सोमवार, १६ फेब्रुवारी, २०२६

शब्दशक्ती आणि अर्थविचार

 

अध्ययन आणि अध्यापन


शब्दशक्ती आणि अर्थविचार

                                    

                                                 डॉ. अक्षय घोरपडे.

 

 

प्रस्तावना:

 

मानवाच्या उत्क्रांत अवस्थेत केंव्हातरी मानवाला आपल्या तोंडातील अवयवांचा आणि स्वरयंत्राचा परिचय झाला. विशिष्ट ध्वनी निर्माण करणासाठी मानवाने प्रयत्नपूर्वक तोंडाचा आणि स्वरयंत्राचा उपयोग सुरु केला. प्रारंभी मानवाला भाषा अवगत नव्हती, जेंव्हा त्याला संपर्क आणि व्यवहाराची गरज पडली तेंव्हा त्याने इतरांशी संपर्क  साधतांना हावभाव, हातवारे आणि इतर अवयवांद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पुढे त्याने आपल्या बुद्धी कौशल्याने समूहाच्या पातळीवर एकत्र येऊन निर्माण केलेल्या ध्वनिना अर्थसंकेत दिले. आणि अशाप्रकारे भाषा निर्माण झाली. मानवी समूह समाज रुपान एकत्र येऊन उत्क्रांत होत गेला या उत्क्रांतिमधूनच मानवी संस्कृति निर्माण झाली आणि आकाराला आली. म्हणजेच भाषा ही मानव निर्मित आहे आणि ती परिवर्तनीयसुद्धा आहे.

       या भाषेला मानवाने समूह रुपाने एकत्र येऊन लेखनाद्वारे मूर्त स्वरूप दिले. यातूनच मानवाने इतिहास, शास्त्र, तत्वज्ञान इत्यादी अनेक विषय निर्माण केले आणि त्यात विपूल लेखन ही केले. पण यासर्व विषयात काव्यशास्त्रा बाबतीत मात्र त्याने वेगळेपण जपले. यातले वेगळेपण स्पष्ट करतांना भट्टनायकाने काव्येत्तेर वाङ्‌मयाला 'शब्दप्रधान हा शब्द लावला आहे. तत्वज्ञानादीशास्त्रामध्ये शब्दाच्या अर्थाला प्राधान्य असते, शब्दांचा हा निश्चित अर्थ म्हणजे वाच्यार्थ होय. एखादा विषय जर रमणीय असेल तर तिथे सरळ व साधे शब्द योजले तरी काव्यात रमणीयत्व येते. पण विषयात जर रमणीयत्व नसेल तर कवि आपल्या कविव्यापाराने वक्र शब्द योजून काव्यात रमणीयत्व आणतो. म्हणून कवि सरळ शब्द न योजता वक्रपणे काव्य निर्माण करतात. येथे काव्याचे सौंदर्य  हे कविव्यापार निर्मित अर्थावर अधिष्ठित असते. हा अर्थ म्हणजे व्यंगार्थ होय. या वरिल सर्व विवेचनावरून आपणांस असे दिसून येते की, शब्दाची व्याप्ती खूप मोठ्या प्रमाणात आहे.

 

शब्दांच्या तीन शक्ती

शब्दाचे अर्थ तीन प्रकाराचे असतात. एक वाच्यार्थ, दुसरा लक्ष्यार्थ, तिसरा व्यंगार्थ हे तिन्ही अर्थ व्यक्त करणाऱ्या निरनिराळ्या तीन शक्ति आहेत त्यांना क्रमाने अभिधा, लक्षणा आणि व्यंजना असे म्हणतात.

 

अ) अभिधा :-

        अभिधा ही शब्दाची पहिली आणि मुख्य शक्ती आहे. 'कोणत्याही शब्दाचा उच्चार करता क्षणीच जो अर्थ आपल्या मनात येतो त्याला वाच्यार्थ असे म्हणतात. उदा. माणूस हा शब्द उच्चारताच दोन हात, दोन पाय, एक नाक, दोन डोळे, दोन कान असलेली चालणारी, बोलणारी, हसणारी एक मूर्ती चटकन ध्यानात येते. गाय म्हटले की, चार पाय, दोन शिंगे, एक शेपूट परंतू दूध देणारा प्राणी हे पटकन लक्षात येते.

         "विशिष्ट शब्द उच्चारताच त्याचा अमुकच एक ठराविक अर्थ व्यक्त करणारी ही जी शक्ति तिला 'अभिधाशक्ति असे म्हटले जाते

 

अभिधेचे प्रकार :-

 

अभिधा शक्ति तीन प्रकारची आहे.

 

१.योग २.रूढी  ३.योगरूढी

 

१.योग: व्युत्पत्तीने जेव्हा शब्दाचा अर्थ निघतो तेंव्हा योग ही शक्ति येते.

        उदाहरणार्थ पाठक, भारतीय

२. रूढी :- शब्दाला रुढी परंपरेनुसार आलेला अर्थ म्हणजे रुढी होय.

उदा, मंडप, गृह, तरू, अश्व इ. या शब्दांना रुढी अशी संज्ञा आहे.

या शब्दांची व्युत्पत्ती देता येत नाही.

 

३.योगरूढी : - काही शब्दांमध्ये रूढी व व्युत्पत्ती या दोन्हींचे सहाय्य घ्यावे लागते. म्हणजेच परंपरेनुसार येणारा अर्थ आणि त्याला सरळ जोडून अर्थ येतो. तेव्हा तेथे योगरूढी ही शक्ति असते.

उदा. पंकज - पंक म्हणजे चिखल, चिखलात जे जे निर्माण झाले आहे ते असा व्युत्पत्तीने अर्थ होतो पण पंकज-कमळ असा आपण रुढीने अर्थ घेतो.

 

ब)  लक्षणा :-

 

शब्दांची दुसरी शक्ति लक्षणा ही होय. "एखाद‌या शब्दाचा अर्थ वाच्यार्थ, बाह्यार्थ, मुख्यार्थ म्हणजेच अभिधेने घेता येत नाही. तेव्हा त्या शब्दामधिल अर्थाचे घटक लक्षणेने तपासावे लागतात. शब्दांचे प्रतिक, वस्तू आणि शब्द या तिन्ही मिळून जेव्हा लक्ष्यार्थ बोध होतो. शब्दांचा अर्थ समजायला लागतो तो अर्थ म्हणजे शब्दाची लक्षणा शक्ति होय." किंवा थोडक्यात असे म्हणता येईल की, "शब्दांचा लक्षणेचा वापर करून शोधलेले अर्थ म्हणजे लक्षणा शक्ति होय."

उदा. माझ्या गं दारावरनं । कोण्या राजाचा हत्ती गेला ।

या ओळीमध्ये दार शब्दाचा दारच असा अर्थ अभिप्रेत नाही. तो तेथे लागत नाही, हत्ती घराच्या दारावरून जाऊ शकत नाही. तो  दारापुढील रस्त्यावरून असा अर्थ अभिप्रेत होतो. आणि बोलणाव्याच्या मनातही हाच अर्थ अभिप्रेत असतो.

'मी केशवसूत वाचला.

    या साध्या वाक्यातही केशवसूत याचा मनुष्य असा अर्थ नसून त्याने लिहलेले काव्य असा अर्थ अभिप्रेत होतो.

     एखाद वेळी शब्दाचा अर्थ योग किंवा योगरूढीने आपल्यासमोर येत नाही तेव्हा त्या शब्दाच्या पाठीमागे येणाऱ्या लक्षणाचा शोध घ्यावा लागतो तेव्हा तो अर्थ डोळयासमोर येतो.

 

लक्षणेचे प्रकार :-

लक्षणेचे मुख्य दोन प्रकार आहेत.

१. शुद्धा २. गौणी

 

१) गौणी :- या लक्षणेत लाक्षणिक अर्थ केवळ गुणांवर अवलंबून असतो. उदा. 'हापूसचा आंबा म्हणजे साक्षात अमृत आहे'

'तो विद्यार्थी खूपच हुशार आहे.'

 

वरिल वाक्यात गुण अभिप्रेत आहेत या वाक्यात मुख्यार्थ अभिप्रेत नाही. बोलणाऱ्याच्या व ऐकणाऱ्याच्या मनात गुण अभिप्रेत असतो.

 

        गौणीचे दोन प्रकार पडतात. 

अ) सारोपा ब) साध्यवसाना

 

अ) गौणी सारोपा :- 'सारोपा मध्ये दोन वस्तूपैकी एकाचा दुसरीवर अध्यारोप केलेला असतो.' ज्या व्यक्तिवर किंवा वस्तूवर  हा गुणविशेष आरोप केलेला असतो. त्या व्यक्तिचा किंवा वस्तूचा स्पष्ट उल्लेख आलेला असतो.

उदा. तिचे मुख म्हणजे चंद्रबिंबच.

वरील वाक्यात मुखावर चंद्रबिंबाचा आरोप केलेला आहे.

 

३ ) गौणी साध्यवसाना :- उपमेय काढून टाकून केवळ उपमानाची योजना जेथे होते तेथे साध्यवसाना लक्षणा होते. थोडक्यात उपमेय उपमानासारखे भासवले जाते .

उदा. हा चंद्रच भूतलावर अवतरला आहे'

 

वरिल वाक्याने मुख शब्दाचे अध्यवसान झाले आहे. येथे थेट  उपमाच दिली गेली आहे. आणि ज्याला उपमा दयायची तेच अध्यवसान झाले आहे.

 

२) शुद्धा : शुद्धा लक्षणा ही सादृश्यत्तर संबंधावर अधिष्ठित झालेली असते.

 

उदाहरणार्थ  माझ्या ग दारावरन कोण्या राजाचा ग हत्ती गेला. 

या वाक्यात दार म्हणजे जवळचा रस्ता असा अर्थ लक्षणीने घ्यावा लागतो. या ठिकाणी दार व दाराजवळचा रस्ता यात कोणताही गुणविशेष नाही किंवा तसा संबंध ही नाही.

 

शुद्धा लक्षणेचे चार प्रकार पडतात.

 

अ) सारोपा ब) साध्यवसाना क) उपादान (अजहल्लक्षणा) ड) लक्षणलक्षणा (जहल्लक्षणा)

 

१) शुद्धा सारोपा : "सारोपामध्ये दोन वस्तु पैकी एकीचा दुसऱ्यावर अध्यारोप केलेला असतो." ज्या व्यक्तिवर किंवा वस्तूवर हा गुणविशेष आरोप केलेला असतो, त्याव्यक्तिचा किंवा वस्तूचा स्पष्ट उल्लेख आलेला असतो,

उदा. च्यवनप्राश म्हणजे साक्षात बलच

 

वरिल वाक्यात च्यवनप्राशवर बलाचा आरोप केलेला आहे.

 

ब) शुद्धा साध्यवसानाः "उपमेय काढून टाकून केवळ उपमानाची योज‌ना जेथे होते तेथे साध्यवसाना लक्षणा होते." थोडक्यातउपमेय उपमानासारखे भासवले जाते. 

उदा. तो साक्षात बलसेवनच करीत आहे

 

क) शुद्धा उपादान : उपादान लक्षणेमध्ये शब्दाचा मुख्यार्थ हा लक्ष्यार्थामध्येच समाविष्ट होतो तो पुर्णपणे नाहिसा होत नाही."

उदा. पानपतावर सव्वा लाख बांगडी फुटली

 

याचा अर्थ असा सव्वालाख लोक कामी आले . बांगडी फुटली म्हणज 'वैधव्य येणे' या लक्ष्यार्थाला पूढे करीत मुख्यार्थ आपणहून पुढे येतो व लक्ष्यार्थाला पुढे करतो.

 

ड) लक्षण लक्षणा: "लक्षणलक्षणेमध्ये मुख्यार्थ लक्ष्यार्थाला पुढे करून आपण लुप्त होतो.

उदा, 'घरावरून हत्ती गेला

या वाक्यात घराचा मुख्यार्थ नाहिसा होऊन रस्ता किंवा रस्त्यावरुन असा लक्ष्यार्थ पुढे झाला.

 

क) व्यंजना :-

 

शब्दांची तिसरी शक्ति व्यंजना ही होय.

 

"जेव्हा अभिधा आणि लक्षणा आपआपले कार्य करून निवृत्त होतात तेव्हा व्यंजना  ही शक्ति सुरु होते." थोडक्यात शब्दांच्या अर्थापलीकडले जेव्हा काही तरी जाणवते त्यावेळी व्यंजनाची सुरवात होते.

उदा, सूर्य अस्ताला गेला!

 

या वाक्याचा सरळ अर्थ सूर्य अस्ताला गेला असा होतो. हे एकच वाक्य भिन्न भिन्न व्यक्तिच्या मनात वेगवेगळ्या अर्थची वलये निर्माण करील.

 

या वाक्याच्या संदर्भात ब्राम्हण, नववधू, चोर आदीच्या मनात भिन्न भिन्न अर्थाची अभिव्यक्ति होऊ शकेल. ब्राम्ह‌णाला सायंसंध्येची सूचना मिळेल, नववधूला आपला नवरा घरी परतण्याची वाट बघेल. चोराच्या मनात चोरीची वेळ जवळ आल्याची सूचना मिळेल.

 

व्यंजनेचे प्रकार:-

 

व्यंजनेचे मुख्यतः दोन प्रकार आहेत.

 

१.शाब्दी २.आर्थी

 

१) शाब्दी व्यंजना : "शब्दावर अवलंबून असलेली व्यंजना ती शाब्दी व्यंजना होय." थोडक्यात शब्दाच दोन अर्थ असूनही जो ध्वनित शब्दार्थानेच बद्ध होतो ती शाब्दी व्यंजना होय.

 

शाब्दी व्यंजनेचे प्रकार

 

अ) अभिधामूलक व्यंजना     ब) लक्षणामुलक व्यंजन

 

१) अभिधामूलक व्यंजना :

पुष्कळसे शब्द असे असतात की, त्यांना दोन किंवा अधिक अर्थ असतात तेव्हा अभिधामूलक व्यंजना असते.

उदा. 'कर'

या शब्दाला हात, किरण, जनतेकडून वसूल केलेला पैसा इतके अर्थ निघतात.

या दोन अर्थापैकी एक अर्थ वरवर वापरला जातो व दुसरा अर्थ बोलणारा व ऐकणारा सूचकतेने वापरत असतो.

 

ब) लक्षणामूलक व्यंजनाः- शाब्दी व्यंजनेचा हा दुसरा प्रकार होय. या व्यंजना प्रकारामध्ये शब्दालाच महत्व असते येथे वाच्यार्थ अनावश्यक ठरतो, तर लक्ष्यार्थ प्रगट होतो. 

उदा. "माझ्या ग दारावरन कोण्या राजाचा ग हत्ती गेला "

या वाकयातदारावरनच्या ऐवजी 'रस्त्यावरून' असा अर्थ आपण लक्षणेने घेतो. जर वाच्यार्थाने अर्थ घेतला तर दारावरून हत्ती जाणे अशक्य आहे म्हणून आपोआप लक्ष्यार्थ प्रगट होतो.

 

२) आर्थी व्यंजना : :-"वाच्यार्थाहून भिन्न आणि हृदयंगम अर्थ ज्यावेळी वाचकांच्या रसिकांच्या मनात तरळू लागतात. तेंव्हा आर्थी व्यंजना होते."

 

उदा. पार्वतिला मागणी घालव्यासाठी शंकरातर्फे अंगिरसऋषि हिमालमाकडे आले असता पार्वती पित्या शेजारी उभी होती. अंगिरसऋषिने मागणी घातली असता पित्याच्या बाजूला उभी असलेली पार्वती हातांतील कमळाच्या पाकळ्या मोजू लागते.

        या वाच्यार्थाने काव्य-सौंदर्य समजू शकणार नाही. पार्वती आपल्या हातातील कमळाच्या पाकळ्या मोजू लागते. या क्रियेन पार्वतीच्या अंत:करणातील लज्जा, आनंद इ. भावना रसिकाना आनंद देतात.

 

आर्थी व्यंजनेचे प्रकार

 अ)वस्तूध्वनी  ब)अलंकार ध्वनी  क) रसध्वनी

 

अ) वस्तूध्वनी :-काव्यातील व्यंगार्थ हा विशिष्ट वस्तूचा किंवा कल्पनेचा अविष्कार करत असतो. यालाच वस्तुधनी व्यंजना अस म्हणतात.

 उदा. 'सूर्य अस्ताला गेला'

 

या वाक्यातून विशिष्ट व्यक्ति किंवा कल्पना यांना उद्देशून वेगवेगळे अर्थ-भावस्पंदने व्यक्त होतात. या वाक्यातील अर्थाच्या ज्या विविध च्छटा श्रोत्याच्या मनावर उमटतात त्या केवळ वस्तुरूप असतात.

 

ब) अलंकार ध्वनी: "जेव्हा व्यंगार्थ एखादया अलंकाराच्या रुपाने होते. तेंव्हा अलेकार ध्वनी होतो.”  अर्थात यातील अलंकार स्पष्ट नसून सूचित असतो हे लक्षात घ्यावे लागते.

 

उदा. "न मनागपि राहुरोध शंका न कलंकानुगमो न पांडुभावः । उपचीयत एवं कापि शोभा परितो भामिनि ते मुखस्य नियम्।

अर्थ : "राहूकडून त्रास होण्याची भिती नाही; कलंकाचा संबंध नाही; फिकटपणा नाही; हे सुंदरी ! नित्य तुझ्या मुखाची शोभा सतत वाढतच चालली आहे."

 

येथे उपमान जो चंद्र याचा उल्लेख नाही; पण राहु, कलंक इ.नी चंद्राची सूचना मिळते. उपमेयाचे श्रेष्ठत्व वर्णिले असल्याने हा व्यतिरेक ध्वनी होतो. व्यतिरेक अलंकार सूचित केला आहे

 

क) रसध्वनी :- रसध्वनी अलौकीक आहे कारण तो मुख्यार्थाने कधीच प्रकट होत नाही, रसध्वनीचे आकलन होण्यासाठी रसिकाजवळ प्रतिभाशक्तीची आवश्यकता असते. ध्वन्यालोककारांनी यालाच काव्याचा आत्मा असे म्हटले आहे,

 

उदा. "पार्वती आपल्या हातातील कमळाच्या पाकळ्या मोजू लागली" या शब्दाच्या वाच्यार्थाने पार्वतीच्या अंतःकरणाचे वर्णन कसे करता येइल? तिच्या अंतःकरणात उद्भवलेले प्रेमसाफल्य, लज्जा,आनंद इ. भावना केवळ अनुभूतीगम्यच आहे. याभावना केवळ सहृदय रसिकाच्याच प्रचितीस येइल.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

जागतिकीकरण आणि आदिवासी

  जागतिकीकरण आणि आदिवासी डॉ . अक्षय किशोर घोरपडे. ·        गोषवारा  (Abstract) :- १९९० नंतरचा कालखंड हा भारतीय समाज जीवनात फार मोठा सा...