पुस्तक परीक्षण
अस्वस्थ (काव्यसंग्रह) - कैलास भाले
अस्वस्थ वर्तमानाचे चित्रण करणारी कविता
प्रस्तावना
कवी कैलास भाले हे दलित जीवन जाणिवेची कविता लिहिणारे कवी आहेत. ‘पोळणाऱ्या सावल्या’, ‘अस्वस्थ’ हे त्यांचे दोन काव्यसंग्रह प्रकाशित असून आजच्या लेखात त्यांच्या ‘अस्वस्थ’ या काव्यसंग्रहाची चर्चा आपण करणार आहोत.
दलित कविता ही दलित जीवनाचे चित्रण करणारी असली तरी या कवितेला अखिल
मानवतावादाचा ध्यास आहे.
शोषित, पीडित, वंचित जीवनाचा स्वर हा दलित कवितेचा स्वर आहे. आणि म्हणूनच ही कविता शोषणाच्या सर्वच प्रथा, परंपरांना नाकारणारी आहे. समता हे या कवितेचे मूल्य असल्याने समताधिष्ठित
समाज जीवनाचा आग्रह दलित कविता धरते. या मूल्याच्या आड येणाऱ्या सर्वच प्रवृत्तींचा निषेध आणि त्या
प्रतीचा विद्रोह करणे ही दलित कवितेची खासियत आहे. दलित कवितेच्या या सर्वच वैशिष्ट्यांचा आढळ
कैलास भाले यांच्या कवितेत दिसतो.
कविता ही दुःखाच्या वेदनेतून निर्माण होते. समाजाचा एक घटक म्हणून जेव्हा आपण समाजात
वावरतो तेव्हा समाजानेही आपल्याला स्वीकारावे ही आपली अपेक्षा असते. परंतु समाजच जेव्हा आपल्याला नाकारतो , दुर्लक्षित करतो, आपल्या अस्तित्वाची दखल घेत नाही तेव्हा मिळणारे दुःख हे वेदनादायी
असते, कवीलाही असेच
दुःख मिळालेले आहे.
आणि म्हणून मग तो आपल्या दुःखाशी आत्मसंवादी होतो. दुःख खोदत जातो. दुःखाचा तळ शोधतो. कवी म्हणतो,
"कायम सोबत करणाऱ्या दुःखालाचं
खोदत गेलो
आतल्या आत
लागली ओल
तसं
पान
फांद्या
खोडातून
उतरलो
मुळात
तर
भेटली
कविता
आता मला दुःख हवयं
प्रचंड
कशातही न मावणारं."(कोंदण, पृष्ठ८६)
झालेली उपेक्षा आणि मिळालेल्या अवहेलनेच्या दुःखातून कवीला स्वतःची कविता सापडली. नवा सूर सापडला. नवा ध्यास सापडला. कवीचा हा आत्मविष्कार कवीला अधिकच्या दुःखाकडे
घेऊन जातो. एक
प्रकारे कवी आपल्या कवितेच्या निर्मितीची प्रक्रिया उलगडत जातो. इतरांमध्ये राहून इतरांसारखेच परंतु
इतरांपेक्षा वेगळ्या जाणीवेचा स्वर हीच आपली मुख्य ओळख आहे, हा कवीचा खरा आत्मविष्कार. हा आत्मविष्कारही त्याला कदाचित प्रस्थापित
व्यवस्थेपासून अलगतेची जाणीव झाल्यावर झाला. त्यामुळे ही कविता आणखी एक नवा अर्थ उलगडते तो असा की, इतरांच्या दुःखापेक्षा आपल्या दुःखाचा पोत
वेगळा आहे,
आपल्या भाकरी आणि अस्मितेचे प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत, म्हणून आपले दुःख आपणच शोधायला हवे तेव्हा
कुठे अस्सल अभिव्यक्ती जन्मास येईल.
कैलास भाले यांच्या कवितांचे वर्गीकरण केले तर गावगाड्यातून मिळालेली
अस्पृश्यतेची वागणूक, दलितांमधील जात वर्चस्वाचे राजकारण, आणि वर्तमानात दलितांची स्थिती अशा तीन भागात त्यांची कविता वर्गीकृत करता येते. वर्तमानात असलेला कवी जसा भूतकाळात रमतो तसाच तो भविष्याचा ही वेध घेत असतो कवी त्याला
मिळालेल्या अस्पृश्यतेचे चित्रण करतो म्हणजेच तो भूतकाळात रमतो असा एखाद्याचा समज
होऊ शकतो.
आता कोठे अस्पृश्यता आहे?
आता कोठे जात वर्चस्व आहे? असा सूर एखाद्याचा असू शकतो परंतु आमच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक जीवनातून जातीचे गणित अजून सुटलेले नाही. त्यामुळे जात संवेदनांचे अनुभव दलित कवितेत वारंवार येतात आणि जोपर्यंत
हे गणित सुटणार नाही तोपर्यंत जात संवेदनेचे अनुभव दलित कवितेने मांडायलाच हवेत
अन्यथा त्यांची जी अभिव्यक्ती असेल ती अस्सल ठरणार नाही तर ती नक्कल ठरण्याची भीती अधिक आहे.
दलित कवी हा समतेच्या पथावरचा पाईक असल्याने स्वजातीत असलेल्या शोषणावर ही तो टीका करतो. जातीयता नाकारणारा समाज जेव्हा स्वतः जातीय होतो तेंव्हा ही
कवीला दुःख होते.
गावकुसाबाहेर निर्माण झालेला नवा संघर्ष कवीला अस्वस्थ करतो कवी म्हणतो,
"विस्तारित जाणीवांच्या आपल्या हक्कासाठी
होऊन
जाऊ द्या असं म्हणताना बाबासाहेब
चवदार
तळ्याच्या पाण्याला आग लावताना
आम्हीही
तुमच्या सोबत होतो
हे
या कार्यकर्त्यांना अजूनही कसे कळले नाही." (संघर्ष पृष्ठ ८३)
बाबासाहेबांच्या प्रत्येक आंदोलनात चळवळीत बहुजन समाज हा सक्रिय होता. चवदार तळ्याच्या सत्याग्रहात तर महार, मांग,
चांभार, मुस्लिम आणि
ब्राह्मण समाजातली ही काही व्यक्ती बाबासाहेबांच्या समवेत होती. हा इतिहास नाकारता
येणारा नाही. जात नाकारणे हा मुख्यतः बाबासाहेबांच्या चळवळीचा उद्देश परंतु आता
सोयीस्करपणे याकडे दुर्लक्ष केले जात आहे. बाबासाहेबांपासून इतर बहुजन समाज तोडण्याचे प्रयत्न स्वकीय आणि
परकीयांकडून सातत्याने सुरू आहे. एका बंदिस्त पर्यावरणात बाबासाहेबांचे विचार
मर्यादित करून चळवळ संपवण्याची सुरू असलेले षडयंत्र कवीला अस्वस्थ करते.
वर्तमानात जात, धर्म,
प्रदेश, लिंग यांच्या
अस्मिता या टोकदार झालेल्या आहेत.
त्यामुळे कोवळ्या बालमनावर विकृत, विपर्यस्त, एकांगी बाबी कोरल्या जात आहेत. भारत देश हा बहुभाषिक, बहुसंस्कृतिक देश आहे. मात्र ही बहुभाषिकता. बहुसंस्कृतिकता आता नष्ट करून त्या ऐवजी
आमच्याच रंगाने भारत ओळखला जावा यासाठी साऱ्याच मूलतत्त्ववादी संघटना आणि त्यांचे
प्रतिनिधी हे प्रयत्नरत आहेत. त्यातही बहुसंख्यांचे बळ असलेले तर ते जाणीवपूर्वक तसाच प्रचार करत आहेत. त्यामुळे येथे जन्माला आलेल्यांच्या कपाळावर
जन्मजात शिक्का उमटवणे सुरू आहे. जे ऐकत नाहीत त्यांच्यावर तर बळजबरीने लादले जात आहे. एक धर्म, एक भाषा, एक वंश या त्रिसूत्रीत गुंतवल्या गेलेल्या बालमनावर याचा विपरीत परिणाम
झालेला आहे म्हणून तर मग,
"शालेय विद्यार्थ्यांसाठीच्या
‘बदलता
भारत’ या विषयावरील
चित्रकला
स्पर्धेत
एकानं
भगवं झाड काढलं
दुसऱ्यानं निळा पोपट
तर
तिसऱ्याने हिरवा चंद्र
एकाने
तर काळा सूर्यच मांडला समोर" (जागृती, पृ. ८५)
परंतु एकालाही अखंड भारताचा इंद्रधनुष्य काढता आला नाही. संवेदनशील कवीच्या शिक्षकी मनाला हे बदललेले वास्तव पटत नाही. अखंड भारताच्या नकाशात जो कोणी स्वतःचे
अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करेल त्याला या देशाच्या नकाशातूनच गायब केले जाईल ह्या
अत्यंत दहशतगर्भ विचाराने कवी ठेचाळतो,
रक्तबंबाळ
होतो आणि कवितेच्या पायावर डोकं ठेवून ढसाढसा रडतो.
स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही आमच्या सामाजिक जीवनात विशेष फरक पडलेला नाही. आम्ही प्रगतीच्या दिशेने निघालो, माहिती तंत्रज्ञानाच्या जगात येऊन पोहोचलो, कृत्रिम बुद्धिमत्तेने आज आमचे जीवन व्यापलेले
आहे, याच काळात
दुसऱ्या स्वातंत्र्याचाही उल्लेख होत आहे. पहिलं स्वातंत्र्य अमान्य असणारे आपल्या सत्ताकाळात दुसऱ्या स्वातंत्र्याचे गोडवे गात आहेत, बदलता भारत, विकसित भारत, राष्ट्रवादी भारत उभा केला जात आहे. सत्तांतराची शहाडी वाजवली जात आहेत. बदलत्या भारताच्या जाहिरातींनी आमचे अवघे
विश्व व्यापले आहे.
आमच्या कुळांचा शोध घेऊन आम्ही कसे या देशाचे डी.एन.ए. आहोत हे सिद्ध करण्याची चढाओढ सुरू आहे. या सगळ्या धामधुमीत आमच्या सामाजिक स्थानाचे
काय? याविषयी मात्र
कुठेच चर्चा होत नाही.
विशिष्ट रंगाच्या विशिष्ट भारतात आमचे अस्तित्व कोठे असेल ? तर आजही आमचे अस्तित्व,
"आयुष्यभर माना टाकून जगलेली
महारा
मांगाची माणसं
आजही
खालच्या मानेने ताटकळत
उभी
राहिली अंतराने
हातात
जीर्ण काठ्या
घेऊन" (जागरूक, पृ. ७५)
ग्रामसभेत ही अवस्था असेल तर बाकी विषयीचे बोलणेच नको म्हणून आम्हाला आमच्या अस्तित्वाची लढाई
लढावी लागणार आहे.
गाफीलपणाचा इतिहास विसरून जुने मार्ग रोखण्यासाठी नवे मोर्चे बांधणी करावी लागणार
आहे.
कवी कैलास भाले यांची कविता ही अर्थघन आहे. वर्तमानाचे विविध पदर ही कविता उलगडते. आत्मसंवादी असणे या कवितेचे ठळक वैशिष्ट्य आहे. कवी आपल्या मनोगतातून केवळ स्वतःची वेदना व अभिव्यक्ती करत नाही, तर आत्मचिंतन करून आत्मपरीक्षणही करतो
त्यामुळे कवीचे निष्कर्ष हे त्याच्या जगण्याची ग्वाही देतात.

.jpg)
.jpg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा