शरीर शुद्धी कशी करावी.
दीपावली हा सण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. वसुबारसपासून सुरू
होणारा हा सण भाऊबीजेपर्यंत चालतो. या सणाच्या निमित्ताने घराला रंगरंगोटी केली
जाते. घराची साफसफाई केली जाते. घरात करंज्या, लाडू, शंकरपाळे अशी गोड
आणि चकल्या, चिवडा अशी तिखट
व्यंजने केली जातात. भरपूर प्रमाणात कपडे, दागिने, फटाके, मिष्टान्न फराळ आदी व्यंजनांची खरेदी केली जाते. मित्र परिवारात एकमेकांच्या घरी जाऊन शुभेच्छा दिल्या जातात आणि घेतल्या
जातात. नोकरी व्यवसायानिमित्त विखुरलेले कुटुंब एकत्रित येऊन दीपावली साजरी करतात.
घरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असते. दिव्यांची रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी आणि मिष्टानाचा आस्वाद
दिवाळीचा आनंद द्विगुणीत करते. दीपावलीचा हा आनंद उपभोगतांना आपल्या शरीराकडे
मात्र आपले दुर्लक्ष होते आणि त्याचा दुष्परिणाम दीपावली झाल्यानंतर आपल्याला शरीर
आणि मनावर दिसू लागतो. म्हणून आपल्या शरीराला शुद्ध करणे अत्यंत गरजेचे आहे.
दुष्परिणाम
दीपावलीच्या कालखंडात आपली जीवनशैली पूर्णपणे बदललेली असते. खान पानाच्या सवयी
बदललेल्या असतात. या काळात नकळत आपल्याकडून अधिकचे श्रम आणि प्रमाणापेक्षा जास्त
आहार आपण घेतलेला असतो. त्यामुळे त्याचे पुढील काही दुष्परिणाम आपल्याला दिसतात.
1. वजन वाढणे
दीपावलीत आपल्या खानपानाच्या सवयी बदललेल्या असतात. या काळात जेवणाव्यतिरिक्त
घरच्यांच्या आणि मित्रांच्या आग्रहास्तव आपण नकळतपणे गोडधोड पदार्थांवर ताव मारतो.
चकल्या, करंज्या, लाडू, चिवडा असे तळलेले, अधिक साखर असलेले पदार्थ आपल्या खाण्यात येतात. तसेच पुरेशी झोप होत नाही. या काळात जागरण वाढते. सर्व कुटुंब एकत्रित आल्याने गप्पा गोष्टी होतात यात रात्री झोपण्यास उशीर होतो. अधिकचे खाणे आणि अपुरी झोप त्यामुळे आपले वजन वाढते.
2. नैराश्य येणे.
दीपावली सुरू होण्यापूर्वीपासून ते दीपावली संपेपर्यंत घरामध्ये अतिशय आनंद व
उत्साहाचे वातावरण असते. दीपावलीची पूर्वतयारी करण्यात व्यक्ति गर्क असतो.
त्यानंतर दीपावलीच्या काळात आपल्या मित्र परिवाराला कुटुंबाला भेटून त्याचे दिवस
आनंदात जातात. याच काळात तो भरपूर मौज मजा करतो. फिरायला जातो. मनाला आनंद
देणाऱ्या व्यंजनांचा आस्वाद घेतो. त्यामुळे त्याचे मन प्रफुल्लित राहते. परंतु
जशीच दीपावली संपते त्यानंतर आपले रुटीन जीवन सुरू होते आणि व्यक्तीला अचानक
झालेला हा बदल नैराश्यात नेतो. व्यक्तीला निराश
वाटते त्याच्या शरीराला जी सवय झालेली असते ती सवय पूर्ववत होईपर्यंत त्याच्या
मनावर निराशा दाटून राहते. एवढेच नसून या काळात झालेला खर्च आणि झालेले अधिकचे
श्रम यामुळेही व्यक्ती निराश होतो.
शरीर शुद्धीसाठी पाच आवश्यक बाबी .
1. संतुलित आहार घेणे
दीपावलीच्या काळात वाढलेले वजन कमी करण्यासाठी माणसाने पोषक आणि संतुलित आहार
घेणे गरजेचे आहे. आहारात फळभाज्या, पालेभाज्या आणि डाळींचा समावेश असला पाहिजे. यामुळे त्याला
योग्य प्रमाणात फायबर मिळतात. काही दिवस जेवणातील साखरेचे प्रमाण कमी केले पाहिजे.
शुद्ध सात्विक आहारामुळे जे वाढलेले वजन आहे ते कमी होण्यास मदत होते.
2. पाणी पिणे
संतुलित आहाराबरोबर व्यक्तीने योग्य प्रमाणात पाणी पिले पाहिजे. दिवसभर कमीत
कमी आठ ते दहा ग्लास पाण्याचे सेवन व्यक्तीने केले पाहिजे. पाणी पिल्याने
व्यक्तीचे वजन मर्यादित राहते. शरीरात असणारे पाणी व्यक्तीला उत्साहीत व आनंदित
ठेवण्यास मदत करते.
3. पुरेशी झोप घेणे
संतुलित सकस आहार आठ ते दहा ग्लास पाणी याबरोबरच व्यक्तीने पुरेशी झोप घेणे
गरजेचे आहे. दीपावलीच्या काळात आणि त्याच्या आधीही व्यक्तीचे जागरण झालेले असते.
वास्तविकत त्याची जीवनशैलीच बदललेली असते. पुरेशी झोप न होणे हे दीपावलीच्या काळात
जाणवत नसले तरी नंतरच्या काळात मात्र ते जाणवते ते असे की, झोप न झाल्यामुळे व्यक्तीला थकवा येतो. म्हणून
व्यक्तीने कमीत कमी सात ते आठ तासाची झोप घेणे गरजेचे आहे पुरेशी झोप माणसाचे मन
प्रफुल्लित करते आणि त्याचबरोबर त्याचे वजनही नियंत्रित करते.
4. व्यायाम करणे
व्यक्तीने व्यायाम करणे अतिशय गरजेचे आहे. सकाळ संध्याकाळ फिरायला जाणे, योगासन करणे, जिमला जाणे एरोबिक्स करणे व्यक्तीच्या प्रकृतीला ज्या प्रकारचा व्यायाम सूट
होईल त्या प्रकारचा व्यायाम त्याने आपल्या वयोमानानुसार कमीत कमी 20 ते 25 मिनिटे करणे गरजेचे आहे. दीपावलीच्या काळात जे अधिक च्या कॅलरीचे आपण सेवन
केलेले आहे ते व्यायाम केल्याने कमी होते. वाढलेले वजन तर नियंत्रित होते. शिवाय
झोपही चांगली लागते.
5. प्राणायाम करणे
शरीराबरोबर मनःशांतीसाठी प्राणायाम केला पाहिजे. शुद्ध हवा आणि निसर्गाच्या सान्निध्यात केला गेलेला प्राणायाम फुफ्फुस शुद्ध करतो. श्वासाच्या माध्यमातून फटाक्यांचा गेलेला धूर श्वसनाचे आजार निर्माण करतो, या काळात हवेचा स्तर घसरलेला असतो. प्रदूषण वाढलेले असते. ज्यांना दम्याचा आजार आहे अशांसाठी हा धूर आणि या काळातील हवा त्रासदायक तर असतेच. परंतु जे स्वस्थ आहेत त्यांनाही हे त्रासदायक असते, म्हणून प्राणायामामुळे शुध्द हवा फुफ्फुसात जाऊन दुषितपणा बाहेर पडतो. त्याच बरोबर मन ही शांत होण्यास मदत होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा