अध्ययन आणि अध्यापन
कविता : रसग्रहण
‘माले ऽ कससंच वाटस रे ऽ !’ : आईच्या मनाची घालमेल
डॉ. अक्षय घोरपडे.
माले
ऽ कससंच वाटस रे ऽ !
- निंबा कृष्णा ठाकरे
विमानतळावरची
गोष्ट
सुरक्षा
व्यवस्थेला हुलकावणी देऊन
माझी
माय माझ्याजवळ आली.
तेव्हां
ऽ
ऽ
माझ्या हातातले एअर इंडियाचे तिकिट
काऊंटरवरच्या
क्लार्कला देताना थरथरल ऽऽ।
मायन
माझ्या,
हात
माझा घट्ट धरला,
कुजबुजली सर्द आवाजात...
“मन्हा ऽ दादा ऽ
माले
कससंच वाटस रे ऽऽ,
माले कससंच वाटस रे ऽऽऽ!"
मी चिम्ब झालो आतून,
मायच्या
त्या आर्त टाहोनं ऽ ऽ...
.... नि माय माझी
आली
तशीच निघून पण गेली
एअर
इंडियाच्या 'त्रिशकू' न जेव्हां
आकाशात
झेप घेतली
पावणेपाच
फुटी माझी माय
तेव्हां
आकाशाएवढी बाटली।
अर्ध्या
तासानं विमानाचा कॅप्टन
सांगत
होता-
विमानाच
एक जनरेटर
बिघडलं
म्हणून ।
माझी
माय,
आकाशातनं
पुन्हा कुजबुजली माझ्या कानात,
“मन्हा ऽ दादा ऽऽ
माले
कससंच वाटस रे ऽऽ,
माले कससंच वाटस रे ऽऽऽ!”
"मन्हा दादा ऽ
माले
ऽ कससंच वाटस रे ऽ,
माले
ऽ कससच वाटस रे ऽ!"
· कवितेचे स्वरूप
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचे पहिले कुलगुरू म्हणून कविवर्य
निंबा कृष्णा ठाकरे यांची ओळख आहे. प्रशासकीय कार्याबरोबरच त्यांनी साहित्यिक
म्हणूनही आपला ठसा उमटविला आहे. 'माले
ऽ कससंच बाटस रे ऽ' या निंबा कृष्णा ठाकरे यांच्या कवितेमध्ये
आपल्या आईला तिचा मुलगा दूरदेशी विमानाने जातांनाच्या आईच्या भावव्यवस्थेचे वर्णन
कवीने केले आहे. विमानात बसण्यासाठी आपला मुलगा जेव्हा जातो त्या विमानतळावरची
गोष्ट कबीने अत्यंत हृदयदावक पद्धतीने रेखाटली आहे. आईची आपल्या मुलाशी जोडलेली
नाळ मुलगा जरी मोठा झाला तरी टिकूनच असते. आपल्या मुलाला आपल्या जवळून दूर जाताना
तिचे आतडे तीळ-तीळ तुटत जाते मुलाच्या आपल्यापासून दूर जाण्याने आईच्या म नाची
होणारी घालमेल या कवितेत कवीने रेखाटली आहे. कवीमनाच्या कुलगुरुची ही कविता वाचक
मनाला भावते
· कवितेचा आशय व अभिव्यक्ती
'माले
ऽ कससंच वाटस रे ऽ' या कवितेमध्ये कविवर्य निंबा कृष्णा ठाकरे यानी
विमानातून प्रवासासाठी निघालेला मुलगा व त्याची अडाणी आई या मायलेकामधील
भावनिकतेचे दर्शन घडविले आहे. खरे तर ही कवितेतील घटना किंवा गोष्ट विमानतळावर
घडलेली आहे. पशु-पक्षी, प्राणी याना आपल्या पिल्लाबद्दल जसे प्रेम, जिव्हाळा असतो. तसाचप्रकारे या कवितेतील एका
अडाणी मातेला आपल्या मुलाबद्दल प्रचंड प्रेम, कणव, जिव्हाळा आहे. आपला मुलगा आपल्यापासून दूर
जाणार हीच गोष्ट त्या अडाणी मातेला सहन होत नाही. आपल्या मुलाला भेटण्यासाठी ती
सुरक्षा व्यवस्थेला हुलकावणी देऊन त्या मुलाजवळ जाते. त्यावेळेला तिच्या शिकलेल्या
मुलाची अवस्था रेखाटताना कवी म्हणतो,
“माझ्या हातातले एअर इंडियाचे तिकिट
काऊंटरवरच्या क्लार्कला देताना थरथरल ऽऽ!
मायन
माझ्या,
हात माझा घट्ट धरला,
कुजबुजली
सर्द आवाजात...
"मन्हा ऽ दादा
माले
कससंच वाटस रे ऽऽ ,
माले
कससंच वाटस रे ऽऽऽ!"
सुरक्षा रक्षकाना न जुमानता आपल्या मुलाला भेटायला आलेल्या आईला
पाहून काउंटरवरील क्लार्कला हातातील एअर इंडियाचे तिकीट देताना कवीचा हात थरथरतो.
या प्रसंगातून एकंदरीत कवीच्या द्विधा मनस्थितीचे दर्शन घडते. माया, ममता, जिव्हाळा
या गोष्टींपासून माणूस कधीही आपली सुटका करू शकत नाही. अडाणी आईच्या 'माले कससंच बाटस रे ऽऽ' या वाक्यामुळे कवीच्या मनाची झालेली भावनिक
गुंतागुंत व घालमेल नाजूक शब्दकळांनी कवीने चितारली आहे आईने फोडलेला अर्थ टाहो, अतिव दुःखाने व आईबद्दलच्या प्रेमाने आतल्या आत
कवी चिंब भिजवून जातो. द्विधा मनस्थितीत सापडलेल्या कवीला आपल्या आईला सोडून
जावेनासे वाटत राहते. कवीच्या डोळ्यापुढे आईचा अर्थ टाहो आणि 'माले कससंच वाटस रे ऽऽ' हे शब्द सभोवती फिरत राहून आईच्या अस्तित्वाची
जाणीव करून देत राहतात. 'माले कससंच बाटस रे ऽऽ' या वाक्याद्वारे प्रतीत झालेला कवीबद्दलचा
जिव्हाळा व अतूट नाते त्याचप्रमाणे आडाणी आईच्या मनात भरलेला प्रेमाचा अथाग सागर
कवीला चिंब भिजवून टाकतो. वाऱ्याची झुळूक क्षणार्धात येते आणि माणसाच्या शरीराला
स्पर्शन सुखद गारवा देते,
तशीच काहीशी प्रचिती '... नि माय माझी आली तशीच निघून पण गेली... 'या वाक्यातून प्रतिबिंबित होताना दिसून येते.
कवीला आपल्या आईविना जाणवणारा एकटेपणा सतत सतावतो, त्रस्त करतो व आपल्या आईकडे खेचत राहतो. 'आई' म्हणजे
ममतेने भरलेला निर्मळ आत्मा निर्मळ आत्म्याच्या संगमातून 'आई' नावाची
ईश्वररुपी जीवत मूर्ती निर्माण झाली आहे. आईच्या प्रेमाची दुसऱ्या कोणत्याही
प्रेमाशी तुलना होऊ शकत नाही आईचे प्रेम म्हणजे निर्मळ, निर्भेळ, निस्वार्थी, पवित्र व सात्विकतेचा अखंड झरा असतो. कोणत्याही
मुलाची आई कशीही असली तरी ती त्याच्यासाठी ईश्वर समान असते तसेच ममतेचा, प्रेमाचा अथांग सागर असते कवी म्हणतो,
“एअर इंडियाच्या 'त्रिशंकू' न जेव्हां आकाशात झेप घेतली
पावणेपाच
फुटी माझी माय
तेव्हा
आकाशाएवढी वाटली!"
अडाणी आई आपल्या शिकलेल्या मुलाला निरोप देऊन विमानतळावरून निघून
जाते. त्यानंतर थोड्याच वेळात एअर इंडियाचे विमान त्रिशंकू स्थितीत आकाशात झेप
घेते त्यावेळी मात्र त्याची पावणे पाच फुटी माय आकाशाएवढी वाटत राहते. आपली आई
आपल्याला सोडून गेली नाही तर आपल्या सोबतच आहे, ही
भासमान प्रतिमा कवीने या काव्याच्या ओळीतून अत्यंत शिताफीने
उभी केली आहे. घार हिंडते आकाशी, तिचे चित्त पिलापाशी या संत जनाबाई यांच्या
अभंगांच्या पंक्तीचा आभास काव्यास्वाद घेतांना निर्माण होतो. आपली माय आपल्या
सोबतच आहे. विमानाने कितीही उंच झेप घेतली, त्याहीपेक्षा
आपल्या आईचे अस्तित्व आभाळापेक्षाही मोठे व्यापक, विशाल आहे, ही आई या नावाची विश्वव्यापकता कवीने आपल्या
काव्यातून अत्यत उत्कटपणे रेखाटली आहे.
कवी फ. मु. शिंदे म्हणतात,
“आई असते जन्माची शिदोरी
सरतही
नाही आणि उरतही नाही”
आपली अडाणी माय आकाशापेक्षाही उच वाटणे' अथवा 'भासणे' ही कवी मनाची अभिव्यक्ती प्रशंसनीय वाटते.
विमानाने आकाश झेप घेतल्यानतर अर्ध्या तासात विमानाच्या कॅप्टनने विमानाचे एक
जनरेटर बिघडल्याचे घोषित केले, त्यावेळेला
मात्र कवीला त्यावेळी आपल्या आईचे अस्तित्व आपल्या अवतीभोवती अप्रत्यक्षरीत्या
अदृश्य स्वरूपात आपल्याशी संबाद साधत असल्याचा भास होतो
“'माझी माय,
आकाशातन
पुन्हा कुजबुजली माझ्या कानात,
"मन्हा दादा माले कससच वाटस रे ऽऽ“”
आपली आई पृथ्वी तलावावर असूनही विमानाने आकाशात झेप घेतलेल्या
मुलाच्या मनाशी व हृदयाशी जणू काही संवाद साधते त्याच्या अवतीभोवती सतत तिचे
अस्तित्व असते. त्यामुळे 'विमानाचे जनरेटर बिघडले आहे हे विमानाच्या
कॅप्टनचे शब्द ऐकून कवीला आपल्या आईचे शब्द आकाशातून ऐकू येतात. 'माले कससच वाटस रे ऽऽ आईच्या या तीन शब्दातून
आईच्या मनाची घालमेल आपल्या मुलाशी जोडलेली अतूट नाळ मुलाविषयी असलेले अत्यंत
प्रेम, जिव्हाळा, कणव
प्रकर्षाने जाणवते. एका अडाणी आईचे आपल्या विमानाने प्रवास करणाऱ्या मुलावर असलेले
प्रेम व त्याच्याशी जोडलेली भावनिक नाळ यांचे हृदयद्रावक चित्रण या कवितेत कवी
निंबा ठाकरे यांनी उभे केले आहे
· कवितेतील प्रतिमा प्रतीके व अलंकार दर्शन
'माले
कससंच वाटस रे ऽऽ' या कवी निंबा कृष्णा ठाकरे यांच्या कवितेत हात
घट्ट धरणे, चिंब होणे, एअर
इंडियाच्या त्रिशकूने, पावणे पाच फुटी माय आकाशाएवढी वाटणे, थरथरने, सर्द
आवाज, टाहो फोडणे असे अनेक अलकारिक शब्द प्रतिकात्मक
पद्धतीने आले असून जीवंत प्रतिमा उभ्या करण्याचे कार्य त्यातून झाले आहे. 'आकाशात मायेचे कुजबुजणे' यातून भ्रांतिमान तसेच 'पावणे पाचफुटी माय आकाशाएवढी वाटणे' यातून अतिशयोक्ती अलंकाराची निर्मिती केली असून
कवितेला आगळे वेगळे सौंदर्य प्राप्त झाले आहे.
· कवितेतील जीवनदर्शन व भाषाशैली
'माले
कससंच वाटस रे ऽऽ' या कवी निंबा कृष्णा ठाकरे यांच्या कवितेत एका
गरीब, साधी, भोळी, अडाणी मातेचे अर्थातच आईचे जीवन व तिच्या मनाची
भावावस्था चित्रीत केली आहे. आपणास सोडून कधीही दूर न गेलेल्या मुलाला विमानाने
प्रवास करून दूर देशी जाताना तिच्या मनाची होणारी घालमेल तसेच आईचे 'माले कससंच वाटस रे ऽऽ' या वाक्याच्या माध्यमातून मुलाची अर्थातच कवीची
होणारी मनोवस्था त्याचप्रमाणे आई व मुलाचे एकमेकांशी जुळलेले भावबंध यांचे नाजूक, तरल चित्रण कवितेद्वारे उभे केले आहे. माले-मला, हुलकावणी देणे-नजर चुकविणे, मन्हा माझा, वाटस
वाटत आहे, चिम्ब होणे ओलेचिंब म्हणजेच प्रेमात न्हाऊन
निघणे, भिजून निघणे, माय-माता किंवा आई, फुटी
फूट, बिघडणे-नादुरुस्त होणे, कुजबूजने हलक्या आवाजात संवाद साधणे, दादा-बडील अथवा मोठा मुलगा असून खान्देशातील
धुळे जिल्ह्याच्या अहिराणी बोलीतील काही शब्दांचा वापर कवितेत कवीने केला आहे.
त्यामुळे कवितेला आगळे वेगळे भाषिक सौंदर्य लाभलेले दिसून येते.
सदर कवितेवर मी माझ्या 'अ-अक्षयचा' या youtube channel वर व्याख्यान दिलेलं आहे, त्याची लिंक खाली देत आहे.
https://youtu.be/3b7eAxUdO5Q?si=GzIP8XtnendvxXfe
टीप : सदर कवितेचा समावेश हा क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव विद्यापीठाच्या प्रथम वर्ष कला मराठी विषयाच्या अभ्यासक्रमात द्वितीय सत्रासाठी केलेला आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा