अध्ययन आणि अध्यापन
साष्टांग नमस्कार - आचार्य अत्रे
- डॉ. अक्षय घोरपडे.
प्र. के. अत्रे उर्फ आचार्य अत्रे हे मराठी साहित्यातील अष्टपैलू लेखक आहेत. साहित्याच्या सर्वच प्रकारात मुशाफिरी करणाऱ्या आचार्य अत्र्यांनी नाटक या साहित्य प्रकारातही आपला ठसा उमटवलेला आहे. मराठी रंगभूमीचे सुवर्णयुग संपून तमोयुगात म्हणजेच अंधार युगात वावरणाऱ्या मराठी नाट्यसृष्टीला पुन्हा सुवर्णयुग प्राप्त करून देणाऱ्या नाटककारांमध्ये अत्रे यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. चित्रपटसृष्टीमुळे मराठी नाटकापासून दुरावलेल्या प्रेक्षकांना पुन्हा नाट्यसृष्टीकडे आचार्य अत्रे यांच्या नाटकांनी वळवले. मराठी नाटकांचा चेहरा मोहरा अत्रे यांच्या नाटकांनी बदलवून टाकला. हलकेफुलके कथानक व मनोरंजनात्मक आशय असणाऱ्या अत्रे यांच्या नाटकांचे नाट्यतंत्र ही आधुनिक व काळानुरूप होते, त्यामुळे मराठी नाट्यसृष्टीतील लोकप्रिय व युगप्रवर्तक नाटककार म्हणून नाटकांच्या इतिहासात त्यांची नोंद घेतली जाते. "आचार्य अत्रे यांच्या नाट्य लेखनाची सुरुवात मुळात मुलांसाठी लेखन करावे या हेतूने झाली त्यांचे 'साष्टांग नमस्कार' हे अत्यंत हलकेफुलके नाटक त्या काळात खूप गाजले. बालमोहन नाट्य संस्था ही एक व्यावसायिक नाट्य संस्था होती त्या संस्थेच्या संस्थेची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट होती नाट्य निर्मितीचा आर्थिक भार पडू नये या बेताने या नाटकाची निर्मिती करता यावी म्हणून आचार्य अत्रे यांनी साष्टांग नमस्कार हा फार्स लिहिला"(भगत दत्ता, पृष्ठ 344)
‘साष्टांग नमस्कार’ हे नाटक तीन अंकी असून
प्रत्येक अंकात एक प्रवेश आहे. नाटकाची सुरुवात रावबहादुर शेषाद्रीच्या बंगल्यातील
एका प्रशस्त दालनातील प्रसंगातून होते आणि याच दालनात आणि याच प्रवेशात नाटकातील
सर्वच पात्रांचा प्रेक्षकांना परिचय होतो. नाटकात रावबहादूर शेषाद्री हे 63 वर्षाचे गृहस्थ असून
त्यांना सिद्धेश्वर, शोभना, मीरा आणि चंदू अशी चार अपत्य आहेत. सिद्धेश्वर हा 27-28 वर्षाचा असून त्याच्याहून धाकटी शोभना,
शोभनाहून धाकटी मीरा आणि शेवटी चंदू. यांच्याबरोबरच भद्रायू, शंतनू, त्रिपुरी आणि
मल्लिनाथ अशा पात्रांचा ही आपणास परिचय होतो.
रावबहादूर शेषाद्रीच्या बंगल्यातील प्रशस्त
दालनात सिद्धेश्वर, शोभना व मीरा नमस्कार घालित असतात आणि चंदू ते मोजत असतो. याच
दरम्यान तिथे चंदूला शिकवायला येणारा शिक्षक भद्रायू तेथे येतो. भद्रायूच्या
बोलण्यातून तो कवी असून त्याला शीघ्र कवितेची आवड आहे, असे समजते. शोभनालाही
कवितेची आवड असते, मिरेला कथा लेखनाची आवड आहे, तर सिद्धेश्वरला फल ज्योतिषाची आवड
आहे. तेथे रावबहादूर येतात तेव्हा त्यांना नमस्कार म्हणजे सूर्यनमस्कार घालण्याची
आवड आहे, हे आपणास त्यांच्यातून होणाऱ्या संवादातून लक्षात येते.
भद्रायूला कवितेची आवड असल्याने शोभना
त्याच्यावर भाळते त्याच्याशी प्रेमळ संवाद करते तेव्हा तेथे शंतनू येतो. शंतनू हा
शिकारी असून त्याला शिकारीची आवड आहे. शंतनुला शोभना आवडत असते. परंतु शोभणेला
शंतनू आवडत नाही कारण एक तर तो शिकारी असतो आणि दुसरे म्हणजे तो मांसाहार करतो.
त्यांच्या संवादा दरम्यान तेथे त्रिपुरी व
मल्लिनाथ येतात. त्रिपुरी ही शोभनाची लहानपणाची मैत्रीण असते. त्रिपुरी व मल्लिनाथ
मिळून चित्रपट कंपनी सुरू करणार असतात. मल्लिनाथ याने अलिबाबा चाळीस चोर या
चित्रपटात एकोणचाळीसाव्या चोराची भूमिका केलेली असते. आणि त्यासाठी अशोक बाग या
जागेवर त्यांनी एक कार्यक्रम ठेवलेला असतो त्या कार्यक्रमाला येण्याचे ती सर्वांना
निमंत्रण देते. आणि सर्वजण ते निमंत्रण स्वीकारतात.
त्यानंतर दुसरा अंक सुरू होतो दुसरा अंक हा
त्रिपुरी आणि मल्लिनाथ यांनी फार्म हाऊस वर आयोजित केलेल्या कार्यक्रमाचा आहे. यात प्रत्येक जण आपापल्या व्यापात असतो या अंकात दोन घटना
घडतात एक म्हणजे मल्लिनाथ हा मिरेला आपले तिच्यावर प्रेम आहे याची कबुली देतो. वास्तविक
त्रिपूरी आणि मल्लिनाथ विवाह करणार असतात असे आपल्याला पहिल्या अंकाच्या शेवटी
शेवटी समजलेले असते कारण ते दोघे चित्रपटसृष्टीशी निगडित असतात आणि त्यांना
चित्रपट कंपनी सुरू करावयाची असते आणि त्यासाठीच अशोक बाग हीच जागा त्यांना विकत
घ्यायची असल्याने ते तिथेच आपल्या कामाचा डोलारा उभा करणार असतात आणि तेथेच
त्यांनी कार्यक्रमासाठी या सर्वांना तिथे बोलवलेले असते. या प्रसंगावरून आपल्या
असे लक्षात येते की, मल्लिनाथ हा वरकारणी दिसायला साधा भोळा वाटत असला तरी तसा तो
नाही याचा एक अंदाज आपल्याला या प्रसंगानुसार येतो. त्याच दरम्यान तिथे त्रिपुरी
येते आणि ती मल्लिनाथला विचारणा करते की, तू येथे काय करतो आहेस? येथे कोण होतं?
त्यावेळेस तो म्हणतो की, कोणी नाही मीरा होती आणि त्यासाठी मी येथे आलेलो होतो आणि
फारसा तो बोलत नाही. त्याचवेळेस आपल्याला तेथे शोभना आणि भद्रायू यांचाही संवाद
होताना दिसतो. भद्रायू हा आपलं काव्य करण्यामध्ये गर्क झालेला असतो आणि त्याला
आपल्या अवतीभवतीचही भान नसतं आणि नेमकं हेच शोभणेलाही आवडत असतं परंतु त्याच दरम्यान
दुसरी महत्त्वाची घटना तिथे अशी घडते की, चंदू हा चिंचेच्या झाडावरून खाली पडतो
आणि खाली पडल्यानंतर तो बेशुद्ध होतो. त्यानंतर त्याला उपचाराची आवश्यकता असते
त्यावेळेस शोभना ही चंदूला दवाखान्यात नेण्यासाठी आकांत करते आणि भद्रायूला म्हणते
की, अरे अहो काहीतरी करा त्याच वेळेस भद्रायूला काव्याची उर्मी आलेली असते,
स्फूर्ती आलेली असते आणि तो काव्य करण्यात गर्क होऊन जातो. त्याचे हे विक्षिप्त
वागणे पाहून शोभना हतबल होऊन जाते आणि त्याच दरम्यान शंतनू तेथे येतो आणि तो
चंदूला शुद्धीवर आणण्यासाठी प्रयत्न करतो. या प्रसंगामुळे शोभणेचे भद्रायू बद्दलचे
आकर्षण कमी होते आणि ती शंतनूकडे आकर्षित होते.
तिसरा अंक सुरू होतो तिसऱ्या अंकात सिद्धेश्वर
हा त्रिपुरीला लग्नासाठी विचारतो तेव्हा त्रिपुरी त्याला आपण मल्लिनाथशी लग्न
करणार आहोत असे सांगते त्यांचा संवाद सुरू असताना तिथे मल्लिनाथ घाईत येतो आणि मला
अर्जंट चित्रपटाच्या कामासाठी कलकत्त्याला जावयाचे असून पाचशे रुपये दे असे
त्रिपुरीला सांगतो. त्रिपुरी त्याला विचारते की, ‘एवढ्या घाईत तू कसा काय निघालेला
आहेस’ त्यावेळेस तो सांगतो की, तातडीचे काम असल्यामुळे मला जाणे गरजेचे आहे आणि
तिच्याकडून पाचशे रुपये घेऊन तात्काळ बॅग भरून गाडीने तो निघून जातो. त्यावेळेस
तेथे शोभना आणि भद्रायू धावत पळत येतात आणि त्रिपुरीला शोभना एक चिठ्ठी दाखवते ती
त्रिपुरीला विचारते की, ‘मल्लिनाथ कोठे गेलेला आहे?’ त्यावेळेस ती सांगते की, ते
आत्ताच कलकत्त्याला गेलेले आहे आणि मग ती तिला चिट्ठी दाखवते तर ती चिठ्ठी मीराने
लिहिलेली असते, त्यात तिने ती मल्लिनाथ सोबत मद्रासला निघून जात आहे, असे लिहिलेले
असते. चिट्ठी पाहून वाचून त्रिपुरी हतबल होऊन जाते आणि मल्लिनाथला अद्वातद्वा
बोलते. त्याच दरम्यान तेथे शंतनू येतो आणि तो सांगतो की मी मीराला घेऊन आलेलो आहे.
खूप समजावल्यानंतर मीरा माझ्यासोबत आलेली आहे आणि मीरा असं सांगते की, मल्लिनाथ
माझ्यावर खरंचच प्रेम आहे तेव्हा त्रिपुरी तिला आपलं कपाट उघडून त्याची प्रेमपत्र
दाखवते त्यावेळेस मीराला सुद्धा धक्का बसतो आणि ते दोघं ही निराश होतात. त्याच
वेळेस शंतनु असं सांगतो की मी पोलिसातही वर्दी देऊन आलेलो आहे. ते मल्लिनाथला
नक्कीच पकडतील. शंतनुचा हा पराक्रम पाहून शोभना ही शंतूनकडे अधिकच आकर्षित होते
आणि त्याच वेळेला शंतनूही तिला लग्नासाठी विचारणा करतो आणि ती त्याला होकार देते.
त्याच दरम्यान तेथे रावबहादूर येतात आणि आणि झालेला प्रकार त्यांच्या लक्षात येतो.
त्यावेळेस रावबहादुर हे शोभना व शंतनू यांचे लग्न जुळवतात. तसेच त्रिपुरी व
सिद्धेश्वर यांचेही लग्न जुळवतात त्याच दरम्यान तिथे पोलीस मल्लिनाथला घेऊन येतात.
रावबहादूर मल्लिनाथला त्याच्या चुकीबद्दल माफ
करतात आणि पोलिसांना विनंती करतात की, ते त्यांची तक्रार वापस घेत आहेत आणि
मल्लिनाथला त्यांनी सोडून द्यावे. रावबहादूर यांचा हा निर्णय फारसा कोणाला रुचत
नाही. परंतु कोणी त्याविषयी तक्रारही करत नाही आणि शेवटी रावबहादूर हे मल्लिनाथला
सल्ला देतात की, ‘तू रोज नमस्कार घालत जा म्हणजे तुझे बुद्धी ठिकाणावर राहील’ शोभना
ही शतनुशी विवाह करण्यास तयार झाल्यामुळे भद्रायूचा
हिरमोड होतो आणि त्याचा झालेला हिरमोड पाहून रावबहादुर भद्रायू आणि मीरा यांचेही
लग्न जुळवतात आणि त्यांना सांगतात की आता तुम्हाला काय कथा कविता लिहायच्या असतील
त्या तुम्ही लिहा आणि येथे हा नाटकाचा अंक संपतो आणि नाटक संपते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा