शनिवार, १३ डिसेंबर, २०२५

संदर्भ माझ्या जातीचे शोधणारा कवी : मिलिंद बागुल

 

संदर्भ माझ्या जातीचे शोधणारा कवी : मिलिंद बागुल

                                             
                                                            अक्षय घोरपडे.

मिलिंद बागूल 

व्यक्ती परिचय 

मिलिंद बागुल हे  खानदेशातील महत्त्वाचे कवी, लेखक, संपादक म्हणून ओळखले जात असले तरी खानदेशातील दलित आंबेडकरी चळवळीला धडाडीने पुढे नेणारा लेखक म्हणून त्यांची खरी  ओळख आहे. 


प्रकाशित ग्रंथ : 

 ‘संदर्भ माझ्या जातीचे’, ‘तेवढेच संदर्भ आमचे’ इत्यादी काव्यसंग्रह, 

‘फ.मु.गजबजलेलं गाव’, ‘हमालपुरा ते कुलगुरू’, ‘झंजावात’, ‘बाबुराव गायकवाड यांचे लघु निबंध’,

 ‘विचारश्रृंखला’, ‘गाव शिवार’ इत्यादी व्यक्तिचित्रणात्मक आणि समीक्षणात्मक ग्रंथ प्रसिद्ध आहेत. 

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावच्या प्रथम वर्ष मराठीच्या  अभ्यासक्रमात मिलिंद बागुल यांच्यामायया कवितेचा समावेश झालेला आहे. 


रसग्रहण 


माय

मायच्या मायेनं गहिवरून आल्यानं 
ओथबलेल्या आसवांना वाट करून देत 
तिनं वाहिलेल्या आयुष्यातल्या ओझ्यांचा 
हिशेब जुळवत ताळेबंद ठरवत 
मला मी विचारीत असतो 
लाकडाचा भारा, ज्वारीचा वाटा 
यातल्या हिश्याशी कितपत प्रामाणिक राहत असतो 
मायच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या मोजत मायच्या 
स्वातंत्र्याचा पाढा वाचीत 
बापाचा न्याय-अन्याय याच समीकरण जुळवीत बसतो 
पोटाला चिमटी देत मायन शिक्षण हे पोट समजून 
माझ्या पोटाला घडवताना 
शिक्षणाची एक एक पायरी, माझ्याकडून पार करीत 
पोटातल्या आकांताला आतल्या आत शांत करीत 
माझ्यातल्या मला घडवित राहिली 
आज तिला आलेल्या सुखाच्या दिसात 
तमाम सनातन्यांना तिच सुख पाहवत नाही 
तिनं अन् तिच्या मेळ्यातल्या स्त्रियांनी 
शिकवलेल्या आपल्या मुलांना धनसंपत्ती समजून 
चष्म्यातून डोकावतांना त्यांच्या आसवांशी 
संवाद साधताना 
मायच्या झिंगून गेलेल्या केसांना तेल लावीत 
हिनं दाखवलेला मेळ 
मायच्या स्वप्नाला साकारत गेला
                                 
                                     मिलिंद बागुल

            माय म्हणजे प्रमाण भाषेत बोलायचे झाले तर आई. आई ही आपल्या संपूर्ण जीवनाला व्यापून टाकणारी असते. नऊ महिने नऊ दिवस जिच्या गर्भातून; तिच्या नाळेतून आपले भरण पोषण होत आणि आपण जन्माला येतो ती आई असते. आईशी आपले भावनिक नाते असते. ज्या कुटुंबात आपण जन्म घेतलेला असतो, त्या कुटुंबातील आई-वडील, भाऊ-बहीण आणि या व्यतिरिक्त इतर नातेसंबंधांशी आपले संबंध असतात, ऋणानुबंध असतात परंतु या सर्व ऋणानुबंधात आपल्या शेवटपर्यंत टिकून राहतात ते फक्त आपल्या आई-वडिलांशी जोडलेले ऋणानुबंध. त्यातल्या त्यात वडिलांपेक्षा आईशी आपला  ऋणानुबंध हा अधिकचा जुळलेला असतो. लहानपणापासून जिच्या अंगा खांद्यावर आपण वाढलो, तिच्या पदरात आणि उदरात आपण  तोंड खूपसून रडलो, हसलो, बागडलो अशा आईशी मुलांचे नाते शेवटपर्यंत जोडलेले असते. माणसाच्या नेणिवेत आई कोरीव लेणी सारखी असते. आईची विशिष्ट छबी, प्रतिमा, मूर्ती त्यात कोरलेली असते आणि तीच प्रतिमा आपल्याला आपल्या आयुष्यात अटीतटीच्या प्रसंगी, निर्णायक वेळी, भावनात्मक प्रसंगात आपण वयाने कितीही मोठे झालेलो असलो तरी आपल्याला आठवत असते, म्हणजेच आपली आई आठवत असते. अशा प्रसंगात न कळत आपण आईचे मनन करतो, तिच्याशी संवाद साधतो आणि या  अटीतटीच्या भावनात्मक प्रसंगात हा संवादच आपल्याला तारुन नेतो. आई घरात नसली किंवा कुठे बाहेर गेलेली असली तर घर आपल्याला खायला उठते. घर एकदम सुनेसुने वाटते आपली आई आपल्या डोळ्यासमोर केव्हा दिसेल असे होऊन जाते. आईची शिकवण, आईच्या हातचे जेवण, आईने मायेने फिरविलेला डोक्यावरून हात तसेच आईने मारलेले फटके हे सारे आपल्या आयुष्याला वळण देतात. लहान मुल कुठे चुकत असेल किंवा कुठे त्याला मदतीची गरज असेल किंवा त्याला भाषेतून व्यक्त व्हावयाचे असेल तेव्हा आई त्याला मदत करत असते. आईशी मुलाचा होणारा हा संवाद त्याला आयुष्यभर पुरत असतो म्हणून त्याचे आईशी घट्ट नाते बनते. म्हणजे याचा अर्थ असा नसतो की, त्या मुलाचे वडिलांशी नाते घट्ट बनत नाही, वडिलांशीही त्याचे नाते घट्ट असते परंतु वडिलांच्या आधी आईशी त्याची भावनिक नाळ जोडल्या गेलेली असल्याने आपल्या मनातली अभिव्यक्ती तो मुख्यतः आईकडेच करत असतो. कारण आई मुलाचे कौतुक तर करतच असते शिवाय वेळप्रसंगी त्याच्या पाठीशी ठाम उभे राहून त्याला आधार देत असते. छोट्या छोट्या गोष्टीच्या माध्यमातून छोट्याशा शामचा सानेगुरुजी पर्यंतचा प्रवास हा आईमुळेच शक्य झाला म्हणून ‘श्यामची आई’ हे पुस्तक मराठीतील अजरामर पुस्तक होऊन जाते. येथे आई महत्त्वाची आहे, कारण आईने आकार दिला नसता तर ते मुल आकारहीन झाले असते. आकार दिला म्हणूनच त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास झाला. म्हणून प्रत्येक कवी लेखक किंवा व्यक्तीही सतत आपल्या आईविषयीची  कृतज्ञता नेहमी व्यक्त करीत असते. ‘माय’ या कवितेतही डॉ. मिलिंद बागुल यांनी आपल्या माय विषयीचे वर्णन केलेले आहे. 

माय’ या कवितेत कवी मिलिंद बागुल हे आपल्या आईशी आत्मसंवाद साधत आहे. सहज एका क्षणी आईच्या चेहऱ्याकडे बघितल्यावर  कवीला त्याची आई म्हणजेच  माय आता म्हातारी झालेली आहे, तिच्या चेहऱ्यावर सुरकुत्या आलेल्या आहेत हे दिसते. आणि त्यातून कवीला आपला संबंध भूतकाळ आठवतो. मायन घरासाठी केलेले कष्ट आणि त्यासाठी सोसलेले बापाचे शोषण या सर्वांचा ताळेबंद यानिमित्ताने कवीच्या मनात सुरु होतो. कवी हा एका गरीब, दरिद्री कुटुंबात जन्माला आलेला आहे. गरिबीचा संसार रेटताना कवीच्या मायन कवीला कधीही दारिद्र्याची चटके अनुभवू दिले नाही. त्यासाठी तिने प्रचंड काबाड कष्ट केले. लाकडाचे भारे वाहिले. शेतात मजुरी करून कष्ट उपसले, स्वतः उपाशी राहून स्वतःच्या मुलांना कधीही उपाशी ठेवले नाही हे करण्यामागे कवीच्या आईची एक विशिष्ट भूमिका होती आणि ती भूमिका म्हणजे अशी होती की आपल्या मुलांनी सुशिक्षित व्हावे, चांगले शिक्षण घ्यावे. शिक्षणापासून वंचित राहू नये कारण तिला माहिती होते की शिक्षण नसेल तर घरात अज्ञानाचा अंधार असतो, दारिद्र्याचा अंधार असतो.  जी परिस्थिती आज आपली आहे त्याच परिस्थितीत आपल्याला जगावे लागते म्हणून मग शिक्षण जर घेतले तर घरातला अंधार जाऊन दारिद्र्याचा अंधार जाऊन आपण उजेडाच्या सावलीत येतो. आहे ती परिस्थिती बदलून टाकतो. आज आपण हे जे लाकडाचे भार वाहत आहोत किंवा स्वतःचे आपले पोट जाळून आपल्या मुलांना भाकरी पुरवत आहोत ते केवळ यासाठीच की, जर मुलांनी व्यवस्थित शिक्षण घेतले तर आपल्याला येणाऱ्या भविष्यात चांगले दिवस बघायला मिळतील. त्याशिवायही शिक्षणाने आपले मूल हे सुशिक्षित तर होईलच परंतु त्याचबरोबर एक माणूस म्हणूनही तो या समाजात महत्त्वाचा घटक बनेल. अन्यथा आपल्यासारखेच दारिद्र्याचे शिवाय उपेक्षेचे जीवन त्याच्या वाटेला येईल.

कवीचा एकंदर आईशी होणारा संवाद जर पाहिला तर असे लक्षात येते की, कवीच्या आईने मुलांच्या शिक्षणासाठी प्रचंड खस्ता खाल्लेल्या आहेत, प्रसंगी बापाशीही भांडण केलेली आहेत, त्याशिवायही आजूबाजूच्या ज्या शेजारी असलेल्या मैत्रिणी असतील किंवा सख्या असतील त्यांच्याशीही तिने वाद घातलेला आहे. कदाचित त्या म्हणत असतील की, तू स्वतःचे पोट जाळून, एवढे कष्ट करून मुलांना शिक्षण का देतेस ? त्यापेक्षा त्यांना कामाला पाठव म्हणजे चार पैसे घरात येतील आणि तुमचा संसार सुखाचा होईल. परंतु कवीची आई मात्र अशा भुलथापांना बळी पडत नाही ती आपल्या भूमिकेवर ठाम आहे, कारण तिला माहिती आहे की, आपण जर आज कष्ट केले आणि मुलांनी जर व्यवस्थित शिक्षण घेतले तर उद्याचा येणारा दिवस हा सुवर्ण असेल म्हणून,

“आज तिला आलेल्या सुखाच्या दिसात

तमाम सनातण्यांना तिच सुख पाहवत नाही

 तिनं अन तिच्या मेळ्यातल्या स्त्रियांनी

 शिकवलेल्या आपल्या मुलांना धनसंपत्ती समजून

 चष्म्यातून डोकावताना त्यांच्या आसवांशी, संवाद साधताना”

 कवीला हे दिसून येते की, मायच्या स्वप्नाला आकार आलेला आहे. तिने आपलेच मुलं नाही तर आपल्या सख्या सोयऱ्याच्या मुलांचाही विचार केलेला आहे. ज्यांनी मायची गोष्ट ऐकली आहे किंवा त्यांनी मायेचा सल्ला ऐकलेला आहे अशा सर्वांनी मुलांना शिक्षित केले, सुशिक्षित केले आणि हि सुशिक्षित पिढी जेंव्हा नोकरीवर चांगल्या पदांवर पोचली त्यांना सोन्याचे दिवस आले. परंतु ज्यांनी आजपर्यंत मायचं ऐकलेलं नव्हतं ते मात्र आहे त्या परिस्थितीतच जगताहेत. कवीला असे दिसून येते की, आता ते मायचं न ऐकल्याबद्दलचा पश्चाताप करत आहे परंतु प्रसंगी त्यांनी जर मायचा सल्ला ऐकला असता तर आज त्यांची ही मुलं किंवा त्यांची ही परिस्थिती निश्चितच बदलली असती.

सदर कवितेत कवीने आपल्या आईचं यथार्थ वर्णन केलेल आहे तिच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेल्या आहेत, केस झिंगून गेलेले आहेत, बापाच्या शोषणाने तिच्या शरीरावरील बदलही त्याने नेमकेपणाने टिपलेले आहेत. ‘मायन शिक्षण हे पोट समजून’ आपल्या मुलांना शिक्षणाचे महत्व सांगितले किंबहुना त्यांना कवी म्हणतो त्याप्रमाणे,

“शिक्षणाची एक एक पायरी,

माझ्याकडून पार करीत,

पोटातल्या आकांताला आतल्या आत शांत करीत

माझ्यातल्या मला घडवीत राहिली.”

हे जर तिने केले नसते तर आज कवीसाठी परिस्थिती वेगळी असती याचे कवीला भान आहे. म्हणूनच तर तो स्वतःचे आत्मपरीक्षण करतो ते असे की ,

“मला मी विचारीत असतो,

लाकडाचा भारा, ज्वारीचा वाटा,

यातल्या हिश्याशी कितपत प्रामाणिक राहत असतो.”

प्रामाणिक रहावेच लागेल. कारण मायन केलेला तो संस्कार आहे. मायचा हा संस्कार हा विचारच कवीच्या कवितेचे केंद्र आहे.  

सदर कविता ही विलक्षण आहे. कवितेत कवीचा आत्मसंवाद आहे आणि हा आत्मसंवाद तो आईकडे पाहून करत आहे . आईकडे पाहत असताना त्याच्या मनातला हा संवाद म्हणजेच ही कविता आहे. यात आईची कुठेही प्रतिक्रिया येत नाही उलट मायचा मुलगा हा मायची काळजी घेत घेत आत्मसंवाद करतो आहे आणि त्यामुळे या सबंध कवितेला एक विलक्षण धार प्राप्त होते. कवी इतिहासात जातो बालपणापासून ते आतापर्यंतचा त्याचा प्रवास क्षणात त्याच्या डोळ्यासमोर तरळतो. आणि त्यावेळेस त्याच्या मायला घेतलेले कष्ट आणि या कष्टामुळे आज आपल्याला मिळालेले चांगले दिवस याचा ताळेबंद तो करत आहे. जरी माय म्हातारी झालेली असली तिच्या चेहऱ्यावर सुरकुत्या येत असल्या, तिचे केस झिंगून गेलेले असले तरी कवीला त्याची माय ही जणू काही तारुण्यातली जी सुंदरता त्याने पाहिलेली होती अगदी तशीच ती त्याला या कवितेमध्ये दिसते म्हणून ही कविता महत्त्वाची आहे.

८ टिप्पण्या:

  1. खूप छान समिक्षात्मक मांडणी

    उत्तर द्याहटवा
  2. सुंदर, अर्थपूर्ण आणि वाचनीय रसग्रहण

    उत्तर द्याहटवा
  3. उत्तम समीक्षा आई मुलाच्या भावनिक संवाद, आईची मुलांविषयी काळजी,आईमुलाच्या भावनिक संवाद वाचकांच्या मनाला स्पर्श करतात , उत्तम काव्य तेवढीच दर्जेदार समीक्षा... दोघांचे हार्दिक अभिनंदन...

    उत्तर द्याहटवा
  4. अतिशय सखोल आणि मर्मग्राही रसग्रहण सर....

    उत्तर द्याहटवा
  5. या ब्लॉग विषयी डॉ. मिलिंद बागुल यांना whats app वर आलेल्या प्रतिक्रिया

    प्रतिक्रिया :
    “संदर्भ माझ्या जातीचे शोधणारा कवी : मिलिंद बागुल” हा लेख वाचताना मन अतिशय अंतर्मुख झाले. मिलिंद बागुल यांच्या कवितेतून व्यक्त होणारी वेदना, संघर्ष आणि आत्मभान लेखकाने अत्यंत संवेदनशीलपणे मांडले आहे. विशेषतः ‘माय’ ही कविता वाचताना आईच्या त्यागाची, मायेची आणि कष्टांची जाणीव अधिक तीव्रतेने होते. हा लेख केवळ कवीची ओळख करून देत नाही, तर वाचकाला स्वतःच्या मुळांशी, समाजाशी आणि वास्तवाशी संवाद साधायला भाग पाडतो. अशी अभ्यासपूर्ण, भावस्पर्शी आणि सामाजिक जाणिव जागवणारी मांडणी वाचकांसाठी प्रेरणादायी आहे. या दर्जेदार लेखासाठी लेखकाचे मनःपूर्वक अभिनंदन.

    ✍️✍️✍️✍️
    महादेव एस लांडगे
    सावरगाव तेली
    लोणार सरोवर

    उत्तर द्याहटवा
  6. Sir ही कविता खूप उत्कृष्ट आहे. मला तुमची "माय" ही कविता खूप आवडली आहे. एखादा व्यक्ती यशस्वी होतो तर त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, कोणत्याच प्रकारचा पाठिंबा त्या व्यक्तीच्या मागे नसतो, परंतु त्या व्यक्तीसोबत सर्वात महत्वाचा पाठिंबा म्हणजे त्या व्यक्तीचे आईवडील असतात, आणि विशेषतः त्या व्यक्तीची आई असते की जी स्वतः अनेक अडचणींचा सामना करते , कधीकधी आपल्या मुलांसाठी स्वतः उपाशी राहते परंतु आपल्या मुलाच्या शिक्षांमध्ये कधी अडचण उत्पन्न होऊ देत नाही. लहानपणापासून मुलांवर चांगले संस्कार घडवणारी आईच असते. काही वेळा अनेक दुसरे व्यक्ती त्या आईला सांगतात की , शिक्षण घेऊन काय होणार आहे? काम केलं तर दोन वेळेचं जेवण सुखाने मिळेल परंतु आई या सर्व गोष्टींना दूर ठेवते आणि आपल्या मुलाच्या शिक्षणाकडे लक्ष देते कारण लोकांना हे नाही समजत की आज काम केल्याने चांगल जेवण मिळेल,परंतु जर भविष्यात स्वाभिमानाने जीवन जगायचं असेल, गरिबीतून निघायचं असेल, झोपडीतून महालात जायचं असेल, आपली एक नवीन ओळख निर्माण करायची असेल तर ती एकच गोष्ट करू शकते आणि ते म्हणजे शिक्षण. हे तुमच्या आईंना चांगल्याप्रकारे समजलेले आहे आणि म्हणून आज आम्हाला इतके चांगले शिक्षक, लेखक, कवी ,मुख्याध्यापक डॉ.मिलिंद बागुल सर लाभलेले आहेत. तुमच्या कवितेतून आई काय असते हे समजते, आईंचा मुलगा जर यशस्वी झाला तर त्या आईला किती आनंद होत असेल हे तुमच्या कवितेतून कळते.व्यक्तीच्या यशस्वी होण्यामागे त्या व्यक्तीच्या आईची खूप महत्वपूर्ण भूमिका असते हे तुमच्या कवितेतून कळते.
    आजकालचे मुलं यशस्वी झाल्यानंतर स्वतःच्या आई-वडिलांनाच विसरून जातात, ज्या आईने लहानच मोठ केलेलं असतं , नऊ महिने नऊ दिवस पोटात ठेवलेलं असतं त्या आईलाचं विसरून जातात मग ती म्हातारी झाली तर काय झालं?तिचे कष्ट विसरून जातात ही भावना तुमच्या कवितेतून जाणवते.
    डॉ.बाबासाहेब आंबेडकर लहान असताना त्यांच्यासोबत ही कोणीच नव्हतं, त्या काळात तर अस्पृश्य समाजातील लोकांनी शिक्षण घेणं हे पाप मानल जात होत परंतु एकट्या व्यक्तीने पूर्ण भारत बदलवून दाखवलेला आहे , जातपात, अन्याय , बालविवाह अशा अनेक गोष्टींचा संघर्ष त्यांनी केलेला आहे.आज आपल्याला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक सोईसुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत आपण शिक्षण घातलाच पाहिजे आणि या समाजात, या देशात स्वतः ची एक नवीन ओळख निर्माण केलीच पाहिजे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रत्येक संघर्षात भिमाई जोपर्यंत होत्या तोपर्यंत बाबासाहेबांची ताकद बनून राहिल्या होत्या, बरेचशे लोकं फक्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयीच वाचतात परंतु त्यांच्या आई वडिलांचा संघर्ष देखील खूप मोठा आहे.
    सर तुमची कविता या सर्व गोष्टींची आठवण करून देते , मला तुम्ही लिहलेले "माय" ही कविता खूप आवडली आहे.आणि मी ही कविता ज्यांना शक्य होईल त्यांना पोहचवण्याचा प्रयत्न नक्कीच करेल.
    I really like the poem you wrote✍️

    उत्तर द्याहटवा
  7. "जय भीम सर🙏" आज आमच्या जवळ तुमच्यासारखे महान शिक्षक आहेत हे बघून आनंदही होतो आणि अभिमानही वाटतो.
    तुम्ही चांगले शिक्षक आहातच , मुख्याध्यापक आहात,कवी आहात आणि लेखक आहात , तुम्ही लोकांच्या मनामध्ये जागरूकता आणण्याचा प्रयत्न करत आहात ही खूप मोठी गोष्ट आहे💐🙏🌹

    उत्तर द्याहटवा

जागतिकीकरण आणि आदिवासी

  जागतिकीकरण आणि आदिवासी डॉ . अक्षय किशोर घोरपडे. ·        गोषवारा  (Abstract) :- १९९० नंतरचा कालखंड हा भारतीय समाज जीवनात फार मोठा सा...