बुधवार, १९ नोव्हेंबर, २०२५

फुलराणी : मराठी कवितेला पडलेले एक अद्भूत स्वप्न

 

फुलराणी : मराठी कवितेला पडलेले एक अद्भूत स्वप्न

    आजच्या ब्लॉगमध्ये आपण बालकवी यांच्या ‘फुलराणी’ या कवितेचे रसग्रहण करणार आहोत.

बालकविबद्दल थोडक्यात .....

त्र्यंबक बापूजी ठोंबरे ऊर्फ बालकवी हे मराठी कवितेला पडलेले एक अद्भूत स्वप्न आहे. धरणगाव, जि. जळगाव येथे जन्मलेल्या बालकवींना दुर्दैवाने अल्पायुष्य लाभले असले तरी या अल्पायुष्यात त्यांनी मराठी कविता समृद्ध केली. १९०७ साली जळगाव येथे किर्तीकरांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मराठी साहित्य संमेलनात किर्तीकरांनी त्यांना 'बालकवी' ही उपाधी दिली. त्यावेळेस त्यांचे वय केवळ अठरा वर्ष होते. १८९० ते १९१८ या अठ्ठावीस वर्षाच्या आयुष्यात त्यांनी लक्षणीय काव्यलेखन केले. निसर्ग कवी म्हणून त्यांचा उल्लेख होत असला तरी स्वच्छंदतावादी कवितेला त्यांनी नवा आयाम दिला हे नाकारता येत नाही.

 

आशय रसग्रहण 

'फुलराणी' ही बालकवींची अतिशय प्रसिद्ध अशी रचना आहे. "आदले दिवशीच्या संध्याकाळी एक विकसनयोग्य कळी दुसरे दिवशी प्रभातकाली सूर्याच्या प्रथम किरणाचा स्पर्श होताच एक फूल म्हणून उमलते, ही सृष्टीतील नेहमीची घटना बालकवींनी आपल्या स्वप्निल डोळ्यांनी पाहिली आणि 'फुलराणी' या सदैव टवटवीत काव्यपुष्पाचा जन्म झाला.

निसर्गातील एका घटनेचे बालकवींनी प्रथम एका प्रीतीकथेत आणि नंतर एका स्वयंवर काव्यात रूपांतर केले आहे. बालकवी निसर्ग कसा पाहत-अनुभवत होते, निसर्गाशी तदात्म पावतांनाही आपले भावविश्व निसर्गावर कसे लादत होते, याही दृष्टीने या कवितेकडे पाहणे मोठे स्वारस्याचे ठरते." (डॉ. दत्तात्रय पुंडे, डॉ. स्नेहल तावरे, त्रिदल, पृ.८०-८१)

माळरानावर एका उगवलेल्या कळीला वाऱ्यांवर डोलताना पाहून बालकवींना फुलराणी कविता सुचली. उमललेल्या कळीत त्यांना फुलराणी दिसली. नव्हे तिचे नामकरण त्यांनी फुलराणी केले. ही फुलराणी तारुण्याच्या उंबरठ्यावर आहे 'प्रणय चंचला त्या भ्रुलीला अवगत नव्हत्या कुमारिकेला' अशी ही कुमारिका 'आईच्या मांडीवर बसूनी झोके घ्यावे गावी गाणी' एवढेच तिला माहिती आहे, ती अगदी साधी भोळी आहे आणि आपल्याच मनोविश्वात रममाण आहे. अशा या साध्याभोळ्या फुलराणीच्या मनात प्रणयभावना जागृत झालेली आहे. आकाशातला गोजिरवाणा रविकर तिला आवडतोय आणि त्याच्यावर ती लुब्ध झालीय. हे संध्यासमयी वाहणाऱ्या वाऱ्याने बरोबर हेरले. तो हासत हासत फुलराणीकडे येतो आणि तिच्या मनातले गुज ओळखतो. तो म्हणतो,

"छान माझी सोनुकली ती - कुणाकडे ग पाहत होती?

कोण बरे त्या संध्येतून - हळूच पाहते डोकावून ?

तो रविकर का गोजिरवाणा - आवडला आमुच्या रार्णीना?"

त्याच्या या वचनांनी फुलराणी लाजलाजते. म्हणजे याचा अर्थ ती आता तरुण झाली आहे आणि तारुण्यसुलभ भावना तिच्या मनात जागृत झालेल्या आहेत. तिचे मन स्थिर नाही. चित्त थाऱ्यावर नाही. आपल्याच विचारात ती गढून गेलेली आहे. 'आंदोली संध्येच्या बसुनी झोके झोके घेत रजनी' आलेली आहे. त्या रजनीचे नेत्र विलोल-नभी चमकती ते ग्रहगोल। जादूटोणा त्यांनी केला चैन पडेना फुलराणीला” रात्र प्रौढ होत आहे. सर्व सृष्टी निद्रेच्या आधीन आहे तरीही फुलराणीचा डोळ्याला डोळा लागत नाही ती जागीच आहे. मध्यरात्री कधीतरी फुलराणी निद्राधीन होते आणि स्वप्न पाहते. स्वप्नात ती पाहते की,

"कुणी कुणाला आकशात - प्रणयगायने होते गात

हळुच मागुनी आले कोण - कुणी कुणा दे चुंबनदान"

चित्ती प्रणयाचे हे खेळ पाहून फुलराणीला गोजिरवाण्या रविकराचा विरह तीव्रतेने जाणवू लागतो. फुलराणीची ही अवस्था पाहून व्योमीच्या प्रेमदेवताही वाऱ्यासवे विहार करताना धरतीवर आल्या आणि फुलराणीला पाहून त्या म्हणतात 'ही आमची राणी' आहे. 

"स्वर्भूमीचा जुळवित हात - नाचनाचतो प्रभाववात

 खेळुनि दमल्या त्या ग्रहमाला - हळुहळु लागति लपायला

 आकाशींची गंभीर शान्ती - मंदमंद ये अवनीवरती

विरू लागले संशयजाल - संपत ये विरहाचा काल

शुभ्र धुक्याचे वस्त्र लेवुनी - हर्षनिर्भरा नटली अवनी !

स्वप्नसंगती रंगत होती - तरीही अजुनी फुलराणी ती !"

 

विरहाचा काल संपला आहे. शुभ्र धुक्याचे वस्त्र लेवून सकाळ उगवली आहे. तो रविकर आकाशात आला आहे. परंतु फुलराणी मात्र अजुनही स्वप्नमय आहे.

आकाशात लख्ख पांढरा तेजोमय मंडप उभारला आहे. फुलराणी व रविकराच्या लग्नासाठी वऱ्हाडींचे आगमन होत आहे. लाल सुवर्णी झगे घालून, तर कोणी गुलाबी फेटे बांधून येत आहेत. आकाशातला चंडोल पक्षी वाङ्निश्चय करण्यासाठी निघालेला आहे. आकाशातले पक्षी मंगलपाठ म्हणताहेत तर वारा सनई वाजवतो. कोकिळा तान घेते आणि भारद्वाज आनंदाने नाचतोय. निर्झर पखवाज वाजवतोय अशा रम्य मंगल परिणयासाठी सोनेरी रविकर नवरदेव म्हणून आलाय तर नवरीही फुलराणी सुंदर आहे. दोघांचे लग्न लागतेय पक्षी, वारे यासह सारे सावध झाले. दवाचा अंतरपाट हटून रविकर आणि फुलराणीचे लग्न लागले.

या लग्नात वधूवरांसाठी त्यांच्या प्रेमाची कहाणी सांगणारी मंगलगाणी गायली. वनदेवीही फुलराणीची ही गोड कहाणी वातावरणात लिहीत आहे. एवढेच नव्हे तर कवीसुद्धा विहार करण्यासाठी तेथे गेला असता तेव्हा हा मंगल सोहळा पाहून तर त्याने नवगीतांनी वधूवरास आशीर्वाद अभिषेक केला.  




सजीवतेवर मानवी रूपक

बालकवींची ही काव्यरचना मराठी कवितेतली एक महत्त्वाची रचना म्हणून ओळखली जाते. ही लोकप्रिय अशी रचना आहे. यात कवीने निसर्गाचे विलोभनीय रूप चित्रित केलेले आहे. संध्याकाळ-रात्र-सकाळ या तिन्ही प्रहरात निसर्गाचे असणारे रूप त्याचा मानवी मनावर पडणारा प्रभाव आणि त्यातून उत्फुल्ल होणाऱ्या चित्तवृत्ती यांची सांगड कवीने निसर्गाशी जोडून अलौकिक असे वर्णन केलेले आहे. फूल, आकाशातला रविकर, मारूत, कोकीळ, चंडोल, भारद्वाज या सर्व निसर्गातील सजीवतेवर मानवी रूपक योजून कवीने चेतनागुणोक्ती साधलेली आहे. वाऱ्यावर डोलणारे इवलेसे फूल, ते फूल नसून फुलराणी आहे. संध्यासमयी, प्रभातसमयी लालबुंद असणारा सूर्य गोजिरवाणा आहे. संध्याकाळी वाहणारा वारा प्रौढ आहे. मध्यभागी रात्रकिड्यांची किरकिर, वनदेवीचा विहार, व्योमीच्या प्रेमदेवता, पुन्हा सकाळी पक्ष्यांची किलबिल, आकाशात सोनेरी कडा लाभलेल्या ढगांची गर्दी, कोकिळेची तान, चंडोल पक्ष्याचा विहार, निर्झराची खळखळ आणि दवबिंदूची चादर वास्तविक या सर्व गोष्टी नित्याने आपणास दिसतात. परंतु कवीने या सर्वावर आपल्या प्रतिभेने मानवी जीवनाचे रूपक योजले. आणि एक नवगीत साकार केले. या सर्वांच्या मिश्रणातून त्यांनी प्रेमकहाणीला जन्म दिला त्यात नायिका म्हणून फुलराणी तर नायक म्हणून रविकराची निवड केली आणि आपोआपच त्यातून एक मनोहर दृश्य तयार झाले.

सदर कविता वाचताना, अनुभवताना आपल्या जीवनातील मंगल परिणयाचे आपण साक्षात अनुभव अनुभवत आहोत असा भास होतो. "बालकवीच्या प्रतिभेचे झाडून सर्व विशेष ह्या कवितेत आढळतात. उत्स्फूर्तता, स्वाभाविकता, रम्यता, चित्रात्मकता इ. त्यांचे काव्यगुण या कवितेत अत्यंत सरलपणाने येऊन बसलेले आहेत. प्रेमाच्या उदयाची नाजूक भावना तितक्याच नाजूक शैलीत आविष्कृत करण्यात बालकवींना यश आलेले आहे. आणखी एक गोष्ट म्हणजे या प्रीतीभावनेला कवीने खेळकरपणाची आणि नर्मविनोदाची किंचित डूब दिलेली आहे." (डॉ.द.दि.पुंडे, डॉ. स्नेहल तावरे, त्रिदल, पृ.८१). त्यामुळे ही कविता तरल, विलोभनीय व आकर्षक झालेली आहे.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

जागतिकीकरण आणि आदिवासी

  जागतिकीकरण आणि आदिवासी डॉ . अक्षय किशोर घोरपडे. ·        गोषवारा  (Abstract) :- १९९० नंतरचा कालखंड हा भारतीय समाज जीवनात फार मोठा सा...