बुधवार, ८ ऑक्टोबर, २०२५

क्षितिज जसे...........अलगद भरूनी यावे

 

सांजवेळ : मानवी मनाची घालमेल

अक्षय किशोर घोरपडे.

कवी ग्रेस यांची कविता

 

क्षितिज जसे दिसते

तशी म्हणावी गाणी

देहावरची त्वचा आंधळी

छिलून घ्यावी कोणी

 

गाय जशी हंबरते

तसेच व्याकुळ व्हावे

बुडता बुडता सांजप्रवाही

अलगद भरूनी यावे.

                  - ग्रेस

 

कविवर्य ग्रेस यांची ही लोकप्रिय कविता. ही कविता तरल मानवी भाव संवेदनांची अभिव्यक्ती करते. या कवितेची अनुभूतीही हृदयाच्या अस्तरापर्यंत जाऊन पोहोचते. मराठी समीक्षकांनी कवी ग्रेस यांच्या कवितेचे मूल्यमापन करताना या कवितेची भावाभिव्यक्ती ही सांजसमयीच्या भावाभिव्यक्तीशी समांतर आहे असे म्हटलेले आहे. आणि यात तथ्यही आहे कारण त्यांचा पहिला काव्यसंग्रह हासंध्याकाळच्या कविताया शीर्षकाने प्रकाशित झालेला आहे. आणि ही कविता याच काव्यसंग्रहातील आहे. कवि ग्रेस यांची कविता आकलनास जड, दुर्बोध गुढ वाटत असली तरी ही कविता वाचताना, ऐकताना व्यक्तीला भावविभोर करते. त्याच्या मनात आशयाचे तरंग उमटवते. एक विशिष्ट अध्यात्मिक अनुभूतीचा अविष्कार घडवते म्हणून ही कविता सहजपणे जिभेवर  रुळते.

 

दिवस मावळणे आणि रात्र उगवणे यादरम्यानच्या काळात संध्यासमयाचा प्रहर असतो. धड उजेडही नाही आणि अंधारही नाही. तांबडी पिवळसर लालीमा आकाशावर पसरलेली असते. मनात विचारांचे द्वंद असते. भौतिक पातळीवर विचार केला तर हा संध्यासमय किंवा संध्याकाळ आपण दररोज अनुभवतो परंतु जीवनाच्या धकाधकीत आपले त्याकडे फारसे लक्ष जात नाही. दररोज संध्याकाळ उगवते आणि मावळते आपण मात्र निर्विकार असतो. आपल्या जंजाळात गुंग असतो. आधीभौतिक पातळीवर जेव्हा आपण संध्या समयाचा विचार करतो तेव्हा संध्यासमयात मनाची होणारी घालमेल व्यक्तीच्या जेव्हा भावना दुखावतात; तो अस्वस्थ होतो तेव्हा अनुभवाला येते. व्यक्तीला उजेडही नको असतो आणि अंधारही नको असतो त्याला फक्त एकटेपणा हवा असतो. अशावेळी सकारात्मक आणि नकारात्मक या दोहोच्या सीमारेषेवर आत बाहेर व्यक्तीच्या मनाचे चलन वलन होत असते. निश्चित अशी कोणतीच प्रतिक्रिया त्याच्या मन:पटलावर उमटत नाही. मनाच्या हिंदोळ्यावर व्यक्ती झोके घेत असतो तेव्हा त्याला संध्यासमय हा अस्वस्थ, गूढ आणि हवाहवासा वाटतो.

 

        प्रत्येकाला क्षितिज दिसते आणि प्रत्येकाचे स्वतंत्र क्षितिज असते. क्षितिज हे मृगजळाप्रमाणे असते. ते फक्त दिसते परंतु आपण त्यापर्यंत पोहोचू शकत नाही. हे खरे असले तरी क्षितिज हे एका दीपस्तंभासारखे व्यक्तीला मार्ग दाखवणारे असते. व्यक्तीने काही ध्येय उद्दिष्टे ठरवलेली असतात आणि ती गाठण्यासाठी तो सतत प्रयत्नरत असतो हेच त्याचे क्षितिज असते. या क्षितिजाजवळ पोचेपर्यंत एक नवे क्षितिज त्याला खुणावत असते, म्हणून कवी म्हणतो, क्षितिज जसे दिसते तशी म्हणावी गाणी ही गाणी व्यक्तीच्या अंतर्मनातून उमटलेली असतात. क्षितिज गाठण्यासाठी ही गाणी त्याला प्रेरणा देत असतात. या क्षितीजाकडे व्यक्ती मार्गस्थ होतो तेव्हा त्याच्या अंतर्मनात उमलणारी वेदना ही त्याच्या देहावरची आंधळी त्वचा जणू काही कोणी छिलून घेत आहे असे त्याला जाणवते हा अंतर्मनाचा संघर्ष असतो. राजपुत्र सिद्धार्थाने  राजमहालातले ऐश्वर्य सोडून ज्ञान मिळवण्यासाठी निघताना जेव्हा पहिले पाऊल टाकले असेल तेव्हा ते पहिले पाऊल उचलताना त्याच्या मनाची जी काही घालमेल झाली असेल ती घालमेल म्हणजे या कवितेचा आशय होय.

 

संध्यासमयीच्या घालमेलीतून जेव्हा क्षितिजाकडे आपण मार्गस्थ होतो तेव्हा जीवनाचे आणखी एक सूत्र कवी दुसऱ्या कडव्यातून मांडतो. कवी म्हणतो, गाय जशी हंबरते तसेच व्याकुळ व्हावे.” गाईच्या हंबरण्याप्रमाणे माणसाने व्याकुळ व्हावे गाईचे हंबरणे ही सुद्धा एक अस्वस्थता आहे. ही अस्वस्थता गाईला आपले वासरू दिसत नाही त्यातून निर्माण झालेली आहे, म्हणजेच ती एक मनाची घालमेल आहे. या घालमेलीतून हे हंबरणे येते. यात व्याकुळता आहे. मनात अनिश्चितता आहे. विचारांचे द्वंद्व आहे. येथे पुन्हा मनाची संध्याकाळ अनुभवता येते. या हंबरण्याला मायेची किनार आहे. ओढ आहे. ही ओढ एखाद्याला आसक्ती वाटू शकते परंतु आसक्तीच्या पलीकडची करुणा त्यात सामावलेली, दडलेली आहे. ही करुणा निस्वार्थ, निर्व्याज आणि निर्मळ असते आणि म्हणून मग क्षितिजा जवळ  पोहोचल्यावर माणसाने असेच करुणामय व्हावे असे कवीला वाटते. म्हणून तो म्हणतो,बुडता बुडता सांजप्रवाही अलगद भरूनी यावे.” माणसाचे असे अलगद भरून येणे म्हणजे करूणेने ओतप्रोत होणे होय.

 

ग्रेस यांच्या या कवितेचे वैशिष्ट्य असे की, ते परस्परविरोधी अशा दोन भावनांचे चित्रण करतात. कवितेतल्या पहिल्या कडव्यातील पहिल्या दोन ओळीत कवी उगवण्याचा भाव व्यक्त करतो, तर दुसऱ्या दोन ओळीत मावळण्याचा भाव व्यक्त करतो. कवितेतील दुसऱ्या कडव्यातील पहिल्या दोन ओळीत कवी मावळण्याचा भाव व्यक्त करतो तर दुसऱ्या दोन ओळीत उगवण्याचा भाव व्यक्त करतो. सूर्याचे उगवणे आणि मावळणे ही  निरंतर प्रक्रिया आहे तसेच मानवी मनात आशा निराशेचे भाव उगवत आणि मावळत असतात. एखादी विशिष्ट घटना घडली किंवा दुःख वाट्याला आले किंवा अस्वस्थता वाढली की  व्यक्तीच्या मनात प्रतिक्रिया उमटत असतात. या प्रतिक्रिया सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही असतात. एकाच वेळी व्यक्ती सकारात्मकतेतूनही विचार करतो आणि त्याच वेळेला नकारात्मकतेतूनही विचार करतो तो ठरवू शकत नाही की आपल्याला नेमके काय करायचे आहे आणि अशा हिंदोळ्यावर तो झुलत असतो. व्यक्तीचे असे  झुलणे त्याला अस्वस्थ करत असते. त्याच्या मनाची घालमेल वाढवत असते. शेवटी तो कुठल्यातरी निष्कर्षावर पोचतोच परंतु या निष्कर्षा प्रत पोचण्याआधी त्याच्या मनाची जी घालमेल झालेली आहे, जी ओढाताण झालेली आहे त्या ओढाताणीतून त्या घालमेलीतून त्याने जणू काही आगीचा समुद्र पार केलेला असतो.   या घालमेलीतून अनुभवलेल्या वेदनेचा प्रवास व्यक्तीला माणूस म्हणून घडवतो. व्यक्तीचे माणूस होणे म्हणजे ‘अलगद भरुनी येणे’. म्हणूनच ही कविता व्यक्तीच्या माणूस होण्याच्या घालमेलीचे चित्रण करणारी कविता होय.

 

टीप : कवी ग्रेस यांच्या कवितेवरील रसग्रहण आवडल्यास लेखाला प्रतिक्रिया द्या. Comment करा.

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत.

हा ब्लॉग जास्तीत जास्त वाचकांपर्यंत  शेअर करा.

1 टिप्पणी:

  1. छान पद्धततीने मांडणी केली आहे. सर द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी खूपच उपयोगी आहे.

    उत्तर द्याहटवा

जागतिकीकरण आणि आदिवासी

  जागतिकीकरण आणि आदिवासी डॉ . अक्षय किशोर घोरपडे. ·        गोषवारा  (Abstract) :- १९९० नंतरचा कालखंड हा भारतीय समाज जीवनात फार मोठा सा...