अध्ययन आणि अध्यापन
नाटक : घटक
डॉ. अक्षय घोरपडे.
Happy New Year !!
नाटकाचे घटक :
नाटक हा वैशिष्ट्यपूर्ण साहित्यप्रकार आहे रंगमंचावर नाटकाचे सादरीकरण नाटकाला वेगळा आयाम देते. साधारणपणे पुढील घटकांमुळे नाटक अस्तित्वात येते.
शीर्षक हा नाटकाचा महत्त्वाचा घटक आहे. शीर्षकावरून प्रेक्षक नाटकाकडे आकर्षीत होतात. कारण शीर्षकावरून नाटकाची पूर्वकल्पना होते. नाटकाचे शीर्षक हे नाटकाचा विषय आणि नाट्यआशय प्रेरित करणारे असते.
उदा. 'रायगडाला जेंव्हा जाग येते', 'ती फुलराणी', नटसम्राट
२) नाटकाचे कथानक :
कथानकाला संविधानक असेही म्हणतात. कथानकाची सहेतुक केलेली मांडणी म्हणजे संविधानक. कथानक हा नाटकाचा आत्मा असतो. कथानकामुळेच एका उत्कृष्ट नाटकाची निर्मिती होते. कथानकाला समृद्ध करण्यासाठी नाटकांत संवाद तंत्राचा वापर केला जातो. पात्रांच्या साहाय्याने संवादातून कथानक दृश्य स्वरूपात प्रेक्षकांसमोर सादर केले जाते. नाटकातील घटना, प्रसंग नाट्यपूर्ण रीतीने कथानकाला योग्य न्याय देतील. अशाप्रकारे मांडावे लागतात. कथानकाच्या स्वरूपानुसार नाटकाची सुस्पष्ट मांडणी करावी लागते. कथानकाच्या साहाय्याने नाटककार नाटकांत रंगत आणण्याचे काम करतो. चांगल्या कथानकावरच नाटकाचे यश व लोकप्रियता अवलंबून असते.
३ ) पात्रचित्रण/व्यक्तिचित्रण :
नाटक हे संवादातून घडत असते.संवादामुळे नाटकांत जिवंतपणा येतो. नाटकांतील संवाद पात्राद्वारे व्यक्त होतात. पात्र ही नाटकाला सजीव बनवतात. कथानकातील मुख्य सूत्रधाराला नायक व नायिका असे म्हणतात. याशिवाय नाटकांत इतर पात्रही असतात. नाटकांतील घटना, प्रसंगाला अनुरूप पात्र नाटकांत असतात. पात्रचित्रण नाटककाराला करावे लागते. योग्य ते पात्र निवडून पात्रांचे चित्रण केले जाते. नाटकांतून पौराणिक, ऐतिहासिक,सामाजिक, विनोदी राजकीय यासारखे विषय हाताळले जातात. त्यामुळे विषयानुरूप पात्र चित्रण नाटकांत करावे लागते. पात्रचित्रण हे प्रेक्षकांच्या मनावर परिणाम करीत असते त्यामुळे वास्तव पात्रचित्रण नाटकांत अपेक्षित असते. नाटकांतील व्यक्तिचित्रण किंवा पात्रचित्रण हे नाटकाला जीवंत ठेवत असतात. आजही नाटकांतील अनेक व्यक्तिचित्रण लोकांमध्ये जीवंत आहेत. उदा. पौराणिक नाटकांतील 'नारद', 'विद्याहरण' नाटकातील 'शुक्राचार्य', 'भाऊबंदकी' नाटकातील राघोबा, 'नटसम्राट' नाटकातील अप्पासाहेब. 'प्रेमा तुझा रंग कसा' या नाटकातील प्रा. बल्लाळ इ. नाटकांतील व्यक्तिचित्रण अजरामर झाली आहेत.
४) संवाद :
संवाद हा नाटकाचा आत्मा तर मध्यवर्ती सूत्र हा नाटकाचा प्राण असतो. संवाद आणि मध्यवर्ती सूत्र यांच्या समन्वयातून नाटकाचा संवाद केवळ अर्थपूर्ण होत नाही तर संवादामुळे नाटकाला गती मिळते. संवाद हा नाटकाचा महत्त्वाचा घटक आहे. नाटकाच्या कथानकाला साजेशे असे संवाद नाटकांत असतात. नाटकांतील घटना, प्रसंग, स्थळ, काळ प्रेक्षकांपर्यंत संवादातून पोहचत असतात. नाटकातील पात्रांचा समन्वय संवादातून घडत असतो. त्याचप्रमाणे संवादातूनच पात्रांचा आपआपसातील परिचय प्रेक्षकांना होत असतो. प्रभावी, परिणामकारक, खटकेबाज, विनोदी, गंभीर अशा स्वरूपाचे संवाद नाटकाला प्रभावी बनवतात. मानवी स्वभाव, नातेसंबंध यांचे कंगोरे संवादातून प्रेक्षकांसमोर मांडले जातात.
५) नेपथ्य :
नाटक हा दृक-श्राव्य प्रयोगशील प्रकार आहे. प्रेक्षकांसमोर रंगमंचावर नाटक सादर करावे लागते. नाटकाचा अनुभव प्रेक्षक सामूहिकरीत्या घेतात. नेपथ्याला नाटकांत अत्यंत महत्त्व आहे. नाटकाच्या सादरीकरणाच्या वेळेस म्हणजेच प्रयोगादरम्यान रंगमंचावर केलेली सजावट, कथानकाला अनुरूप घटना, प्रसंग दाखविण्यासाठी तयार केलेले चित्रांचे पडदे, सचित्र साकारलेले देखावे या सर्वांचा समावेश नेपथ्यात होतो. नाटकाच्या विषयानुसार नेपथ्यरचना केली जाते. पौराणिक किंवा ऐतिहासिक नाटकांतील साकारलेला प्रासाद, महाल, नक्षीदार खांब, मोठमोठे पडदे यासारखी नेपथ्य रचना रंगमंचावर साकारावी लागते. तर इतर नाटकांत प्रसंगानुरूप नेपथ्य असते. उदा. घरांची रचना, स्वयंपाकगृह, कार्यालय, दिवाणखाना, खिडकी, दरवाजे इ. नेपथ्य असतात. नाटकाचे बरेचशे यश हे नेपथ्यावर अवलबून असते. त्यामुळे नेपथ्यकार सतत नवनवीन नेपथ्याचा वापर नाटकांत करीत असतो.
६) प्रकाश योजना :
रंगमंचावर नाटकाचा प्रयोग सादर करताना योग्य ती प्रकाश योजना करावी लागते. नाटकाच्या कथानकाला अनुरूप प्रकाश योजना महत्त्वाची असते. नाटकांतील विविध प्रसंग दाखविण्यासाठी प्रकाश योजनेत वैविध्य ठेवावे लागते. उदा. रात्रीचा प्रसंग असेल तर अंधार, भीतीदायक प्रसंग असेल तर उजेड अंधार यांचा खेळ.
७) संगीत :
सुरुवातीच्या काळात मराठी रंगभूमीवरील नाटके ही संगीत प्रधान होती. नाटकांतील कथानक हे बहुतांश पद्यमय होते. त्यामुळे पद्याला संगीताची जोड देऊन नाट्यगितांतून नाटकांचे सादरीकरण होत असे. पदरचनाकार, संगीतकार, वादक, गायक यांना संगीतप्रधान नाटकांत फार महत्त्व होते. संगीतप्रधान नाटकांतून अनेक नामवंत शास्त्रीय गायक, संगीतकार नावारुपास आले. नाटकांतील कथानकाला अनुरूप संगीत योजना केली जाते. आधुनिक नाटकांत नाटकांतील घटना, प्रसंगानुसार पार्श्वसंगीत दिले जाते. संगीतामुळे नाटकांत वातावरण निर्मिती, पात्रांच्या संवादातील विषय त्यातील भाव पटकन लक्षात येतात. आणि संगीतामुळे नाटकातील प्रसंग उठावदार होतो.
८) दिग्दर्शन :
दिग्दर्शन हे व्यक्तिकेंद्री असते. नाटकाच्या प्रयोगाचे यशस्वी सादरीकरण दिग्दर्शकाच्या हाती असते. नाटकाचा विषय हा प्रेक्षकांसमोर वास्तव रूपाने मांडण्याची किमया दिग्दर्शनात असते. नाटकांचा प्रयोग हा निर्दोष पद्धतीने बसविण्याचे काम दिग्दर्शकाचे असते. नाटकांत प्रयोग सादर करतेवेळी काही वेळेस संवादाऐवजी कलाकारांचे अव्यक्त भाव प्रेक्षकांना अर्थबोध करुन जातात. अपेक्षीत अर्थ हा प्रेक्षकांना समजतो व नाटक गतिमान होते. ही सचोटी दिग्दर्शनाची असते. दिग्दर्शन करणाऱ्याला दिग्दर्शक म्हणतात. नाटकाच्या अंगाने आवश्यक गुण दिग्दर्शकाजवळ असायला हवेत. दिग्दर्शन हे स्वकर्तृत्वाचे क्षेत्र आहे. दिग्दर्शकाला नाटकाच्या प्रयोगावेळेस नेपथ्य, प्रकाश, संगीत या सर्व घटकांचा विचार करावा लागतो.
वरीलप्रमाणे नाटकांचे घटक आहेत. नाटक हे आधी लिहिले जाते नंतर त्याचा प्रयोग होतो. रंगभूमीवर नाटकांचा प्रयोग सादर होताना नाटकाचे घटक महत्त्वाचे ठरतात. नाटकाची परिणामकारकता आणि वातावरणनिर्मिती या घटकांच्या साहाय्याने होते.
Happy New Year !!
नववर्षाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा !!

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा