०५ नोव्हेंबर : मराठी रंगभूमी
दिवस
मराठी नाटक प्रारंभ ते १९९५
०५ नोव्हेंबर हा दिवस मराठी रंगभूमी दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्ताने मराठी नाट्य लेखक व नाट्य कलावंतांना मनःपूर्वक शुभेच्छा !!
या दिवसाचे औचित्य साधून आपण आजच्या ब्लॉगमध्ये मराठी रंगभूमीचा किंबहुना मराठी नाट्य वाङ्मयाचा आढावा घेणार आहोत.
⭐नाटक आणि रंगभूमी
नाटक आणि रंगभूमी या दोन स्वतंत्र संकल्पना आहेत. नाटक हे नाट्यसंहितेशी निगडित आहे, तर रंगभूमी ही नाटकाच्या प्रयोगाशी निगडित आहे. नाट्यसंहितेचा प्रयोग रंगभूमीवर होत असतो. नाटककार नाटक लिहितो म्हणजेच तो संहिता तयार करतो आणि त्या संहितेचा प्रयोग हा रंगभूमीवर सादर होत असतो. तसेच रंगभूमीवर प्रयोग सादर होतो म्हणून नाटककार नाट्यसंहिता लिहितो असेही आपल्याला म्हणता येते. या अनुषंगाने विचार केला तर नाटक आणि रंगभूमीचा संबंध आणि इतिहास हा खूप प्राचीन आणि नाटक संहिता आधी की रंगभूमी आधी या वादग्रस्त प्रश्नावर जाऊन संपू शकतो. या प्रश्नाचा फारसा विचार न करता आपण रंगभूमी म्हणजे नाटक हा रूढ झालेला अर्थ गृहीत धरून आणि उपलब्ध संदर्भ ग्रंथांच्या आधारे मराठी नाट्य इतिहासाचा आढावा घेणार आहोत.
मराठी नाट्य वाङ्मयाचा इतिहास हा कालखंडानुसार आरंभ ते १८८०, १८८० ते १९२०, १९२० ते १९५०, १९५० ते १९९० असा केला जातो. आपणही याच पद्धतीने नाट्य वाङ्मयाचा इतिहास तपासणार आहोत.
वर्तमान पातळीवर प्रादेशिक अंगाने विचार केला तर मराठी नाटक हे आज स्वतंत्रपणे विकसित झालेले असले तरी मराठी नाटकांच्या पूर्वीही आपल्याला भारतात नाट्य परंपरा दिसून येते. साधारणपणे इसवी सन पूर्व २०० ते इसवी सन २०० हा कालखंड भरतमुनीच्या नाट्यशास्त्राच्या जडणघडणीचा कालखंड मानला जातो. आपल्या नाट्यशास्त्रात भरतमुनींनी नाटकाविषयीचे अतिशय सविस्तर आणि दीर्घ विवेचन केलेले आहे. रंगभूमी अस्तित्वात होती त्यातूनच हे विवेचन अस्तित्वात आलेले असावे किंबहुना नाट्यपरंपरेचा इतिहास आणि मागोवा घेऊन भरतमुनींनी नाट्यशास्त्राची रचना केली आहे. असे आपल्याला म्हणता येते. कारण आधी भाषा येते नंतर व्याकरण तोच संबंध येथेही लावता येतो.
“अंगी कलांचा व्यक्तिशः किंवा समुदायाने अविष्कार करण्याची भूमी किंवा स्थान म्हणजे रंगभूमी” विश्वकोशात असलेली ही रंगभूमीची व्याख्या लक्षात घेतली तर केवळ संस्कृत नाटकच नव्हे तर रंगभूमीशी निगडित असलेले विविध लोक कलाप्रकार आपल्याला दिसतात. यात गोंधळ, दशावतारी खेळ, लळीते, दंडार, भारुड, बहुरूपी आणि तमाशा या लोककला प्रकारात आपल्याला मराठी रंगभूमीची बीजे दिसून येतात. संस्कृत रंगभूमीच्या आधीही हे लोक कलाप्रकार अस्तित्वात होते आणि आज मराठी रंगभूमी विकसित झाल्यावर ही हे लोककलाप्रकार जीवनामध्ये अस्तित्वात आहेत.
⭐मराठीतले ‘पहिले नाटक’
मराठी रंगभूमीच्या आरंभाविषयी मराठी समीक्षकांमध्ये मतभेद दिसून येतात. “कै. विष्णुदास भावे यांनी ५ नोव्हेंबर १८४३ रोजी सांगली येथे सांगलीचे संस्थानिक अप्पासाहेब पटवर्धन यांच्या उपस्थितीत ‘सीता स्वयंवर’ या नावाचा दशावतारी ‘खेळ’ सादर केला. या घटनेच्या आधारे सांगली हे मराठी नाटकाचे ‘माहेरघर’ कै. विष्णुदास भावे हे मराठी नाटकाचे ‘जनक’ आणि ‘सीता स्वयंवर’ हे मराठीतले ‘पहिले नाटक’ ही समजूत रूढ झाली आहे. ही समजूत दृढ व्हावी म्हणून ५ नोव्हेंबर हा मराठी रंगभूमीचा वर्धापन दिन आहे असे गृहीत धरून हा दिवस साजरा करण्याची प्रथा ही रूढ झालेली आहे.”( प्रा. दत्ता भगत, मराठी नाटक आणि रंगभूमीचा इतिहास, पृ.२९) प्रा. दत्ता भगत यांनी अतिशय सविस्तरपणे मराठी रंगभूमीच्या आद्यत्वाविषयीची चर्चा केलेली आहे. यासाठी त्यांनी काही कसोट्याही लावलेल्या आहेत त्यात कालप्रमाण आणि नाट्यसंहिता या दोन कसोट्यांचा विचार केला तर त्यांनी पुढील प्रश्न उपस्थित करून मराठी नाटकाचे आद्यत्व ठरवायचे कसे यासंदर्भातील विवेचन केले आहे. त्यांच्या मते
१. लक्ष्मीनारायण कल्याण इ स.१६८४
२. सं. सीता स्वयंवर इ. स.१८४३
३. प्रबोध चंद्रोदय इ.स. १८५१
४. तृतीय रत्न इ. स.१८५५
५. व्यवहारोपयोगी नाटक इ स १८५६
६. नाटक थोरले माधवराव पेशवे याजवर इ. स.१८६१.
वरीलपैकी कोणते नाटक पहिले नाटक होय ? असा ते प्रश्न उपस्थित करतात आणि त्या प्रश्नाचे उत्तरही अतिशय तार्किकपणे देतात. त्यांच्या मते
⭐'लक्ष्मीनारायण कल्याण 'मराठी रंगभूमीवरील उपलब्ध पहिले नाटक कारण या नाटकाचे हस्तलिखित उपलब्ध आहे. परंतु याचा प्रयोग झालेला आहे किंवा नाही याविषयीची माहिती उपलब्ध नसल्याने हस्तलिखित असलेले पहिले उपलब्ध नाटक म्हणून याचा उल्लेख करता येतो.
⭐दशावतारी खेळाच्या आधारे रंगभूमीवर सादर झालेले 'सीता स्वयंवर' हे पहिले व्यावसायिक नाटक आहे.
⭐'प्रबोध चंद्रोदय' हे पहिले रूपांतरित नाटक.
⭐महात्मा फुले यांचे 'तृतीय रत्न' हे नाटक पहिले आधुनिक नाटक होय.
⭐'व्यवहारोपयोगी नाटक' नाटक रूप निबंध आहे.
⭐'नाटक थोरले माधवराव पेशवे याजवर' हे पहिले ऐतिहासिक नाटक होय.
अशी मांडणी प्रा. दत्ता भगत यांनी केलेली आहे. आणि ही मांडणी आदर्श मांडणी म्हणून ठरवता येते. जिज्ञासूंनी अवश्य ही मांडणी सविस्तरपणे अभ्यासावी.
⭐ बुकिशनाटके आणि भाषांतरित नाटकं
साधारणपणे १८ व्या शतकात सुरू झालेल्या मराठी रंगभूमीचा कालखंड हा अतिशय संघर्षाचा होता. नाटक म्हणून अस्तित्व निर्माण करण्यासाठीची धडपड या कालखंडामध्ये दिसून येते. विष्णुदास भावे यांच्या संगीत सीता स्वयंवर पासून प्रेरणा घेऊन पौराणिक नाटकांची लाटच या कालखंडात आली. या पौराणिक नाटकांबरोबरच बुकिश नाटके ही या काळात आली. बुकांच्या स्वरूपात प्रथम प्रसिद्ध होणारी नाटके ती बुकिश नाटके होय. ही बुकिश नाटके प्रसिद्ध होण्याच्या आधीपासूनच मराठीमध्ये संस्कृत नाटकांची भाषांतरे होण्यास सुरुवात झाली होती. हा कालखंड अव्वल इंग्रजी राजवटीचा कालखंड म्हणून ओळखला जातो. या काळात शाळा महाविद्यालयांमध्ये नवशिक्षित विद्यार्थी इंग्रजी साहित्याच्या अभ्यासाने स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने इंग्रजी नाटकांचे प्रयोग सादर करत असत. त्यामुळे या काळात प्रहसने आणि भाषांतरित नाटकांचे प्रयोग फार मोठ्या प्रमाणात झालेली दिसत नाहीत. खास करून युरोपियन मंडळी शोकात्म अथवा सुखात्म नाटक सादर करत असे नवशिक्षितांसाठी हे सर्व नवे होते आणि म्हणून मग वाचकांनाही ही नाटके उपलब्ध व्हावीत ही प्रेरणा घेऊन आपल्याकडे बुकिशनाटके लिहिली गेली.
⭐१८८० ते १९२० : वैभवपर्व
आरंभापासून ते १८८० पर्यंत मराठी नाटक हे आपल्या अस्तित्वासाठी झुंजत होते. आपापल्या परीने नाट्यतंत्रात बदल करून क्वचित पाश्चात्य नाट्यतंत्राचा आधार घेऊन ते विकसित करून खेळरूपाने सुरू झालेले नाटक हे खऱ्या अर्थाने नाट्यसंहितेच्या अनुषंगाने कसे विकसित होऊन प्रयोगक्षम होईल या दिशेने सर्वांचे प्रयत्न होते. मराठी रंगभूमी ही खऱ्या अर्थाने १८८० नंतरच्या कालखंडात उदयाला आली. १८८० ते १९२० हा कालखंड मुख्यतः संगीत नाटकांचा कालखंड म्हणून ओळखला जातो. या कालखंडाला मराठी नाटकांचे सुवर्णयुग असेही म्हटले जाते.
⭐अण्णासाहेब किर्लोस्कर
अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी दिनांक २१ ऑक्टोबर १८८० साली संगीत शाकुंतल या नाटकाचा प्रयोग केला. या नाटकापासून खऱ्या अर्थाने मराठी रंगभूमीला स्वतःची ओळख निर्माण करता आली. आणि ऐथूनच संगीत नाटकांची सुरुवात झाली. अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी शंकर दिग्विजय, संगीत शाकुंतल, संगीत सौभद्र इत्यादी नाटके रंगभूमीवर आणली. पहिले संगीत नाटककार म्हणून अण्णासाहेब किर्लोस्कर यांचा उल्लेख केला जातो.
⭐गोविंद बल्लाळ देवल
अण्णासाहेब किर्लोस्कर यांचे शिष्य गोविंद बल्लाळ देवल यांनी अण्णासाहेब किर्लोस्करांच्या नाट्यतंत्राला अधिक प्रगत करून संगीत नाटकांना सामाजिकतेची डूब दिली. एक दिवसाची चुकामुक अथवा दुर्गा नाटक, विक्रमोर्वशीय, मृच्छकटिक, झुंजारराव, फाल्गुनराव अथवा तसबीरीचा घोटाळा याचेच पुढे संशयकल्लोळ, शाप संभ्रम, संगीत शारदा अशी नाटके देवलांनी लिहिली. दुर्गा नाटक हे देवलांचे पहिले रूपांतरित नाटक होय. इझाबेल या इंग्रजी नाटकाचे ते मराठी रूप होते. देवलांचे संगीत शारदा हे नाटक सामाजिक नाटक म्हणून ओळखले जाते यात त्यांनी बालाजरठ विवाह या समस्येचा विचार केलेला आहे.
⭐श्रीपाद कृष्ण कोल्हटकर
श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी वीरतनय, मूकनायक, गुप्तमंजुष, मतीविकार, प्रेम शोधन, वधूपरीक्षा, सहचारिणी, परिवर्तन, जन्मरहस्य, शिवपावित्र्य, श्रमसाफल्य, मायाविवाह अशी बारा नाटके कोल्हटकर यांनी आपल्या ती ३४ वर्षाच्या कारकीर्दीत लिहिली आणि रंगमंचावर आणली. कोल्हटकर यांच्या नाटकांचे विशेष असे की, त्यांनी मराठी नाट्यसृष्टीला कल्पनाप्रधान अशा स्वतंत्र नाटकांची देणगी दिली. अद्भुतता, नवलपूर्णता, पद्यांच्या नवीन उडत्या चाली, शब्दनिष्ठ विनोद आणि कृत्रिम कथा हे त्यांच्या नाटकाचे विशेष होय.
⭐कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर
कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी सवाई माधवरावाचा मृत्यू, कांचनगडाची मोहना, कीचकवध, बायकांचे बंड, भाऊबंदकी, प्रेमध्वज, संगीत मानापमान, संगीत विद्याहरण, सत्वपरीक्षा, संगीत स्वयंवर, संगीत द्रौपदी, संगीत मेनका, सवतीमत्सर, संगीत सावित्री, संगीत त्रिदंडी संन्यास इत्यादी नाटकांची निर्मिती केली. खाडीलकर हे राष्ट्रीय प्रवृत्तीचे नाटककार म्हणून ओळखले जातात. आपल्या नाटकांना इतिहासाचा संदर्भ देऊन वर्तमानाशी त्याची नाळ जोडणारे नाटककार ते आहेत. उदाहरण म्हणून कीचकध या त्यांच्या नाटकाचा उल्लेख करता येतो.
⭐राम गणेश गडकरी
राम गणेश गडकरी यांनी प्रेमसंन्यास, पुण्यप्रभाव, एकच प्याला, भावबंधन अशी अगदी थोडकीच नाटके आपल्या प्रतिभेच्या बळावर यशस्वी केली. गडकरी हे कवीमनाचे नाटककार म्हणून ओळखले जातात. एकच प्याला या त्यांच्या नाटकाने मराठी नाटकात शोकात्मिकेची सुरुवात केली.
⭐१९२० ते १९५० : आव्हानपर्व
१९२० ते १९५० हा कालखंड मराठी नाटकासाठी संघर्षाचा आणि आव्हानाचा कालखंड आहे. या कालखंडात भारतीय स्वातंत्र्य चळवळ ही जोरदार सुरू झालेली होती. याच काळात सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय पातळीवर मोठ्या प्रमाणात वादविवाद आणि नवनवीन संकल्पनांची निर्मिती होत होती. भौतिक विज्ञानाच्या पातळीवर विचार केला तर तंत्रज्ञानातही प्रगती या काळात झाली. आणि या सर्वांचा दूरगामी परिणाम हा या कालखंडातील मराठी नाट्यसृष्टीवर पडला. संगीत नाटकाकडे वळालेला प्रेक्षक हा ग्रामोफोन, आकाशवाणी, चित्रपट इत्यादी निर्माण झालेल्या माध्यमामुळे नाट्यसृष्टीपासून दूर जाताना दिसतो. चित्रपटांनी मराठी नाटकांसमोर मोठे आव्हान निर्माण केले चित्रपटात मिळणारे मानधन हे नाटकाच्या तुलनेत जास्त असल्याने नाटकातील कलावंतही चित्रपटसृष्टीत काम करण्यास प्राधान्य देत होते. या सर्व आव्हानांना तोंड देत मराठी नाट्य रंगभूमी तग धरून राहिली ती पुढील नाटककारांमुळे.
⭐भा.वि.वरेरकर
भा.वि.वरेरकर यांनी सुमारे ५० नाटके लिहिली. त्याशिवाय ते कादंबरीकार आणि आत्मचरित्रकार आहेत. वरील करांना वरेरकरांना दीर्घायुष्य लाभल्यामुळे जवळपास तीन पिढ्यांचे साक्षीदार असा मकरंद साठे यांनी त्यांचा उल्लेख केला आहे. वरेरकरांच्या गाजलेल्या नाटकात हाच मुलाचा बाप, भूमिकन्या सीता, सत्तेचे गुलाम, तुरुंगाच्या दारात, संन्याशाचा संसार इत्यादी नाटकांचा उल्लेख करता येईल. वरेरकरांनी नाटकांच्या कथानकात वास्तवता आणली. संवादात भाषा सुबोध असावी याची काळजी घेतली. त्याशिवाय नाटक हे व्यावसायिक आहे याची त्यांना जाणीव असल्याने स्वतःचा प्रेक्षक वर्ग डोळ्यासमोर ठेवून त्यांनी नाटकांची रचना केली. नाट्यतंत्रात बदल घडवून आणला. पूर्वी दीर्घ चालणाऱ्या नाटकांना त्यांनी कमी कालावधीत बसवले आणि त्याचा परिणाम हा प्रेक्षकांवर झाला.
⭐स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी उ:शाप, संन्यस्त खङ् ग, संगीत उत्तरक्रिया अशी फक्त तीनच नाटके लिहिली. राजकीय नाटककार म्हणून त्यांचा विचार केला जातो.
⭐प्रल्हाद केशव अत्रे उर्फ आचार्य अत्रे
प्रल्हाद केशव अत्रे उर्फ आचार्य अत्रे यांचाही उल्लेख या कालखंडात करावा लागतो. वास्तविक १९५०नंतरही आचार्य अत्रे यांनी नाटके लिहिलेली आहेत. आणि विशेष म्हणजे ही नाटके गाजलेली नाटके आहेत. संगीत वीरवचन, घराबाहेर, साष्टांग नमस्कार, उद्याचा संसार, भ्रमाचा भोपळा, लग्नाची बेडी, पराचा कावळा, पाणीग्रहण, कवडी चुंबक, जग काय म्हणेल, वंदे मातरम, मी उभा आहे या नाटकांचा समावेश आपल्याला या कालखंडात करावा लागतो तर १९६० नंतर तो मी नव्हेच, डॉक्टर लागू, बुवा तॆथे बाया, मी मंत्री झालो, प्रीतीसंगम, अशी बायको हवी इत्यादी नाटके त्यांनी लिहिली. अत्रे यांच्या नाटकांचे वैशिष्ट्य असे की, ही नाटके हलकीफुलकी, तशीच गंभीर विषयांनाही हात घालणारी होती. या नाटकांनी मराठी नाट्यतंत्रात बदल घडवून आणला. पूर्वी दीर्घ चालणाऱ्या नाटकांना अत्रे यांनी सुटसुटीत आणि प्रेक्षकांना भावेल, त्यांचे मनोरंजन करेल अशी त्यांची रचना केली. त्यामुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांची पावलं मराठी रंगभूमीकडे वळाली.
या कालखंडात नाट्य मनवंतर या नाट्यसंस्थेचाही आढावा घ्यावा लागतो. इसवी सन १९३० च्या आसपास प्रा. अनंत काणेकर, के. नारायण काळे, वि.वि.वर्तक, डॉक्टर चिटणीस, पार्श्वनाथ आळतेकर या तरुण नाट्यवेड्या अभ्यासकांनी एकत्रित येऊन ‘नाट्यमन्वंतर, या नावाची नाट्य संस्था स्थापना केली. आणि या संस्थेने ‘आंधळ्याची शाळा’ हे पहिलेच नाटक सादर केले. व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता नाट्यतंत्राच्या बाबतीत प्रयोगशील असणारे हे नाटक होय.
⭐मो. ग. रांगणेकर
व्यावसायिक रंगभूमीला ऊर्जा देणारे नाट्य लेखक म्हणून मो. ग. रांगणेकर यांचा उल्लेख केला जातो. आशीर्वाद, कुलवधू, नंदनवन, सारस्वत, कन्यादान, अलंकार, माझे घर, वहिनी, एक होता म्हातारा, पतीत एकदा पतीत का सदा, भटाला दिली ओसरी इत्यादी नाटकांचे लेखन केले. ते स्वतः उत्तम दिग्दर्शक होते तसेच त्यांची स्वतःची नाट्य निकेतन नावाची नाट्य संस्था होती. रागणी करांनी मराठी व्यावसायिक नाटकाचा प्रेक्षक मध्यमवर्गीय पांढरपेशी आहे हे लक्षात घेऊन मुख्यतः कुटुंबप्रधान नाटके लिहिली. कुटुंबात निर्माण होणारा तणाव आणि शेवटी होणारी सुखात्मिका यामुळे त्यांची नाटके लोकप्रिय झाली.
⭐१९५० ते ९० : विकासपर्व
⭐विद्याधर गोखले व पुरुषोत्तम दारव्हेकर (संगीत नाटकांना पुनरुज्जीवीत केले)
१९६० च्या सुमारास विद्याधर गोखले व पुरुषोत्तम दारव्हेकर यांनी पुन्हा एकदा संगीत नाटकांना पुनरुज्जीवीत केले. विद्याधर गोखले यांनी पंडितराज जगन्नाथ, मंदारमाला, मदनाची मंजिरी, अमृत झाले जहराचे, जय जय गौरीशंकर, बावनखणी इत्यादी नाटके लिहिली. १९६० नंतरचे एकमेव असे संगीत नाटकाचे लेखक म्हणून त्यांनी कीर्ती मिळवली.
पुरुषोत्तम दारव्हेकर यांनी चंद्र नभीचा ढळला, वऱ्हाडी माणसं, नयन तुझे जादूगार, कट्यार काळजात घुसली, घनश्याम नयनी आला. ही काही
लोकप्रिय महत्वाची नाटक लिहिली आहेत.
⭐बाळ कोल्हटकर
बाळ कोल्हटकर यांनी दुरितांचे तिमिर जावो, लहानपण दे गा देवा, सीमेवरून परत जा, देणाऱ्याचे हात हजार, एखादी तरी स्मितरेषा, मुंबईची माणसे अशी एकूण सुमारे २९ नाटके लिहिली. बाळ कोल्हटकर यांच्या नाटकांना पुणे मुंबईच्या बाहेर प्रेक्षक उत्तम प्रतिसाद देत. त्यामुळे व्यावसायिक रंगभूमीला त्यांनी वेगळे वळण दिले. आपल्या प्रयोगाच्या जाहिरातीत ते स्थळाचा उल्लेख करत त्यामुळे त्यांच्या नाटकांना गर्दी होत असे.
⭐पु. ल. देशपांडे
पु. ल. देशपांडे या कालखंडातील महत्त्वाचे लेखक आणि नाटककार आहेत साधारणपणे तीन दशके त्यांचे लेखन सुरू होते त्यांनी भाग्यवान, तुझे आहे तुजपाशी, सुंदर मी होणार, बटाट्याची चाळ, तीन पैशाचा तमाशा, झुंज एका वाऱ्याशी ही त्यांची लोकप्रिय नाटके आहेत. तुझे आहे तुजपाशी ह्या एकमेव नाटकाचा अपवाद वगळता पु ल देशपांडे यांची सर्वच नाटके रूपांतरीत आहेत. निखळ विनोदी लेखक म्हणून पु.लं.ची प्रतिमा निर्माण झालेली असली तरी ते अतिशय गंभीर प्रकृतीने लेखन करणारे लेखक आहेत त्यांची सर्वच नाटके अशा याच्या पातळीवर प्रसन्न अनुभव देतात काव्यमय भाषा हे एक त्यांच्या नाटकांचे वैशिष्ट्य होय. ‘ती फुलराणी’ हे नाटक तर भाषेचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने वाचले आणि पाहिले पाहिजे.
⭐विजय तेंडुलकर
विजय तेंडुलकर हे एक या कालखंडातील प्रतिभावंत नाटककार म्हणून उदयाला आले तेंडुलकरांचा ही विचार १९५० नंतरचे तेंडुलकर आणि १९५० अगोदरचे तेंडुलकर असा करावा लागतो तेंडुलकरांनी श्रीमंत, माणूस नावाचे बेट, मधल्या भिंती, चिमणीचं घर होतं मेणाचं, सरी ग सरी, शांतता कोर्ट चालू आहे!, गिधाडे, सखाराम बाईंडर, घाशीराम कोतवाल, कन्यादान, भल्याकाका, भाऊ मुरारराव, पाहिजे जातीचे, कमला, मित्राची गोष्ट, नियतीच्या बैलाला अशी आणि याहून जवळपास ५० नाटके लिहिली. तेंडुलकरांच्या गिधाडे, सखाराम बाईंडर, घाशीराम कोतवाल, शांतता कोर्ट चालू आहे !, कन्यादान या नाटकांनी मराठी रंगभूमीवर खळबळ उडवून दिली. या नाटकांच्या विरोधात निदर्शने ही झाली परंतु या नाटकांचा विचार केला तर नाट्यतंत्र आणि नाट्यसंहितेच्या बाबतीत ही नाटके अतिशय प्रयोगशील आहेत. या नाटकांची भाषा, संवाद अतिशय टोकदार आणि व्यक्ती मनाचा वेध घेणारे आहेत. तेंडुलकर हे नाटककार म्हणून व्यक्तीच्या मनाचा शोध घेतात व्यक्तीच्या मनात दडून असलेला पशु वेळप्रसंगी कसा बाहेर येतो याचे चित्रण तेंडुलकर यांच्या नाटकात पहावयास मिळते.
⭐जयवंत दळवी, वसंत कानेटकर, वि. वा. शिरवाडकर
या कालखंडात व्यावसायिक रंगभूमीला वैभव प्राप्त करून देणारे नाटककार म्हणून जयवंत दळवी, वसंत कानेटकर, वि. वा. शिरवाडकर यांचा विचार करावा लागतो.
जयवंत दळवी हे कथा, कादंबरीकार, एकांकिका लेखक आणि नाटककार आहेत. त्यांचे बॅरिस्ट,र संध्याछाया, सूर्यास्त, पुरुष ही नाटके विशेष गाजली. या नाटकांच्या व्यतिरिक्त त्यांनी जवळपास २९ नाटक लिहिलेली आहेत.
व्यावसायिक रंगभूमीला वैभव प्राप्त करून देणारे दुसरे महत्त्वाचे नाटककार म्हणून वसंत कानेटकर यांचा उल्लेख करावा लागतो. कानेटकरांनी वेड्याचं घर उन्हात, देवाचं मनोराज्य, प्रेमा तुझा रंग कसा, लेकुरे उदंड जाहली, रायगडाला जेव्हा जाग येते, तुझा तू वाढवी राजा, जिथे गवताला भाले फुटतात, अश्रूंची झाली फुले, घरात फुलला पारिजात अशी एकाहून एक सरस आणि लोकप्रिय नाटके लिहिली.
⭐वि. वा. शिरवाडकर
वि. वा. शिरवाडकर यांनी ‘कुसुमाग्रज’ या टोपण नावाने काव्यलेखन केले आणि त्या नावानेच ते प्रसिद्धही झाले. त्यांनी नाटके मात्र वि. वा. शिरवाडकर या नावानेच लिहिली. राजमुकुट, दूरचे दिवे, दुसरा पेशवा, कौंतेय, ययाती आणि देवयानी, नटसम्राट, वीज म्हणाली धरतीला, चंद्र जिथे उगवत नाही इत्यादी त्यांची लोकप्रिय नाटके आहेत. यातील ‘नटसम्राट’ या नाटकाने तर इतिहासच असलेला आहे याच नाटकासाठी त्यांना ज्ञानपीठ हा पुरस्कार मिळाला.
⭐महेश एलकुंचवार
महेश एलकुंचवार साधारणपणे १९६५ नंतर लिखाण करणारे महत्त्वाचे नाटककार आहेत. त्यांनी गार्बो, वासनाकांड, वाडा चिरेबंदी, मग्न तळ्याकाठी, युगांत ही नाटके लिहिली आहे. यातील वाडा चिरेबंदी, मग्न तळ्याकाठी आणि युगांत या तीन नाटकांच्या संचाला आज मराठी प्रेक्षक नाट्यत्रयी म्हणून ओळखतो.
⭐गो.पु. देशपांडे
गो.पु. देशपांडे यांची उध्वस्त धर्मशाळा, अंधारयात्रा, विष्णूगुप्त चाणक्य, सत्यशोधक ही लोकप्रिय आणि प्रसिद्ध नाटके आहेत. विचार प्रवर्तक नाटककार म्हणून देशपांडे यांचा उल्लेख होतो.
⭐सतीश आळेकर
सतीश आळेकर यांचे मिकी आणि मेमसाहेब, महानिर्वाण, बेगम बर्वे, महापूर इत्यादी नाटके प्रसिद्ध आहेत.
⭐दलित रंगभूमी
१९७० ते ९० या दोन दशकात दलित साहित्याने आपली मुद्रा मराठी साहित्यावर नोंदवली. त्यातच दलित रंगभूमी ही आघाडीवर होती. यात प्रा. दत्ता भगत, प्रेमानंद गज्वी, संजय पवार, रामनाथ चव्हाण, प्रकाश त्रिभुवन इत्यादी लेखकांनी महत्त्वाचे नाट्य लेखन केले आहे.
⭐दत्ता भगत यांचे वाटा पळवाटा, खेळीया,जहाज फुटल आहे आणि इतर एकांकिका, अश्मक इत्यादी नाटके प्रसिद्ध आहेत.
![]() |
| दत्ता भगत |
⭐प्रेमानंद गज्वी यांचे तनमाजोरी, किरवंत, गांधी आंबेडकर इत्यादी नाटके प्रसिद्ध आहेत तर त्यांच्या ‘घोटभर पाणी’ या एकांकिकेने महाराष्ट्रभर ख्याती मिळवलेली आहे.
⭐रामनाथ चव्हाण यांचे साक्षीपुरम, बामणवाडा इत्यादी नाटके प्रसिद्ध आहेत.
⭐प्रकाश त्रिभुवन यांचं ‘थांबा रामराज्य येतंय’ या नाटकानेही इतिहास घडवला.
⭐संजय पवार यांचे ‘कोण म्हणतं टक्का दिला ?’ हे एक प्रसिद्ध नाटक आहे.
⭐सुरेश खरे
१९७०नंतर सुरेश खरे हे ही एक महत्त्वाचे नाटककार म्हणून उदयाला आले. त्यांनी काचेचा चंद्र, सखी शेजारीणी, मला उत्तर हवयं, पप्पा सांगा कुणाचे, असुनी नाथ मी अनाथ, मंतरलेली चैत्रवेल, संकेत मिलनाचा, एका घरात होती अशी सरस नाटके लिहिली सुरेश खरे यांच्या नाटकांनी कानेटकर, शिरवाडकर यांच्या नाटकांसोबतच प्रेक्षकांना रंगभूमीकडे खेचले.
⭐रत्नाकर मतकरी
या कालखंडात रत्नाकर मतकरी हे एक महत्त्वाचे नाव. मतकरी हे कथा, गुढकथा, कादंबरी, ललित लेख, वैचारिक साहित्य, नाटक आणि बालनाट्य लिहिणारे यशस्वी लेखक आहेत. या कालखंडात त्यांचे आरण्यक, लोककथा ७८, अजून यौवनात मी, अश्वमेध, दुभंग, माझं काय चुकलं, कर्ता-करविता, खोल खोल पाणी, गांधी :अंतिम पर्व, ची. सौ. कां. चंपा गोवेकर, जादू तेरी नजर, जावई माझा भला, तनमन, प्रियतमा, बकासुर इत्यादी नाटके प्रसिद्ध आहेत. एक यशस्वी व्यावसायिक नाटककार म्हणूनही त्यांचा उल्लेख केला जातो.
पुढील काही लेखकांनी नाटके लिहून मराठी नाटकात विशेष योगदान दिलेले आहे. अनिल बर्वे (थँक्यू मिस्टर ग्लाड), शं.ना. नवरे (गहिरे रंग, गुलाम), विश्राम बेडेकर (टिळक आणि आगरकर), प्रशांत दळवी (चारचौघी), अजित दळवी (शतखंड), राजीव नाईक (अखेरचं पर्व, या साठेचं काय करायचं?, जातक, ऐन वसंतात अर्ध्या रात्री), मकरंद साठे (चारशे कोटी विसरभोळे), अशोक पाटोळे (आई रिटायर होतेय), अशोक समेळ (कुसुम मनोहर लेले), देवेंद्र पेम (ऑल द बेस्ट), शेखर ताम्हणे (सविता दामोदर परांजपे), प्र.ल.मयेकर (अग्निपंख), शफाअत खान (राहिले दूर घर माझे) इत्यादी नाटककारांनी १९९०च्या दशकात आणि त्यानंतरही दमदारपणे नाट्यलेखन केलेले आहे.
आज मराठीत नव्याने लिहिणारे अनेक नाटककार समर्थपणे नाटक लिहून रंगभूमीकडे प्रेक्षकांना खेचत आहेत. त्याशिवाय मराठी नाटकात, नाट्यसंहितेत विविध प्रयोग करून मराठी नाटकांना एक नवी दिशा देत आहेत. रिंगण नाट्य, न नाट्य असे विविध रंगमंचीय अविष्कार नाटकाच्या क्षेत्रात होत आहेत. मराठी नाटकांनी मराठी अभिरुची संपन्न केली हे खरे असले तरी एक निरीक्षण येथे नोंदवणे गरजेचे आहे ते असे की, मराठी नाटके ही कुटुंबाच्या पलीकडे गेलेली नाहीत. फार कमी आणि थोड्या नाटककारांनी सामाजिक आणि राजकीय जाणिवेची, गंभीर प्रश्नावर प्रकाश टाकणारी नाटके लिहिलेली आहेत. विनोदी आणि सुखात्मिका या मराठी नाटकांमध्ये प्रचंड प्रमाणात आढळतात. यात व्यावसायिक दृष्टिकोन असल्याने नाटकाचे निर्मिती मूल्य खर्च वसूल होण्यासाठी अशा पद्धतीची नाटके लिहिली जातात. कारण गंभीर प्रश्नावर चर्चा करणाऱ्या नाटकांकडे प्रेक्षक वळत नाही म्हणून असे नाटक लिहिणारे ही कमी असतात. किंबहुना व्यावसायिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवल्यामुळे त्यांच्या अशा नाटकांना प्रयोगापर्यंत पोहोचू ही दिले जात नाही. हे वास्तव नाकारता येणारे नाही.
टीप :
१. कालखंडाला वैभवपर्व, आव्हानपर्व, विकासपर्व या प्रा. दत्ता भगत यांनी दिलेल्या संज्ञा वापरलेल्या आहेत.
२. मराठी नाट्य इतिहासाचा मागोवा घेताना यात अनावधानाने काही नाटककार आणि गाजलेली नाटके राहून गेली आहेत याची मला कल्पना आहे. त्याशिवाय या इतिहासाचा वेध घेताना कामगार रंगभूमी, बालरंगभूमी यासंदर्भातही लिहावयाचे राहून गेलेले आहे. मराठी नाटकांच्या इतिहासाला कामगार रंगभूमी आणि बालरंगभूमी यांनीही महत्त्वाचे योगदान दिलेले आहे हे नाकारता येणारे नाही. या दोन्ही रंगभूमीवर स्वतंत्रपणे नाट्य लेखन करणारे अनेक नाटककार अजूनही दुर्लक्षित असून त्यांच्याही लेखनाचा वेध घेणे गरजेचे आहे. येथे शब्द मर्यादेमुळे हा वेध घेतला नसून लवकरच नवीन एका ब्लॉगमध्ये हा वेध घेण्यात येईल. महाविद्यालयांच्या स्नेहसंमेलनामधून आणि विविध स्पर्धांमधून एकांकिका ही सादर होत असतात. स्वतंत्रपणे एकांकिका लिहिणारे लेखकही आहेत त्यांचाही उल्लेख यात राहून गेलेला आहे. हे ही नम्रपणे नमूद करावे लागेल.

.png)
.png)
.png)
.png)
.png)
.png)
.png)
.png)
.png)
.png)
.png)
खूप सुंदर व सखोल माहितीपूर्ण लेख
उत्तर द्याहटवाधन्यवाद !
हटवायथासार आढावा घेतलाय सर मराठी रंगभूमीचा...
उत्तर द्याहटवाधन्यवाद !
हटवाखूप छान! सविस्तर आढावा घेतलाय मराठी भाषेत रंगभूमीचा..आवडले
उत्तर द्याहटवासर धन्यवाद !
हटवामराठी नाटक आणि रंगभूमी विषयी खूपच विस्तृत आणि अभ्यासपूर्ण मांडणी केली त्याबद्दल आ.प्रा.डॉ. अक्षय जी घोरपडे सर आपले आभार.
उत्तर द्याहटवाधन्यवाद सर !
उत्तर द्याहटवा