मंगळवार, ३० सप्टेंबर, २०२५

१९८० ते २००० या कालखंडातील मराठी कवी

१९८० ते २००० या कालखंडातील मराठी कवी आणि त्यांचे काव्यसंग्रह

-अक्षय किशोर घोरपडे.

 

·      मुख्य प्रवाहातील कवी आणि त्यांचे काव्यसंग्रह 

 

1.     प्रसन्नकुमार पाटील –

श्रीरंग, घोडे, माझ्या पृथ्वीवर, आरती, जबाला ते मेधा (२००४)

2.     लक्ष्मीकांत तांबोळी-

मी धात्री मी धरित्री

3.     निरंजन उजागरे-

परिच्छेद, प्रहार, दीपवा

4.     फकीरा मुंजाजी शिंदे –

सार्वमत, दिल्ली ते दिल्ली, फकीराचे अभंग, प्रार्थना, गाथा, आई आणि इतर कविता, आयुष्य वेचताना, निरंतर, भूकंपाची मरणगाणी, मिथक

5.     द.धा.धामणस्कर-

प्राक्तनाचे संदर्भ, बरेच काही उगवून आलेले

6.     हेमंत जोगळेकर-

होड्या, माझापण बेहद्द नाममात्र घोडा, मनातले घर

7.     नारायण कुलकर्णी कवठेकर-

हे माझ्या गवताच्या पात्या , मागील पानावर पुढे

8.     गणेश विसपुते-

सिनार, धुवाधार, गजबजलेल्या रस्त्याच्या मधोमध

9.     अरुण म्हात्रे –

ऋतू शहरातले

10.  प्रफुल्ल शिलेदार –

स्वगत

11.  श्रीधर तिळवे-

एका भारतीयाचे उद्गार,  स्त्री वाहिनी

 

·       दलित कवी आणि त्यांचे काव्यसंग्रह 

                                                      1. वामन निंबाळकर-

गावकुसाबाहेरील कविता, महायुद्ध

2.शरणकुमार लिंबाळे –

उत्पात

3. यशवंत मनोहर-

काव्य भीमायन, मूर्तीभंजन, प्रतीक्षायन, अग्नीचा आदिबंध

4. किशोर घोरपडे-

डहाळी, दलदल

5.अरुण काळे-

रॉकगार्डन, सायरनचे शहर, नंतर आलेले लोक, ग्लोबलच गावकुस

6.लोकनाथ यशवंत-

आता होऊन जाऊ द्या !आणि शेवटी काय झाले?,  पुन्हा चाल करूया !

7. राम दोतोंडे –

रापी जेव्हा लेखनी बनते

                     8.  लहू कानडे –

क्रांतीपर्व, टाचाटीभा, तळ ढवळताना

9.     धम्मपाल रत्नाकर-

हॉटेल माझा देश, लक्तरांची गझल, सैतानाच्या खांबावर

10.  महेंद्र गायकवाड -

काजव्यांच्या खांद्यावर संगिनी, ओलीस ठेवलेली माणसे

11.  महेंद्र भवरे

चिंताक्रांत मुलुखाचे रुदन, महासत्तेचे पीडादान

12.  अविनाश गायकवाड

जंजाळ,   अजूनही अस्वस्थ रोहिणी

13.  प्रकाश मोगले

 दंभस्फोट

14. शशिकांत हिंगोणेकर -

युद्ध सुरू आहे, अजूनही, बेट बंद भावनांचे, नवे स्वगत, कवितेचे दिवस, ऋतूपर्व, वर्तमान, छलचक्र, अंतर्भेदी, मोकळे आकाश, वेदनेची त्रिदले, अस्वस्थ प्रस्फुरणे, बंद दरवाजा 

 

·       ग्रामीण कवी आणि त्यांचे काव्यसंग्रह 

                                                      1. उत्तम कोळगावकर-

जंगलझडी, तळपाणी

2. नारायण सुमंत-

रानभरी, सातबारा

3. प्रकाश होळकर-

कोरडे नक्षत्र

4. प्रदीप पाटील

आत्मसंवाद, अंतरीचा भेद

5. जगदीश कदम-

रास आणि गोंडर

6.गणेश देशमुख-

गावच्या कविता

7.इंद्रजीत भालेराव

आम्ही काबाडाचे धनी, टाहो, पेरा, कुळंबीणीची कहाणी, भूमीचे मार्दव

8. श्रीकांत देशमुख

बळीवंत

 

·     आदिवासी कवी आणि त्यांचे काव्यसंग्रह 

1.     भुजंग मेश्राम

उलगुलान , आबुजमाड

2.     वाहरू सोनवणे

गोधड

3.     विनायक तुमराम

गोंडवण पेटले आहे

4.     कुसुम आलाम

रान आसवाचे तळे, रानपाखरांची माया

5.     उषाकिरण आत्राम

म्होरंकी

6.     माधव सरकुंडे

मनोगत

7.     सुनील कुमरे

तिरकमठा

8.     कृष्णकुमार चांदेकर

पतुसा

9.     बापूराव डोमाजी आडे

ऋणमुक्ती

 

·      स्त्रीवादी कविता आणि त्यांचे काव्यसंग्रह 

1.     वासंती मुजुमदार-

सहेला रे, स्नेही

2.     रजनी परुळेकर

दीर्घ कविता, काही कविता, स्वीकार, पुन्हा दीर्घ कविता

3.     सिसिलिया कार्व्हालो

उन्मेष, अंतर्यामी

4.     ज्योती लांजेवार

दिशा, अजून वादळ उठले नाही

5.     हिरा बनसोडे

फिर्याद, पौर्णिमा

6.     नीरजा

निरन्वय, वेणा, स्त्री गणेशा

7.     अनुराधा पाटील

दिगंत, तरीही, दिवसेंदिवस, वाळूच्या पात्रात मांडला खेळ

8.     कविता महाजन

धुळीचा आवाज

9.     प्रज्ञा दया पवार

अंतस्थ, उत्कट जीवघेण्या धगीवर, मी भिडवू पाहते समग्राशी  डोळा, आरपार प्राणांतिक लयीत

10. उषा हिंगोणेकर -

मुद्रालेख, धगधगते तळघर, सगळेच पर्याय संपले आहेत.

 

·      मुस्लिम कवी आणि त्यांचे काव्यसंग्रह 

                                                  1.फ.म. शहाजिंदे-

निधर्मी, शेतकरी, आदाम, ग्वाही

2. जावेद कुरेशी-

बएत

3. सय्यद अल्लाउद्दीन-

जिंदाबाद मुर्दाबाद

4. रफिक सुरज

सोंग घेऊन हा पोर

 

 

·       टीप : सदर यादी ही अपूर्ण असून लवकरच ती अद्ययावत करण्यात येईल. तसेच यादीत नसलेली परंतु तुम्हाला माहित असलेली कवींची नावे आणि त्यांचे काव्यसंग्रह निश्चित प्रतिक्रियेतून कळवा.

म्हणजेच commment करा.

आपल्या commment च्या प्रतीक्षेत

  

रविवार, २८ सप्टेंबर, २०२५

वर्तमान परिप्रेक्ष्यात समकालीन दलित कविता

 

वर्तमान परिप्रेक्ष्यात समकालीन दलित कविता

                                                                              डॉ. अक्षय किशोर घोरपडे.

वर्तमान परिप्रेक्ष्यात समकालीन दलित कवितेचा विचार करताना आपणास अनुक्रमे वर्तमान परिप्रेक्ष्य आणि समकालीन  या दोन संकल्पना समजावून घेणे गरजेचे आहे. वर्तमान परिप्रेक्ष्य ही संकल्पना मुख्यतः 1990 नंतरच्या कालखंडाच्या अनुषंगाने वापरण्यात आलेली आहे. 1990 नंतरचा कालखंड हा जागतिकीकरणाचा कालखंड म्हणून ओळखला जातो. फार मोठ्या सामाजिक बदलाचा, परिवर्तनाचा हा कालखंड आहे. या कालखंडास माहिती तंत्रज्ञानाचे युग असेही संबोधले जाते. इंटरनेट,संगणक,सॅटॅलाइट आणि मोबाईल इत्यादींनी पारंपारिक जीवनाला नवा आकार दिला. मानवी प्रवृत्ती ही स्वाभाविकपणे या  आधुनिक जीवनाकडे आकर्षिल्या गेली. सदर कालखंड हा उदारमतवादी कालखंड म्हणून जरी प्रत्ययास येत असला तरी प्रचंड विरोधाभास, विसंगतीने भरलेला हा कालखंड आहे. एकीकडे माहितीचे खुले जग तर दुसरीकडे माहितीपासून वंचित असलेला समाज, एकीकडे प्रचंड अवर्षण तर दुसरीकडे प्रचंड प्रमाणात साधनसंपत्ती, एकीकडे प्रचंड गरिबी दुसरीकडे प्रचंड श्रीमंती आणि हे सर्व आकाराला आले आहे ते याच कालखंडात. सर्वसामान्यांप्रमाणे दलित जीवनही या कालखंडाच्या कचाट्यातून सुटलेले नाही. त्यांच्या स्वतःच्या स्वतंत्र अशा काही समस्या या कालखंडाने निर्माण केल्या. ज्यात दलित जीवन भरडल्या जात आहे म्हणून या  अनुषंगाने वर्तमान परिप्रेक्ष्य ही संकल्पना सदर शोधनिबंधाच्या अनुषंगाने समजून घेणे गरजेचे आहे. समकालीन म्हणजे एका काळाबरोबर असणे किंवा काळाशी समांतर असणे साहित्य म्हणून ज्या वेळेस आपण समकालीन साहित्याचा विचार करतो त्यावेळेस "समकालीन साहित्य म्हणजे जे साहित्य आपल्या काळाबरोबर आहे ज्या काळात ते निर्माण होत असते त्या काळाचे प्रतिबिंब त्यात आहे त्या काळातील विचार जाणिवा मते ज्या साहित्यातून व्यक्त होतात, असे साहित्य"१ म्हणून मग वर्तमान काळाशी दलित साहित्य किंवा दलित कविता ही समकालीन आहे का? की ती काळाशी फटकून वागते ? किंवा दलित जीवनाचा पूर्वसुरच ती अभिव्यक्त करते का? इत्यादी प्रश्नांचा शोध  सदर शोधनिबंधात घ्यावयाचा आहे. सदर काव्यसंग्रहाची चिकित्सा करताना प्रस्तुत शोधनिबंध लेखकाने स्वतःला काही मर्यादा घालून घेतल्या आहेत.  त्या अशा आहेत की, ही चिकित्सा करताना समकालीन असणाऱ्या या कवितेच्या वर्तमान जीवन जाणिवांचा शोध फक्त येथे अपेक्षित आहे. त्यांच्या कवितेला असणारी जागतिकीकरणाची पार्श्वभूमी तपासणे या कवीच्या कवितांमधून काही समान सूत्रे हाती लागतात का? प्रतिमांचे विश्व त्यांच्या कवितेमध्ये कितपत समान आहे? वर्तमानाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन कसा आहे? हे या शोधनिबंधाचे संदर्भात अपेक्षित आहे. एकच ओघ आम्हातून वाहत असल्यामुळे तोच ओघ फक्त इथे शोधायचा आहे. त्यामुळे सदर कवींची कविता वाईट आहे की, चांगली आहे किंवा केवळ तिची भलामण करून स्तुतिपर मांडणी करण्याचाही उद्देश नाही. इथे फक्त कविता गृहीत धरलेली आहे. शोधनिबंधाला सुरुवात करण्यापूर्वी १९९० नंतरच्या कवितेच्या संदर्भात आणखी एक निरीक्षण येथे नोंदवता येते ते असे की, कविता लिहिणाऱ्या दलित कवींची संख्या उदंड झाल्यामुळे काव्यसंग्रह आणि त्यांच्या प्रकाशनांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. उत्तरोत्तर ही संख्या वाढत जाणार हे निश्चित यात दुसरी गोष्ट अशी की, या प्रकाशित काव्यसंग्रहापैकी बहुतांश कवींनी स्वतःचे काव्यसंग्रह स्वतः प्रकाशित केलेले आहे. आणि यात काही वावगे आहे, असे नाही. उलट यामुळे आपल्या कृतक वाङमयाभिनिवेशात अडकलेला मराठी प्रकाशन व्यवहार हा खिळखिळा झाला किंवा सुलभ झाला. असेही म्हणता येईल. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून साहित्य निर्मितीचा हा ओघ सुरु असल्याने वर्तमान जीवन जाणिवांचा समृद्ध संदर्भ या कवितांमधून पहावयास मिळतो. ही संख्या पाहता विषय विवेचन अधिक व्यापक होऊ नये याकरिता १९९० नंतर  प्रकाशित झालेल्या काही निवडक दलित कवींच्या कवितासंग्रहाचा विचार सदर शोधनिबंधात करण्यात येणार आहे. 

      सदर शोधनिबंधासाठी एकूण सहा काव्यसंग्रहाची निवड केलेली आहे. ते पुढीलप्रमाणे - १. नंतर आलेले लोक - अरुण काळे २. धगीवरची अक्षर - उत्तम अंभोरे, ३. पुन्हा चाल करु या ! - लोकनाथ यशवंत, ४. अजूनही अस्वस्थ रोहिणी - अविनाश गायकवाड, ५.  ग्लोबल वर्तमानाच्या कविता - सुनिल अभिमान अवचार, ६. तळ ढवळताना- लहू कानडे.  हे सहाही काव्यसंग्रह प्रामुख्याने दोन हजार सालनंतर प्रकाशित झालेले आहेत. इथे एक गोष्ट आधीच स्पष्ट करायला हवी की, या निवडलेल्या काव्यसंग्रहाव्यतिरिक्तही याच कवींचे इतर काव्यसंग्रहही प्रसिद्ध आहेत त्यांचा आपण विचार करणार नाही. 

या सहाही काव्यसंग्रहाची शीर्षक अत्यंत बोलकी आहेत. शीर्षक उच्चारताच जाणिवेच्या पटलावर प्रतिमा दृश्यमान करण्यात ते समर्थ ठरतात. या शीर्षकापैकी 'धगीवरची अक्षर' हे शीर्षकनाम वजा केले असता उर्वरित पाचही काव्यसंग्रहाची शीर्षक जागतिकीकरणाच्या रेट्यातून जन्मास आलेली आहेत. जागतिकीकरण अटळ आहे व ते धोकादायक असल्यामुळे त्यापासून सावध राहण्याचा व त्याच्या चाहुलीचा इशाराच प्रस्तुत शीर्षकातून प्रत्ययास येतो. सदर शीर्षकाना  आपणास खालिल नामिक गटात समाविष्ट करता येते.

१. सामान्य नाम: नंतर आलेले लोक, ग्लोबल वर्तमानाच्या कविता, तळ ढवळताना.

२. विशेष नाम : धगीवरची अक्षर.

३. भाववाचक नाव : पुन्हा चाल करु या !, अजूनही अस्वस्थ रोहिणी .  

या शीर्षकामध्ये उद्गार चिन्हाचा वापर फक्त एकाच काव्यसंग्रहाच्या शीर्षकांमध्ये केला गेलेला आहे. बाकी कुठल्याच शीर्षकात विरामचिन्हांचा वापर केलेला नाही तसा वापर केला गेला असता तर शीर्षकनाम प्रभावी ठरले असते या सबंध शीर्षकाचा बारकाईने विचार केला असता असे दिसून येते की, ही शीर्षक पुन्हा एकदा परिवर्तनासाठी उद्युक्त झालेली आहेत. जागतिकीकरणाच्या अदृश्य पावलांना त्यांनी ओळखल्यामुळे व्यवस्थेतील संभाव्य धोक्याबद्दल ते सजग झालेले आहे. व्यवस्थेने कूस बदलली मात्र मूळ ढाचा कायमच ठेवला छद्मी मुखवटा धारण करून जन्माला आलेली ही व्यवस्था या व्यवस्थेची वारंवारिता कायम आहे. पुन्हा ज्यांनी ही व्यवस्था जन्माला घातली त्यांनीच ही जागतिकीकरणाची प्रक्रिया गतिमान केली. हे नवनिर्माण करण्याचा आव आणणारे लोक नंतर आलेले लोक आहेत या नंतर आलेल्या लोकांनी दुसऱ्या देशावर आपले राष्ट्रगीत लिहिले त्याहूनही मुळच्या लोकांना हद्दपार केले म्हणूनच तळ ढवळताना ग्लोबल वर्तमानाच्या कवितांमध्ये अजूनही अस्वस्थ रोहिणीसाठी धगीवरची अक्षर सोबत घेऊन नंतर आलेल्या लोकांवर पुन्हा चाल करु या! ही या पाठीमागची भावना होय. शिर्षयुद्धाला पुन्हा सुरुवात झाली आहे. असा भावार्थ सदर शीर्षकामधून प्रकट होतो. 

 जागतिकीकरणात ग्लोबल वॉर्मिंग आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तीव्रतर होत आहे. कदाचित पाण्यासाठी तिसरे महायुद्ध होण्याचीही शक्यता वर्तविली जाते. पाण्याला भारतीय संस्कृतीमध्ये पवित्र मानले जाते. भारतामधील कुठलाही धार्मिक रीतिरिवाज पाण्याशिवाय पूर्ण होत नाही. मुळात पाणीही नैसर्गिक देणगी असली तरी धार्मिक सोपस्कारामुळे व त्याच्या जैविक गरजेमुळे पाणी हे एकाच वेळी समतेचे तसेच विषमतेचेही प्रतीक बनले. भारतामध्ये क्रांती आणि प्रतिक्रांतीसाठी पाण्याचा वापर केला गेला. बाटलीबंद पाणी कुठेही सहज उपलब्ध होत असले तरी अजूनही विकसनशील अथवा विकसित राष्ट्र अथवा महासत्ता पाण्याची मूलभूत गरज पूर्ण करू शकलेले नाहीत हे वास्तव सत्य आहे. म्हणून अविनाश गायकवाड यांना अजूनही रोहिणी अस्वस्थ वाटते.

      पाणी या प्रतिकाचा वापर जवळपास सर्वच काव्यसंग्रहातून झालेला दिसतो. उत्तम अंभोरे यांच्या कवितेत पाण्याचा संदर्भ कावळ्यासहित येतो. पाण्याचाच नवा साठा शोधण्याच्या गोष्टी ते कोवळ्या कावळ्यांना शिकवताहेत सुनिल अवचार यांना पाण्याशिवाय तू काही दिवस जिवंत राहू शकतोस असे वाटत असले तरी साध्या पाण्याऐवजी : Bisleri Aqua Guard ची होणारी ग्लोबल संस्कृती पाण्याच्या अभावी भटकंती करणाऱ्या सामान्यांच्या समूहाविषयी प्रश्न उपस्थित करते मोर्चे आडवा, मोर्चे जिरवा, पोलिसांचा कर्तव्यदक्ष कार्यक्रम, दलितांची एक संपूर्ण पिढी नेस्तनाबूत येथे लोकनाथ यशवंत पुन्हा पाण्याचा संदर्भ रूपकात्मक वापरतात.

रोहिणी नदी बौद्ध संस्कृतीमध्ये विशेष संदर्भात ओळखली जाते. शाक्य आणि कोलीय यांच्यात रोहिणीच्या पाण्यावरून संघर्ष निर्माण झाला असताना राजपूत्र सिद्धार्थाने हा प्रश्न सामोपचाराने, अहिंसेने सोडवावा यासाठीचा आग्रह धरला. बहुमताच्या विरोधी गेल्याने राजपूत्र सिद्धार्थ शिक्षेस पात्र ठरला. आणि सर्वसंगपरित्याग करून दुःखाचा शोध घेण्यास निघालेला राजपूत्र सिद्धार्थाचा गौतम बुद्ध झाला. हिंसेने अस्वस्थ झालेली रोहिणी पुन्हा एकदा खळाळली. ही रोहिणी नदी अजूनही अस्वस्थ आहे असे अविनाश गायकवाड यांना वाटते.

पाणी हे जीवन आहे आणि त्याच्यावर सर्वांचा समान हक्क आहे. परंतु याच पवित्र पाण्यापासून माणसांना अस्पृश्य म्हणून दूर ठेवले. पाण्यालाही विटाळ होऊ लागला. पुन्हा एकदा रोहिणी अस्वस्थ झाली. आणि पुन्हा एकदा तथागत जन्मला.

"चवदार तळ्याच्या अंगावर उडाले शहारे

पुन्हा एकदा माणसाच्या मुक्तीचा

फडकावला जाहीरनामा तथागताने

रोहिणीचा कुंठित प्रवाह असा

खळाळून वाहीला जोमाने"

वॉटर किंग्डम-१ आणि वॉटर किंग्डम-२ पाण्याचं महात्म्य सांगणाऱ्या अशा दोन कविता नंतर आलेले लोक या काव्यसंग्रहात येतात.

"पाण्याचा तंटा आणि लवाद

आपल्याला मिळतो एक बुद्ध

पाण्याच्या पायऱ्या चढून

आकाशाच्या वर जातो कबीर

हौदातून उगवते चिरंतन ज्योती

तळ्याचा नक्शा उतरवतो भीम

पाणी अन्यायाची बाजू

पाणी क्रांतीच माध्यम"

नव्वदनंतरच्या जागतिकीकरणात पाण्यावर अधिसत्ता गाजवणारे नवे वॉटर किंग्डम अस्तित्वात आलेले आहे. हजारो रुपये मोजून घंटा दोन घंटे पाण्यात मनसोक्त डुंबा किंवा बाटलीबंद पाण्यासाठी पैसे मोजा नुकतेच जगण्याला दोन कोंब फुटले असताना हे असे पाण्याच्या विक्रीचे नवे भांडवली अर्थशास्त्र जन्मास आल्याने कवी अस्वस्थ होतो.बाजारात विक्रीला आलेल्या बाटलीकडे पाहून बिसलेरीची बाटली निळ्या झाकणाची, तसाच तो निळा टोपीवाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर निष्ठा असलेला सच्चा भीमसैनिक दिसतो. पाणी वापरून बाटली फेकून द्यावी, अगदी तसाच हा भीमसैनिक चैत्यभूमीच्या रस्त्यावर निपचित पडला, रिकाम्या बाटलीसारखा

"माणसाने कायम शुद्ध पाणी प्यायला हवे म्हणून

पाणी गाळून घ्यावं उकळून घ्यावं

झालं तर दोन थेंब औषध टाकून सुद्धा ठेवावं

पण पाणीच मिळत नसेल तर काय कराव ?"

हे मात्र कोणीच सांगू शकत नाही याकडे लहू कानडे लक्ष वेधतात जशी पाण्याची चव तसा त्या गावातील लोकांचा स्वभाव किंवा बारा गावचं पाणी प्यायलेला माणूस कणखर असतो अशी लोकोक्ती आहे. म्हणूनच समुद्र असलेल्या गावात लहू कानडेना करमत नाही.

सदर सहाही काव्यसंग्रहातून जागतिकीकरणाच्या भयाचा ओघ वाहताना दिसतो. जागतिकीकरणाची सुरुवात झालेल्या या सहस्त्रका बद्दल आणि हे सहस्त्रक ज्यामुळे आपल्या अंगावर आलेले आहे. अशा माहिती-तंत्रज्ञान युगाबद्दल उद्देशून अरुण काळे म्हणतात,

"हे महान गवशा

बंद कर तुझा हा मल्टीमीडिया

पुरी झाली नाही भटक्यांची देवाण-घेवाण

वार्षिक जत्रांमधून"

जग ग्लोबल झालंय; जवळ आलय. माणसं एकात्मिक पातळीवर एकत्र आली. असा कितीही भ्रम निर्माण केला तरी भारतातल्या मध्ययुगीन आवरासावरीकडे कोण पाहिल?’ हीच जाणीव लहू कानडे आणखी पुढे घेऊन जातात.

"हे मल्टिमीडिया सॅटॅलाइट हॅंगओव्हर गाजर

ती दुबळ्यांचे माणूस पण नाकारून

गळ्यात हायटेक ची घंटा बांधून धावणार मांजर ?"

जो तो ज्याच्या त्याच्या परीने या सहस्त्रकाच स्वागत करीत सुटलाय नव्या सहस्त्रकाच्या गुणगान सुरू आहे. क्षणार्धात जग बदलेल असा भास निर्माण केला जातोय. विज्ञान-तंत्रज्ञान, सुख-समृद्धीचे सहस्त्रक म्हणून त्यांचा उल्लेख होतोय तर मग झोपडीतल्या विझत चाललेल्या दिव्याबद्दल काय? त्याबद्दल मात्र कोणीही बोलू इच्छित नाही.

"माहिती तंत्रज्ञानाने जग जवळ आले

आणि कुटुंबच झाले ! आनंद झाला

(लढाया मात्र सुरूच )"

माहिती-तंत्रज्ञानाच्या स्फोटाने माहितीचे जाळे जगभर विणले जात असताना माहितीच्या विषमतेचे अंतर भारी पायाने कापले गेले. ई स्फोटात माझ्याच वर्गात दोन गट पडले माहिती मिळविणारा एक गट व माहितीपासून अनभिज्ञ असलेला दुसरा गट ज्याला अजूनही पोटभर भाकरीची शाश्वती नाही 'इंटरनेटवर दलित युवक डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू जॉब डॉट कॉम वर आणि ते डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू सेक्स डॉट कॉम वर' माहितीचा स्फोट कितीही झाला तरी इंटरनेट वापरणाऱ्यांचे विश्व मर्यादित आहे. किंवा तसे करून दिले जात आहे. एका विशिष्ट विचारांच्या मर्यादित चौकटीत तुमची बुद्धी बंदिस्त करणे हा त्या पाठीमागचा प्रधान हेतू असे करताना इंटरनेट कशासाठी तर,

"इंटरनेट: पुरुषांसाठी

बघता येते जगातील कोणत्याही देशाची भोंगळी बाई

इंटरनेट : स्त्रियांसाठी

चाखता येतो जगातील कोणत्याही देशाचा माणूस नंग धडंग"

यासाठी एखाद्या मादक पदार्थाच्या व्यसनाने गुंगून जावे. आणि भोवतालच्या वास्तवाचा विसर पडावा त्याप्रमाणे इंटरनेट माणसाच्या बुद्धीवर हावी होत आहे. संगणकाच्या पडद्यावर गुंतून पडलेल्यांना त्यावर दिसत नाहीत भूमिहीन, आदिवासी, दलित, अस्पृश्य, विझत चाललेल्या झोपड्यातील वाती, फुटपाथवर अर्धपोटी झोपणार्‍याचे आकडे इत्यादी छातीला छाती भिडवणाऱ्या माणसापेक्षा ही संगणकाच्या पडद्यावरील आभासी मनुष्य अधिक जवळचा वाटत चाललाय. जागतिकीकरणातून निर्माण झालेल्या समस्येच्या मुळाशी हे कवी जातात. अग्निशामक दलाच्या गाडीची धोक्याची घंटा खणखणावी आणि आपण सावध व्हावे, अगदी त्याप्रमाणे हे कवी आपणास सावध करतात. जागतिकीकरणात दलितत्व नष्ट होण्याऐवजी डिलीट झाला. वापरा फेका आणि तुमचा भाव सांगा, चुपचाप बसा. माहिती एन्जॉय करा. चोरण्यापासून ते कायमचूर्णपर्यंत हरेक गोष्टीच्या तत्वज्ञानात ट्रेड संस्कृतीने मूळ धरला आहे. संस्कृतीच रखेल झाली आहे. खुल्या आर्थिक क्षेत्रात कितीही मुक्त स्पर्धा असली तरी आडनावावरून समजणारे इंगित ते लपवू शकत नाही. आणि आलेली निनावी ओकारी ही दाबू शकत नाही.

यातील काही कवी आपल्या काव्यसंग्रहातून मुलांशी संवाद साधताना आढळतात. मुळात त्यांना संवाद का साधावा वाटतो? याचे उत्तर आपल्याला अवतीभोवतीच्या पर्यावरणात आढळते. दिवसेंदिवस वडील आणि मुलगा यामध्ये विसंवाद वाढतो आहे. जागतिकीकरण आणि माहिती तंत्रज्ञानाने तरुणांच्या मनोविश्वावर केलेला कब्जा हा जुन्या पिढीसाठी चिंतेचा विषय. नव्या पिढीची म्हणजेच मुलांची जुन्या पिढीकडे म्हणजेच वडिलांकडे पाहण्याची दृष्टीच बदलली. चळवळ, समाज, विचार या गोष्टी त्यांच्यासाठी आउटडेटेड झाल्यात. तर ज्याला वरची कमाई, तो लोकप्रिय हा सिद्धांत त्यांनी मनात घट्ट रुजून घेतलाय. त्यामुळे गल्लोगल्ली, नाक्यानाक्यावर झळकणाऱ्या बॅनर्स वरील गळ्यात सोन्याच्या चैनी आणि बोटात अंगठ्या असलेले लोक त्यांचे रोल मॉडेल ठरत आहेत. वडील आणि मुलगा यांच्यातील वाढलेल्या विसंवादाचे कारण आणि बदलती वर्तमान व्यवस्था याचे यथार्थ चित्रण आपल्याला अरुण काळे यांच्या प्रेमाचं होऊ द्या ना जागतिकीकरण या कवितेत प्रतीत होते. दहा किलो दप्तर वाहणारा माझा मुलगा ही येणारी ओळ बरेच काही सांगून जाते. लोकनाथ यशवंत यांची वडिलांनी मुलाला पोस्ट न केलेले पत्र ही कविता थेट मुलाशी संवाद साधणारी आहे. तर अविनाश गायकवाड यांना मात्र असं वाटतं की, मुलांच्या पुढ्यात तर इच्छा भोगाचं प्रसरणशील अनंत आकाश आहे. वास्तवापासून तो दूर आहे. आभासी दुनियेत तो गेम ॲडिक्ट झालाय. आभासालाच वास्तव समजणाऱ्या आपल्या मुलाला,

"भिकारी बाप मिळाल्याची मधूनच

डोळे गुरगुरतात मुलाचे  घरभर

संगणकाचा माऊस कीबोर्ड वर

सनासन फिरतात सैरभैर बोट

तो करतो सारखा गाड्यांचे एक्सीडेंट"

बाप करत राहतो संघर्ष मुलाला सकारात्मक विधायक मार्गावर आणण्याचा हे करत असताना बापालाच पडतो प्रश्न,

"बाप रिप्लेस करायचा क्रांतीकारक विचार

येत असेल का कधी मुलाच्या डोक्यात ?"१०

      लहू कानडे यांच्या कवितेत आनंदी होऊन पहिल्यांदा मतदानाला निघालेला मुलगा मित्राच्या बोलल्याने हिरमुसतो, तेव्हा बाप त्याला प्रेमाने समजावतो; धीर देतो; नवे बळ देतो.

जागतिकीकरणाच्या व्यवस्थेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा अँटिव्हायरस लागू पडणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच दलित साहित्याचे मुख्य प्रेरणास्त्रोत असल्याने त्यांच्या विषयीची आदराची भावना या कवितासंग्रहातून व्यक्त होते. त्यासाठी विविध प्रतिमाने या कवींनी वापरली आहेत. सदर काव्यसंग्रहातून आलेले ही प्रतिमाने नाविन्यपूर्ण आहेत. आधुनिक जीवनशैलीमुळे बदललेल्या भाषाशैलीचा प्रभाव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वापरल्या जाणाऱ्या या प्रतिमामधून दिसून येतो. अरुण काळे, तू मदरबोर्ड माझ्या संगणकाचा हे प्रतीक वापरतात. उत्तम अंभोरे, ओझोन लेयर ही प्रतिमा वापरतात. अविनाश गायकवाड यांना बाबासाहेब तथागत असे वाटतात. सुनिल अवचार, एक बोट दिशादर्शक असे म्हणतात. लहू कानडे यांना बाबासाहेब रापीची धार वाटतात.

      या सहा काव्यसंग्रहातील समान सूत्रांचा शोध घेतल्यानंतर आपल्याला काही ठोस निष्कर्ष नोंदवता येतात.

१. जागतिकीकरणाच्या भयाचा ओघ या काव्यसंग्रहातून स्त्रवतांना दिसतो.

२. सदर कवी हे विद्रोही गटात समाविष्ट होतात.

३. आधुनिक जीवनशैलीच्या प्रतिमांचा वापर काव्यसंग्रहात वैपुल्याने झालेला दिसून येतो.

४. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवरील अव्यभिचारी निष्ठा हाही विशेष नोंदवावासा वाटतो.

५. इंग्रजी शब्दांचा वापर अधिक्याने दिसतो.

६. सदर कवितेची भाषाशैली ही वर्तमानाशी संवादी दिसते.  

      या सहाही काव्यसंग्रहातील समान सूत्राचा शोध घेणे प्रस्तुत शोधनिबंधात अपेक्षित होते. त्यासाठी सदर कवी कोणत्या प्रतिमा वापरतात? त्या समानार्थी आहेत का? वर्तमानाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन कसा आहे? याची चर्चा करणे येथे क्रमप्राप्त होते. आणि त्याचबरोबर आजच्या वर्तमान परिप्रेक्ष्यात वर्तमानाकडे पाहण्याचा कवींचा दृष्टिकोन नेमका कसा आहे? दलित जीवनाचे नेमके चित्र यात कसे येते? याचा शोध घेताना हे सहाही कवी वर्तमानाकडे व्यापकपणे पाहताना दिसतात. दलित जीवनाचे आमुलाग्र चित्र त्यांनी मांडलेले आहे. दलित जीवनाची दुखरी नस पकडण्यात त्यांना यश आलेले आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी मांडलेला विचार हा केवळ दलितांपुरताच मर्यादित राहत नाही तर तो सर्वव्यापक होताना दिसतो. त्यामुळे ही दलित कविता निश्चितच आश्वासक असली तरी वर्तमानाच्या संदर्भात ती अधिक समकालीन वाटते.

 

संदर्भ ग्रंथ :

१.    डहाके वसंत, नवसाहित्य आणि नवसहित्योत्तर साहित्य, संपादक व अभ्यासक्रम संयोजक - डॉ. शरणकुमार लिंबाळे, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक, प्रथम प्रकाशन २००१, पु.मु. २०१२, पृ. २.

२.    गायकवाड अविनाश , साद घालतेय रोहिणी अजूनही अस्वस्थ रोहिणी , आशय प्रकाशन , ठाणे, पहिली आवृत्ती २००८, पृ. ६७.

३.    काळे अरुण, वॉटर किंगडम-१, नंतर आलेले लोक, लोकवाङमयगृह  प्रकाशन, मुंबई, पाचवी आवृत्ती २००८, पृ. ६८.

४.    कानडे लहू,पीआरए, तळ ढवळतांना, लोकवाङमयगृह प्रकाशन, मुंबई, दुसरी आवृत्ती २०१२, पृ. २९.

५.    काळे अरुण, अर्थयुदध, उनि, पृ. ९.

६.    कानडे लहू, बाप्पा नव्यासहस्त्रका...! उनि, पृ.४.

७.    लोकनाथ यशवंत, शेवटी भाजी - भाकरीचा सवाल,  पुन्हा चाल करू या !, यंग इंडिया पब्लिकेशन, मुंबई, पहिली आवृत्ती २००९ पृ.९७.

८.    तत्रैव, पृ. ९७.                                                  

९.    गायकवाड अविनाश, रिपलेसमेंट, उनि, पृ.५८.

१०. तत्रैव, पृ. ५८.

जागतिकीकरण आणि आदिवासी

  जागतिकीकरण आणि आदिवासी डॉ . अक्षय किशोर घोरपडे. ·        गोषवारा  (Abstract) :- १९९० नंतरचा कालखंड हा भारतीय समाज जीवनात फार मोठा सा...