रेरणेतून जरी निर्माण झालेला असला तरी अजूनही शिवधर्माचे म्हणावे तसे घट्ट नाते फुले-आंबेडकरी
चळवळी सोबत जोडले गेलेले नाही आणि भविष्यातही तशी शक्यता धूसर दिसते हे वास्तवही
नाकारता येणार नाही. यादृष्टीने विचार करता साबळे यांनी या संदर्भात अधिक विवेचन
केले तर हा लेख एक महत्त्वाचा संशोधन लेख ठरेल.
सदर ग्रंथात त्यांनी ‘शिवशक्ती आणि भीमशक्ती’ यांच्या युतीच्या संदर्भात मध्यंतरी चाललेल्या प्रयोगाबद्दल स्वतंत्रपणे आपले
राजकीय मत व्यक्त केले आहे. आज या कालखंडाचा विचार केला तर शिवशक्ती आणि भीमशक्ती
युतीचा विचार हा गैरलागू आहे. किंबहुना भिमशक्तीचा विचार केला तर एकंदरीत आपली
राजकीय ताकद ही विखुरलेली आहे. समाजजीवनावर प्रभाव पाडेल असा सर्वव्यापी नेता दलित
समाजात तरी आज दिसत नाही. त्यामुळे जे काही नेते दिसतात त्यांची ताकद ही त्यांच्यापुरती
मर्यादित आहे. आणि अशा नेत्यांनी कोणाशी युती करावी किंवा करू नये हा त्यांच्या
राजकीय स्वार्थाचा प्रश्न असतो. आपले प्रश्न, समस्या सोडवण्यासाठी संसदेत जर आपले प्रतिनिधीत्व
पाठवायचे असेल तर त्यासाठी जनतेने ठामपणे भूमिका घेणे गरजेचे असते, वास्तविक जनताही कुठल्याच एका नेत्याच्या पाठीशी
पूर्णपणे उभी राहत नाही आणि त्याला पाठिंबा देऊन निवडूनही आणत नाही. राजकीय
गणिताचा विचार केला तर मतपेटीत आपले तितकेसे मत दिसून येत नाही म्हणून सध्यातरी
अशा युतीचा प्रस्ताव किंवा त्यावरील आपले भाषण गैरलागू ठरते.
सुरेश साबळे हे व्रतस्थ चिंतक म्हणून ओळखले जातात. वैचारिक लेखनात त्यांनी
स्वतःची नाममुद्रा उमटविली आहे. त्यांचे लेखन प्रसंगनिहाय असले तरी स्पष्ट, प्रवाही व तटस्थ असते. आपले मत मांडताना ते
पूर्वसुरींचा आदर व्यक्त करून कुठलीही भीडभाड न ठेवता मत प्रतिपादन करत असतात. त्यांचा हा स्पष्टवक्तेपणा सदर ग्रंथात
पदोपदी जाणवतो. वर्तमानाचे संदर्भ हे त्यांच्या लेखनाला असल्यामुळे त्यांच्या
लेखनाचे मूल्य वर्धित होते. परिवर्तनवादी चळवळीच्या संदर्भात अपेक्षित असलेल्या बहुविध विषयांना
त्यांची लेखणी स्पर्श करते, त्याची मूलभूत मांडणी करते. एका विशिष्ट विषयाला धरून त्यांनी आपली लेखणी
झिजवली तर निश्चितच स्वतंत्रपणे येणारे त्यांचे लेखन वैचारिक आनंद देईल. सदर ग्रंथाच्या
माध्यमातून गांभीर्याने लेखन करणारा लेखक म्हणून मराठी साहित्यविश्वात त्यांची
प्रतिमा निश्चितच वर्धमान होईल यात काहीही शंका नसावी.
परिवर्तनवादी चळवळी
चिंतन आणि प्रबोधन- सुरेश साबळे
अथर्व पब्लिकेशन, जळगाव, प्रथमावृत्ती २४ सप्टेंबर २०२१,
पृष्ठ-२१२, मूल्य-३००/-


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा