अध्ययन आणि अध्यापन
नाटकाचे प्रकार
डॉ. अक्षय घोरपडे.
प्रस्तावना
भरतमुनींच्या 'नाट्यशास्त्र' या ग्रंथाचा अभ्यास करुन अॅरिस्टॉटल या
अभ्यासकाने नाटकाचे सुखात्मिका आणि शोकात्मिका हे दोन प्रमुख प्रकार मानले आहेत.
नाटक हे जीवन अनुभवाचे वास्तव प्रकट करणारे असते. त्यामुळे वास्तव जीवनातील सुख, दुःख घटना, प्रसंग, अनुभव यांचे सादरीकरण नाटकांतून होत असते.
त्यामुळे प्रेक्षकांच्या मनावर नाटकांचा परिणाम होतो. प्रेक्षक नाटक पाहता-पाहता; त्याचा अनुभव घेताना त्याचा भाग बनून जातो. सुख, दुःख, विचार, बोध, समस्या, रंजन यांचा ठसा नाटकांतून प्रेक्षकांच्या मनावर
उमटतो. दृश्य स्वरूपाचा हा आविष्कार सामूहिक स्वरूपाचा असतो. नाटकांच्या रचनेवरून
नाटकाचे प्रमुख प्रकार पडतात.
१) शोकात्मिका :
'शोकात्मिका' या नाट्यप्रकारासाठी इंग्रजीत ‘Tragedy' हा पारिभाषिक शब्द आहे. नाटक पाहिल्यावर
प्रेक्षकांच्या मनावर जो दुःखद परिणाम होतो. त्या परिणामाचा विचार शोकात्मिकतेत
होतो.
शोकात्मिका हा जीवनातील दुःख, भोग यांच्या अनुभूतींचे चित्रण करते. मराठीत शोकात्मिका, शोकांतिका, शोकनाट्य असे पर्याय 'Tragedy' साठी वापरले जातात. ग्रीक संस्कृती आणि साहित्यातून शोकात्मिका हा नाट्यप्रकार निर्माण झाला. ग्रीक तत्त्वज्ञ अॅरिस्टॉटलने शोकात्मिकेचे स्वरूप मांडले. शोकात्मिकेची व्याख्या करताना अॅरिस्टॉटलचे विवेचन पुढीलप्रमाणे- 'शोकांतिका ही गंभीर, स्वयंपूर्ण व विशिष्ट आकारमान असलेली कर्माची अनुकृती असते तिची भाषा प्रत्येक जातीच्या कलात्मक भूषणाने सुशोभित असते आणि त्या निरनिराळ्या जाती नाटकाच्या वेगवेगळ्या भागात सापडते ती नाट्यरूप असते. निवेदनात्मक नसते आणि ती करुणा व भीती ह्यांच्या साहाय्याने त्या भावनांचे योग्य ते विरेचन घडवून आणते.
शोकात्मिका नाटकातील कथानकाशी प्रेक्षक एकरूप करून त्यांच्या
भावनांचे विरेचन घडवून आणते. त्यामुळे प्रेक्षक नाटक पाहताना भावनाविवश होतो आणि
त्याच्या मनातील भीती, दुःख नाहीसे होऊन त्याला अंतिमतः एक प्रकारचे
मानसिक भावनिक समाधान लाभते. शोकात्मिकेत नाटकाचे संवाद हे प्रभावी असायला हवे.
शब्दातील सामर्थ्य शोकात्मिकेला प्रभावी बनवत असते. शोकात्मिकेतील घटना, प्रसंग हे परिणामकारक असतात. शोकात्मिकेतील
नायकाबद्दल प्रेक्षकांना सहानुभूती वाटते. प्रेक्षकही आपल्या जीवनातील दुःखद
घटनांची, आठवणींची तुलना शोकात्मिका पाहताना करत असतो.
त्यामुळे शोकात्त्म नाटकही प्रेक्षकांच्या पसंतीला उतरत असतात. मराठी साहित्यात
राम गणेश गडकरी यांची नाटके, खाडिलकरांची
नाटके शोकात्मिकेला जवळची आहे. उदा. एकच प्याला, उद्ध्वस्त धर्मशाळा, अंधारयात्रा, नटसम्राट या नाटकांचा समावेश शोकात्मिकेत करता
येईल.
२) सुखात्मिका :
सुखपर्यवसायी नाटकाला सुखान्तिका किंवा सुखात्मिका असे म्हणतात. सुखात्मिका प्रेक्षकांना आनंद देण्याचा काम करतात. या प्रकारच्या नाटकांतील बराचसा भाग हा सुखदायी घटनांचाच असतो. शोकात्मिका आणि सुखात्मिका हे दोन्ही शब्द नाटकांचा अंत सुचविणारे आहे. नाटकांतील घटना, प्रसंगांचीकल्पना आपल्याला या संज्ञांमधून येते. काही नाटकांचा बराचसा भाग हा दुःखद असतो परंतु त्यांचा शेवट हा आनंददायी असतो. विनोद आणि हास्य हे प्रामुख्याने सुखात्मिकेत आढळतात. प्रेक्षकांना हसवत ठेवणे हे सुखात्मिकेचे प्रमुख धोरण असते. विनोदीपणा हे सुखात्मिकेच्या यशाचे गमक आहे. विनोदाचा उपयोग करून समाजातील दोष-दिग्दर्शन, मानवी स्वभावातील विक्षिप्तपणा, यांवर हसतहसत विनोदातून प्रहार केला जातो. सुखात्मिकेचा जन्मच हा प्रेक्षकांना आनंद देण्यासाठी होतो. सुखात्मिकेचा नायक हा विवेकशील असतो. सुखात्मिकेत नायकाचा शेवट हा करुण पद्धतीने होत नाही किंवा तो दुःख, यातना भोगत नाही. मानवी भावभावनांचे विडंबन आणि उपहास सुखात्मिकेत येतात. शोकांत्मिका आणि सुखात्मिका ह्या दोघांमध्ये नाटकाचे समान घटक असतात. शोकात्मिकेत दुःख हे अंतिम असते तर सुखात्मिकेत विनोद, विडंबन, उपहास आणि आनंदी शेवट हे अंतिमतः असते. मराठी साहित्यात आचार्य अत्रे, पु.ल. देशपांडे यांची नाटके सुखात्मिका या प्रकारात येतात. उदा. 'लग्नाची बेडी', तुझे आहे तुजपाशी, प्रेमा तुझा रंग कसा?, बटाट्याची चाळ इ.
शोकात्मिका आणि सुखात्मिका हे नाटकाचे प्रमुख २ प्रकार आहेत.
शोकात्मिकेला दोन हजार वर्षापूर्वीचा इतिहास आहे तर सुखात्मिकेला चारशे
वर्षापूर्वीचा इतिहास आहे. शाश्वत मानवी मूल्ये, भावभावना चित्रित करण्यासाठी शोकात्मिकेचा उपयोग होतो तर, बदलत्या सामाजिक पर्यावरणाचा लोकांच्या इच्छा
आकांशाचा विचार सुखात्मिकेत होतो. नाटक हा दृक-श्राव्य साहित्य प्रकार आहे.
सामूहिकपणे प्रेक्षक नाटकाचा आस्वाद घेतो. रसिक प्रेक्षक हे सुखात्मिकेला जवळची
असणारी विनोदी नाटके, हास्यप्रधान नाटके, फार्स अभिरुचीच्या दृष्टीने लोकप्रिय ठरतात.
प्रेक्षकांची करमणूक, मनोरंजन या प्रकारच्या नाटकांतून घडत असते.
त्यामुळे शोकात्मिकेपेक्षा सुखात्मिक प्रेक्षकांच्या पसंतीला जास्त उतरतात.
नाटकाच्या लिखित स्वरूपाचा विचार केला तर नाटक हा एक साहित्यप्रकार
आहे, पण नाटकाच्या प्रयोगाचा विचार केला तर नाटकांत सादरीकरणाला महत्त्व आहे. आणि हे
सादरीकरण रंगमंचावर केले जाते. त्यामुळे नाटक ही एक प्रयोगसिद्ध कला आहे.
नाटकांच्या वरील दोन प्रमुख प्रकारांसोबत कलेच्या अंगाने किंवा सादरीकरणाच्या
अंगाने विचार केला तर नाटकाचे काही उपप्रकार पाहावयास मिळतात. नाटकाचे
उपप्रकार हे सादरीकरणाच्या वैविध्यातून निर्माण झाले आहेत. उदा. एकांकिका, दीर्घाक, पथनाट्य, एकपात्री प्रयोग, नाट्यछटा, संगीतिका, नभोनाट्य.
या काही उपप्रकारांचा समावेश नाटकाच्या उपप्रकारात होतो.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा