१९८० नंतरची मराठी कविता
डॉ. अक्षय घोरपडे.
समाज हा परिवर्तनशील असतो किंबहुना परिवर्तन हे सृष्टीचे अविभाज्य अंग आहे. परिवर्तनाद्वारे
समाज कूस बदलतो. काळाच्या प्रवाहात समाजात अनेक स्थित्यंतरे येत असतात. या
स्थित्यंतराचा प्रभाव मानवी भौतिक जीवनावर पडत असतो. या स्थित्यंतराची नोंद
साहित्यात प्रवाहरूपाने नोंदवली जात असते. या बदलत्या स्थित्यंतराच्या द्वंद्वात
अडकलेल्या संस्कारक्षम संवेदनशील मनाची ओढाताण ही प्रामुख्याने कवितेतून प्रखरपणे अभिव्यक्त
होत असते. कवितेची व्याख्या करताना डॉ. गंगाधर पानतावणे असे म्हणतात की, “अस्तित्वाला
अस्मितेचा स्पर्श झाला की मने गदगदून उठतात आणि मग संवेदनशील मनातून कवितेला आकार
येतो.”
विसाव्या शतकातील शेवटच्या दोन दशकात म्हणजेच १९८० नंतर एकंदर मराठी कवितेचे स्वरूप, पार्श्वभूमी किंवा पर्यावरण पाहावयाचे असेल
तर आपल्याला या कालखंडातील सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक स्थित्यंतरांचा प्रभाव
हा पाहावा लागतो. त्याची स्थितीगती पाहावी लागते. या कालखंडात झालेले बदल आणि या
बदलांचा मानवी जीवनावर नेमका काय परिणाम झालेला आहे याचीही नोंद घ्यावी लागते.
या कालखंडातील सामाजिक पर्यावरण जर आपण पाहिले तर आपल्याला असे दिसते की,
आधुनिक विज्ञानाने मानवी जीवनाचे आरोग्य, भौतिक गुणवत्ता यास अधिक उंची प्राप्त करून
दिली असली तरी समाजव्यवस्थेत ठाण मांडून बसलेले प्रश्न तसूभरही या कालखंडात कमी
झालेले नाहीत. याउलट अनेक समस्या व प्रश्नांनी या कालखंडातील समाज घेरलेला दिसतो. या
कालखंडाचा विचार केला असता या कालखंडातील काही महत्वाच्या घटना प्रसंगाची नोंद
घ्यावी लागते. नामांतराचा सुटलेला प्रश्न,
दलित नेतृत्वाने केलेला अपेक्षाभंग, बाबरी मशिदीचे प्रकरण, गोध्रा दंगल, मूलतत्त्ववादी
संघटनांची मुजोरी, पर्जन्याचा खालावलेला स्तर, कृत्रिम पाऊस, संवेदनशील मनाला पीळ पाडणाऱ्या
शेतकऱ्यांच्या आत्महत्या, मीडिया व संगणकाचे वाढते वर्चस्व, जागतिकीकरणाची सुरुवात
इत्यादी समाज जीवनावर खोलवर परिणाम करणाऱ्या घटना प्रसंगाचा, सामाजिक
स्थित्यंतरांचा प्रभाव या कालखंडातील मराठी कवितेवर पडलेला दिसून येतो.
१९८० नंतरच्या मराठी कवितेचे स्वरूप पाहण्यापूर्वी
आपल्याला हे जाणून घ्यावे लागते की, १९५०-६० नंतर मराठी साहित्यात निर्माण
झालेल्या लघु नियतकालिकांच्या चळवळीने आणि दलित साहित्य, ग्रामीण साहित्य
प्रवाहांनी मराठी कवितेची पारंपारिक चौकट
मोडून प्रायोगिक नवकवितेचा आविष्कार घडवला. मराठी कवितेचा चेहरा मोहरा बदलून टाकला.
पारंपरिक मराठी कवितेची ही चौकट मोडण्यात प्रामुख्याने दिलीप चित्रे, अरुण कोलटकर,
नामदेव ढसाळ, नारायण सुर्वे, केशव मेश्राम, चंद्रकांत पाटील, तुलसी परब, सतीश
काळसेकर, भालचंद्र नेमाडे, राजा ढाले, मनोहर ओक, वसंत आबाजी डहाके, गजमल माळी,
प्रकाश कामतीकर, नागनाथ कोतापले, मधुकर केचे, ना.धो.महानोर, यशवंत मनोहर, गुरुनाथ
धुरी इत्यादी कवी आघाडीवर होते. या कालखंडात समर्थ आशयाभिव्यक्ती व प्रायोगिक रचनातंत्राद्वारे
मराठी कवितेची झालेली मांडणी आपल्याला दिसून येते. (यातही नामदेव ढसाळ या कवीचा
अपवाद वगळता बाकीच्या बऱ्याचशा कवींनी जे काही रचनातंत्र निर्माण केलेले होते.
त्या रचनातंत्रात फारसा प्रायोगिक बदल न करता ते त्याच पद्धतीच्या कवितेत अडकले.
तीच ती कविता गिरवत राहिले. त्यामुळे साचेबद्धपणा या कवितेत येऊ लागला. नामदेव
ढसाळ यांनी मात्र आपल्या कवितेतून अभिव्यक्तीचे विविध प्रयोग या कालखंडात केले.
त्यांची कविता रचनेच्या आकृतीबंधात अडकली नाही.) इथे एक गोष्ट मान्य करावी लागते
ती अशी की, या कवींच्या काव्यलेखनाचा प्रभावच एवढा जबरदस्त होता की त्या नंतरच्या
काव्यलेखन करणाऱ्या पिढीने याच कवितेची शैली गिरवली. या कवींच्या प्रभावातून
नंतरची पिढी सुटू शकली नाही. असे असले तरी या कवितेचा आणि या कवींचा प्रभाव पचवून
स्वतंत्र काव्यलेखनाची शैली निर्माण करणारे कवी या कालखंडात निर्माण झाले का? आणि निर्माण
झाले असतील तर त्यांच्या लिखाणाचे स्वरूप कसे आहे ? त्यांनी १९८० नंतरच्या
कालखंडाला न्याय दिला का? याचा ही शोध घ्यावा लागतो. कारण या कालखंडाचे मूल्यमापन
करावयाचे असेल तर या कालखंडात निर्माण झालेल्या कवींची आणि त्यांच्या रचनांची नोंद
घेणे गरजेचे आहे. आणि जे काही कवी या कालखंडात निर्माण झालेले आहेत आणि ज्यांनी
स्वतंत्र शैली निर्माण केली त्यांचा विचार येथे आपण करणार आहोत. अशा कवींच्या
माध्यमातूनय या कालखंडातील सामाजिक जीवनाची पार्श्वभूमी समजून घेता येते.
जेव्हा आपण या कालखंडाचा विचार करतो तेव्हा असे आढळते की, आजही मराठी कविता १९६० नंतर निर्माण झालेल्या मराठी कवितेच्या कोशाबाहेर फारशी पुढे गेलेली दिसत नाही.
कविता उदंड जाहली पण गुणात्मक उंचीत होणारी वाढ झाली नाही. या कालखंडातील मराठी
कवितेत परिवर्तन होत आहे; अवस्थांतराच्या मार्गावर ती आहे. आशयाच्या संदर्भात विचार
केला तर आशयाचे संदर्भ बदलले पण रचनातंत्राच्या बाबतीत फारसा बदल दिसून येत नाही. हे एक निरीक्षण या कालखंडातील कवितेचे नोंदवता येते.
कलावंताच्या सर्जन प्रक्रियेत काळाचा महत्त्वाचा वाटा असतो. प्रत्येक काळाचे
स्वतंत्र संदर्भ असतात. कलावंताची होणारी जडणघडण ही काळाच्या संदर्भात विचारात
घ्यावी लागते. वर्तमान कालखंडात निर्माण होणारे प्रश्न कलावंताच्या सर्जनशीलतेवर
परिणाम घडवत असतात. १९८० नंतरच्या कालखंडाचा विचार केला तर या
कालखंडातील सामाजिक परिस्थितीचा रेटाच इतका जबरदस्त होता की, या कालखंडाच्या
मागेपुढे लिखाण करणारे कवी या परिस्थितीच्या रेट्यातून सुटू शकलेले नाहीत. हिरव्या
बोलीद्वारे चैतन्यमय ग्रामीण जीवन शब्दांकित करणाऱ्या ना. धो. महानोरांना सुद्धा
“मोडलेल्या माणसांचे दुःख ओले झेलताना
त्या अनाथांच्या उशाला दीप लावू झोपताना”
असे म्हणावेसे वाटले. म्हणजेच मोडलेल्या माणसाच्या महानोरांसारखा शृंगारिक
कवीही दुःखाने व्यथीत झाला. शृंगारिक ग्रामजीवनाचे चित्रण साकारणारे महानोरांसारखे
कवी जेव्हा या परिस्थितीच्या रेट्यातून सुटू शकलेले नाहीत तेव्हा या द्विदशकात
निर्माण झालेल्या मराठी कवितेचे स्वरूप सहज आकलनास येते. सामाजिक, राजकीय, आर्थिक
व्यवस्थेत मानवी मूल्यांच्या घसरणीचा सूर प्रामुख्याने या कालखंडातील कविता प्रकट
करते म्हणून की काय या कालखंडात सकस प्रेम कविता वाचावयास मिळत नाही. हे आणखी एक निरीक्षण या कालखंडातील कवितेचे नोंदवता येते.
दलित कवितेच्या संदर्भात या कालखंडाचा विचार
केला तर या कालखंडात दलित कविता विपुल प्रमाणात लिहिल्या गेली. एकीकडे प्रस्थापित
व्यवस्थेकडून दलितांवर होणाऱ्या अत्याचारांच्या, बहिष्कारांच्या घटनांनी व्यथित
झालेल्या दलित कवींचा भावकल्लोळ त्यासाठी स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांवर
आधारित जातीवर्णविहीन समताधिष्ठीत समाजरचना स्थापन करण्यासाठी घेतलेल्या विद्रोही
भूमिकेचा उत्कट आविष्कार तर दुसरीकडे वर्तमान दलित समाजजीवनाचे अंतर्मुख होऊन केले
जात असलेले चिंतन या कालखंडातील कवी किशोर घोरपडे (दलदल), अरुण काळे(रॉकगार्डन, सायरनचे शहर), लोकनाथ यशवंत(आता होऊन जाऊ द्या
!,आणि शेवटी काय झाले?), राजेंद्र सोनवणे (माणूस नावाचे गाव), राम दोतोंडे(रापी जेव्हा लेखनी बनते), लहू कानडे (क्रांतीपर्व, टाचाटीभा), प्रकाश मोगले (कावड, दंभस्फोट, धम्मद्रोही), महेंद्र गायकवाड (काजव्यांच्या खांद्यावर संगिनी, ओलीस ठेवलेली
माणसे) इत्यादी कवींच्या कवितांमधून प्रकट होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या
महापरिनिर्वाणानंतर सर्व दलित समाजाला पुढे नेऊ शकेल असा एकही नेता निर्माण झाला
नाही. जे काही दलित नेते आहेत त्यांनी सत्तेच्या राजकारणासाठी वेगवेगळ्या चुली
मांडल्या. दलित समाजातील उच्चशिक्षित मंडळींनी सुरक्षित पांढरपेशीय जीवनात जगण्यास
केलेली सुरुवात यावर टीकेचा सूर या कालखंडातील कवींच्या कवितेतून पाहावयास मिळतो.
किशोर घोरपडे ‘पोबारा’ या कवितेत म्हणतात,
“काळोखाची धास्ती
म्हणूनच सूर्याबरोबर दोस्ती केली
त्यावर भर टाकून मी
बेफिकार – निर्धास्त.
दूरवर काळोखी सळसळीचा
तोच तो भास
बघतो तर
सूर्यानेच पोबारा केला.”
दलित नेतृत्वावर भाष्य करणारी त्यांची ‘नवा खेळ’ ही कविताही महत्वाची आहे. राजेंद्र
सोनवणे सारखा कवी म्हणतो की,
“चळवळी तुम्ही करू नका
एकतर त्या मंत्रालयात जातात
नाहीतर लयास जातात.”
उदा.
दाखल दिलेल्या या कवितेच्या उदाहरणावरून या कालखंडातील दलित कवितेची पार्श्वभूमी
लक्षात येते. आणि सामाजिक परिस्थितीचा अंदाज येतो.
ग्रामीण साहित्याच्या दृष्टीने हा कालखंड ग्रामीण साहित्याला अधिकाधिक
वास्तवाभिमुख करणारा ठरला आहे. शृंगाराचा पडदा बाजूला सारून मराठी ग्रामीण
कविता माळरानावरच्या भेगाळलेल्या जमिनीचे दुःख प्रकट करू लागली. फाटक्या
कास्तकऱ्याचे दुःख वेशीवर टांगणाऱ्या म. फुले यांच्या चळवळीशी तिचा नातेसंबंध अधिक
दृढ होताना दिसतो. बारा महिने चोवीस तास माळरानावर राबणाऱ्या कास्तकऱ्याचे कंबरडे
मोडणारा हा कालखंड कमी प्रमाणात पडणारा पाऊस, दुष्काळी परिस्थिती, खुली आर्थिक
व्यवस्था, जागतिकीकरणाचे वारे, कष्टाच्या प्रमाणात शेती उत्पादनाला न मिळणारा
बाजारभाव, ग्रामीण भागातील राजकारणाचे बदललेले स्वरूप, सुशिक्षित ग्रामीण भागातील
तरुणांची भांडवलदारी व्यवस्थेत होत असलेली कुचंबणा, धरणे उभी राहिली पण शेतीला
पाणी नाही, वर्षभर शेतात राब राब राबणे महागडी बियाणे वापरणे ऐनवेळी पावसाने
दिलेला दगा म्हणून आर्थिक चणचण, आर्थिक फटक्यातून सावरण्यासाठी कर्ज घेणे, कर्ज फेडीतून
मुक्त होण्यासाठी शेतीत अधिक श्रम करणे; परंतु पावसाचा पुन्हा मागचाच गिरवलेला पाढा
या आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर आत्महत्येशिवाय दुसरा मार्ग शिल्लक
नव्हता. कर्नाटक, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि इतर प्रांतातील काही शेतकऱ्यांनी
व्यथांच्या या दुष्टचक्रव्यूहातून मुक्त होण्यासाठी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला.
कास्तकऱ्यांच्या कारुण्यमय व्यथांवर सरकारी पातळीवर उपाययोजनांच्या संदर्भात होत
असलेली उपेक्षा बघून संवेदनशील मनाच्या लोकांनी हळहळ व्यक्त केली. पण
सहानुभूतीच्या कुंपणापलीकडे कोणाचीच धाव गेली नाही. स्वतःच्या मेहनतीने मशागतीने
बहुसंख्य समाजाचे जीवन जगवणारा जेव्हा स्वतःचेच जीवन संपवण्याचा मार्ग पत्करतो
तेव्हा अशा समाजाचे भविष्य निश्चितच उज्वल नसते.
शेतकऱ्यांच्या कारुण्यमय व्यथांचे शब्दबद्ध
चित्रण या कालखंडातील कविता करते. रानातला सूचक शृंगार, चैतन्यपूर्ण निसर्गवर्णने
बाजूला सारून वर्तमान ग्रामीण जीवनातील वास्तव, ग्रामव्यवस्थेचे बदलते स्वरूप
यांचा शोध या कालखंडात उदयाला आलेली ग्रामीण कवींची नवी पिढी अधिक सशक्तपणे घेत
आहे. ‘काट्याकुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकड चाल माझ्या दोस्ता’ असे
कवी इंद्रजीत भालेराव म्हणतात. या कालखंडात त्यांचे आम्ही काबाडाचे धनी, टाहो, पेरा, कुळंबीणीची कहाणी, भूमीचे मार्दव इत्यादी काव्यसंग्रह प्रसिद्ध
झालेले आहेत. या शिवाय पुढील उत्तम कोळगावकर (जंगलझडी, तळपाणी) , नारायण सुमंत (रानभरी, सातबारा), प्रकाश होळकर (कोरडे नक्षत्र),प्रदीप पाटील (आत्मसंवाद, अंतरीचा भेद), जगदीश कदम (रास
आणि गोंडर), गणेश देशमुख(गावच्या कविता), श्रीकांत देशमुख (बळीवंत)
या ग्रामीण कवींनी शेतकऱ्यांच्या दु:खाचे आणि भावजीवनाचे यथार्थ चित्रण केलेलं
आहे.
मुख्य प्रवाहातील कवींच्या संदर्भातही या कालखंडात नवे प्रश्न, नव्या समस्या
निर्माण होत असलेल्या दिसतात. समकालीन वर्तमान परिस्थिती संवेदनशील माणसाचे
भावविश्व अनुभवसमृद्ध करत असते. मनस्वी कलावंताच्या सर्जनप्रक्रियेची जडणघडण अनुभव
समृद्धीतून साकारते. वर्तमान समाजाच्या गुंत्यात गुंतलेला मध्यमवर्गीय कलावंत
आत्मपरीक्षणाचा, आत्मविश्लेषणाचा मार्ग स्वीकारतो. वर्तमानाचा वेध घेता घेता
भविष्याचा ही विचार करू लागतो. कलावंत म्हणून जगताना व्यवहारवादी समाजव्यवस्थेकडून
मिळणारा प्रतिसाद कलावंताचे अंतर्मन सैरभैर करतो. तो त्वेषाने संघर्षास उद्युक्त
होतो पण स्वतःच्या मर्यादांची असलेली जाणीव कलावंताची आंतरिक घुसमट तीव्र करते.
सजीव म्हणून जगताना मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी करावी लागणारी कसरत त्याचबरोबर
वास्तवाच्या पलीकडे असणारे कलावंताचे स्वतंत्र कलाविश्व या द्वंद चकमकीतून या
कालखंडातील कविता आलेली दिसते. त्याचबरोबर या कालखंडात वाढलेला मूलतत्त्ववाद, वाढलेले
यांत्रिकीकरण, व्यक्तिवादाचा अतिरेकी संकोच, इमारतींची वाढलेली संख्या, सिमेंटचे
वाढलेले जंगल, घड्याळाच्या काट्यावर चालणारे
जीवन, खुली अर्थव्यवस्था, जागतिकीकरण, महागाई, मध्यमवर्गीय जीवनाचा होत असलेला
संकोच, फास्ट फूड संस्कृतीचा होणारा उदय या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे मध्यवर्ती
प्रवाहातील कवींनी प्रेम कवितेकडे पाठ फिरवलेली दिसते. वास्तविक जीवनाकडे बघण्याचा
कवीचा कल हा काव्यक्षेत्रात काल परिस्थिती
सापेक्ष असतो आणि म्हणून मग जेंव्हा कवी या सर्वांकडे पाहतो तेंव्हा अस्वस्थपण
त्याला जाणवते. या अस्वस्थेतून होणाऱ्या मानसिक कुचंबनेचे चित्र या कालखंडातील भगवान
ठग (क्षणकाव्य, आत्मपक्षी, युद्ध, सर्व काही मातीच, वाळवीची कुळे), बळवंत धोंगडे
(रंग ओले जपतांना), सुनील लोणकर (दिवस कवितेचे), वृषाली किन्हाळकर (वेदन, तारी),
रेणू पाचपोर (डाळींबाचे दाणे, अवथर, चांद झुला पाण्यात, घनगर्द), शंकर झुल्पे
(आभाळवेल, रानभूल), प्रसन्नकुमार पाटील (श्रीरंग, घोडे, माझ्या पृथ्वीवर, आरती, जबाला ते मेधा),लक्ष्मीकांत
तांबोळी (मी धात्री मी धरित्री), निरंजन उजागरे(परिच्छेद, प्रहार, दीपवा), फकीरा मुंजाजी शिंदे (सार्वमत, दिल्ली ते दिल्ली, फकीराचे अभंग, प्रार्थना, गाथा, आई आणि इतर कविता, आयुष्य वेचताना, निरंतर, भूकंपाची मरणगाणी, मिथक), द.धा.धामणस्कर (प्राक्तनाचे
संदर्भ, बरेच काही उगवून आलेले), हेमंत जोगळेकर(होड्या, माझापण बेहद्द नाममात्र घोडा, मनातले घर), नारायण कुलकर्णी कवठेकर (हे माझ्या गवताच्या पात्या , मागील पानावर पुढे),गणेश विसपुते (सिनार, धुवाधार, गजबजलेल्या रस्त्याच्या मधोमध) अरुण म्हात्रे (ऋतू
शहरातले) इत्यादी कवींच्या कवितेत आपल्याला दिसून येते.
१९९०नंतर मराठी साहित्यात मुस्लिम मानसिकतेचा साहित्यप्रवाह जोरकसपणे उदयास आलेला
आहे. मराठी कवितेसाठी ही आश्वासक घटना होय. नव्वदनंतर हिंदू मुस्लिम यांच्या संबंधात अधिक तणाव उत्पन्न झाला. बाबरी मस्जिदवरून
निर्माण झालेली दंगल आणि त्यानंतर वेगवेगळ्या घटनांच्या माध्यमातून हिंदू मुस्लिमांचे
संबंध तणावपूर्ण झाले. दोघांमध्ये अविश्वास वाढला. वास्तविक एकाच देशात राहणाऱ्या
या दोन भिन्न धर्मीय व्यक्तींचे जीवन हे सहजीवन असायला हवे मात्र त्यात तणाव निर्माण
झालेला या कालखंडात दिसून येतो. धार्मिक मुलतत्ववादाचा तरुण पिढीवर पडत चाललेला
प्रभाव आणि त्यातून विकृत झालेली मानसिकता हे लक्षात घेऊन संवेदनशील व्यक्तीला
कायम वेदना होत असते आणि म्हणून मग या कालखंडामध्ये मुस्लिम कवींची कविता निर्माण
झालेली आहे. हा मुस्लिम कवी ज्याचे आपल्या मातृभूमी असलेल्या भारत देशावर प्रेम
आहे. हिंदू मुसलमानांच्या राजकारणामुळे राजकारण्यांची राजकीय पोळी भाजली जाते
परंतु यात मात्र भरडला जातो तो सामान्य मुस्लिम व्यक्ती आणि सामान्य हिंदू
व्यक्तीही. आणि अशा दुभंगलेल्या वातावरणात सामान्य पापभीरू मुस्लिमांचे जीवन हे
भयावह, चिंताग्रस्त होत आहे. हातावर काम करणाऱ्या आणि आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये
अडकलेल्या मुस्लिम व्यक्तीची व्यथा मुस्लीम प्रवाहातील कवी मांडतात. यात फ.म. शहाजिंदे (निधर्मी, शेतकरी, आदाम, ग्वाही), जावेद कुरेशी (बएत), सय्यद
अल्लाउद्दीन (जिंदाबाद मुर्दाबाद), रफिक सुरज (सोंग घेऊन हा पोर)
इत्यादी कवी आघाडीवर आहेत.
वर्तमान युगात समाज हा अत्यंत
गतिमान बनला आहे. अनेक प्रलोभने त्याला आपणाकडे आकृष्ट करीत आहेत.
प्रसारमाध्यमांची स्त्री देहाचे प्रदर्शन मांडण्याची चाललेली चढाओढ यातून एक
प्रकारची भोंगळ व भोगवादी संस्कृती जन्मास येत आहे. या भोगवादी प्रवृत्तीने माणूस
संकुचित वृत्तीचा बनला असून कळत नकळतपणे त्याच्याकडून मानवी मुल्ये पायदळी तुडवली
जातात. स्त्री ही उपभोगाचे प्रमुख साधन आहे हा रुजत चाललेला विचार, विविध स्तरावर
होणारी स्त्रीची कुचंबना लैंगिक शोषणाच्या व बलात्काराच्या वाढलेल्या घटना याच
प्रवृत्तीतून आलेल्या आहेत याचे चित्रण या कालखंडातील या वासंती मुजुमदार-(सहेला रे, स्नेही), रजनी परुळेकर (दीर्घ कविता, काही कविता, स्वीकार, पुन्हा दीर्घ कविता),सिसिलिया कार्व्हालो (उन्मेष, अंतर्यामी), ज्योती लांजेवार (दिशा, अजून वादळ उठले नाही), हिरा बनसोडे (फिर्याद, पौर्णिमा), नीरजा (निरन्वय, वेणा, स्त्रीगणेशा), अनुराधा पाटील (दिगंत, तरीही, दिवसेंदिवस, वाळूच्या पात्रात मांडला खेळ), कविता महाजन (धुळीचा आवाज), प्रज्ञा दया पवार (अंतस्थ, उत्कट जीवघेण्या धगीवर, मी भिडवू पाहते समग्राशी डोळा, आरपार प्राणांतिक लयीत) कवयित्रीनी मांडलेली आहे.
या कालखंडातील आदिवासी जीवनाचे चित्र जर आपण
पाहिले तर तेही चित्र आपल्याला भयावह आणि भयंकर दिसते. जागतिकीकरणाच्या प्रभावाने
आदिवासींचे जीवन प्रभावित झाले. त्यांच्या आदिमतेवर घाला घातला गेला. मुलतत्ववादी
वृत्तीने त्यांना त्यांच्या स्वतंत्र संस्कृतीपासून दूर नेण्याचा प्रयत्न केलेला
आहे. याचा प्रभाव त्यांच्या जीवनावर पडला. शिवाय भांडवलदारी वृत्तीने त्यांना
जंगलातून हद्दपार करण्याचा जोरकस प्रयत्न या कालखंडात केलेला दिसून येतो आणि
म्हणून हा कालखंड त्यांच्या दृष्टीने संघर्षाचा कालखंड आहे. याचे चित्रण भुजंग
मेश्राम (उलगुलान) वाहरू सोनावणे (गोधड)
विनायक तुमराम (गोंडवण पेटले आहे) सुनील कुमरे (तीरकमठा) या कवींनी केले
आहे.
सारांश, १९८० नंतरचा कालखंड हा मुख्यत: ९०
नंतरच्या दशकापासून तीव्र वेगाने बदलला. या कालखंडात जागतिकीकरण, प्रसारमाध्यमांचे
वर्चस्व, मोबाईल, संगणक, माहिती तंत्रज्ञान यांचा परिचय समाजजीवनास झाला. परंतु
याच कालखंडात मूलतत्ववाद वाढला. माणसांची मने दुभंगली. ग्राम जीवनातही निराशा
वाढली त्यामुळे हा कालखंड बदलाचा कालखंड आहे. या कालखंडातील कवींच्या
काव्यसंग्रहाच्या शीर्षकांवर नजर टाकली तरी या कालखंडाचा प्रभाव दिसून येतो.
टीप : सदर लेखात सर्वच कवींची नोंद घेतलेली नाही.
या कालखंडातील कवींची यादी मी स्वतंत्र नोंदवली आहे.
ती पाहण्यासाठी खालील लिंक वापरा.
https://pradnyechimulakshar.blogspot.com/2025/09/blog-post_30.html
https://youtu.be/Cix0FQ-c9jo?si=gpg7OlWHgya8C42Y
आपली मत आमच्यासाठी महत्वाची आहेत म्हणून आपली मत नोंदवा. आपला अभिप्राय कळवा.
Comment करा. आणि हा लेख आपल्या मित्रांना शेअर करा.

Beautiful and thought provoking article!
उत्तर द्याहटवाVery well highlighted every stream of Marathi poetry with neutrality and empathy.
Your analysis of Dalit and rural poetry, in particular, is extremely impactful.