मंगळवार, १६ डिसेंबर, २०२५

कुब्जा - इंदिरा संत

 

पाव्याच्या मंजुळ स्वरांनी भावविभोर झालेली कुब्जा 

                  अक्षय घोरपडे.


कुब्जा 
     इंदिरा संत


अजून नाही जागी राधा,

अजून नाही जागें गोकुळ;

अशा अवेळीं पैलतिरावर

आज घुमे कां पावा मंजुळ.

 

मावळतीवर चंद्र केशरी;

पहाटवारा भवती भणभण;

अर्ध्या पाण्यामध्ये उभी ती

तिथेच टाकुन अपुलें तनमन.

 

विश्वच अवघे ओठां लावू

कुब्जा प्याली तो मुरलीरव;

डोळ्यामधुनी थेंब सुखाचे :

"हे माझ्यास्तव.... हें माझ्यास्तव...."

 

इंदिरा संत यांची ही एक प्रभावी प्रेमकविता. इंदिरा संतांच्या कवितेचे वैशिष्ट्य असे की, प्रेमातील विरह भावनेचा त्यांची कविता उत्कट आविष्कार घडवत असते. प्रेमातील समर्पण आणि एकरूप होण्याच्या अवस्थेचा प्रत्यय त्या त्यांच्या कवितेतून देत असतात. सदर कविताही याच भावअवस्थेला उजागर करते.

सौजन्य : श्री. रवी माळी


सदर कवितेत कुब्जेच्या मानसिक पातळीवरील प्रेमभावनेचे चित्रण आलेले आहे. कुब्जा ही कुरूप स्त्री. तिच्या कुरूपतेमुळे समाजाकडून तिची उपेक्षा व अहेलना होत असते. परंतु या सर्वांकडे दुर्लक्ष करून ती कृष्णभक्तीत, कृष्णनामस्मरणात एकरूप झालेली आहे. तिला ना राधा माहित आहे. ना गोकुळ. तिला फक्त कृष्ण माहिती आहे. कृष्णाच्या प्रेमात ती आकंठ बुडालेली आहे. आणि त्याच्या पाव्याच्या मंजुळ स्वरांनी ती भावविभोर होते. तिच्या चित्तवृत्ती जागृत होतात आणि पारलौकिक अशा मनोमिलनाचे सुख ती अनुभवते. 'हे माझ्यास्तव... हे माझ्यास्तव...' असे म्हणून ती त्यावर आपला हक्क सांगते आणि त्याचबरोबर हे ऐवढे जरी अनुभवता आले तरी आपला उद्धार झाला असे तिला वाटते.

 

'कुब्जा'कवितेचे भाषिक सौंदर्य आणि चिंतनशिलता

प्रीतिभावनेची वैश्विकता आणि अमूर्तता स्पष्ट करणारी ही कविता आहे. सदर कवितेचा आकृतिबंध चार ओळींचे तीन कडवे असा आहे. त्यातही प्रत्येक कडव्यात दुसऱ्या आणि चौथ्या ओळीत यमक साधलेले आहे. तिसऱ्या कडव्यातील शेवटची ओळ "हे माझ्यास्तव... हे माझ्यास्तव..." कवितेला उंच स्वरावर नेऊन कविता संपवते.

सदर कविता ही पारंपरिक प्रीती कवितेला नाकारणारी आहे. या कवितेत कुब्जेच्या भावअवस्थेचे चित्रण आलेले आहे. 'मावळतीवर चंद्र केशरी; पहाट वारा भवती भणभण' या ओळीतून काळाचे सूचन होते. हा काळ पहाट उजेडण्यापूर्वीचा आहे. ही वेळ खरे तर साखर झोपेची अशा अवेळी कुब्जेला पैलतीरावरून पाव्याचा मंजूळ स्वर कानी येतो. या मंजूळ स्वराने तिला स्थिती प्राप्त होते. ती जिथे असते 'तिथेच टाकून आपले तनमन/विश्वच अवघे ओठा लावत/कुब्जा प्याली तो मुरलीरव' त्या एका क्षणाने तिचे आयुष्य सार्थक होते. 'डोळ्यामधुनि थेंब सुखाचे' ओघळतात आणि 'हे माझ्यास्तव... हे माझ्यास्तव...' असे म्हणून ती कृतकृत्य होते.

वास्तविक कुब्जा ही कुरूप. आणि कृष्ण तर देखणा पूर्ण पुरुष. गोकुळातील त्याच्या लीळा आणि रासक्रीडामुळे त्याची वदंता सर्वदूर पोहचलेली. अशा या कृष्णावर कुब्जा भाळलेली. त्याला सर्वस्व मानणारी आणि त्याच्या भेटीच्या एका क्षणात आपले आयुष्य उजळून निघणार आहे याची पक्की जाणीव असलेली. कुब्जा म्हणूनच समाजाकडूनही उपेक्षित आहे. कृष्णचरित्रात कृष्ण मथुरेला जाताना कुब्जेची आणि कृष्णाची दृष्टीभेट होते आणि त्यातूनच कुब्जेचे कुरूपपण निघून जाऊन ती सुंदर होते असा उल्लेख आहे. कवयित्रीने मात्र कृष्ण आणि कुब्जा यांच्या कथेला एक नवा आयाम दिला आहे. कवितेत फक्त कुब्जेची भावावस्था येते. यात कुब्जेने स्वतःचे कुरुपपण स्वीकारून कृष्णशी ती आत्मिक पातळीवर एकरूप झालेली आहे. 'अर्ध्या पाण्यामध्ये उभी ती/तिथेच टाकून आपले तनमन' कवितेतल्या या ओळी कुब्जेच्या जाणीव व नेणीवच्या सीमारेषेवरील भावस्थितीचे चित्रण करतात. कवितेतला 'घुमे पावा मंजूळ' म्हणजे कृष्णाविषयीची ऐकीव माहिती आणि ही ऐकीव माहिती तिला कृष्णाविषयीची ओढ निर्माण करते. हाच तो मुरलिरव आहे. (रव म्हणजे आवाज) हा कृष्ण आपल्याला भेटणार नसला तरीही त्याच्याविषयीच्या ऐकीव माहितीने ती संपृक्त होते आणि विरहातील ओढीने आसक्तही होते. अशावेळी आपल्यासाठी फक्त ही विरहातील ओढ आहे. या जाणिवेने ती सुखी होते.

सौजन्य : डॉ. विजयेंद्र पाटील


ना राधा जागी आहे, ना गोकुळ जागी आहे. तरीही अवेळी कृष्ण पावा वाजवत आहे. आज त्याच्या पाव्याचा स्वर ना राधेसाठी आहे ना गोकुळासाठी आहे. वास्तविक त्याच्या पाव्याचा स्वर ऐकून प्राणीमात्रांसह निसर्गही मंत्रमुग्ध होतो. त्याच्या मंजुळस्वरात सर्वच रममाण होतात. आपले अस्तित्व विसरून मंजुळ स्वरात विलीन होतात, सर्वच कृष्ण होतात. परंतु आज कृष्णाच्या पाव्याचा मंजुळ स्वर कुणाच्याही कानी पडत नाही. निसर्गसृष्टीसह सर्वच साखरझोपेत आहेत. का ही कृष्णाची लीला आहे. कृष्ण हा पूर्ण पुरुष आहे. अवतारसिद्ध असल्याने त्याला हेही माहिती आहे की, पैलतिरावर कुब्जा कृष्ण ओढीने अर्ध्या पाण्यामध्ये उभी ती तिथेच टाकुन अपुलें तनमन. आहे. आणि आज हाच पावा फक्त कुब्जेसाठी स्वरांकित आहे. कुब्जेसाठी कृष्णालाही अवेळी पावा वाजवावा लागतो. म्हणजे याचा अर्थ असा की, कृष्ण ही लोकलज्जेला घाबरला का ? की कृष्णालाही कुब्जेला स्वीकारण्याची भीती वाटते का ? तर असे नाही आणि कवयित्रीलाही असे सुचवायचे नाही. समाजात सौंदर्याची व्याख्या ही व्यक्तिपरत्वे बदलत असली तरी सौंदर्य म्हणजे देखणेपण हा समज प्रचलित आहे त्यामुळे कुब्जेसारखी व्यक्ती समाजाच्या सौंदर्याच्या व्याख्येवर उतरत नाही. कुब्जेने कृष्णावर प्रेम करावे आणि कुब्जेवर कृष्णाने प्रेम करावे हे समाजाला रुचत नाही. कृष्ण फक्त आमचा आहे असे म्हणून ते कृष्णावर हक्क बजावतात. आणि त्याला बंदिस्त करतात. ते हे विसरतात की कृष्ण सर्वांचाच आहे तो जितके सौंदर्यावर प्रेम करतो तितकेच कुरूपतेवरही करतो. त्यामुळे राधेचे जागे नसणे गोकुळचे जागे नसणे म्हणजे कृष्णाचे कुरूपतेवरही प्रेम आहे याचे भान नसणे होय. सदर कवितेत कवयित्रीने या सर्वच भावनांचे सूचन केलेले आहे.    

  टीप : सदर ब्लॉगसाठी श्री. रवी माळी आणि  डॉ. विजयेंद्र पाटील यांनी कृष्णाचे फोटो उपलब्ध करून दिले त्याबद्दल त्यांचे धन्यवाद ! कृष्णाच्या फोटोच्या खाली सौजन्य म्हणून या दोघांची नावं टाकलेली आहेत. 

1 टिप्पणी:

  1. अभ्यासपूर्ण विवेचन केल आहे सर आपले समीक्षात्मक लेखन खूप दर्जेदार आहे

    उत्तर द्याहटवा

जागतिकीकरण आणि आदिवासी

  जागतिकीकरण आणि आदिवासी डॉ . अक्षय किशोर घोरपडे. ·        गोषवारा  (Abstract) :- १९९० नंतरचा कालखंड हा भारतीय समाज जीवनात फार मोठा सा...