अंधभक्तांनी निर्माण केलेल्या विचारव्यूहाला तडा देणारी कविता
‘युद्ध न संपणारे….’
‘युद्ध न संपणारे….’ ही वेणुप्रशांत (डॉ. प्रशांत राऊत) यांची दीर्घकविता प्रकाशित झालेली आहे. कविता ही कवीची प्रतिक्रिया असते. ही प्रतिक्रिया अनुभवातूनच आलेली असते. कवीला कवीचा अनुभव जेव्हा वेदना देतो, अस्वस्थ करतो तेव्हा खरे तर त्याच्या मनात काव्यनिर्मितीची प्रक्रिया सुरू होते. शरदचंद्र मुक्तिबोधांच्या भाषेत बोलायचे झाले तर ‘जेव्हा आत्मा फोडासम दुखतो’ तेव्हा कविता आविष्कृत होते. वेदनेतून जन्माला आलेली कविता वाचकाला आनंद तर देतेच शिवाय अंतर्मुख करून विचार करण्यासही भाग पाडते वेणूप्रशांत यांची कविता ही वाचकास अंतर्मुख करणारी कविता आहे.
वेणुप्रशांत यांच्या दीर्घकवितेचे मूल्यमापन करण्यापूर्वी कवितेच्या मूल्यमापनाची दिशा ठरवणे गरजेचे आहे. मराठीत साधारणपणे सुखाच्या किंवा दुःखाच्या अनुभूतीच्या पार्श्वभूमीवर कवितेचे मूल्यमापन केले जाते. कवितेतला अनुभव सुखद असेल तर त्यातील सुखाचे चैतन्य शोधून कवीच्या अनुभवाचा अनुबंध जोडला जातो तेच दुःखाच्या संदर्भातही केले जाते. वास्तविक सुखद किंवा दुःखद अनुभूतीच कवीला अपेक्षित आहे का? तर असे नाही कवी सुखद अनुभूतीतही अस्वस्थ असतो आणि दुःखद अनुभूतीतही अस्वस्थ असतो. त्याची अस्वस्थता ही वर्तमानाच्या विसंगतीतून आलेली असते. त्यामुळे मूल्यमापनाचा सूर हा मुख्यतः कवीच्या अस्वस्थतेशी संवादी असावा जेणेकरून कवीच्या आत्मानुभूतीच्या तळापर्यंत जाता येते. मूल्यमापनाची ही भूमिका दीर्घ कवितेच्या संदर्भात तर अधिकच सजग ठेवावी लागते.
वेणुप्रशांत यांची कविता ही वर्तमानाची कविता आहे वर्तमानाविषयीचे दीर्घ चिंतन; या दीर्घ चिंतनाला असलेली वैचारिक
पार्श्वभूमी आणि भूमिका मांडताना कवी म्हणतो,
तू दरवेळी घेतेस
या भूमीवर होणाऱ्या
अन्यायाच्या नोंदी आणि लिहीती होतेस न्याय मिळेपर्यंत.”
कवितेच्या
माध्यमातून कवी या भूमीवर होणाऱ्या अन्यायाच्या नोंदणी घेतो आणि न्याय मिळेपर्यंत
लिहीत राहण्यासाठी कटिबद्ध होतो सदर कविता ही दीर्घ आहे. दीर्घ कविता ही दीर्घ
चिंतनातून येते. एकाच अनुभवाचा व्यापक परिप्रेक्ष दीर्घ कवितेत येतो. यात
संवेदनांचे व्यामिश्र रूप असते. त्यामुळे दीर्घकविता वाचकावर व्यापक परिणाम
घडवते. येथे प्रश्न असा निर्माण होतो की,
कवीने दीर्घकवितेचा आकृतीबंध का निवडला? तर
याचे उत्तरही ही दीर्घकविताच देते आणि ते उत्तर काय आहे हे आपण लेखाच्या शेवटी
पाहू.
‘युद्ध न संपणारे….’ हे या दीर्घकवितेचे शीर्षक असून कवी न संपणाऱ्या युद्धाविषयी विवेचन करीत आहे. भय, हिंसा आणि करुणा ही माणसाची उपजत स्वाभाविक प्रवृत्ती असून मानवी पशुत्वाच्या त्या निदर्शक खुणा होय. कुणापासून तरी संरक्षण किंवा कोणावर तरी अधिराज्य गाजवण्याच्या प्रवृत्तीतून युद्ध आकाराला येते. युद्ध घडवणे ही माणसाची विकृती आहे. युद्धात माणसे मरतात, मारले जातात. हिंसेचे क्रौर्य युद्धात पाहावयास मिळते त्यामुळे सुबुद्ध आणि सुसंस्कृत माणसांना युद्ध नको असते. भय आणि हिंसा या मानवी प्रवृत्तीवर विजय मिळवून त्याला करुणेकडे नेण्यासाठी शांती आणि करुणेचा संदेश सांगणारे महापुरुष प्रत्येक शतकात जन्माला येतात आणि माणसाला सुबुध्द करतात परंतु समाजात जशी सुबुद्ध माणसे असतात तशीच दुर्बुद्ध माणसेही असतात. स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी आणि इतरांना अंकित ठेवण्यासाठी ते युद्ध घडवून आणतात. युद्ध घडवून आणणारी ही प्रवृत्ती प्रत्येक शतकात जन्माला येत असते आणि हीच प्रवृत्ती युद्धाचे निकष आणि रूपही बदलवत असते.
दगड, काठी, तलवारी,
बंदुका, क्षेपणास्त्राच्या साह्याने रणांगणात
खेळल्या जाणाऱ्या युद्धापासून ते सायबर कोरोना व्हायरसपर्यंत
“युद्धाला असंख्य चेहरे
असंख्य कंगोरे
युद्ध एक कोडे
जे कधी न उलगडे”(६४)
अशी युद्धाची विविध रूपे पाहावयास मिळतात. माणूस हा सतत युद्धाच्या सावटात आहे. युद्धरत आहे. खरे तर “नैसर्गिकतेपासून कृत्रिमतेकडे /अविनाशाकडून विनाशाकडे /निश्चितेतकडून अनिश्चिततेकडे /शाश्वततेकडून क्षणभंगुरतेकडे /माणुसकीकडून अमानुषतेकडे/ स्वातंत्र्याकडून गुलामीकडे /जीवनाकडून मरणाकडे झालेल्या या प्रवासातून मनुष्याने जन्माला घातली असंख्य खडतर अडचणींची युद्ध” (पृ.६३)हे युद्ध का निर्माण केले जाते तर माणसाला बाध्य करण्यासाठी. विकृतांकडे माणसाला बाध्य करण्यासाठी असंख्य पर्याय आहेत. यात जात, धर्म, वंश, प्रदेश, लिंग इत्यादी घटक प्रभावी असून या घटकांच्या अस्मितेला कुरवाळून युद्ध घडवले जाते.
हे सर्व खरे
असले तरी पशुत्व ते मनुष्यत्व हा मानवी उत्क्रांतीचा प्रवास आहे हा प्रवास कसा आहे
तर,
“व्यक्ती म्हणून घडावे
माणसाला जोडावे
इमाने इतबारे आज
प्रतिकूलतेशी लढावे.”(पृ.६१)
असा आहे जे पिळलेले, वंचित, शोषित आहेत
अशा
“हतबलांच्या वंशा जावे
दुःख दैन्य कळावे
मूकनायक होऊन
समस्यांचे डोंगर गिळावे.”
संत तुकाराम म्हणतात त्याप्रमाणे ‘जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे’ शोषित, पीडित, वंचित जीवनाच्या
दुःखाचा अनुभव घेतल्याशिवाय त्यांचे दुःख अनुभवता येत नाही आणि म्हणून मग जेव्हा
आपण हे दुःख अनुभवतो तेव्हा त्यांच्या समस्यांचे डोंगर मूकनायक होऊन आपण गिळावे
जेणेकरून माणुसकीची पताका उंचावेल. माणुसकीची पताका उंचावणे ही खरी माणसाची
प्रवृत्ती आहे. मानवी हिंसा, भय, क्रोधावर
मिळवलेला तो विजय आहे. परंतु हा विजय मिळवण्यासाठी माणसाला पुन्हा युद्धच करावे
लागते. हे युद्ध न संपणारे असते. परंतु या युद्धात माणसे मारली नाहीत, तर जोडली जातात. माणसांना विभक्त करणाऱ्या जाती-धर्माच्या, वंशाच्या, प्रदेशाच्या सीमारेषा ओलांडल्या जातात.
यात ‘माणूस वारा’ वाहतो. हे युद्ध
शांती, करूणेचे असते आणि शांती करुणेसाठीच असते.
“फक्त सीमेवरच होत नाही युद्ध
फक्त देशा देशांचे होत नाही युद्ध
युद्ध आहे सुरू अंतर्बाह्य
युद्ध आहे चिरंतन
युद्ध आहे अटळ
युद्ध आहे अमर
युद्ध आहे अपरिहार्य
शरीर आणि मनही झालंय
एक महायुद्ध” (पृ.१८)
युद्ध सतत सुरू आहे, वर्तमानात युद्धाची परिभाषा बदललेली आहे.
“अणुबॉम्बची आता राहिली नाही गरज
कोरोना सारख्या विषाणूबॉम्बनेच घडताहेत युद्ध
शत्रु राष्ट्रांना संपवण्यासाठी”
अण्वस्त्र
हल्ल्यापेक्षा विषाणूंच्या माध्यमातून माणसे संपवली जात आहेत शत्रू राष्ट्राला नामोहराम केले जात आहे. परंतु हेच केवळ माध्यम आहे का ? तर नाही. शत्रू राष्ट्रच नव्हे तर स्वराष्ट्रातही माणसांना
अंकित करण्यासाठी विषाणू आणि इतर विविध पर्यायांचा वापर केला जात आहे.
आजचा वर्तमान
हा निर्घृण काळ असून एका महाभयंकराच्या दारात आपण उभे आहोत ‘मानवी उत्क्रांतीचा हा कोणता टप्पा?’
असा प्रश्न कवीला पडला आहे. कारण मूलतत्त्ववाद, लिंगभेद, वंशभेद, जातीभेद,
धर्मभेद यांनी आपले स्वरूप बदलवले असून ते सद्यस्थितीत अत्युच्च
टोकावर आहेत. चंगळवादाच्या विळख्यात अडकलेल्या मनुष्याला आपण एका गर्तेत अडकलेले
आहोत याचेही भान नाही. ज्या आरंभबिंदूपासून माणसाचा प्रवास सुरू होतो त्याच
आरंभबिंदूवर तो प्रवास संपतो. शेवट होतो. आणि पुन्हा तोच प्रवास अशा वर्तुळाकार
गर्तेत माणसाला फसवले जात आहे. त्यासाठी संगणक,
मोबाईल, इंटरनेट, विकास
आणि व्हायरसचा प्रभावी वापर केला जात आहे. युद्धखोर मानसिकतेने सबंध समाजाभोवती एक
अदृश्य फास आवळला असून त्यातून समाजाला निसटू न देण्यासाठी विविध क्लुप्त्यांचा
वापर केला आहे.
यातील पहिली क्लुप्ती ही जागतिक अर्थव्यवस्थेची आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत टिकण्यासाठी विकासाचे भ्रामक मॉडेल निर्माण केले गेले. विकासाच्या नावाखाली लोककल्याणकारी लोकशाहीला बाजूला सारून भांडवलदारी व्यवस्था उभी केली गेली. सरकारी सार्वजनिक क्षेत्रे भांडवलदारांच्या ताब्यात देऊन गगनचुंबी चकचकीत इमारतींना विकास म्हटले गेले. डोंगर पर्वत जंगले आणि जंगलातील लोकांचा अधिवास नष्ट करून भांडवलदारांसाठींच्या खनिज शोधाला विकास म्हटले गेले. शेकडो एकर जमीन हडप करून सिमेंट रस्त्यांच्या जाळ्यांना विकास म्हटले गेले. विकासाचा हिरवा गॉगल प्रत्येकाच्या डोळ्यावर असा काही चढवला की, प्रत्येकाला विकासाचे हिरवे प्रारूप दिसू लागले. आणि जो कोणी या भ्रामक विकासाला विरोध करतो त्याला विकास विरोधीच नव्हे तर राष्ट्रविरोधी, देशद्रोही ठरवले जात आहे.
शिक्षणाने माणसे सुबुद्ध होतात म्हणून
“शिक्षण योजना रद्द करून
पुन्हा केले वंचितांना शिक्षणापासून वंचित
हेच सरकारचे असेल
जनतेच्या मनातील भविष्यातील संचित” (पृ. ४०)
इथल्या शोषित, पीडित, दलित, वंचितांना हजारो वर्षापासून शिक्षणापासून दूर ठेवून त्यांना गुलाम केले. धर्माने त्यांचा शिक्षणाचा हक्क नाकारला. अशांना फुले -शाहू -आंबेडकरांच्या प्रेरणा कार्यशक्तीने शिक्षण मिळाले. हेच शोषित, वंचित सुबुद्ध झाले आणि माणसाला गुलाम करणाऱ्या धोरणाला विरोध करू लागले. आधुनिक काळात शिक्षणापासून वंचित ठेवता येत नाही म्हणून शिक्षण व्यवस्थाच बदलण्यात आली. आधुनिक वैज्ञानिक शिक्षण पाश्चात्त्य आहे, ते पाश्चात्यांनी निर्माण केलेले आहे, आपलेच पारंपारिक शिक्षण चोरून त्यांनी हे शिक्षण निर्माण केलेले आहे असा प्रचार करून तसेच पारंपारिक शिक्षण हेच कौशल्याचे शिक्षण आहे. म्हणून आपण आपले मूळचे पारंपारिक शिक्षण घेतले पाहिजे यासाठी नवे शैक्षणिक धोरण स्वीकारले गेले. या नव्या शिक्षणात ‘प्राचीन विद्यांना आलेय महत्त्व आधी वेद कानावर पडला तर ओतले शिसे’ आणि आता तेच कालबाह्य पारंपारिक शिक्षण अभ्यासा आणि नव्या शिक्षणापासून दूर जा असेच धोरण स्वीकारले जात आहे.
प्रचंड टोकाचा धार्मिक उन्माद निर्माण केला जातोय, त्यातून कट्टरतावादाचे जोमाने पीक येतेय. या कट्टरतावादामुळे धार्मिक दंगली घडत आहेत. धर्माला विकासाशी, अस्तित्वाशी, जीवनशैलीशी जोडल्यामुळे धर्मांधांची फौज निर्माण झाली आहे. “उन्मत धर्मवेडे मेंदू मुखात राम आणि बगलेत सुरी घेऊन उतरलेत रस्त्यावर विरोध अभिव्यक्त केलेल्यांना कापून टाकण्यासाठी.” (पृ.२७) ते हे विसरून गेलेले आहेत की, “धर्माने केला नाही माणूस निर्माण, माणसाने निर्मिला धर्म” असे धर्मांध भक्त स्वतः न्यायाधीश म्हणून धर्मशास्त्रानुसार न्याय देतात म्हणजेच काय तर शस्त्र हातात घेऊन कत्तली करतात.
हा वर्तमान
व्यामिश्र आहे. या वर्तमानाच्या जहाजाला धर्म,
शिक्षण, विकास, जागतिकीकरण,
सायबर विश्व, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, भांडवलदारांची मानसिकता यासारखी असंख्य भोकं पडली असून एक भोकं बुजवायला
जावं तर दुसऱ्यातून आत पाणी शिरतं. हे पाणी जहाजाला बुडवणार आहे किंबहुना हे जहाजच
बुडलं पाहिजे म्हणजे जेणेकरून आपली सत्ता अबाधित राहील असा युद्धखोर मानसिकतेचा
डाव आहे. त्यांचा हा डाव कवीने ओळखला असून त्यांच्या विरोधात त्याने एल्गार
पुकारलेला आहे आणि त्यासाठी आपल्यालाही युद्धाला सज्ज व्हावं लागेल याची त्याला
जाणीव आहे. आणि म्हणून तो म्हणतो,
“या निर्घृण काळात
जीव मुठीत घेऊन जगणाऱ्यास
व्हावे लागेल नायक
भावी पिढीचे आयुष्य
अंधारमय करणाऱ्या मेंदूला
ठेचून काढावे लागेल
आंदोलनाच्या कळपांनी
व्हावे लागेल एकमेकांचे सुरक्षा कवच”(११)
हा लढा
एकट्याचा नसून प्रबोधन पुरोगामीत्वावर श्रद्धा असणाऱ्या त्या सर्वांचा आहे आणि या
लढ्याला सर्वच बाजूंनी सर्वांनी प्रतिकार केला तर युद्ध जिंकण्याची शक्यता अधिक
आहे.
![]() |
| डॉ. प्रशांत राऊत उपाख्य वेणुप्रशांत |
कवीने दीर्घ
कवितेचा आकृतीबंध का निवडला तर याचे उत्तर त्याच्या कवितेत पाहावयास मिळते. हे आधी
आपण म्हणालेलोच होतो. वास्तवात, वर्तमानात जागतिकीकरण, धर्म, विकास,
शिक्षण, खाजगीकरण, संगणक
विश्व, माहिती तंत्रज्ञानाचे बदलते आयाम या सर्वांनी मानवी जीवनावर
प्रभाव पाडला आहे. हे सर्व घटक आज एकमेकांत गुंतलेले असून त्यातील कुठल्याही
घटकावर बोलायचे झाले तर सर्वच घटकांवर भाष्य करावे लागते. म्हणून कवी जे भाष्य
करतो ते दीर्घ बनते. वर्तमानाची संवेदना दीर्घपणे मांडण्यासाठी कवीने दीर्घ
कवितेचा आकृतीबंध निवडलेला आहे.
वेणुप्रशांत यांची कविता विचारप्रवण कविता आहे. ती माणसाला विचार करण्यास भाग पाडते. अलीकडच्या
काळात अंधभक्तांनी निर्माण केलेल्या विचारव्यूहाला ही कविता तडा देते. फुले, शाहू, आंबेडकरांच्या
विचारावर श्रद्धा असणारी ही कविता समता, बंधुता, न्याय यांची पताका फडकवत ठेवते. ही कविता रोखठोक असून ‘जगात थांबेल युद्ध, जेव्हा होता येईल बुद्ध’
असा संदेश देते.
जगदगुरु तुकोबाराय साहित्य परिषद, यवतमाळ
प्रथमावृत्ती २७ फेब्रुवारी २०२५
मूल्य - रु. ७०/-
टीप : डॉ. प्रशांत राऊत हे 'वेणुप्रशांत' या उपनामाने काव्यलेखन करतात.




आदरणीय अक्षय घोरपडे सर तुम्ही माझ्या कवितेकडे मला नव्याने बघायला लावले, मार्मिक सासमीक्षा आभार आणि धन्यवाद सर
उत्तर द्याहटवाधन्यवाद सर !
हटवाखूप छान आढावा घेतला सर या कवीचा. आपल्या लेखणीमध्ये सतेजपणा आहेच हे पुन्हा एकदा सिद्ध होत आहे.
उत्तर द्याहटवाआजच्या वास्तव परिस्थीतीचे दाहक कवीने आपल्या कवितेत रेखाटले अन् अक्षय सरांनी अगदी वास्तववादी विश्लेषण करुन या कवितेची उकल केली..
उत्तर द्याहटवाछान. .लेखणी तळपत राहो हिच सदिछा🌹👍अशोक ठाकरे उमरेड
'अंधभक्तांनी निर्माण केलेल्या विचारव्युहाला तडा देणारी कविता' यासारख्या शब्दशिवाय इतर शब्द या कवितेची समीक्षा करण्यासाठी कदाचित न्यायोचित नसतील इतक्या सुंदर समर्पक शब्दात मा. घोरपडे सरांनी या दिर्घ काव्याची समीक्षा केली.🌹🌹विजयानंद सावळे, उमरेड.
उत्तर द्याहटवा