सोमवार, ६ जुलै, २०२६

जागतिकीकरण आणि आदिवासी

 

जागतिकीकरण आणि आदिवासी

डॉ.अक्षय किशोर घोरपडे.

·       गोषवारा (Abstract) :-

१९९० नंतरचा कालखंड हा भारतीय समाज जीवनात फार मोठा सामाजिक व आर्थिक बदलाचा कालखंड म्हणून ओळखला जातो. याच कालखंडात भारताचे आर्थिक धोरण हे आक्रमकपणे खाजगीकरण, उदारीकरण व जागतिकीकरणाकडे वळालेले आहे. साधारणपणे जागतिकीकरणाचा कालखंड म्हणूनच त्याकडे पाहिले जाते आणि तसे त्यास संबोधले जाते. जागतिकीकरणाने भारतीय अर्थव्यवस्थेत फार मोठा बदल घडवून आणला. जागतिकीकरणातून माहिती तंत्रज्ञान युग अवतरले. इंटरनेटच्या महाजालामुळे जग एकमेकांशी कनेक्ट झाले. बाजार संस्कृती अस्तित्वात आली.  सुपर मार्केट, मॉल, कॉल सेंटर, फास्ट फूड, वॉटर किंग्डम, सायबर विश्व हे सर्व दूर पोहोचले. दिवसेंदिवस तंत्रज्ञान अपग्रेड होत आहे.आधुनिकीकरण आणि समृद्धतेचा कालखंड म्हणूनही याकडे पाहिले जाते. जागतिकीकरणाच्या या कालखंडात भारताने खुल्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार केल्याने कल्याणकारी राज्याची संकल्पना मोडकळीस निघाली. सरकारी व सार्वजनिक क्षेत्राचाच मोठ्या प्रमाणात संकोच करून खाजगीकरण केले जात आहे. याचा सर्वात जास्त दुष्परिणाम हा आदिवासी समाजाला भोगावा लागतो आहे. आदिवासी म्हणजे मूळ रहिवासी. जो आदीम काळापासून जंगलात राहतो आणि जंगलातील साधन संपत्तीवरच ज्याची उपजीविका असते असा तो आदिवासी. जागतिकीकरणाच्या कालखंडात मल्टिनॅशनल कंपन्यांकरिता जमिनी अधिग्रहित केल्या जात आहेत आणि या जमिनी मुख्यतः जंगलातील असल्याने त्याचा थेट परिणाम आदिवासींच्या जगण्यावर होत आहे. जमीन अधिग्रहणामुळे विस्थापन, विस्थापनातून सामाजिक तुटलेपण, प्रस्थापित समाजाकडून न स्वीकारण्याची वृत्ती, यातून निर्माण झालेले सांस्कृतिक ताण तणाव आज आदिवासींच्या संदर्भात पाहावयास मिळतात. म्हणून या अनुषंगाने सदर शोधनिबंधात जागतिकीकरण आणि आदिवासी यांचा अनुबंध तपासण्यात आलेला आहे. 

·       मुख्य शब्द (Key Words) :- आदिवासी, जागतिकीकरण, विस्थापन, सांस्कृतिक संक्रमण, भाषाऱ्हास

·       संशोधन हेतू / उद्दिष्टे :-

संशोधकांनी शोधनिबंधासाठी निवडलेल्याजागतिकीकरण आणि आदिवासीया संशोधन विषयाची काही उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहे. 

१. जागतिकीकरण ही संकल्पना समजावून घेणे. 

२. जागतिकीकरण आणि आदिवासी यातील परस्पर संबंध जाणून घेणे.

३. जागतिकीकरणामुळे आदिवासींच्या जीवनात निर्माण झालेल्या समस्यांचा शोध घेणे.

·       संशोधन पद्धती :-

जागतिकीकरण आणि आदिवासीया अभ्यास विषयासाठी विविध वैचारिक संदर्भ ग्रंथ, ललित ग्रंथ, संशोधन लेख यांचा आधार घेतला असून सदर संशोधनासाठी विश्लेषणात्मक, वर्णनात्मक अभ्यास व संशोधन पद्धतीचा वापर केला आहे.

·       विषय विश्लेषण :-

१९९१ साली भारताने गॅट करारावर सही केली त्याचा परिणाम म्हणून भारतात खुल्या मुक्त अर्थव्यवस्थेची दारे उघडल्या गेली. एक नवे अर्थशास्त्र या कालखंडात उदयास आले. या अर्थशास्त्राच्या सिद्धांतानुसार जग ही एक खुली बाजारपेठ आहे. आणि या बाजारपेठेत नफा कमविणे एवढाच हेतू अनुस्यूत आहे. हा कालखंड मुख्यतः मुक्त अर्थव्यवस्था, उदारीकरण, खाजगीकरण, भांडवली व्यवस्था, व्यापारीकरण, खुले धोरण, स्पर्धात्मकता, माहिती तंत्रज्ञान आदी नाम संज्ञांनी जरी ओळखला जात असला तरी या कालखंडाला जागतिकीकरणाचा कालखंड म्हणून ओळखल्या जाते आणि तसे संबोधलेही जाते. जागतिकीकरण या एकाच शब्दात वरील सर्व संज्ञा एकवटल्या जातात.

१९९० नंतरच्या कालखंडावर जागतिकीकरणाचा प्रभाव आणि त्यांचे परिणाम दोन्हीही स्पष्टपणे दिसून येतात. नवे ज्ञान-तंत्रज्ञान या कालखंडात विकसित झाले. देशादेशात त्याचे आदान-पदान झाले. मोबाईल, इंटरनेट, डीटीएच, यांनी समाजाचा चेहरा मोहरा बदलून टाकला. दळणवळण सहज व सुलभ झाले. नव्या मल्टिनॅशनल इंटरनॅशनल कंपन्यांनी समाजजीवनात बस्तान बसविले. सामान्य माणसांच्या जीवनशैलीत फरक पडला. कॉर्पोरेट कल्चर अस्तित्वात आले. मॉल संस्कृतीने नव्या बाजारपेठेची ओळख सामान्य माणसाला करून दिली. रोजगाराच्या संधी वाढल्या. उद्योगधंद्याचे स्वरूप बदलले. एकमेकांपासून दूर असणारे देश त्यांच्या संस्कृतीसह एकमेकांशी जोडले गेले. कृषी, आरोग्य आदी क्षेत्रात नवे तंत्रज्ञान झपाट्याने विकसित होत आहे. एकंदर काय तर जागतिकीकरणाने समाजाच्या सर्वच क्षेत्रात आपले हातपाय पसरवले आहे.

जागतिकीकरणाचे जसे अनेक फायदे आहेत तसे अनेक तोटेही किंबहुना तोटेच जास्त समाजाला भोगावे लागतात. जागतिकीकरणाचा खरा चेहरा अजून स्पष्ट होऊ शकलेला नाही. मानवी समाजातला असा एकही व्यवहार नाही की, जिथे जागतिकीकरणाचा स्पर्श झाला नसेल. मानवी नातेसंबंधावर ही त्याचा पडलेला प्रभाव अलिकडच्या काळात जाणवू लागला आहे. वाढता चंगळवाद, अमर्याद बाजारीकरण, नव वसाहतवाद, वाढती विषमता, शहरी ग्रामीण भेद, नैसर्गिक संसाधनांची बेसुमार लूट, बदलत जाणारी जीवनशैली आणि घसरत चाललेली जीवनमूल्य इत्यादींच्या माध्यमातून जागतिकीकरणाचे हे दुष्परिणाम दिसून येतात.

आदिवासींच्या संदर्भात बोलायचे झाले तर जागतिकीकरणाचा सर्वात जास्त दुष्परिणाम हा त्यांनाच भोगाव लागत आहे. आदिवासी हा इथला मूळ पुरुष आदिम काळापासून रहिवास करणारा तो आदिवासी. आर्यांशी संघर्ष झाल्यानंतर आर्यांची गुलामगिरी न पत्करता किंवा त्यांच्याशी जुळवून न घेता इथला एत्तदेशीय समाज स्वतःच्या संरक्षणासाठी दूर जंगलात निघून गेला. तेथेच त्याने स्वतःचा रहिवास केला. त्याचा परिणाम असा झाला की, प्रस्थापित समाजव्यवस्थेपासून हा समाज दूर राहिल्याने तो अप्रगत किंवा मागास राहिला. मर्यादित नैसर्गिक साधन संपत्तीच्या संचयाने त्यांचा उदरनिर्वाह होत असल्यामुळे त्यांचे जगणे प्राथमिक पातळीवरचे राहिले. या सांस्कृतिक संक्रमणात त्यांनी त्यांची भाषा व संस्कृती ही स्वतंत्रपणे विकसित व समृद्ध केली. त्यांनी त्यांच्या रूढी, रीतिरीवाज, परंपरा स्वतंत्रपणे निर्माण केल्या. मौखिक परंपरेने त्यांनी त्यांचे साहित्य टिकवून ठेवले. त्यांनी निर्माण केलेले साहित्य हे स्वतंत्र व स्वायत्त असल्यामुळे पारंपारिक मूल्यमापनाच्या कसोटीवर त्यांचे मूल्यमापन अशक्य आहे म्हणून त्यांच्या साहित्याचे मूल्यमापन करायचे असेल तर मूल्यमापनाचे स्वतंत्र व स्वायत्त मापदंड तयार करावे लागतिल. 

जागतिकीकरणाचा सर्वात पहिला प्रभाव आदिवासींच्या अस्तित्वावर पडलेला पाहावयास मिळतो.    हजारो वर्षापासून आदिवासी या निसर्गाच्या सानिध्यात आपल्या सांस्कृतिक पर्यावरणात जगतो आहे.  आदिवासींची संस्कृती ही निसर्गातील साधनसामग्री गरजेनुसार वापरायची फारसा संचय करून ठेवायचा नाही अशा कल्पनेवर आधारित आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल साधला जातो मात्र जागतिकीकरणाने आधुनिकीकरणाच्या नावाखाली जे प्रारूप स्वीकारले ते मात्र त्याच्या उलट असे आहे त्यामुळे या आदिवासींना कुठल्याही तयारीविना या निसर्गसिद्ध व्यवस्थेतून बाहेर काढले जाते आणि जबरदस्तीने बाजाराधिष्ठित व्यवस्थेत आणून सोडले जाते. त्या आदिवासींच्या ताब्यात जंगले अरण्ये होती ती आता खाजगी मालकीची झाली आणि त्याचे रूपांतर एक तर शासकीय अभयारण्यात किंवा उद्योजकांचे मळे, मध्यमवर्गीयांची सहलीची ठिकाणी यासाठी झाले.

पर्यावरण बचाव किंवा संसाधनांचे पुनर्जीविकरण या गोंडस नावाखाली आदिवासींना आदिवासींच्याच मालकी जागेतून हाकलून बाहेर काढले जात आहे. जो मूळ मालक आहे ज्याला पर्यावरणाची जाणीव आहे अशालाच बाहेर हाकलले जात आहे. असेच आक्रमण त्यांच्यावर हजारो वर्षांपूर्वी झाले होते या परिस्थितीचे वर्णन आदिवासी लेखक आपल्या साहित्यातून व्यक्त करतात कवी विनायक तुमराम आपल्या कवितेत असे म्हणतात की,

गोंड आणि भिल्ल भूमीचे या धनी

राज्य केले आर्याआधी

आणखी कित्येक आदीम जमाती

सुखाने नांदते एकेकाळी

पूर्वीचे ते शूर भूपती नि वीर

यांचा संहार केला तुम्ही.

आदिवासी हेच या देशाचे मूळ मालक असून आर्यापूर्वी त्यांचे स्वतंत्र राज्य होते. महान संस्कृती अस्तित्वात होती. आर्यांच्या आगमना अगोदर विविध आदीम जमाती एकत्र गुण्यागोविंदाने नांदत होत्या परंतु आर्यांनी या अनार्यांचा पराभव करून त्यांचा संहार केला. तेव्हा अनार्यांनी जंगलात डोंगर कपारीत, दऱ्या खोऱ्यात दुर्गम भागात आश्रय घेतला. मात्र त्यांनी आर्यांची गुलामी स्वीकारली नाही म्हणून मग आर्यांनी त्यांच्या  निर्माण केलेल्या मिथकातून, प्राचीन पुरातन धर्मग्रंथांतून प्रामाणिकपणे जगणाऱ्या आदिवासींची कुचंबना केली. धर्माच्या नावाखाली त्यांची हेटाळणी केली. त्यांचे खच्चीकरण केले. त्यांच्या प्रतिमा विकृतपणे रंगविल्या राक्षस म्हणून त्यांना हिणवले गेले. ही खंत कवीच्या मनाला बोचते म्हणून कवी म्हणतो

अनार्य कुळीचे आम्ही आदिवासी

राक्षस जयांशी संबोधिले !

लुटून आम्हास रचिली पुराणे

नासविले जिणे गणगोताचे !

जागतिकीकरणाच्या या युगात इतिहासाचीच पुनरावृत्ती घडताना दिसत आहे. आदिवासींविषयी विकृत प्रतिमा समाजमाध्यमातून पसरवून त्यांना त्यांच्याच मालकी हक्काच्या जागेतून हाकलून लावण्याचे कटकारस्थान व्यापक पातळीवर सुरू आहे. आदिवासी हा अशिक्षित अडाणी आहे, त्याला समाजप्रवाहात आणण्यासाठी त्यांना सुशिक्षित करणे गरजेचे आहे. असे म्हणत त्यांच्याशी जवळीक साधण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. परंतु या जवळीक साधण्यामागचा सुप्त हेतू काहीतरी वेगळाच असतो. हा सुप्त हेतू भुजंग मेश्राम यांनी नेमकेपणाने पकडलेला आहे आपल्या कवितेत ते म्हणतात

ते आले तेव्हा त्यांच्या हातात

बायबल होते मी आमच्या हातात जमीन देवाजवळ काळा गोरा नाही या प्रार्थना करू

डोळे मिटून हरखलो

डोळे मिटले नकळत

तर त्यांच्या हातात जमीन होती

आमच्या हातात बायबल

ब्रिटिशांच्या राजवटीत वन कायदे निघाले. वनाकडे उत्पन्नाचे साधन म्हणून बघितले जाऊ लागले. त्यासाठी त्यांनी आदिवासींचा मूळ जमीन हक्क नाकारून त्यांना वनातून हद्दपार करण्याचे धोरण अवलंबले. राजवट बदलली स्वतंत्र भारताची राजवट अस्तित्वात आलेली असली तरी  आदिवासींची फरपट मात्र तशीच राहीली. आणि आता जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत देशाला प्रगत करण्यासाठी मानवी विकासाचे नवे मॉडेल स्वीकारले गेले. यात औद्योगिक संरचना, वसाहतींची पुनर्रचना, दळणवळण, उपग्रहांची निर्मिती आणि इंटरनेटची आंतरप्रणाली, नदीजोड धरणांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. मानवी विकासाचे हे प्रारूप जगभरातील सर्वच देशांनी स्वीकारले असले तरी या मानवी विकासासाठीविकासाचे तारतम्यआहे का ? हा खरा प्रश्न आहे.

मोठ्या धरणाच्या प्रकल्पासाठी भूमिपुत्राकडून जमिनी घेऊन

त्यांचेकडूनच त्याग करवीला जातो

हे आमचं विकासाच तारतम्य आहे.

मोठमोठ्या प्रकल्पासाठी धरणांसाठी आदिवासींच्या जमिनी सहज हस्तगत केल्या जातात. मल्टीनॅशनल कंपन्या नफा कमविण्यासाठी येथे येत आहेत. त्यांच्या  कारखान्याला कच्चामाल व सर्व सोयी सुविधा सहज पुरविल्या जाऊ शकेल अशी जमीन त्यांना देण्यात येत आहे. आदिवासींच्या जमिनी केवळ या एकाच कारणासाठी अधिग्रहित केल्या जात नाहीत तर इथे आपल्याला दुसरे एक कारण दिसते ते म्हणजे सेझ. सेझ म्हणजेस्पेशल इकॉनॉमिक झोनम्हणजेचविशेष आर्थिक क्षेत्रया विशेष आर्थिक क्षेत्राने तर आदिवासींच्या जीवनाची निव्वळ थट्टा उडवली आहे. मुळात जे आदिवासी भूभाग अस्तित्वात असताना त्यांचा विकास शक्य असताना तसे न करतास्पेशल इकॉनॉमिक्स झोननिर्माण करून प्रचंड पैसा त्यात ओतला जातोय व विकासाचे प्रारूप म्हणून त्याकडे अंगुली निर्देश केला जातोय.अशी जमीन आज आदिवासींच्या ताब्यात आहे म्हणून आदिवासींच्या जमिनी हिसकावून घेतल्या जात आहेत. यासाठीआदिवासी विकासाची भाषा आज जो तो बोलायला लागला आहे. सरकार दरबारी तर त्यांच्या विकासासाठी जणू योजनांची खैरात झडू लागली आहे. खाजगी यंत्रणेसकट शासकीय यंत्रणा त्यांच्या विकासासाठी राबून राबून थकून गेल्या की काय असेच वाटू लागले आहे. तरीही आदिवासींची ओरड कायमच ! दुःख दारिद्र्याचे ठाणेही त्यांच्या आवारात अद्याप कायमच ! असे काशासकीय योजना व सोयी सवलती आदिवासींपर्यंत खरेच पोचल्या कायत्यांचा अपेक्षित विकास घडून आला काय? याचे उत्तरनाहीअसेच  आहे. आदिवासींच्या नावावर विकासाचे केवळ शिष्टसंमत आराखडे व कृत्रिम देखावे निर्माण होऊ लागले आहे.६ आदिवासींचे शोषण करणाऱ्या या क्रियेला आजचा तरुण आदिवासी हा या सर्व प्रक्रियेला विरोध करतो. आदिवासी विरोध करतो म्हणून त्याला विकास विरोधी, देश विरोधी असे म्हटले जात आहे. जाणीवपूर्वक तसे पसरवले जात आहे. या अशामुळे सर्वसामान्य व्यक्तीच्या मनात आदिवासींविषयी दूषित भावना निर्माण होते म्हणून चामुलाल राठवा हा कवी असे म्हणतो की

प्रकल्प…..?

इतरांचा कायाकल्प

आमचा तर मरण संकल्प

कोण म्हणतो आम्ही देश विरोधी ?

कोण म्हणतो आम्ही विकास विरोधी ? अहो असे नाहीच मुळी

पण ….

बळी तो कान पिळी

सोम्याच्या सुखासाठी

गोम्याचा बळी?

बळींची उचलता तळी

अन् त्यांच्यासाठी आमचा बळी ?

वाहरे बंधूता आणि समता !

वाहरे देशाची एकता !!

समता आणि बंधुत्वाच्या बाता करता आणि आदिवासींना मात्र दूर लोटता. हा कुठला न्याय आहे. 

हे मोठ मोठे प्रकल्प आदिवासींच्या विस्थापनास कारणीभूत ठरत आहे. या विस्थापनामुळे आदिवासींच्या जीवनाची हेळसांड होत आहे.विरोध करणारे आदिवासी ठार होतात किंवा त्यांचा आवाज दडपला जातो. शुल्लक किंमत देऊन त्यांचे जोरदार विस्थापन केले जात आहे प्रस्थापित समाजव्यवस्था स्वीकारत नाही आणि भांडवलदार जगू देत नाही. अशा विचित्र कैचीत आदिवासी सापडला आहे. त्यांचा मूळचा संसार उध्वस्त करून त्यांना राहत्या ठिकाणापासून दूर नेले जाते. नुकसान भरपाई म्हणून थोडीशी मलमपट्टी केली जाते. मात्र त्यांचे योग्य ते विस्थापन होत नाही. आदिवासींना विस्थापनाच्या नावाखाली विमुक्तासारखे भटकावे लागते. त्यांच्या मूलभूत सुविधाही सोडविल्या जात नाही. विस्थापनापूर्वी आदिवासींना चांगले जीवन जगता येईल असे आश्वासन दिले जाते. परंतु हे आश्वासन खोटे असते चामुलाल राठवा यांच्याच भाषेत बोलायचे झाले तर,

“विस्थापनापूर्वी केल्या मोठ मोठ्या बाता

आता फक्त लाथाच लाथा

मधाचे बोट दाखवून तोंडात घालता कोरडे बोट

आमच्या विनाशातून तुमचा विकास”८

  जागतिकीकरणात आदिवासींच्या हे चित्र संदर्भात जगभर पाहावयास मिळत आहे. आदिवासींचे विस्थापन करून तेथे प्रस्थापित समाजाला स्थापित केले जात आहे. त्यांच्या सुख सोयींचा विचार केला जात आहे. नैसर्गिक संपदेला नाख लावले जात आहे. यामुळे विस्थापित झालेला आदिवासी समाज आणि प्रस्थापित समाज या दोन या सर्व प्रक्रियेमुळे प्रचंड सांस्कृतिक संघर्ष घडतांना दिसतो. यात दोन भाग असे दिसून येतात की, एक म्हणजे आदिवासींची स्वतःची संस्कृती जी स्वायत्त व स्वतंत्र आहे, तिच्या स्वायत्ततेवर जागतिकीकरणात घाला घातला जात आहे. आणि दुसरे असे की, प्रस्थापित सांस्कृतिकव्यवस्था आणि आदिवासींची सांस्कृतिकता यात संघर्षाची ठिणगी पडताना दिसते.

आदिवासींची संस्कृती ही बहुविध स्वरूपाची आहे. त्यांची वेशभूषा, सण-उत्सव, कलाप्रकार, खाद्यपदार्थ, भाषिक संकेत यात प्रांतागणिक आदिवासी जमातींमध्ये भिन्नता आढळून येते. ही बहुविधता केवळ जमाती गणीकच नाही तर त्यामध्ये नैसर्गिक पर्यावरणाचा मोठा वाटा असतो. कुठल्या प्रांतात, जमिनीत कोणता वेश व खाद्यपदार्थ हवा हे ठरविण्यात तिथल्या निसर्गाचा मोठा वाटा असतो.मात्र अशी विविधता टिकवून ठेवणे बहुराष्ट्रीय कंपन्यांना परवडण्याजोगे नसते. मग ही विविधता संपुष्टात आणताना सारे सपाटीकरण करण्याचा प्रयत्न करतात. आणि आपली उत्पादने या वर्गाच्या माथी मारतात. म्हणजे निसर्गातील या देशातील हवा, पाणी, जमीन यांचा वारेमाप आणि मोफत वापर करायचा. जे त्यांच्या मालकीचे त्यांना विस्थापित करायचे आणि नवी उत्पादने त्यांच्याच माथी मारून त्यांच्याच खिशातून पैसे काढून त्यांना भिकेला लावायची ही या बहुराष्ट्रीय कंपन्यांची जागतिक नीती असल्याचे दिसून येते. जागतिकीकरणात धर्म, जात व संस्कृती संघर्ष तीव्र झालेले पाहावयास मिळतात. मूलतत्त्ववादाने या कालखंडात मोठी उसळी घेतलेली दिसून येते. आणि या मूलतत्त्ववादाने आदिवासींच्या संदर्भातही गंभीर अशा समस्या निर्माण केलेल्या आहेत.

आदिवासींना आदिवासी असे न संबोधता त्यांना वनवासी अशी संज्ञा दिली जात आहे असे संबोधण्यामागे दोन सुप्त हेतू दिसतात. एक म्हणजे त्यांचे आदिमत्व नाकारणे आणि दुसरे म्हणजे आदिवासींची संस्कृती ही स्वतंत्र व स्वायत्त न मानता एका विशाल  संस्कृतीचाच अविभाज्य भाग आहे असे लोकमानसावर बिंबवावे, यासाठी विविध कटकारस्थाने, क्लुप्त्यांचा वापर केला जातोय. आदिवासींच्या देव देवतांचे विकृतीकरण करण्याचा कट रचला जातोय. आदिवासींच्या ज्या देवता आहेत त्यांचे स्वतंत्र अस्तित्व नाकारून त्यांना एका विशिष्ट संस्कृतीतील देवतांशी जोडण्याचा प्रयत्न मध्यंतरीच्या कालखंडात केला गेला. 

दुसरा एक भाग यात महत्त्वाचा असा आहे की, कुठलाही देश सांस्कृतिक कार्यक्रमातून प्रदर्शनातून आपल्या संस्कृतीचे प्रदर्शन करत असतो. भारत हा देश बहुभाषिक संस्कृतीने नटलेला देश म्हणून ओळखला जातो. भिन्नसमूहाचे लोक या देशात सुखेनैव नांदतात असे एक चित्र सामान्यपणे नेहमीच उभे केले जाते. त्यांच्या बहुसंस्कृतीचे प्रदर्शन अगदी जोरदार केले जाते. विविध पेहराव, नृत्य, भाषा बोलणाऱ्या व्यक्ती या प्रदर्शनात आकर्षणाची केंद्र असतात. प्रदर्शन पाहायला आलेला प्रेक्षक त्यांचे हे रूप पाहून भुलतात विशेष करून आदिवासींच्या संदर्भात असे मेळावे, कार्यक्रम नेहमीच भरवले जातात. त्यांच्या वेशभूषाचे, नृत्याचे, कलेचे, वाद्याचे प्रदर्शन अगदी थाटात होते. त्यांचा गौरव केला जातो. त्यांच्या या कलेत आधुनिकता नवता शोधली जाते. परंतु संस्कृती म्हणजे नेमके काय? आणि आपली संस्कृती आपण ठरवायची तरी कशी? आणि तिचे गोडवे तरी कसे गायचे ? पांढरपेशांनी निर्माण केलेली संस्कृतीची व्याख्या ही स्वतःच्या सोयीने त्यांनी निर्माण केलेली आहे. या संस्कृतीने निर्माण केलेले आदर्शाचे मापदंड झुट आहेत. आणि म्हणूनच कृष्णकुमार चांदेकरांसारखा कवी आपल्या कवितेत असे म्हणतो की

जोशीबाई ची मांडी दिसली तर

ती अब्रू ठरते

आणि मडावी बाईची मांडी दिसली तर

ती संस्कृती ठरते असे का?” १०

असे का ? ही संस्कृती आहे का? तिला संस्कृती म्हणता येईल का? तर निश्चितच नाही, ही तर विकृती आहे. या देशाची व्यवस्था अशी आहे की, उच्चवर्णीयांसाठी आणि दलित आदिवासी स्त्रियांसाठी येथे मूल्यमापनाचे निकष वेगळेच आहेत. उच्चवर्णीयांनी ठरवलेली किंवा त्यांच्यासाठी असलेली संस्कृती ही येथे ऊपेक्षितांसाठी बळजबरीने लादलेली शोषण व्यवस्था आहे.  या सांस्कृतिक मेळाव्यात  आदिवासींच्या हलाखीच्या परिस्थितीचा, कुपोषणाने मृत्युमुखी पडणाऱ्यांचा, त्यांच्या शोषणाचा कुठेही उल्लेख केला जात नाही. त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जाते. आदिवासी स्त्रियांच्या होणाऱ्या लैंगिक अत्याचाराकडेही डोळेझाक केली जाते. किंबहुना आदिवासी स्त्रीच्या नग्नतेला सांस्कृतिक चेहरा दिला जातो वास्तविक जोशीबाई आणि मडावी बाई या दोन्हीही स्त्री आहेत परंतु येथे उच्चवर्णीय स्त्रीला वेगळा न्याय आणि आदिवासी स्त्रीला वेगळा न्याय दिसून येतो.

या सांस्कृतिक मेळाव्यात आदिवासींच्या जगण्याचे जीवनाचे उदातीकरण केले जाते वास्तविक भारतीय राज्यघटनेने दलित आदिवासींचा सामाजिक विकास व्हावा म्हणून त्यांच्यासाठी आरक्षण आणले.  हे आरक्षण प्रस्थापितांना पचत नाही त्यावर सातत्याने समाजात उलट सुलट चर्चा सुरू असते. आणि मुख्यतः ही चर्चा आरक्षणाच्या विरोधात असते. आरक्षण विरोधी या चर्चेवर भाष्य करताना कवी चांदेकर म्हणतात,

अजूनही माझी माय घरात नागवी राहून लेकीला बाहेर पाठवीते किंवा

लेकीला नागवी ठेवून

माय घराबाहेर निघते

आणि त्यांच्या दिवसातून दहा साड्या फेरणाऱ्या मायलेकी

एकाच वेळी सिनेमात जाऊन बसतात

तरी भडवे म्हणतात

यांना आरक्षणाची गरज काय ?”११

आरक्षणाचा फायदा घेऊन आदिवासींची पहिलीच पिढी अजून समोर आलेली नाही. तरीसुद्धा लोक यांना आरक्षणाची गरज काय ? असे विचारतात. एक तर खऱ्या अर्थाने आरक्षणाचा सूर्य आदिवासींच्या पाड्यापर्यंत पोहोचलाच नाही. मधल्या मध्येच आरक्षण लाटले गेले. सोयीस्करपणे आज इतक्या वर्षानंतरही आदिवासींच्या मूलभूत गरजा पूर्ण होऊ शकल्या नाहीत. अंगावरची लाज झाकण्यापुरतेही कपडे त्यांच्या अंगावर येऊ शकलेले नाहीत. समता, सामाजिक न्याय त्यांच्यापासून आजही हजारो कोसो दूर आहे. त्यांची परिस्थिती आजही तशीच आहे. आणि शोषण करणारे उच्चवर्गीय मात्र थेट चंद्रापर्यंत जाऊन पोहोचले. तंत्र विज्ञानाची, शिक्षणाची मक्तेदारी त्यांच्याकडे आहे आणि तेच लोक वारंवार म्हणत असतात की यांना आरक्षणाची गरज काय ? जागतिकीकरणांनी कॉर्पोरेट कल्चर आणून आरक्षणाच्या मूळ हेतूलाच सूरुंग लावला आहे. सांस्कृतिक पातळीवर आदिवासींचे जागतिकीकरण करायचे आणि प्रत्यक्षात मात्र त्यांच्या विरोधी भूमिका घ्यायची असा तो दुटप्पिपणा आजच्या या व्यवस्थेत दिसून येतो. म्हणूनच चामुलाल राठवा उद्वेगाने असे म्हणतात की,

“नाईलाजाने

पण (दरडावून) विचारावेसे वाटते की,

निसर्गाने, मानवतेने, आणि

घटनेने दिलेली

माझी सनद कुठे आहे?”१२

जागतिकीकरणाचा प्रभाव आदिवासींच्या भाषेवरही पडला आहे. आदिवासी समाजात बहुविध आदिवासी बोली बोलल्या जातात. त्यांचा संदेशन व्यवहार याच बोलीतून होत असतो. मात्र आज या बोलींचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे. एकतर आदिवासी हा प्रस्थापित समाजापासून दूर राहिल्याने त्याला प्रमाण मराठी भाषेत व्यवहार करणे जड जाते. त्यामुळे शिक्षण घेतानाही त्याला अनंत अडचणींना सामोरे जावे लागते. म्हणून त्यांच्यात शिक्षण गळतीचे प्रमाण अधिक आहे. जागतिकीकरणामुळे आधुनिक जीवनशैलीचे जे काही मापदंड तयार झालेले आहेत. त्यामध्ये इंग्रजी ही एकमेव भाषा व्यवहाराचे माध्यम म्हणून पुढे येत आहे. नव्या कॉर्पोरेट कल्चरमध्ये  इंग्रजी अनिवार्य आहे. त्याचबरोबर माहिती तंत्रज्ञानातही इंग्रजीशिवाय पर्याय नाही आणि जे काही भाषा पर्याय उपलब्ध आहेत ते अतिशय तोकडे आहेत. याचा थेट परिणाम आदिवासींवर होत आहे. जिथे मराठीची अडचण आहे तेथे इंग्रजीतून व्यवहार करणे त्यांना जड जाते. जागतिकीकरणाचा हा कालखंड भाषाऱ्हासाचा कालखंड म्हणून ओळखला जातो. आदिवासींचे भाषावैभव या आधुनिक मानदंडामुळे धोक्यात आलेले दिसते.

·       निष्कर्ष :-

जागतिकीकरण आणि आदिवासी यांचा ताळेबंद मांडताना पुढील काही निष्कर्ष दिसून येतात. 

१. जागतिकीकरणात आदिवासींच्या विकासाऐवजी त्यांच्या वाट्याला दुःख भोग आलेले दिसून येतात. 

२. जागतिकीकरणात आदिवासींचे मोठ्या प्रमाणात विस्थापन होताना दिसते. 

३. विस्थापनामुळे आदिवासींच्या वाट्याला हलाखीचे जीवन जगणे आलेले आहे. 

४. जागतिकीकरणातील विस्थापनामुळे आदिवासींची सांस्कृतिकता धोक्यात आलेली दिसते. 

५. आदिवासी व प्रस्थापित या दोहोत सांस्कृतिक संघर्ष निर्माण झालेला दिसून येतो. 

·       समारोप,

 बदल हा सृष्टीचा नियम आहे. समाज हा सातत्याने बदलत असतो, तो गतिशील असतो. नवे नवे प्रवाह, चढउतार सामाजिक जीवनात येत असतात. त्याचबरोबर नव्या नव्या सामाजिक आणि वैज्ञानिक संकल्पनांचा अवलंब सामाजिक प्रगतीसाठी समाजाला करावा लागतो. जागतिकीकरणही या बदलाचा एक महत्त्वाचा भाग आहे. आज जागतिकीकरण अटळ आहे. जागतिकीकरणाला टाळून आजचा कुठला ही समाज विश्वातील ज्ञानापासून अलिप्त राहू शकत नाही. जागतिकीकरणामुळेच जीवनाची सर्व क्षेत्रे प्रभावित झालेली आहे. ज्ञान तंत्रज्ञानाच्या पातळीवर प्रचंड मोठा बदल जागतिकीकरणात पाहायला मिळतो. जागतिकीकरणाच्या या प्रभावातून आदिवासीही सुटलेला नाही. बदल हा समाजाचा सृष्टीचा नियम असला तरी हा बदल नेमका कोणासाठी ?आणि कशासाठी? याचाही विचार होणे गरजेचे आहे. जागतिकीकरणामुळे प्रचंड प्रमाणात प्रगती जरी झालेली असली तरी त्याचे दुष्परिणामही समाजाला भोगावे लागतात. आदिवासी समाजाला जागतिकीकरणाच्या व्यापक दुष्परिणामाला सामोरे जावे लागते आहे.  विस्थापन त्याचबरोबर सांस्कृतिक संघर्ष आणि भाषिक पातळीवर अवमूल्यन आदिवासी समाजाचे झालेले दिसून येते. त्यामुळे जागतिकीकरणात आदिवासींना सामावून घ्यावयाचे असेल तर जागतिकीकरणाचे त्याच्या विकासाचे प्रारूप, स्वरूप बदलणे गरजेचे आहे.

·       संदर्भ :- 

१. तुपे केशव, ‘जागतिकीकरण आणि आदिवासी संस्कृती व साहित्य’, ‘आदिवासी साहित्य आणि लोककला’, संपा. डॉ. शत्रुघ्न फड, प्रकाशक प्राचार्य डॉ. सुशील केळकर, प्रकाशन दिनांक २५ ऑगस्ट २०१२, पृष्ठ क्रमांक १०५.

२. तुमराम विनायक, ‘एकलव्य’, गोंडवन पेटले आहे, एकलव्य प्रकाशन, चंद्रपूर, आ.प.८७, पृष्ठ क्रमांक ६४.

३. तत्रेव, पृष्ठ क्रमांक ६६.

४. मेश्राम भुजंग, उलगुलान, तथागत प्रकाशन, ठाणे, आवृत्ती पहिली ९०, पृष्ठ क्रमांक १२७.

५. वाल्हेकर ज्ञानेश्वर, काव्यातून प्रकट होणारे आदिवासी जीवन, आदिवासी मराठी साहित्य: एक अभ्यास, स्वरूप प्रकाशन, औरंगाबाद, आवृत्ती पहिली ०९, पृष्ठ क्रमांक २०६.

६. तुमराम विनायक, प्रस्तावना आदिवासी कवितेच्या निमित्तानेशतकातील आदिवासी कविता - संपादक - विनायक तुमरामहरिवंश प्रकाशन, नागपूर, प्रथम आवृत्ती ०१ ऑगस्ट २००३, पृष्ठ क्रमांक ६४ 

७. तत्रेव, पृष्ठ क्रमांक ६५.

८. राठवा चामुलाल, धरण आणि मरण, शतकातील आदिवासी कविता - संपादक - विनायक तुमरामहरिवंश प्रकाशन, नागपूर, प्रथम आवृत्ती ०१ ऑगस्ट २००३, पृष्ठ क्रमांक १७५ 

९. तुपे केशव, ऊनि पृष्ठ क्रमांक १०६. 

१०. वाल्हेकर ज्ञानेश्वर, ऊनि, पृष्ठ क्रमांक २४०.

११. जावळे लता, उदघोषित कविता, नवदोत्तर आदिवासी कवितेतील सामाजिक, नवदोत्तर मराठी साहित्य, एक दिवसीय राज्यस्तरीय मराठी साहित्य परिषद, तक्षशिला महाविद्यालय, अमरावती, २८ मार्च २०१८, पृष्ठ  क्रमांक ४०

१२. राठवा चामुलाल, माझी सनद, ऊनि, पृष्ठ क्रमांक १७८.

 

प्रा. डॉ. अक्षय किशोर घोरपडे,

ghorpadeakshay7@gmail.com

जागतिकीकरण आणि आदिवासी

  जागतिकीकरण आणि आदिवासी डॉ . अक्षय किशोर घोरपडे. ·        गोषवारा  (Abstract) :- १९९० नंतरचा कालखंड हा भारतीय समाज जीवनात फार मोठा सा...