आयडेंटीटीचे ब्रँडेडयुद्ध
तिसर्या जगाच्या वेदनेची कविता : आयडेंटीटीचे ब्रँडेडयुद्ध
“हे धमन्या धमन्यातील रक्त
सळसळणाऱ्या
माझ्या बाप्पा
तुझ्या मेंदूतली समष्टी
मी अजून समजून घेऊ शकलो नाही
तू दिलेले ज्ञानकण, अन्नकण, द्रव्यकण
सारे सारे प्राशन करून
मी लढतोय रणांगणावर
आयडेंटीटीचे ब्रँडेडयुद्ध”
वरील काव्यओळी
या अशोक रा.इंगळे यांच्या ‘आयडेंटिटीचे ब्रॅण्डेडयुद्ध’
या काव्यसंग्रहातील आहेत. अशोक इंगळे हे दलित साहित्यातील चौथ्या
पिढीतील महत्त्वाची कवी समीक्षक आहेत. सदर काव्यसंग्रह त्यांचा दुसरा काव्यसंग्रह
असून या संग्रहात कवी वर्तमानातील स्वतःची ओळख शोधण्याचा प्रयत्न करत आहे.
वास्तविक दलित कविता ही आत्मशोधाची कविता म्हणून ओळखली जाते. समाजव्यवस्थेतील
स्वतःचे समतामुलक सन्मानजनक स्थान नेमके कोठे आहे? ते
शोधायचे कसे? आणि मिळवायचे कसे? यासाठी
दलित कवितेचा आग्रह असतो. याशिवाय साहित्यातही दलित कविता स्व अस्मितेचा, अस्तित्वाचा शोध घेत असते. त्यामुळे एकंदर समाजव्यवहार आणि साहित्य
व्यवहारावर प्रश्नचिन्ह दलित कविता उपस्थित करत असते. आज दलित साहित्य हा प्रवाह
मध्यवर्ती साहित्याचा महत्त्वाचा भाग बनलेला आहे. आणि समाज
जीवनातील दलितांचे स्थानही पक्के झालेले आहे. तरीसुद्धा दलित कवितेच्या चौथ्या
पिढीतील कवीला स्वतःची आयडेंटिटी शोधावी लागते म्हणजे हा कवी आवर्तातून बाहेर
पडलेला नसून तो आत्मवंचनेच्या गर्तेत आहे असा एखाद्याचा समज होऊ शकतो. परंतु खरेच
हे असे आहे का? कवी आवर्तातून बाहेर पडला आहे की नाही आणि
वर्तमानात दलितांचे स्थान पक्के झाले आहे की नाही याचा शोध आपल्याला वर्तमानाच्याच
पार्श्वभूमीवर घ्यावा लागतो.
कवी हा काळाचे प्रतिनिधित्व करत असतो. काळाच्या पृष्ठभूमीवर उसळणाऱ्या लाटांचे प्रतिबिंब कवितेत उतरते म्हणून कवी कालातीत होतो. कवीचे कालातीत होणे म्हणजे मानवी संवेदनांची समूह मनावर व्यापून असलेल्या तरलतेचे निदर्शक होय. कवी अशोक इंगळे यांच्या कवितेचा काळ हा संभ्रमित करणारा काळ आहे. हा काळ अत्याधुनिक असून यंत्र तंत्राचा काळ आहे. माहिती तंत्रज्ञानाचा काळ असेही याला संबोधले जाते. या काळाने मानवी जीवनाचे संदर्भ बदलले असून जीवनाच्या सर्वच क्षेत्रात घुसखोरी करून जगण्याचे परिमाण बदलले आहे. संस्कृती संकर, भाषा संकर एवढेच नव्हे तर प्रत्यक्ष आणि आभासी पातळीवर संकराचा कालखंड ही याला संबोधता येते. कवी याच कालखंडाचे ताणेबाणे अधोरेखित करतो.
या कालखंडाने
पहिला पेच निर्माण केला आहे, स्व अस्तित्वाचा. स्व अस्मितेचा. स्व ओळखीचा. म्हणजेच आजच्या भाषेत
आयडेंटिटीचा. क्षणात आयडेंटिटी निर्माण करणे आणि
आयडेंटिटी पुसून टाकणे ही या कालखंडाची रीत बनली आहे. भांडवलदारी, धर्मांध, वर्ण श्रेष्ठत्वांच्या हातात आजच्या
आयडेंटिटीच्या दोर्या असून कळसुत्री बाहुली प्रमाणे ते या कालखंडाला नाचवत आहेत या
कालखंडातील आयडेंटिटीचे सूक्ष्म पदर आधी समजून घेणे गरजेचे आहे यातील पहिला पदर
असा की, आज दलित साहित्याची ओळख काय आहे? मराठी साहित्यात निर्माण होणाऱ्या दलित साहित्याचे नेमके स्थान काय आहे ?
मध्यवर्ती साहित्याला कवेत घेणारा दलित लेखक आहे का ? याविषयाचे आत्मचिंतन केले तर काय दिसते.
“अनुल्लेखाच्या टोळीने घेरलय
चळवळीच्या कवितेला
भलावणीच्या शब्दांनी चोरला अवेळी पान्हा
देशीवादी व कंपू वाद्यांनी तोडलेत
भाषिक लचके सोयीने
भाट लोचनीटांनी बळकवली सांस्कृतिक गादी
आणि तिसऱ्या दुनियेतील ताठ मानेची माण्सं
नुसतच बघताय टुकूमकू
माणसातल्या जनावराचा अगतिकीकरण”(११०)
देशीवादी व कंपूवाद्यांची दलित साहित्याला अनुल्लेखाने मारण्याची चढाओढ सुरू आहे. दलित साहित्यात तोच तोच आशय येतो, तीच वेदना, तोच नकार आणि तोच विद्रोह येतो, असे म्हणून हे साहित्य आवर्तात आहे म्हणून दलित लेखकांच्या साहित्याचे मूल्यमापन तर दूरच नामोल्लेख ही नकोच असा साहित्य क्षेत्रात व्यवहार सुरू आहे. न बदलणाऱ्या वर्तमानात आमच्या साहित्याशयाच्या आयडेंटिटीचे काय करायचे हा एक भाग.
दुसरे असे की, तुमची जी आधीची आयडेंटिटी आहे, तीच आयडेंटिटी बळकट केली पाहिजे, हे सांगणारा हा
काळ. म्हणून मग मी जर पूर्वाश्रमीचा दलित असेल आणि माझी जात विशिष्ट असेल तर मग मी
गर्वाने जातीच्या आयडेंटिटीकडे वळले पाहिजे किंबहुना जातीचा गवगवा करून मिरवले
पाहिजे. असे असेल तर मग नाकारायचे काय? जी आयडेंटिटी आम्हाला
नको होती तीच जर पुन्हा पुन्हा गर्वाने सांगण्यास भाग पाडले जात असेल आणि त्यासाठी
तशी व्यूहरचना उदाहरणार्थ जातीचा गौरव असणारा इतिहास सांगणे त्यातील प्रतिकांची
महत्त्व वाढवणे इत्यादी केला जात असेल तर मग आमच्या साहित्यातून प्रतीत होणाऱ्या
आशयाचे करायचे काय ? हा खरा प्रश्न आहे. व्यवस्था आम्हाला
आमचा स्पेस देत नाही व्यवस्थेचा असं आहे की,
“दोस्ताला रांगेत उभ
राहता यावं म्हणून
मी थोडी स्पेस दिली
नी मीच रांगेबाहेर झालो.”
व्यवस्था आम्हाला रांगेबाहेर काढण्यासाठी नवनवे
स्पेस देत आहे. व्यवस्थेने तुम्ही तुमचा हेका सोडत नाही म्हणून तुमच्या
आयडेंटिटीतच स्पेस दिली आहे. तुम्ही कायम दुभंग राहावे यासाठी ती प्रयत्नरत असते.
उदाहरणार्थ दलित साहित्य की आंबेडकरी साहित्य ?
ही स्पेस व्यवस्थेने नकळतपणे तुमच्यात रुजवली आणि तुम्ही त्यात
वाहवत गेले. दलित साहित्य हेच आंबेडकरी साहित्य आणि आंबेडकरी साहित्यात दलित
जाणिवेचेच चित्रण येते हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ असताना आशयाच्या आधीच तुमच्या
आयडेंटिटीत दुभंग निर्माण केल्याने तुमच्या आशयाच्या सीमारेषा निश्चित झाल्या.
नकळतपणे अखिल मानवाला कवेत घेणारा आंबेडकरवाद संकुचित व मर्यादित करण्यात आला.
आयडेंटिटीचे क्रायसिस येथे पाहावयास मिळते आम्ही आंबेडकरी आहोत परंतु तुम्ही
आम्हाला दलित समजूनच वागणूक देतात आंबेडकरी विचाराला दलित करता मग ह्या
आयडेंटिटीचे काय करायचे?
या कालखंडात
मनुष्य दोन पातळीवर जगतोय एक प्रत्यक्ष आणि दुसरे आभासी. “हे जग आहे केबल टीव्ही फेसबुकवरचे ट्विटर युटूबवरचे
टिक टॉक गुगल इंस्टाग्राम व्हाट्सअप वरचे” सोशल मीडिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या
माध्यमांवर व्यक्ती आभासी पातळीवर वावरत असतो. प्रत्यक्षातली आयडेंटिटी ही आभासी
पातळीवरील आयडेंटिटी पेक्षा वेगळी असते. आभासी पातळीवर व्यक्ती जगभरात भटकंती करू
शकतो, अभिव्यक्त होऊ शकतो. या पातळीवर व्यक्तीला लाईक,
कमेंट मिळतात. त्याची अभिव्यक्ती इतरांशी शेअरही होऊ शकते. हे जितके
खरे आहे तितकेच हेही खरे आहे की, या पातळीवर व्यक्तीला
ट्रोलही केल्या जाते. त्याचबरोबर हेही तितकेच खरे आहे की, या
पातळीवरील आयडेंटिटी क्षणिक आणि क्षणभंगुर आहे. या पातळीवर जोडली गेलेली लाखो
माणसे प्रत्यक्षातील तुमच्या आयडेंटिटीशी संलग्न होतीलच असे नाही. आयडेंटिटीच्या
द्विधा मनस्थितीत असलेल्या कवीला “ई चौकशा करणाऱ्या शहराला
मी कुठली आयडेंटिटी देऊ फेसबुकवरील मित्रांची की संपर्क न ठेवणाऱ्या नातलगांची ये
भागदौड भरी जिंदगी म्हणत फोरजी वर संवाद साधणाऱ्या मित्रांची कुठली आयडेंटिटी देऊ ?”
हा प्रश्न पडला आहे.
वास्तविक या माध्यमावरील आयडेंटिटीला कुठलाच अर्थ नाही. या माध्यमांवर आज नायक असणारा व्यक्ती क्षणात खलनायक ठरू शकतो. कितीही केले तरीही ही आयडेंटिटी फेक आहे आणि डीपफेकच्या जमान्यात तर तुमची प्रतिमा कधीही मलीन, विस्कळीत व हिरोईक होऊ शकते. या आयडेंटिटीचा प्रत्यक्षात काहीही उपयोग होत नाही.
सध्याचा कालखंड हा आयडेंटिटी बळकट करणारा कालखंड आहे. असे म्हणण्याचे कारण असे की, या काळात जाती, धर्म अस्मिता टोकाच्या बनल्या आहेत ‘गर्व से कहो….’ म्हणणाऱ्यांसोबत ‘आय लव….’ म्हणणाऱ्यांची आणि त्यांच्याबरोबरच अमुक जातीचा माज, अमुक परंपरेचा गर्व, होय मी…, आम्ही अमुक वादळ, आम्ही तमुक वादळ म्हणणाऱ्यांची संख्या वाढली आहे. आयडेंटिटीचा ब्रँड होत आहे. जागतिकीकरणाच्या या भांडवलशाही मार्केटिंग व्यवस्थेत ब्रँडला महत्व आले आहे. ब्रँड म्हणजे आयडेंटिटी आणि ब्रँड केव्हा होतो जेव्हा तुम्ही तुमचे काहीतरी वेगळेपण, देखणेपण, सकसपण दाखवाल तेव्हा. ब्रँड हा भांडवलशाहीचे द्योतक आहे, हे आधी लक्षात घेणे गरजेचे आहे. नफा कमवण्यासाठी ब्रँड तयार केला जातो. ब्रँड तयार होणार नसतील तर मग भांडवलदारांचे भागणार कसे ? म्हणून मग आधी समाजात ब्रँड निर्माण व्हायला हवे. ब्रँडची संकल्पना रुजवायला हवी म्हणून मग समाजात जाती-धर्माचे ब्रँड निर्माण केले जात आहेत. जाती-धर्माच्या सीमारेषा जितक्या भेदक होतील तितका ब्रँड पक्का होईल अशा या वातावरणात 'बंधुत्वतेचा वर्ल्ड कप' घेऊन निघालेल्या कवीला आयडेंटिटी कुठली द्यावी असा प्रश्न साहजिकच पडणार.
दलितांनी
नेमकी कोणती आयडेंटिटी द्यायची. वास्तविक ते आंबेडकरवादी आहेत, ही त्यांची खरी आयडेंटिटी. आणि हीच
आयडेंटिटी ठसठशीत व्हावी यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. नेमके यालाच सनातनी
व्यवस्थेने माहिती तंत्रज्ञानाच्या कालखंडात वेगळे वळण दिले. अस्मितेचे छुपे वाद
निर्माण करून दलित असण्याची अस्मिता कुरवाळली आणि आंबेडकरवादी असण्याची ही अस्मिता
कुरवाळली. त्यामुळे या दोघांच्या सीमारेषेवर दलित आंबेडकरी समाज घुटमळत आहे. नव्या
पिढीसमोर पेच निर्माण झाला आहे की, नेमकी कुठे वळावे?
पारंपारिक जाती धर्माच्या महती सांगणाऱ्या समाज माध्यमांवरील
चित्तरकथा म्हणजेच रिल्स आणि खरा आंबेडकरवाद बाजूला सारून टोकाचा आंबेडकरवाद
सांगणाऱ्या चित्तरकथा नेमके जावे कोठे? हा आयडेंटिटीचा खरा
क्रायसिस आहे. परक्यांना तर हेच हवे आहे परंतु स्वकीयांचेही याकडे दुर्लक्ष होत
आहे. हे नीट समजून घेणे गरजेचे आहे. खऱ्या आंबेडकरवादाच्या मार्गावर निघालेल्या
कवीला आयडेंटिटी मिळत नाहीत. कवीचा हा पेच कवीने ‘मला
आयडेंटिटी देत नाही’ या कवितेत नेमकेपणाने मांडलेला आहे.
मुळातच ही कविता वाचणे गरजेचे आहे. तेव्हा नेमके कवीला काय म्हणायचे आहे हे समजते.
सदर
काव्यसंग्रहात कवी सदर काव्यसंग्रहात कवी तिसऱ्या जगाच्या वेदनेची कविता लिहीत
आहे. हे तिसरे जग कोणाचे आहे ? या तिसऱ्या जगात कोण राहतो ? तर या तिसऱ्या जगात
शोषित वंचित आहे. या तिसऱ्या जगातल्या व्यक्तीकडे माहिती तंत्रज्ञानाची मालकी
नाही. या तिसऱ्या जगात खरा आंबेडकरवादी आहे. या तिसऱ्या जगात भूमिमुक्त, हातमजूर, श्रमकरी, हमाल,
कारखान्यात राबणारा कामगार आहे. या तिसऱ्या जगात मूलभूत प्रश्नांनी
ग्रासलेला समाज आहे. ज्यांच्या मूलभूत हक्क, अधिकारावर गदा
आलेली आहे, असा व्यक्ती तिसऱ्या जगातला आहे. या तिसऱ्या
जगातल्या व्यक्तीवर सद्य परिस्थितीत कोणीच बोलत नाही. कोणत्याही माध्यमातून
यांच्यावर भाष्य येत नाही. या तिसऱ्या जगातला व्यक्ती जणू काही आमच्या मीडियाच्याच
नव्हे तर साहित्याच्याही पटलावरून गायब झालेला आहे की काय अशी शंका निर्माण होते.
अशा पार्श्वभूमीवर या तिसऱ्या जगाची संवेदना अशोक इंगळे मांडतात.




नव्या पिढीतील आघाडीचे समीक्षक तथा ब्लाॅग लेखक कवी डाॅ. अक्षय घोरपडे यांनी माझ्या संग्रहाची केलेली उकल वर्तमान वस्तुस्थितीला कवेत घेणारी आहे. अतिशय वेगळ्या धाटणीची ही मांडणी म्हणूनच वेधक ठरते. विशेषत: त्यांनी ज्या कवितांची निवड केली त्या कविताही खास निवडल्या आहेत. त्यामुळे हे समग्र भाष्य समकालीन कवितेत भिन्न असे जाणवते. त्याबद्दल मी अक्षयचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.
उत्तर द्याहटवाडॉ.अक्षय कि.घोरपडे यांनी डॉ अशोक इंगळे यांच्या खऱ्याखुऱ्या आयडिंटीचा शोध घेतला.कवीच्या मनातील घालमेल अलगद टीपली. वाचकांनाही दिशानिर्देश केला.शब्दात गुरफटलेल्या वाचकाला खळबळून जागे केले.डाॅ.अशोक इंगळे यांनी आभासी जगतात घेतलेला वास्तवाचा शोध अफलातून आहे.डाॅ.अशोक इंगळे यांना कोटी कोटी शुभेच्छा.
उत्तर द्याहटवा