गुरुवार, २५ डिसेंबर, २०२५

नाटक साहित्य प्रकार

 

अध्ययन आणि अध्यापन

नाटक साहित्य प्रकार : अध्ययन आणि अध्यापन

डॉ. अक्षय घोरपडे.

 

·      नाटक (Drama): एक अभ्यास

नाटक हा सर्वांना परिचित असा साहित्यप्रकार आहे. मराठीतील इतर साहित्यप्रकारांपेक्षा नाटक हा वेगळा साहित्य प्रकार आहे. कारण नाटक वाचता येते. नाटक ऐकता येते. नाटक पाहता येते त्यामुळे इतर साहित्य प्रकारांप्रमाणेच आपल्याला नाटकाचा आनंद घेता येतो. रंगमंचावर सादर करता येते. म्हणूनच नाटक हा 'दृक-श्राव्य' स्वरूपाचा वाङ्‌मय प्रकार आहे. रंगमंचावर नाटकाचे सादरीकरण होते. नाटकाचे सादरीकरण करणारे कलाकार आणि नाटक पाहणारे रसिक प्रेक्षक असा नाटकाचा प्रवास होतो. रंगमंच, संगीत, नेपथ्य आणि प्रकाश या घटकांच्या आधारे नाटकाचे प्रभावी आणि परिणामकारक सादरीकरण होते. आपल्या देशात 'नाटक' या कलेला प्राचीन व समृद्ध असा वारसा आणि इतिहास आहे. साधारणपणे दोन हजार वर्षापासून ही कला अस्तित्वात आहे. 'भरतमूनी' यांना नाट्यशास्त्राचे जनक मानले जाते त्यांचा 'नाट्यशास्त्र' हा ग्रंथ नाटक कलेची माहिती आणि इतिहास जाणून घेण्यासाठी प्रमाण मानला जातो. नाटकांत संवाद आणि अभिनयाद्वारे घटना, प्रसंग, अनुभव यांचे सादरीकरण केले जाते. त्यामुळे नाटकांची परिणामकारकता ही जास्त आणि प्रभावी असते. नाटकांचा प्रत्यक्ष अनुभव आणि आस्वाद घ्यावा लागतो.

इंग्रजीत नाटकाला Drama हा पारिभाषिक शब्द आहे. Dran (ड्रॅन) या ग्रीक शब्दावरून Drama (ड्रामा) हा शब्द रूढ झाला. Dran (ड्रॅन) म्हणजे कृती करणे. नाटकाचे सादरीकरण करताना कृती करावी लागते त्यालाच आपण अभिनय (Acting) असे म्हणतो, त्यामुळेच नाटकांत सादरीकरणाला फार महत्त्व आहे. त्यामुळेच पुढे Drama हा शब्द रूढ झाला. नाटकाच्या सादरीकरणाला प्रयोग म्हणतात. हा प्रयोग प्रेक्षकांसमोर होतो. त्याचा अनुभव अनेक जण एकाचवेळी घेतात. त्यामुळे नाटक हे प्रभावी आणि आकर्षक होण्यासाठी त्यात मनोरंजन, करमणूक आणि रंजकता असली पाहिजे. नाटकाचे सादरीकरण हे पात्र, कलाकार, अभिनेता किंवा नट याद्वारे होते. नाटकाचा प्रभाव हा अभिनय आणि संवादावर अवलंबून असतो पण तरीही मराठीत नाटक हा ए महत्त्वाचा वाङ्मय प्रकार मानला जातो.

प्राचीन काळात नाटक या कलेला राजाश्रय लाभला होता. करमणूक, मनोरंजन करण्यासाठी नर्तकांद्वारे ही कला सादर केली जात असे. संस्कृत रंगभूमीवरील 'भाण' हा प्रकार, तमाशा, जलसे हे कलाप्रकार लोकांच्या मनोरंजनासाठी सादर केले जायचे. साधारणपणे १९ व्या शतकांत नाटक या कलेला लोकाश्रय मिळाला. मराठी नाटकांना व्यावसायिक स्वरूप प्राप्त झाले. मराठी नाटकांचे सादरीकरण प्रयोगरुपाने रंगभूमीवर व्हायला सुरुवात झाली. मनोरंजनासोबत बोधालाही महत्त्व नाटकांत प्राप्त झाले. मानवी जीवनाचे चित्र नाटक रूपाने साकार झाले.

मराठी व्यावसायिक रंगभूमीचे जनक कै. विष्णुदास भावे यांना ओळखले जाते. ५ नोव्हेंबर १८४३ ला 'संगीत स्वयंवर' या नाटकाचा प्रयोग त्यांनी सांगली येथे केला. १९व्या शतकांत अव्वल इंग्रजी कालखंडात अनेक इंग्रजी नाटकांचे मराठीत भाषांतरे झाली. मराठी रंगभूमीची विकास खऱ्या अर्थाने १९ व्या शतकांत झाला. मराठी नाटकांना व्यावसायिक रूप प्राप्त झाले असले तरी नाटक कलेला प्राचीन वारसा लाभला आहे. बहुरूपी, दशावतारी, सोंग, तमाशा, या लोकजीवनातील प्रचलित लोककला नाटक कलेला रंगभूमीवर स्थिरावण्यासाठी निश्चितच उपयोगी ठरल्या आहेत. सादरीकरणाच्या अंगाने विचार केला तर निश्चितच नाटक कला ही प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे.

 

·      नाटक व्याख्या (पाश्चात्त्य आणि भारतीय विचारवंत) :

1.     सिसिरो : 'नाटक' हे जीवनाचे अनुकरण आहे, चालीरीतींचा आरसा आहे. सत्याचे प्रतिबिंब आहे.

2.     कोलरिज : 'नाटक' हे निसर्गाचे अनुकरण नसून त्याची नक्कल आहे.

3.     विल्यम अर्थर : 'नाटक' हे आपल्याला कमीपणा आणणाऱ्या व बंधन घालणाऱ्या दैवी शक्ती व निसर्ग यांच्या संघर्षात सापडलेल्या माणसाच्या इच्छेचे प्रतिनिधित्व करते.

4.     मार्जन बोल्टन : सादरीकरणाच्या हेतूने लिहिले जाते ते म्हणजे नाटक.

5.     ना.सि. फडके : समूहाने समूहासमोर करावयाची कला.

6.     डॉ. भालचंद्र फडके : नाटक हा मानवी मनाचा सांस्कृतिक उद्गार आहे.

7.     वि. वा. शिरवाडकर : नाटक हा एक साहित्यप्रकार आहे आणि रंगमंचावर सिद्ध होणारा कलाप्रकार आहे.

8.     विष्णुदास भावे : नाटकांत रजनाचे फार मोठे सामर्थ्य असते. नाटकांत सादरीकरण असते म्हणून नाटक म्हणजे 'खेळ'

9.     विश्वकोश वा खंड : नाटक म्हणजे प्रसंग आणि संवाद यांच्याद्वारा व्यक्त होणारा संघर्षमय कथात्म अनुभव.

10.  भरतमुनी : नाट्य हे अनुकरण नव्हे, अनुव्यवसाय होय.

वरील व्याख्यांवरून सारांश असा काढता येते की, शब्दांनी तयार झालेले संवाद साभिनय सादर करावयाची कला म्हणजे नाटक.  नाटक या साहित्य प्रकारात सादरीकरणाला महत्त्व असते. रंगभूमीवर प्रेक्षकांसमोर नेपथ्य, संगीत, प्रकाशयोजना, अभिनय इ. घटकांच्या साहाय्याने हे सादरीकरण होते. आज नाटक या साहित्य प्रकाराकडे कला म्हणून पाहिले जाते. व्यावसायिक नाटकांची रंगभूमीचा आज विकास झाला आहे. दर्जेदार व समाजाभिमुख नाटकांची रंगभूमीचा आज विकास झाला आहे. दर्जेदार व समाजाभिमुख नाटकांची निर्मिती मोठ्या प्रमाणात होत आहे. नाटकांचा निश्चित असा प्रेक्षक वर्ग आहे. मराठी नाटकांच्या विकासात नाटकांचे लेखक, कलाकार, प्रेक्षक यासोबतच सहकलाकार व पडद्यामागील / रंगमंचामागील मदतनिसांचा मोठा हातभार आहे. रंगमंचावरील कलाकार आणि प्रेक्षक यांच्यातील संवाद आज नाटकांमधून वृद्धिंगत झाला आहे.




1 टिप्पणी:

जागतिकीकरण आणि आदिवासी

  जागतिकीकरण आणि आदिवासी डॉ . अक्षय किशोर घोरपडे. ·        गोषवारा  (Abstract) :- १९९० नंतरचा कालखंड हा भारतीय समाज जीवनात फार मोठा सा...