रविवार, ९ नोव्हेंबर, २०२५

विद्रोहाच्या आसक्तीचा 'आरंभ'

 विद्रोहाच्या आसक्तीचा 'आरंभ'

अक्षय घोरपडे.


आरंभ

अनादिकाळापासून एक प्रस्थापित काठी

सतत आपल्या पाठीवर उगारून आहे. 

आपण सगळे जनावरासारखे 

खाली मान घालून दिशाहीन धावताहेत 

आपले मागील पाय सतत एकमेकांत अडकत आहे. 

मी आता त्वेषाने  मागे वळून

काठीवर चाल करणार आहे.

तुमच काय, तुम्ही ठरवा.

              ----- लोकनाथ यशवंत.


    सहज घडा घेऊन पाण्यासाठी बारवाची एकेक पायरी उतरून तळाशी जावं, नितळ पाण्याची सघनता व बारवाच्या उंचीनं स्तिमीत व्हावं त्या स्तिमीत क्षणी भावनांचा हिल्लोळ मनःपटलावर खळखळावा, आत बाहेर अस्वस्थ व्हावे, भावनांनी उन्मळून यावे, काहीसा याच अनुभूतीचा प्रत्यय कवी लोकनाथ यशवंतांच्या 'आंरंभ' या कवितेने येतो. ही कविता सहज म्हणून डोळ्यांनी चाळावी आणि शेवटच्या ओळीने आत्मनिष्ठ भावनांसकट खोलवर रूतावी.

    कवी लोकनाथ यशवंताचा नव्याने परिचय करून देण्याची गरज आता उरली नाही. दलित कवितेला अधिक प्रगल्भ करणारा कवी म्हणून ते लोकमान्य पावले आहेत.

    इतिहास आणि दलित कवी यांचा अन्योन्य संबंध आहे. माणूस हा सामाजिक प्राणी आहे असे म्हणतांना इतिहास आणि समाजव्यवस्थेचा संबंध यांचे नाते अधिक वस्तुनिष्ठ होत जाते. भारतीय समाजव्यवस्थेचा इतिहास हा चातुवर्ण्यव्यवस्थेच्या रंगाने माखलेला आहे. ह्या काळ्याकुट्ट आणि रंगांध इतिहासाचे उत्खनन केले तर गुलामीने आणि लाचारीने जगलेल्या कैक दलित पिढ्यांचे सांगाडे हाती लागतील. कुण्या एकाने काठीने हाकारावे आणि बाकी साऱ्यांनी पशुत्वाच्या खुणा अंगावर बाळगत खाली माना घालून मुकाटपणे समाज नावाच्या जंगलात खुर घासीत रखडावे, बरे त्यालाही जातीच्या कुंपण मर्यादा !

    कवी या आत्मभान हरपलेल्या समाजाचा प्रतिनिधी आहे. म्हणून तो स्वतःचा इतिहास कधीही विसरू शकत नाही. कैक पिढ्यांच्या, दुःखाचे आवरण त्याने स्वतःभोवती लपेटून घेतले आहे. या पारंपरिक विषमताधिष्ठीत व्यवस्थेविरुद्धचा विद्रोह हे त्याच्या काव्य लेखनाचे बळ. हे विद्रोहाचे बळ त्याला 'शिका! संघटित व्हा!! संघर्ष करा !!!' ही आत्मजाणिव मिळवून देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या विचार कार्यातून मिळालेले आहे. मर्ढेकर म्हणतात  'काव्य ही भावनिक अर्थाची संघटना होय.' पण या भावनिक अर्थाच्या पलिकडे असणारी कवीची बांधिलकी कोणत्या विचारप्रणालीशी आहे याचाही विचार करावा लागतो.

    दलित कवीच्या संदर्भात आपल्याला केवळ भावनिक स्पंदनावर अवलंबून राहता येत नाही तर दलित कवी ज्या आंबेडकरी विचारप्रणालीशी बांधिल आहे त्या विचारप्रणाली मधून त्याची भावनिक कृती उक्ती ठरत असते. कवी लोकनाथ यशवंत सुद्धा याला अपवाद नाही. इतिहासाबद्दल प्राप्त झालेले नवे भान त्याला आंबेडकरी विचारसरणीमधून मिळालेले आहे. हे वस्तुनिष्ठ भान 'आरंभ' ही कविता अधिक उत्कटतेने प्रकट करते.

    अनादिकाळाच्या आधीचं अस्तित्व, अनादिकाळापासून प्रस्थापित काठीच्या गुलामीत दाबला गेलेला आत्मसन्मान आणि या आत्मसन्मानाला मिळालेले आंबेडकरी भान म्हणजेच आत्मभान या तीन पातळ्यावर ही कविता वावरते. दलित कवितेची सर्व ठळक वैशिष्ट्ये या कवितेतून प्रतिबिंबितत होतांना दिसतात. 'अनादिकाळापासून उगारलेल्या प्रस्थापित काठीची वेदना, या प्रस्थापित काठीला नकार देतांना 'मी आता त्वेषाने मागे वळून काठीवर चाल करणार आहे' चा विद्रोह' या सर्व अंतः संवेदना, अंतः क्रिया आत्मभानाची जाणिव कवी प्रतिक्रियेच्या माध्यमाने रसिक हृदयापर्यंत पोहचवत आहे.

    या छोटेखानी कवितेत सांस्कृतिक संघर्षाचे चित्र कवीने भेदकपणे रेखाटले आहे. साधारणपणे या कवितेचे दोन स्तर पडतात. 'अनादिकाळापासून एक प्रस्थापित काठी काठीवर चाल करणार आहे' हा एक स्तर. तुमचं काय, 'तुम्ही ठरवा.' या एका ओळीचा दुसरा स्तर. या दोन्ही स्तरातील आशयद्रव्य अधिक सकस, संपन्न आणि समृद्ध आहे. या दोन्ही स्तरांमधला ताण टिपूण घेण्यात कवी यशस्वी ठरला आहे. 

    पहिल्या स्तरात कवी इतिहासाबद्दल निवेदन करत आहे पण हा इतिहास कसा आहे? प्रस्थापित काठीच्या उगारलेल्यापणाचा. कृत्रिम विषमतेचा, वर्णवर्चस्वाखाली दाबल्या गेलेल्या बहुजन समाजाचा, ज्याच्या जगण्याला विचाराला मर्यादा आहेत. पुराण संस्कृतीच्या, श्रृती-स्मृतीच्या ओझ्याखाली दाबला गेलेला आहे. देव आणि दैववाद या भावनिक गुंत्यात तो अधिक गुंतलेला आहे. 'स्व' अस्तित्वाचे, आत्मसन्मानाचे, भान त्याला उरले नाही. त्याचे जगणे कोंडवाड्यात कोंडलेल्या जनावरासारखे आहे. हा कोंडवाडा म्हणजे त्याचे सर्वस्व कोंडवाड्यात कोंडलेले श्वास दरवाज्याला धडका देत पण प्रस्थापित काठी या दरवाज्याला अधिक सुरक्षित करते. या कोंडलेल्या जीवांना मानवमुक्तीचा श्वास मिळाला. प्रज्ञासूर्याच्या विचार स्पशनि त्यांच्या जगण्याला आत्ममुक्तीची आत्मसन्मानाची म्हणजेच आत्मभानाची नवी उब मिळाली. 

    नव्या युगाचे हे नवमन्वंतर, या नवसंजीवणीने कवी जागृत झाला आहे. अनादिकाळाच्या निद्रेपासून तो मुक्त झाला आहे. इतिहासाबद्दल नवे भान त्याला आले आहे. आत्मसन्मानाने जगण्याची तीव्र आसक्ती त्याच्यामध्ये निर्माण झाली आणि ज्या गोष्टीबद्दल माणसाला आसक्ती असते ती गोष्ट मिळेपर्यंत त्याला चैन मिळत नाही. प्रसंगी जीवाची बाजी लावून ती गोष्ट तो मिळवत असतो. आत्मसन्मानाने जगण्याच्या आसक्तीतून, सुरू होतो संघर्ष प्रस्थापित काठीविरुद्ध ! कवीचे निवेदन प्रथम पुरुषी आत्मवाचक सर्वमानाचे असेल तरी 'मी आता त्वेषाने मागे वळून काठीवर चाल करणार आहे' ही ओळ त्याचा संघर्ष स्वतः पासून सुरू करणार असल्याचे अभिव्यक्त करते. कवी स्वतः पासून संघर्ष सुरू करू पाहतोय पण असे का व्हावे? कारण म्हणजे आपले मागील पाय ऐकमेकांत अडकत आहे. मानवी आयुष्य आणि त्यातील गुंतागुंत विलक्षण आहे. आयुष्याला समाजाच्या परिघात प्राप्त होणारे रूप हे वरकरणी, अर्थपूर्ण वाटत असले तरी गाभ्याशी मात्र ते अर्थहीन पोकळ असते. या फसवेपणात आपण अधिक गुंतत जातो. जन्ममातीच्या पारंपरिक नाळेला आपण वज्रकिटकीसारखे चिकटून बसलो आहोत. स्थितीचे स्थिरत्व, सुरक्षितता आणि गतीचे गतीत्व या मानसिक द्वंद्वातील, घुसमट आमचे मागील पाय एकमेकांत अडकवत आहे. म्हणून कवीचा संघर्ष स्वतः पासून सुरू होतो. काळ्याकुट्ट भूतकाळाविरुद्ध व स्थिर व्यवस्थेविरुद्ध तो रिअॅक्ट होत आहे. नव्या समताधिष्ठीत समाजरचनेच्या युगाकडे नेणारी त्याची ही कृतिप्रवणता स्वतःपासून सुरू होते. तत्वज्ञानाचा बाळबोध डोस ती पाजत नाही याचा अर्थ असा होत नाही की हा कवी स्वतःच्या आत्मकोषात मग्न आहे. याउलट 'स्व' कृतीने तो समूहाला कृतिप्रवण करण्याचा प्रयत्न करत आहे.

     येथून कवितेचा पहिला स्तर संपून दुसऱ्या स्तराचा, मार्ग मोकळा होतो. पहिल्या स्तराच्या दुसऱ्या स्तराशी असलेला परस्परसंबंध व ताण अनुभवता येतो. 'तुमचं काय, तुम्ही ठरवा' हा कवितेचा दुसरा स्तर. पहिल्या स्तरातील कविच्या कृतीने दुसरा स्तर अधिक आशयघन व समृद्ध होत जातो. 'मी आता त्वेषाने मागे वळून काठीवर चाल करणार आहे' कविची ही रिअॅक्शन 'तुमचं काय, तुम्ही ठरवा' हा स्तर आशय अधिक व्यापक आणि समृद्ध करते, कवी हा इच्छा आणि स्वातंत्र्य नसलेल्या समूहाचा एक घटक आहे. प्रज्ञासूर्याच्या उर्जेने तो पेटून उठला आहे. त्याचे हे पेटलेपण समूहाच्या पातळीवर जात नसले तरी ते पूर्णतः वैयक्तिक ही ठरत नाही. 'आपल्या', 'आपण', 'आपले' या प्रथम पुरूषी आत्मवाचक सर्वनामाचे 'मी' हे झालेले आत्मवाचक सर्वनाम आपल्यातील 'मी' ला झालेली जाणिव आहे. समूह प्रतिक्रियेच्या अगोदरची ही क्रिया आहे. म्हणून त्याचे वैयक्तिकपण समूहामध्ये महत्वाचे ठरते. 'मी आता त्वेषाने मागे वळून काठीवर चाल करणार आहे' येथून संघर्षास सुरवात होते मानव मुक्तीच्या या संघर्षसाठी जीव गेला तरी बेहत्तर पण मागे न हटण्याचा कवीचा आवेश त्याच्या निडरपणाची साक्ष देतो. म्हणून त्याचे स्वतःचे पाय एकमेकांत अडकत नाहीत.

    काठीवर चाल करण्याबरोबर तो चाल करतोय नव्या समताधिष्ठीत, समाजरचनेच्या युगाकडे. स्फोटासाठी सुरूंग पेरावा लागतो. सुरुंग चेतल्यानंतर मी स्वतः पूर्णांशाने उद्ध्वस्त होणार आहे. पण तत्पूर्वी उद्ध्वस्त होण्या अगोदर आपल्यातल्यांना उद्देशून कवी म्हणतो मी स्वतः आदिबंधासह उद्धस्त होणार आहे पण तुमच काय?' असा प्रश्न उपस्थित करता करता 'तुम्ही ठरवा' असे उत्तर देऊन मोकळा होतो. स्फोटाचे स्फोटित्व त्याच्या आंतरिक उर्जेवर अवलंबून असते आणि या उर्जेला चेतना मिळाली की ती अंतर्ह्याबासकट, आकाशाकडे झेप घेत स्फोटाचे स्फोटित रूप त्यातील उर्जेचे परावर्तीत रूप असते. प्रज्ञासूर्याची उर्जा प्यालेला कवीचा बिनधास्तपणा, अस्तव्यस्त होण्याची निडरवृत्ती या उर्जेचे परावर्तन प्रतिबिब आहे. कवी संवाद साधत आहे. तो विधानात्मक बोलतोय. त्याचे आत्मनिवेदन प्रश्न निर्माण करते अन त्यांचे उत्तरही देऊन टाकते. 'तुमचं काय' असं म्हणतांना अर्थाची अनेक वलये निर्माण होतात. एकच एक अर्थ त्यातून प्रकट होत नाही म्हणून हा दुसरा स्तर आशय अधिक व्यापक होत जातो. परावतीत स्फोटाच्या काही कणांनी तुम्हीही उद्ध्वस्त होणार आहात तुमच काय?' मागील पाय एकमेकांत अडकणाऱ्यांना कोंडवाडा सुरक्षित पण कोंडवाड्यात कोडलेल्या श्वासांनी गुदमरणाऱ्यानो तुमचं काय?'... इत्यादी त्याबरोबर 'तुम्ही ठरवा' अस म्हणत कोणताही मार्ग निवडण्याचं स्वातंत्र्य कवी त्यांना देतो.

    पण कवीचा आशावाद दांडगा आहे. प्रज्ञासूर्याच्या उजेडाने हा सारा समूह प्रकाशमान होणार आहे. कोंडवाड्याविरुद्ध रिअॅक्ट होणार आहे. फक्त एका कृतीची गरज आहे. 'तुम्ही ठरवा' असे म्हणण्यामागे त्याचा हाच उद्देश आहे. म्हणून 'तुम्ही ठरवा' असे तो म्हणतो 'तुम्हीचं ठरवा' असे म्हणत नाही.

    प्रस्थापित व्यवस्था, तिने निर्माण केलेले आकृतिबंधाचे घोडे, जेव्हा जेव्हा काठीसह उधळतील, धाक निर्माण करण्याचा प्रयत्न करतील तेव्हा  प्रस्थापित काठीच्या धाकाला न जुमानता मी त्वेषाने वळून काठीवर चाल करणारच आणि लाथाडणार तुमचे विचार कोष, निर्माण करणार एक नवे विश्व जे व्यापून टाकले 'स्व' अस्तित्वासह समूहाला. मी जागवणार नवी ऊर्मी, नवा जोश, नवा आयाम, नवा विचार, नवा आकृतिबंध पण तुमचं काय, तुम्ही ठरवा.


Ⓒसुनिल अवचार, मुंबई. 


२ टिप्पण्या:

  1. खूपच छान लेख आहे. खऱ्या अर्थाने साहित्याचा उद्देश्य या लेखातून प्रकट झाला आहे.

    उत्तर द्याहटवा

जागतिकीकरण आणि आदिवासी

  जागतिकीकरण आणि आदिवासी डॉ . अक्षय किशोर घोरपडे. ·        गोषवारा  (Abstract) :- १९९० नंतरचा कालखंड हा भारतीय समाज जीवनात फार मोठा सा...