' लघुत्तम
कथा '
(1)
' पिवळं कारड '
" का ऽ वं शालन, हा एवढा मोठा
बागायतदार कंटोरच्या दुकानात आपल्या पिवळ्या कारडावाल्या लोकाहिच्या रांगित कसा?
येच्याकडे
कुठून अन कसंकाय आलं माय पिवळं
कारड
".
" तुल्हे ठाऊक नही कां बह्ये ".
" नही माय ".
" आवं माय तेचा पुतन्या झेडपीत निवडून
नही आला कां माघंल्या साली ".
" आसं हाये कां ! "
(2)
' समाजभूषण '
शह्यरातल्या सरकारी नवकरीत दर मह्यन्याले
पगारापेक्षा कैकपट काळंधन कमावून तो कोट्याधीश झाला.
गावाकडे समाजमंदिर बांध्याले तेन्हं लाखानं
देणगी देल्ही. समाजाच्या मेळाव्यात समाजानं तेचा ' समाजभूषण '
म्हणून
गौरव केला.
- रवींद्र पांढरे.
🍁🍁🍁
कथा
ओव्हरटेक
डोसक्यावर काळेकुट्ट टांगते ढग. समद्या शिवारावर काजळ शिंपडल्यासारखं वाटत व्हतं .काळोख दाटून आला व्हता .मध्येच विजांची सळसळ. मेघांचा गडगडाट. कानठळ्या बसणारे आवाज. पाऊस कधी ईल ह्याचा नेम नाही.
आसं मनाय उशिरा पाऊस सुरू झाला. सोबतीनं विजांचा थयथयाट.पावसाच्या कचाट्यात समदं शिवार सापडलं. झाडाजुडप डोंगर दिशेने असे झाले. गाडीच्या टपावर खडे पडावे तसा पाऊस आदळत व्हता .पावसाच्या ओल्याचिंब धुक्यात समदं एकजीव झालं. व्हत . त्यातूनही वाट काढत जो तो आपल्या मुक्कामाकडे निघाला व्हता .
काळी कुळकुळीत सडक अनेक मोटारीना अंगावर घेऊन धावत व्हती. कारा, टेंपो, ट्रका ह्येंची रांग लागली व्हती .समद्दनं आपल्या गाड्यांचे हेडलाईट, इंडिकेटर्स लावले व्हते. तेवढ्याच काय तो त्या अंधारात दिलासा. त्यांचं चमचमणं जिवाला सुखवित व्हतं . व्हायपर्सची स्पीड वाढली व्हती. म्हागचा पुढचा अंदाज घेत ड्रायव्हर आपल्या पद्धतीने गाड्या चालवत व्हंते. झाडं झुडपं थरथरत व्हंते .त्यात मध्येच विजंचं पातं सळसळायचं अन काळीज लख्खकन करायचं.
मग एक / दीड तासानंतर पावसानं मारा बंद केला. आन् रोडवरच्या गाड्या ठळक दिसू लागल्या. संमद्या गाड्या स्वच्छ धुऊन निघाल्या व्हत्या. एकदम चकचकीत. रंगीबेरंगी पाखराची पंखवीत तशा गाड्या चमकत व्हंत्या. त्येंच काच चकाकत व्हते. अनेक गाड्यांनी आपल्या काचेवर, पाठीवर, पोटावर देवाधर्माचे, वर्गाचे, पंथाचे, प्रतीकं, आकडे, चिन्ह, शब्द ,विचार कोरले व्हते.
‘स्वामीरथ’
‘सोन्याची जेजुरी’
‘परब्रम्हलिंग भजे पांडुरंगम्’
‘रौद्रशंभू’
‘जयजय रघुवीर समर्थ’
‘जय श्रीकृष्णा’
‘होय हिंदूच’
‘जय मल्हार’
‘जाणता राजा’
‘Jesus
+’
‘भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे’
‘ओम साईराम’
‘786’
‘तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार’
‘कुणी आवडला तर वाट दाखविन, नडला तर जात दाखवीन’
‘द ग्रेट मराठा’
‘मेरा भारत महान’
असं काईबाई गाड्यांवर लिहिलेलं दिसत व्हतं. प्रा.डॉ. सुरज चांदमारे यांची गाडीही यामध्ये व्हती. ड्रायव्हिंग करत करत ते हे सर्व वाचत व्हते. त्यांनी आपल्या गाडीच्या मागच्या काचेवर रेडियमचं निळ अशोकचक्र चिटकवलं व्हतं .
आता अशोकचक्र म्हटल्यावर आपण भारतीय असल्याची ती खरी ओळख आहे. पण महाराष्ट्रातील ती नवबौद्धांची ओळख ठरली आहे. एका नजरेत ओळखलं जायचं की ही जयभीमवाल्यांची गाडी हाय मनून.आसं असलं तरी प्रा. सुरज चांदमारे गाडीवर अशोकचक्र चिटकवून साऱ्या महाराष्ट्रभर प्रबोधनानिमित्त फिरत व्हते.
अशोकचक्र चिटकवण्यात त्यांना वावगं असं काही वाटत नव्हतं. प्रत्येकजन आपला धर्म ,पंथ, वर्ग आपापल्या पद्धतीनं अनुसरतो. आपण कोणत्या धर्माचे आहोत, कोणत्या विचारधारेचे अनुयायी आहोत, हे जमेल त्या ठिकाणी, जमेल तेवढे अधोरेखित करण्याचा जो तो प्रयत्न करतो.
घराचे दरवाजे, भिंती, मोटर- बाईक, कार यावर आपापल्या धर्माचे, देवदेवता, चिन्हे, प्रतिकं, शब्द, विचार अनेकजण डकवित असतात. ‘मनात धर्म ठेवण्यापेक्षा आता तो जास्त जनातच दाखवण्याची चढाओढ लागली आहे.’ मी असा धर्माभिमानी आहे हे पुन्हा पुन्हा गिरविलं जातं. आणि याचे लाभ ही होतात. ख्रिश्चन, हिंदू, जैन ,मुस्लीम यांचं तर हे कवचंच आहे .याच्या उलट नवबौद्धांचं आहे. त्यांनी असं काही लिहिलं तर ते मान्य होत नाही. त्यांना व्देषाच्या विषारी डोहात बुडवलं जातं. मत्सराचे गतीरोधक जागोजागी उभे केले जातात. हाटकून भांडण काढलं जातं. चुकून टाचणी तरी टोचली तर लगेच तलवार उपसली जाते ...
... आताबी तसंच झालं. डॉ. सुरज चांदमारे यांच्या गाडीसमोर ‘होय हिंदूच’ असं काचेवर भगव्या रंगानं लिहिलेली गाडी चालली व्हती. तिचा स्पीड अतिशय कमी व्हता. ना ती स्वतः स्पीडनं जात व्हती ना दुसऱ्याला जाऊ देत व्हती. आम्ही कसंही चालतो तरी आम्हाला कोणी बोलू शकत नाही असा त्यांचा अविर्भाव व्हता .पाच / दहा मिनिटं झाली पण गाडीची गती काही वाढत नव्हती. आन् प्रा. चांदमारेंना तर जायची घाई व्हती. त्येंला एका ठिकाणी वेळेत पोहचायचं व्हतं. शेवटी त्येंनी हॉर्न वाजवून साईड मागितली .पण गाडीतले पोरं काही दात देत नव्हते. त्येंचं हासणं, खिदळणं चालू व्हतं.
शेवटी सुरज चांदमारेंनी थोडा रुंद रस्ता दिसताच आपल्या गाडीची स्पीड वाढवली व ‘होय हिंदूच’ ला ‘ओव्हरटेक’ केलं . अन् बघता बघता तसल्या पावसाळी हवेत ठिणकी पडली.
‘माईला सद्या, जयभीमवाल्याची गाडी दिसाल्याय...
‘कस्याऊन ?’
‘माईला तुझ्य, तुला अशोकचक्र दिसंनाय का?’
ड्रायव्हर सीटच्या बरोबर म्हागं बसलेला दणकट पोरगा बोलला .
‘अशोकचक्र आसलं मनून काय झालं? जयभीमवाल्यांचीच आसलं कस्यावरून?’ ड्रायव्हींग करणाऱ्यानं उगंच शंका घेतली.
‘माईला तुज्या जयभीमवाल्यासिवी कोण लावतंया आशोकचक्र...’
‘मंग आता रं?’ दुसरेच दोन पोरं प्रश्नार्थक बोलले.
‘गाडी पुडी घे, माईला आपणाला ‘ओव्हरटेक’ ?’
त्या पोरांना त्यांच्या गाडीला ओव्हरटेक करणं अपमानित वाटलंच. पर एक नव- बौद्ध आपणाला ‘ओव्हरटेक’ याचा संताप जास्त आला. त्येंला ह्ये सहनच झालं नाही. त्येंचा तो म्होरक्या तर सारखा फुरफुरत व्हता.
‘ओव्हरटेक’ मग ते गाडीचं असो की राजकारणातलं, साहित्यातलं असो सामाजिक क्षेत्रातलं, खेळातलं असो की सांस्कृतिक क्षेत्रातलं. एक दलित आपणाला ओव्हरटेक करतोय ही कल्पनाच डोकं तडकवणारी. यातून कोणीही सुटलं नाही. पुरोगामीपणाचा आव आणणाऱ्यांनासुद्धा हे चालत नाही. बाकीच्यांची तर कथाच निराळी. खासगीत समदी चर्चा जातीला केंद्रस्थानी ठेवून. समदं जोखणं जातीला धरूनच. मंग तुम्ही स्वतःला सोळा आणे सिद्ध केलं तरी.
‘ ... मी अशा प्रवृत्तीचा धिक्कार करतो हा एक प्रकारे आंबेडकरी विचारांना दाबण्याचा प्रकार आहे...’ एक ‘... प्रत्येकाला आपापल्या धर्माप्रमाणे राहण्याचं स्वातंत्र्य आहे. आपल्या घरावर, गाडीवर, इच्छा असेल तर आपल्या धर्माचे चिन्ह, प्रतीक आपण लावू शकतो. त्याला कोणी रोखू शकत नाही. पण काही धर्मियांना ही केवळ आपलीच मक्तेदारी वाटते...’ दोन
‘समूहाला मन नसतं तर ताकद असते. समूहाकडे विचार नसतो तर शक्ती असते. आणि या शक्तीच्या जोरावर ते इतरांची प्रतीकं पुसण्याचा प्रयत्न करतात. तसाच प्रकार प्रा. चांदमारे सरांच्या बाबतीत झाला आहे. आणि तो अतिशय निंदनीय आहे...’ तीन.
प्रा सुरज चांदमारे यांच्या गाडीवर झालेला हल्ल्याचा निषेधार्थ शहरातील एका महाविद्यालयाल निषेध सभा आयोजित केली व्हती. प्राध्यापक, वकील, कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते. स्वतः प्रा. चांदमारे सुद्धा हजर व्हते. त्यांनी पुन्हा एकदा तो प्रसंग सभेला सांगितला...
. ... ‘होय हिंदूच’ चक्क गाड्या गाडीच्या समोर आणून उभी केली अन् त्या चार-पाच पोरांनी त्येंच्या गाडीला घेरलं. काचंवर मुठी आदळून लागल्या. एकानं तर चक्क दरवाजालाच हात घातला.
‘ए उत्तर खाली...’
‘भोसडीच्या उतर लवकर’ ते चारपाच चेहरे क्रोधाने बघत व्हते.
त्यातला एकाचं लक्ष पुस्तकावर गेलं. चारपाच पुस्तकं व्हती. एकावर बाबासाहेबाचं चित्र व्हतं, ते पाहून तर ते जास्तच बिथरले.
‘बाहेर निघ. का ओढून काढू...?’ ती पोरं त्येंला आव्हान देत व्हती .
संकटाशी सामना कसा करावा? असं भाषणात सांगणारा प्राध्यापक. तथागतांचं , बाबासाहेबांचं तत्त्वज्ञान सांगणारा प्राध्यापक या प्रसंगातून बाहेर कसं पडावां ह्येचा विचार करीत व्हता. त्येलाही राग येत व्हता. पण प्रसंगाचं गांभीर्य ओळखून त्येनं राग आवरला. आन् मोठ्या धीरानं, आत्मविश्वासानं बाहेर पडला.
‘बोला काय झालं. काय प्रॉब्लेम आहे?’ ‘बोला काय ऑऽऽऽ. आंगावर चिकूल बग. डोळे बंद करून गाडी चालवितोस? ऑऽऽऽ.
त्यातल्या दणकट पोरांना गोंदलेल्या दंडावर उडालेली चिखलाचे थेंब दाखविले
Sorry I am really very very sorry
उडाला असेल चिखल पण मला जरा घाई होती
प्राध्यापक चांदमऱ्यांनी दिलगिरी व्यक्त केली नम्रपणे सॉरी बोलले. पण ती पोरं ऐकण्याचा मनस्थितीत नव्हती. तारुण्याचा कैफ मदिरेची झिंग त्यांना ढुसण्या देत व्हती. त्यामुळे त्यांचा तोल चालला होता .
' ए ss सॉरी काय आss' असं म्हणून त्या दणकट पोरांन ढकलण्याचा प्रयत्न केला.
'ए जाड्या, हात लावशील तर बघ...' चांदमारे रागाने बोलले.
'काय करशील ? आss' तो पोरगा निमित्त शोधत होता.
मग मात्र प्राध्यापकाचा आवाज चढला आणि तो बोलला 'चल गाडी बाजूला घे '
' नाही घेतली तर...' पोरांनी भांडण उकरून काढलं.
ठीक आहे म्हणून सुरत चांदमारे गाडीत बसले. गाडी स्टार्ट केली आणि रिव्हर्स घेऊन ते पुढे निघणार तेवढ्यात एका पोरांना हातातली दारूची बाटली मागच्या काचेवर मारली. आणि एका क्षणात गाडीची काच फुटली. अशोक चक्राचे तुकडे झाले. आरे निखळून पडले. प्राध्यापक सुरज चांदमारे यांनी पाहिलं तेव्हा त्यांच शरीर संतापाने उकळलं. डोक्यात रक्त उतरलं. ते उसळी मारून बाहेर आलं. आणि त्या पोराच्या कानावर खन्नकन वाजवली. आपण काय करतो याचं भानही राहिलं नाही. अंगातल सारा लावा त्या पोरावर ओतला. पोरगा लोळागोळा झाला. खूप वेळानंतर जेव्हा ते भानावर आले. तेव्हा सारा ट्रॅफिक ठप्प झालं होतं.
-आत्माराम गोडबोले.
🍁🍁🍁
कथा
बाप...बाप
असतो.....!
पंच्याहत्तर वर्षाचे भास्करराव आज शुद्धीवर आले होते. गेल्या तीन दिवसापासून
आयसीयु मध्ये अॅडमिट होते. सकाळी फिरायला जाणे ही त्यांची रोजची सवय. असेच तीन
दिवसापूर्वी सकाळी फिरायला गेले असतांना भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली होती.
त्यातच मेंदूला जबर मार लागल्याने ते हॉस्पिटल मध्ये अॅडमिट होते. मेंदूमध्ये
प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने त्यांचे ऑपरेशन करणे गरजेचे होते. परंतू ते शुद्धीवर
येणे आवश्यक होते. त्या शिवाय ऑपरेशन करणे शक्य नाही असे डॉक्टरांचे म्हणणे होते.
डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतर आज त्यांना शुद्ध आली होती. लवकरात लवकर त्यांचे
ऑपरेशन करणे गरजेचे होते. नसता परत शुद्ध हरपून ते कोमात जाण्याची शक्यता होती.
म्हणून डॉक्टर गडबड करत होते. डॉक्टरांनी त्यांच्या मुलाला आयसीयुमध्ये बोलावून
घेतले. डॉक्टर मुलाला सांगत होते. “बाबांच्या मेंदूला जबर मार लागल्याने रक्तस्त्राव जास्त झाला आहे. तात्पुरता
आपण तो बंद केला आहे. परंतू ऑपरेशन केल्याशिवाय पर्याय नाही. त्याशिवाय
रक्तस्त्राव पूर्णपणे बंद होऊ शकणार नाही. ऑपरेशन केले नाही तर ते कायमचे पॅरलाईज
होऊ शकतात किंवा कायमचे कोमात जाऊ शकतात. ऑपरेशनचा खर्च साधारण पाच लाख येईल. काय
करायचे ते लवकर ठरवा.” असे त्यांनी सुमितला सांगितले. वास्तविक ही
गोष्ट भास्कररावांसमोर बोलणे उचित नव्हते. ते नेमकेच शुद्धीवर आले होते. पण
डॉक्टरांनी वेळ जाऊ नये. म्हणून सुमितला आयसीयुमध्ये बोलावून सर्व परिस्थिती
समजावून सांगितली. सुमितच्या डोळ्यात पाणी तरळत होते. एक तासात निर्णय सांगतो.
म्हणून तो बाहेर निघून गेला.
डॉक्टर व सुमितमधील बोलणे भास्कररावांनी नेमके ऐकले. त्यांच्या ही डोळ्यात
पाणी आले. डॉक्टर त्यांना तपासून निघण्यासाठी वळले. तेवढ्यात भास्कररावांनी
डॉक्टरांचा हात धरला आणि हातातल्या सलाईनच्या नळी सह डॉक्टरांना हात जोडून कापऱ्या
आवजात ते बोलू लागले. “डॉक्टर साहेब मला शुद्धीवर आणल्याबद्दल आपले
धन्यवाद. माझी तुम्हांला एक विनंती आहे आणि ती विनंती तुम्ही मान्य करावी. ही माझी
शेवटची इच्छा समजा. डॉक्टर साहेब तुम्ही
माझ्या मुलाला जे काही सांगितले ते सगळे मी ऐकले. माझे आता वय झाले आहे. आजपर्यंत
माझे सगळे आयुष्य कष्टातं गेले. पण सगळ्यांचे करता-करता आयुष्य आनंदात जगलो. कधी
कशाची तक्रार केली नाही. हे सगळे करतांना कर्जाचा डोंगर झाला. तो डोंगर
उतरता-उतरता कधी इथं पर्यंत पोहचलो ते लक्षात ही आले नाही. या कर्जाच्या
डोंगरामुळे माझ्या कुटूंबासाठी मला हवे तसे काही करता आले नाही. माझ्या लेकरांचा
हट्ट कधी पुरवता आला नाही. मीठ भाकरी खाऊन माझी लेकरे शिकली. कधी कसला हट्ट
त्यांनी केला नाही. पोरगा लहान वयात काम करून शिकला. कधी कशाची मागणी त्याने केली
नाही. चांगला शिकून आता नोकरीला लागला आहे. माझ्याकडे लक्ष ही देतो. माझी, त्याच्या आईची काळजी ही घेतो. आता नव्याने
त्याचा संसार ही सुरु झाला आहे. पोरगी ही तिच्या घरी सुखी आहे. तिने सुद्धा कधी
कसला हट्ट केला नाही. डॉक्टर साहेब माझे सगळे आयुष्य कर्ज फेडण्यात गेले. आता
माझ्या ऑपरेशनसाठी माझ्या पोराला पण कर्ज काढावे लागेल. माझ्यासाठी तो कसला ही
विचार न करता ते ही काढेल. मला माहीत आहे. पण डॉक्टर साहेब माझे आयुष्य जसे नुसते
कर्ज फेडण्यात गेले. तसे त्याचे नको जायला. लहानपणापासून तो कष्ट करत आलायं.
आताशी कुठे त्याचा सोन्या सारखा संसार सुरु झालायं. मी जे कर्ज फेडताना भोगले.
माझ्यासाठी माझ्या लेकराला भोगायला नका लावू. उलट मला सुट्टी द्या. इथे दवाखान्यात
जीव ठेवण्यापेक्षा माझ्या घरात, माझ्या लोकांमध्ये शेवटचा श्वास घेतला. तर जीव कशात गुंतणार नाही. जे घर
घेण्यासाठी व बांधण्यासाठी कर्ज घेतले. ते फेडण्यासाठी माझ्या लेकरांच्या इच्छा, स्वप्नं पूर्ण करू शकलो नाही. त्या घरात मला
माझा देह ठेवू द्या. माझे ऑपरेशन करू नका. माझ्या लेकराला माझ्यासाठी आयुष्यभर
कर्ज फेडायला नका लावू. जगू द्या त्याला आनंदाचे दोन दिवस. आता जगून तरी काय करू? असे अधू होऊन लेकाच्या जीवावर जगण्यापेक्षा
देवा घरी गेलेले बरे. ही माझी शेवटची इच्छा समजा.”
हे सर्व ऐकतांना डॉक्टरांच्या ही डोळ्यात पाणी आले. भास्कररावांचा हात धरून ते
त्यांना म्हणाले, “बाबा काळजी करू नका तुमच्या मुलाला आयुष्यभर
कर्ज फेडण्याची वेळ येणार नाही. शासनाने तुमच्यासाठी सोय उपलब्ध केली आहे. आपण
शासकीय योजनेतून तुमचे ऑपरेशन करू. एक रुपया ही तुमच्या मुलाला कर्ज होणार नाही.
काळजी करू नका सगळे चांगले होईल. मी सांगतो तुमच्या मुलाला काय करायचे ते चिंता
करू नका.” डॉक्टरांनी स्वत:चे डोळे पुसले आणि स्वत:शी
पुटपुटले खरचं बाप.......बापच असतो.
-सचिन व्ही.काळे.
🍁🍁🍁
 |
| ©Sunil Awchar |
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
चित्रपट गीत समीक्षा
" चंदन सा बदन,चंचल चितवन "
गुजराती साहित्यकार गोवर्धनराम माधवराम त्रिपाठी द्वारा लिखित 'सरस्वतीचंद्र' ही एक प्रसिद्ध कादंबरी आहे.ही कादंबरी सन 1897 ते 1902 या 15 वर्षांच्या कालावधीत चार भागात प्रकाशित झाली. याच कादंबरीवर आधारीत ' सरस्वतीचंद्र ' हा हिंदी चित्रपट इ.स.1968 मध्ये प्रदर्शित झाला होता. हा हिंदीतील शेवटचा कृष्ण-धवल चित्रपट होता. 19 व्या शतकातील भारतातील सरंजामशाही, उत्कट प्रेम, प्रेमाची विफलता, त्याग यांचे उत्कृष्ट चित्रण यात केले गेले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक गोविंद सरैया तर निर्माता विवेक होते.
या चित्रपटातील 'चंदन सा बदन', 'छोड दे सारी दुनिया किसी के लिए ये मुनासिब नहीं आदमी के लिए' , 'हमने अपना सब कुछ खोया प्यार तेरा पाने को ', ' फूल तुम्हें भेजा है खत में फूल नहीं मेरा दिल हैं ', 'मैं तो भूल चली बाबुल का देस पिया का घर प्यारा लगे', 'सौ साल पहले की बात है', 'वादा हमसे किया दिल किसी को दिया' ही सर्वच गाणी कर्णमधुर होती. परंतु कल्याणजी- आनंदजी यांचे संगीत, इंदीवर यांचे गीत आणि मुकेश यांच्या मखमली आवाजातील 'चंदन सा बदन चंचल चितवन' हे मला आवडलेले नितांत सुंदर गीत.
मनीष व नूतन यांच्यावर हे गीत चित्रित केलेले आहे. या गीतात प्रियकराने आपल्या प्रेयसीचे इतके सुंदर वर्णन क्वचितच दुसऱ्या कुणी केलं असेल.
" चंदन सा बदन चंचल चितवन
धीरे से तेरा ये मुस्काना
मुझे दोष न देना जग वालों
हो जाऊं अगर मैं दीवाना "
चंदनासारखी तुझी ही सुंदर काया,प्रेमानं ओथंबलेली तुझी ती नजर आणि कहर म्हणजे हळूवार हास्य पसरलेली तुझी ती मुखमुद्रा. तुझे हे घायाळ करणारे सुंदर रुप पाहून मी जर वेडा झालो तर यात मात्र माझा दोष नाही.
" ये काम कमान भवें तेरी
पलकों के किनारे कजरारे
माथे पर सिंदूरी सूरज
होंठों पर दहकते अंगारे
साया भी जो तेरा पड़ जाए
आबाद हो दिल का वीराना "
तुझ्या भुवया कामदेवाच्या धनुष्या प्रमाणे दिसत आहेत.काजळ भरलेल्या तुझ्या काळ्याभोर पापण्यांच्या त्या कडा तर फारच सुंदर.तुझ्या कपाळावरील कुंकू म्हणजे आकाशात तळपणारा लालबुंद सूर्यच.तुझे ओठ हे रखरखत्या निखाऱ्यांपेक्षा काही कमी नाहीत.तुझी सावली जरी पडली तरी माझ्या ह्रृदयाचं वैराण वाळवंट हिरवेगार झाल्याशिवाय राहणार नाही.
" तन मी सुंदर मन भी सुंदर
तू सुंदरता की मूरत है
किसी और को शायद कम होगी
मुझे तेरी बहुत जरुरत है
पहले भी बहुत मैं तरसा हूं
तू और न मुझको तरसाना "
आपल्या सुंदर शरीरा प्रमाणे तुझे मन ही सुंदर आहे. मला तर तू सौंदर्याची देवीच वाटत आहे.कुणाला नसेल पण मला खरोखर तू हवी आहेस.मी या अगोदरही तुझ्यासाठी खूप व्याकुळ झालो होतो.आता तरी यातून माझी सुटका कर.
या गितातील अभिनेता मनिष आणि अभिनेत्री नूतन यांचा विरह भावना व्यक्त करताना अभिनय लाजवाब आहे. शब्दांना बोलकं करणाऱ्या नरीमन इराणी यांच्या छायाचित्रणाला तर तोडच नाही.विरहाने व्याकुळ झालेल्या प्रियकराच्या आर्त स्वराला मुकेश यांच्या आवाजाने खरोखर न्याय दिला आहे.
' सरस्वतीचंद्र ' या चित्रपटाला 1969 चा सर्वोत्कृष्ट छायाचित्रणाचा राष्ट्रीय पुरस्कार नरिमन इराणी यांना तर सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शकाचा पुरस्कार कल्याणजी आनंदजी यांना मिळाला होता.फिल्म फेअरचा सर्वोत्कृष्ट संवाद पुरस्कार एस.अली रजा यांना मिळाला होता.1968 मध्ये हे गीत बिनाका गीतमालाच्या वार्षिक कार्यक्रमात पाचव्या क्रमांकावर होते. हे गीत ऐकल्यानंतर भूतकाळातील सुखद आठवणींच्या हिंदोळ्यावर झोके घेतल्यासारखे वाटते.
-डॉ.अमृत खाडपे.
 |
| ©Sunil Awchar |