गुरुवार, २६ मार्च, २०२६

'अवघाची संसार' वारकरी कुटुंबाची शोकांतिका

 'अवघाची संसार' वारकरी कुटुंबाची शोकांतिका 

                                                            -प्रा.डॉ. अक्षय किशोर घोरपडे.

                 'अवघाची संसार' ही रवींद्र पांढरे यांचे कादंबरी. रवींद्र पांढरे हे ग्रामीण लेखक म्हणून ओळखले जात असले तरीही रूढार्थाने सदर कादंबरी ही ग्रामीण कादंबरी म्हणून नोंदवता येत नाही. 

             सदर कादंबरीत विठ्ठलावर भक्ती आणि वारकरी संप्रदायावर निष्ठा असणाऱ्या एका सुसंस्कृत कुटुंबाची होणारी शोकांतिका चित्रित केली आहे. शिवा आबा, त्यांची पत्नी गिरजा आत्या, त्यांची दोन मुलं पंढरी आणि मीरा या चार मुख्य व्यक्तिरेखा भोवती कादंबरीचे कथानक फिरते. या मुख्य व्यक्तिरेखाबरोबरच आणखीही काही पात्र कादंबरीत येतात. पंढरीची पत्नी चंद्राक्का , मीराचा प्रियकर आणि शिवा आंबा कडे सालगडी म्हणून राबणारा कृष्णा, कृष्णाची आई, पत्नी सुशी, चंद्राक्काचा आतेभाऊ लक्ष्मण आणि अधून मधून चमकणारे संपत मास्तर आणि इतर काही पात्र इत्यादी. 

                 शिवा आबा ही गावातली मोठी आसामी विठ्ठलाचा भोळा  भक्त आणि स्वतः खानदानी वारकरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिवा आबांचा पंचक्रोशीत नैतिक दबदबा असतो. आषाढी एकादशीला दिंड्यांचा मुक्काम रामनवमी सप्ताह आणखी इतरही सप्ताह मध्येच एखाद्या नाडलेल्या वारकऱ्यांच्या मुक्काम त्यामुळे शिवा आबांच्या वाड्यात नेहमीचे शे -दोनशे माणसांच्या पंगती चालू असतात. शिवा आबा आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब निर्मळ मनाने ही प्रापंचिक सेवा सुरू ठेवतात कायम संप्रदायात गुंतलेल्या शिवा आबाकडे घरची शेती पाहणारे हक्काचे कोणीच नसते स्वतः आबाही फारसे लक्ष देत नसल्यामुळे शेतीत उत्पन्न कमी आणि खर्च अफाट होत राहतो असे व्यस्त प्रमाण असणाऱ्या कुटुंबाचा कारभार गिरजा आत्या पाहत असतात. त्यांचा स्वभाव कणखर असला तरी त्यांची सुद्धा वारकरी संप्रदायावर अतूटनिष्ठा असते म्हणून संबंध कादंबरीभर शिवाआबांची सहचारिणी म्हणून त्यांची व्यक्तिरेखा व्यापून राहते.

            पंढरी त्यांचा मुलगा हा ही विठ्ठलाचा परमभक्त मृदुंग वाजवण्यात तो पटाईत असतो. कीर्तनात नेहमी मृदुंगावर तो साथ करत असतो परंतु या पंढरीत वैगुण्य असते . त्याच्यात पुरुषत्वाचा अभाव असतो. त्यामुळे आपल्या पत्नीला शरीर सुख देण्यास तो असमर्थ ठरतो हे माहित होऊनही  चंद्राक्का माहेरच्या गरीब परिस्थितीमुळे पंढरी सोबतचा संसार रेटत असते.

                मीरा तारुण्यात नुकतेच पदार्पण केलेली सालस मुलगी तरुण  समवयस्क कृष्णाच्या प्रेमात पडते. दोघांचे प्रेम बहरते. आणि त्यातच तिला दिवस राहतात. गिरजा आत्याला जेव्हा ही गोष्ट समजते तेव्हा त्या तिचा गर्भपात करतात. तिचे दुसऱ्याशी लग्न ठरवतात. गर्भपात झालेली मीरा हा धक्का सहन करू शकत नाही. ती अबोल होते. जीवनाविषयी तिची आसक्ती संपते. ती उदास होते. लग्न झाल्यावर ही तिची उदासी संपत नाही नवऱ्याकडून दिवस गेलेल्या मीराचा बाळंतपणात माहेरी मृत्यू होते. 

                 दरम्यानच्या काळात आपल्या मुलात पुरुषत्त्वाचा अभाव आहे याची माहिती गिरजा आत्याला होते. तरीसुद्धा आपली सून मुलाबरोबर नांदते याचा नवलयुक्त अभिमान आणि पश्चाताप गिरजा आत्याला होतो. पंढरीचे उणेपण झाकले जावे आणि घराण्याला वारस मिळावा म्हणून गिरजा आत्या कृष्णा आणि सून चंद्रा यांना विश्वासात घेऊन नियोग पद्धतीने चंद्राला गर्भधारणा करवतात. याची कल्पना नसलेला पंढरी तुटून जातो. आपण आपल्या पत्नीला शरीरसुख देण्यास असमर्थ आहोत या अपराधगंडाने आधीच उदासलेला पंढरी आणखीनच उदास होतो. मृदुंग वाजवणे सोडून देतो. सारखा अस्वस्थ राहतो. एकटा डोंगर माथ्यावर भटकतो आणि विचार करत राहतो. 

              शेतीचे कमी होत चाललेले उत्पादन आणि कुटुंबाचा अफाट खर्च यांचा ताळमेळ बसत नसल्याने शिवा आबा आपली शेती विकत राहतात. आपल्या मुलाच्या चरितार्थासाठी आपण फारशी शेती शिल्लक ठेवू शकलो नाही याचा शिवा आबाला आयुष्याच्या शेवटी पश्चाताप व्हायला लागतो आणि त्यातच त्यांचा अंत होतो. त्यांच्या पाठोपाठ गिरजा आत्याही वैकुंठवासी होतात शेवटी या गावात आपला निभाव लागणार नाही या कल्पनेने चंद्राक्का सर्व शेती वाडी विकून पंढरी आणि मुलासह माहेरी परतते. माहेरातही चंद्राक्काचा आते भाऊ व्यसनी लक्ष्मण त्यांचा निभाव लागू देत नाही. पंढरीसाठी हे सर्वच अनाकलनीय असते. कादंबरीच्या शेवटी तो वेड्या भिकाऱ्यासारखा फिरू लागतो. 

              एका सत्शील वारकरी कुटुंबाचा हृदय द्रावक झालेला शोकांताचा पट पांढरे यांनी उभा केला आहे. छोटेखानी असणाऱ्या या कादंबरीच्या कथानकावर ओझरता कटाक्ष जरी टाकला तरी असे निदर्शनास येते की, यातले कथ्य कुठेही घटित होऊ शकते पात्रांच्या भोवतालची पार्श्वभूमी जरी बदलली तरी कथानकाचा परिवेश तोच राहतो. म्हणून आधीच म्हटल्याप्रमाणे सदर कादंबरी ग्रामीण कादंबरी म्हणता येत नाही 

                 कादंबरीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे कादंबरीची भाषाशैली लेखकाने खानदेशी तावडी बोलीचा प्रभावी वापर संवाद निवेदनासाठी केला आहे. तावडी बोलीची सर्व वैशिष्ट्ये अंतरंगासह कादंबरीतून प्रकटतात तावडी बोलीची अनोखी लय ध्वनीत होते. खानदेशी तावडी बोलीतून लिखाण (गद्य )करणाऱ्यांची नगण्य म्हटली तरी हरकत नाही. त्यामुळे या पार्श्वभूमीवर तावडी बोलीचा सहजपणा प्रकट करण्यात पांढरे यांना मिळालेले यश स्तुत्य आहे.

                 सदर कादंबरीच्या संदर्भात जेव्हा आपण चर्चा करतो तेव्हा असे लक्षात येते की प्रपंच आणि परमार्थ यातला सूक्ष्म संघर्ष पांढरे उभे करतात. काही लोकांसाठी परमार्थ हाच प्रपंच तर काहींसाठी प्रपंच हाच परमार्थ गिरजा आत्या, चंद्रा, कृष्णा हे प्रपंचात परमार्थ शोधतात तर परमार्थकडून शिवा आबा शेवटी प्रपंचासाठी पश्चाताप दग्ध होतो. प्रपंच आणि परमार्थ यातील गणित विचित्र आहे. मानवी देह म्हटला की जैविक गरजा आल्या, वासना, मोह आला आणि प्रकृती धर्माप्रमाणे त्यांच्या आहारी जाणे हे आलेच यात काही चूक आहे, असेही नाही. आसक्तीत ही  एक प्रकारची विरक्ती असते तर विरक्तीसाठीही आसक्ती असतेच मग यातून बाहेर पडायचे तरी कसे ? तर त्यासाठी स्त्री देह हा नको आणि पुरुष देहही नको कादंबरीतला पंढरी हा स्त्री ही नाही आणि पुरुषही नाही त्यामुळे परमार्थ आणि प्रपंच या दोहोतही तो निर्विकार आणि निर्मोही आहे. मुळात कादंबरीकारने पंढरीची व्यक्तिरेखा मुद्दामहून तर याप्रमाणे केली नसावी? अशी शंका उपस्थित होते.

                संबंध कादंबरी भर पांढरे यांनी प्रसंगाची मांडणी अतिशय तटस्थपणे केली आहे. अनेक ठिकाणी भावनिक प्रसंग आणि निवेदन यांना त्यांनी छेद दिला आहे. कादंबरीकाराचा हा तटस्थपणा उल्लेखनीय असला तरी सुद्धा कादंबरीच्या यशस्वीतेला तो मारक ठरणार आहे. कादंबरी हा दीर्घ अवकाश असणारा वाड्मय प्रकार त्यामुळे काळाच्या पटलावर तो सहज स्फुर्त उमलावायास हवा. उदा. पंढरीचे भावनिक विश्व, मीराचा गर्भपाताचा प्रसंग, कृष्णा आणि चंद्रा यांचा नियोग संबंधाच्या वेळीचा भावनिक उद्रेक आदि प्रसंगांमध्ये पांढरे यांनी जो भावनिकपणा टाळला तो जर टाळला नसता तर कादंबरीचा आवाका वाढला असता, कथानक दीर्घत्वाकडे झुकले असते. त्याचबरोबर गिरजा आत्याच्या मनात नियोग संबंधाच्या संदर्भात निर्माण झालेली कल्पना कशी निर्माण झाली असे दर्शवणारा आणखी एखाद्या प्रसंगाची निर्मिती कादंबरीकारने निर्माण केली असती तर कादंबरीत आलेल्या नियोग संबंधाला एक विशेष वजन प्राप्त झाले असते. कारण केवळ शरीर सुखासाठी जर चंद्रा हापापलेली असते तर ती या विचारांकडे झुकलेली असते परंतु कादंबरीत असे काही होत नाही, घराणाला वारस मिळावा यापुरतेच  जर नियोग संबंधाची  रचना असेल तर त्या संबंधांना प्रमाण ठरवणारा एखादा प्रसंग असायलाच हवा होता.

                 कादंबरीकाराने अनेक ठिकाणी तपशील वगळल्यामुळे कुठलीच व्यक्तिरेखा ही ठळकपणे प्रत्यायास येत नाही. किंबहुना आपला ठसा उमटवत नाही. शोकांतिका म्हटले की त्यात नियती प्रभावी राहते शिवा आबाच्या कुटुंबावर नियतीचा पडणारा प्रभाव दाखवण्यासाठी लेखक असमर्थ ठरतो. केवळ उत्पादन कमी म्हणून कुटुंबाची शोकांतिका होऊ शकत नाही. आणखी एक असे की, संपत मास्तर ही व्यक्तिरेखा या कादंबरीत नोंद घ्यावी इतपत ही तिचे अस्तित्व नाही. परंतु हीच व्यक्तिरेखा कादंबरीकारने अधिक विकसित केली असती तर कादंबरीत संतुलन साधल्या गेले असते संपत मास्तराचा प्रवेश साध्या दोन तीन प्रसंगातच आहे. परंतु त्याही प्रसंगात तो शिवा आबांना कौटुंबिक ह्रासाची जाणीव करून देत असतो.

         सारांश, 'अवघाची संसार' ही कादंबरी विशेष यासाठी आहे की मराठी साहित्यात अस्सल वारकरी जीवनाचे चित्र अभावानेच आढळते. वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञान आणि भूमिका घेऊन जगणाऱ्या कुटुंबाच्या दैनंदिन जीवनशैलीचे मनोरम दर्शन सदर कादंबरी घडवते.


https://youtu.be/2qq4Cng3wtk?si=zsqCNm_KZ1Gd0FDV 



जागतिकीकरण आणि आदिवासी

  जागतिकीकरण आणि आदिवासी डॉ . अक्षय किशोर घोरपडे. ·        गोषवारा  (Abstract) :- १९९० नंतरचा कालखंड हा भारतीय समाज जीवनात फार मोठा सा...