गुरुवार, ११ डिसेंबर, २०२५

प्रार्थना

प्रार्थना

                                        अक्षय घोरपडे.

अखिल मानवाच्या सुखासाठी प्रार्थना म्हणली जाते किंवा गायली जाते. प्रार्थना ही मुख्यतः मनुष्य हताश , निराश आणि अतीव दु:खी झाला की मानवी मनात  उगवते.  मानवाच्या सुखी समाधानी जीवनापाशी येऊन मावळते.  ना. धों. महानोर यांच्या दोन कविता मला कायम प्रार्थना वाटलेल्या आहेत. म्हणून आज खास मी माझ्या वाचक मित्रांसाठी शेअर करीत आहे.


ना. धों. महानोर यांच्या दोन कविता 

१.

मोडलेल्या माणसांचे दुःख ओले झेलताना


मोडलेल्या माणसांचे दुःख ओले झेलताना 

त्या अनाथांच्या उशाला दीप लाव झोपतांना.


वाहताना भार त्यांचा जाहले गणगोत त्यांचे

कोणते नाते कळेना बांधले आयुष्यभरचे 

दुःख भिजले वेचतांना झोपले काट्यांवरी जे 

आपुल्या साऱ्या मुखांचा जाळ पोटी जाळतांना.


माणसांची श्वापदे लावून बसलेली कवाडे 

हे पवाडे गात फिरले झोपड्यांच्या गल्बतांना 

जातिधर्माची महत्ता बंद जेथे राजरस्ता 

फाटक्या बाहीवरी जे झुंजले सूर्यास्त असता.


कोणती ना जात ज्यांची कोणता ना धर्म ज्यांना 

दुःख भिजले दोन अश्रू माणसांचे माणसांना 

प्रार्थना त्यांना म्हणू ह्या ओंजळीने काय द्यावे. 

धुंडती आकाश जेथे त्या धुळीच्या माणसांना.


२. 

सर्व धर्माच्या जिथे गा             प्रार्थना सामावल्या


सर्व धर्माच्या जिथे गा             प्रार्थना सामावल्या 

राष्ट्रगीताच्याच ओळी             कंठभरूनी दाटल्या


रस्ते धुळीने माखले                 भडके उडाले मंदिरी

डोळ्यात भिजले रक्त घेउन      वाहते गोदावरी


उद्ध्वस्त हे संसार गा              पुसला टिळा भाळावरी

दाणे पिलांना शोधण्या              जावे कुण्या कबिराघरी


तुमची तुम्हा सिंहासने                लखलाभ हो जन्मांतरी

हे पाप मिरवित नांदणे               ना मान्य त्या देवाघरी


टीप - ना. धों. महानोर यांच्या या दोन कविता 'पानझड' या काव्यसंग्रहातील असून या कविताना शीर्षक नाहीत त्यांना त्यांनी क्रमांक दिलेले आहेत. 'मोडलेल्या माणसांचे दुःख ओले झेलताना' या कवितेचा क्रमांक हा ५८ आहे.  'सर्व धर्माच्या जिथे गा  प्रार्थना सामावल्या' या कवितेचा क्रमांक हा ५३ आहे.

४ टिप्पण्या:

जागतिकीकरण आणि आदिवासी

  जागतिकीकरण आणि आदिवासी डॉ . अक्षय किशोर घोरपडे. ·        गोषवारा  (Abstract) :- १९९० नंतरचा कालखंड हा भारतीय समाज जीवनात फार मोठा सा...