समीक्षेचे स्वरूप
अक्षय किशोर घोरपडे.
·
प्रस्तावना
“ मानवाचे जगणे, त्याचे अस्तित्व टिकणे, त्याची सुरक्षितता आणि सुखसमृद्धी
यासर्व गोष्टीसाठी त्याला प्रकृतीचे, निसर्गाचे आणि समाजाचेही ज्ञान हवे. या
ज्ञानाची त्याला नितांत आवश्यकता आहे. याबाबत थोडी बहुत ढिलाई झाली तरी त्याचे
अस्तित्व धोक्यात येण्याचा संभव आहे. म्हणून कुठलाही जागरुक समाज अशा ज्ञानप्राप्तीबद्दल
दक्ष असतो. वाद्मयविषयक ज्ञानाची निकड समाजाला जाणवते का? वाद्मय आणि कला यांच्या
विषयीचे ज्ञान त्यांच्या जगण्याला टिकण्याला आवश्यक नसेल तर तो या ज्ञानाबद्दल
फारसा जागरूक व दक्ष राहणार नाही हे उघड आहे. याचा अर्थ या ज्ञानाची समाजाला गरज
नाही, असा नाही.”१
वरील परिच्छेदात सुधीर रसाळ यांनी एकूणच साहित्याभ्यासाच्या प्रक्रीयेसंदर्भात
मुलभूत मुद्दा उपस्थित केला आहे. साहित्याच्या अभ्यासाची समाजाला निकड आहे का? आणि
असलीच निकड तर ती कशी आहे? हा खरा प्रश्न आहे. साहित्य हे जीवनाचे दर्शन घडवते असे
मानणारा एक वर्ग आणि साहित्य हे सौंदर्याची निर्मिती करते हे मानणारा एक वर्ग या
दोन्हीचा विचार केला तरी मानवाच्या जैविक उत्क्रांतीत साहित्याच्या अभ्यासाची निकड
असेल तर ती कशी आहे ? आणि त्यातून नेमके काय निष्पन्न होऊ शकते ? आणि कशाच्या
माध्यमातून हा अभ्यास होऊ शकतो ? ज्ञानाच्या परंपरेचा विचार केला तर साहित्याचा
अभ्यास हा समीक्षेच्या माध्यमातून होऊ शकतो हे मान्य करावे लागते. या समीक्षेची
नेमकी प्रक्रिया कशी आहे हे येथे आपणास पाहावयाचे आहे. तसेच ज्ञानाच्या प्रक्रियेत
साहित्याच्या अभ्यासाची निकड का आहे हेही जाणून घ्यावयाचे आहे.
‘मला ‘क्ष’ ही कादंबरी फार
आवडली’, ‘मला ‘क्ष’ हा काव्यसंग्रह भिकार वाटला’ ही विधाने जेव्हा आपल्या कानावर पडतात, तेंव्हा ही विधाने एका विशिष्ट चौकटीतल्या
व्यवहाराविषयी भाष्य करत असतात. तसेच ती एका विशिष्ट विचारव्यूहातून आलेली आहेत
याचीही आपणास जाणीव होते. वरील विधाने
ही ज्या विशिष्ट चौकटीतल्या व्यवहाराविषयी भाष्य करत असतात तो
विशिष्ट चौकटीतला व्यवहार म्हणजे साहित्यसमीक्षेचा प्रांत होय. साहित्यसमीक्षा हा
साहित्यव्यवहारातील एक महत्त्वाचा भाग आहे. आधी साहित्य निर्माण होते निर्माण
झालेल्या साहित्याचे मूल्यमापन करणे म्हणजे समीक्षा होय. या अर्थाने समीक्षा
व्यवहार हा दुय्यम पातळीवरचा व परपोषी व्यवहार आहे, असे आपणास म्हणता येते. येथे असा आक्षेप निर्माण
होण्याची शक्यता आहे की, आवडनिवड व मूल्यमापन करणे हे मानवी स्वभावाचे एक
उपजत व स्थायी महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य असले तरी “वाद्मयाच्या रसास्वादाला समीक्षेची गरज नाही. चांगले नाटक
पाहिले, चांगली कविता वाचली किंवा चांगले शिल्प पाहिले की रसिकाला कलात्मक अनुभव
येतोच. त्यासाठी मध्यस्थाची म्हणजेच समीक्षकाची
गरज लागत नाही. उलटपक्षी, समीक्षकाच्या विश्लेषणाने सौंदर्याचे स्वप्नभंग
पावण्याची भीती असते. शिवाय असुंदराला सुंदर ठरविण्यासाठी पारिभाषिक शब्दावडंबर
रचणारी समीक्षकांची चतुराई तर भयप्रदच असते !”२ असे सर्वसामान्यांच्या मनात येत
असले किंवा त्यांचे मत ठरत असले तरी “समीक्षा ही निसर्गतःच म्हणजे मनुष्यस्वभावामुळेच, जन्माला येते. नुसता स्वतःपुरता आनंद घेऊन थांबणे हा
मनुष्य धर्मच नव्हे.”३ आपल्याला
होणाऱ्या आनंदाचे स्वरूप हे इतरांना ही कळावे
ही मानवी प्रवृत्ती एकदा मान्य केली तर हे लक्षात येते की, मूल्यमापनाची म्हणजेच समीक्षेची प्रक्रिया ही मानवी अनुभवावर आधारित असते. अनुभवाशिवाय व्यक्ती मूल्यमापनाकडे वळत
नसतो. उदाहरणार्थ ‘आंबा हा मधुर आहे, म्हणून तो मला
आवडतो’ हे आपण कशावर ठरवले तर आधी आपण आंब्याची चव घेतली.
सातत्याने घेतली. इतर फळांच्या चवीशी त्याची तुलना केली. तेव्हा आपण या
निष्कर्षापर्यंत पोहोचलो. परंतु एखाद्याने आंब्याची चवच घेतलेली नसेल किंवा
त्याच्या वाट्याला मधुर आंबाच आलेला नसेल तर तो
अशा निष्कर्षापर्यंत पोहोचणारच नाही. किंबहुना त्याचा निष्कर्ष अजून वेगळा असेल.येथे
अनुभव हा महत्त्वाचा मुद्दा आहे. साहित्याचे परिशीलन केल्याशिवाय साहित्याची
समीक्षा अस्तित्वात येत नाही. म्हणून आधी साहित्य व नंतर समीक्षा तसेच आधी अनुभव
मग मूल्यमापनात्मक निष्कर्ष हे गृहितक मान्य करून आपणास पुढे जावे लागते.
· विषय विवेचन :
समीक्षा म्हणजे साहित्यकृतीचे मूल्यमापन
साहित्यकृतीच्या परिशीलनानंतर समीक्षक थेट मूल्यमापनात्मक निष्कर्ष मांडत नसतो तर
त्याआधी तो विविध पातळ्यांवरील पायऱ्यांवरून जात असतो. यात वाचन, आकलन, आस्वादन, विश्लेषण, मूल्यमापन अशा
क्रमाचा विचार करावा लागतो. या क्रमात वाचन, आकलन, आस्वादन, विश्लेषण यांचा एक वर्ग आणि मूल्यमापन यांचा एक वर्ग
अशा दोन वर्गात त्यांची विभागणी करता येते. विश्लेषणाच्या सोयीसाठी यांना आपण
अनुक्रमे ‘अ’ आणि ‘आ’ असे म्हणू या (‘अ’ गटात वाचन, आकलन, आस्वादन, विश्लेषण तर ‘आ’ गटात मूल्यमापन) समीक्षेच्या संदर्भात विचार केला तर
‘अ’ हा ‘आ’ वर अवलंबून आहे का? किंवा ‘आ’ हा ‘अ’ वर अवलंबून आहे का? किंवा या दोन्हीमधील ‘अ’ आणि ‘आ’ यामधील आंतरसंबंध
कसे आहेत? याचा विचार येथे आवश्यक आहे.
समीक्षेकडे
वळण्यापूर्वी हे ही निश्चित करून घेणे आवश्यक आहे की, साहित्य आणि साहित्यसमीक्षा हे दोन्ही व्यवहार कोऱ्या मनाने अस्तित्वात येत
नाहीत. साहित्य निर्माण करणारा साहित्यिक व साहित्याची समीक्षा करणारा समीक्षक हे
विशिष्ट सामाजिक पर्यावरणातून आलेले असतात. त्या सामाजिक
पर्यावरणाचा त्यांच्यावर प्रभाव पडलेला असतो. विशिष्ट सामाजिक पर्यावरणातील संकेत व्यूहातून त्यांची जीवनदृष्टी आकारास
आलेली असते. आणि याचा काही एक प्रभाव त्यांच्या निर्मितीवर होण्याची दाट नसली तरी शक्यता ही असते. उदाहरणार्थ मराठी साहित्यातील कुठलाही लेखक अथवा त्या लेखकाची कलाकृती यांचा
आस्वाद घेतल्यास; अनुभवल्यास वरील विधानाचा प्रत्यय येऊ शकतो. परंतु फक्त
कलाकृती म्हणून विचार केल्यास, “जीवनातील व्यापार व अनुभव ज्ञानात्मक,
सुखदुखात्मक व कलात्मक असे असूनही मनुष्याच्या उद्दिष्टपूर्तीच्या खांबाभोवती ते
गोफाप्रमाणे विणले जात असतात; तेंव्हा प्रत्येक जातीच्या व्यापाराचा
सर्व जीवनाशी संबंध असतो. पण याचा
आधार घेऊन कलेचे
मूळ स्वरूप म्हणजे जीवनच असे भोंगळ समीकरण मांडणे योग्य होणार नाही. तसेच कलेचा
ज्ञानाशी व सामाजिक, आर्थिक
इत्यादि व्यापरांशी संबंध असतो; म्हणून अर्थकारणाशी किंवा समाजजीवनाशी
समीकरण जोडणे चुकीचे ठरेल”४
कलाकृतीचा
कलाकृती म्हणून समीक्षेवर पडणारा प्रभाव यांचा स्वतंत्र विचार आपण पुढे करणारच
आहोत.
आणखी एक गोष्ट निश्चित करणे आवश्यक आहे की, साहित्यिकाने निर्माण केलेली कलाकृती ही एक सेंद्रिय
संघटना असते. स्वतंत्र व स्वायत्त रूप घेऊन जन्माला आलेले ते घटित असते.म्हणजेच
तिच्या मूल्यमापनाचे निकष तिच्यातच दडलेले असतात. “समिक्षकाकडे आलेली प्रत्येक साहित्यकृती त्याच्या
दृष्टीने मुल्येच्छू असते
त्याला या गोष्टीचे भान सतत राखावे लागते.” ५ हे गृहीत धरले तर समीक्षकाच्या विचारव्यूहातून आलेले निकष व साहित्यकृतीतील निकष हे परस्परविरोधी ठरण्याची
शक्यता नाकारता येत नाही. म्हणून मग अशा पातळीवर समीक्षकांकडून योग्य मूल्यमापनाची
शक्यता धूसर ठरू शकते. या अवस्थेतून समीक्षकालाच मार्ग
काढणे गरजेचे आहे.
आता आपल्या पहिल्या सूत्राकडे वळू या. ‘अ’ हा ‘आ’ वर अवलंबून आहे का? तर ‘अ’ च्या क्रमातील प्रथम असणाऱ्या
वाचनापासून सुरुवात करु.‘वाचन’ हा या
प्रक्रियेतला सर्वात पहिला व महत्त्वाचा घटक. परिपूर्ण वाचन हे कोणाचेच नसते
किंबहूना असेही म्हणता येते की, एखादा व्यक्ती
कितीही चोखंदळ वाचक असला तरी त्याच्या वाचनाची रीत/ पॅटर्न हा ठरलेला असतो (येथे तो संथ वाचतो किंवा गतीने वाचतो हे अपेक्षित नाही) एखाद्या व्यक्तीला कादंबरी वाचनात
गती किंवा रुची असेल तर तुलनेने तो इतर वाङमय प्रकाराच्या वाचनाकडे दुर्लक्ष करतो.
कादंबरी वाचकप्रिय वाचकाकडे काव्यसंग्रह वाचनास आला तर त्याचे वाचन हे सहेतुक व
निर्दोष होईलच हे निश्चित सांगता येत नाही. काव्यात आवश्यक असणारे प्रतिमांचे योजन, लयबद्धता, शब्दांची शैलीत्मक
मांडणी इत्यादी वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ
आपल्याकडे एका वाङमय नियतकालिकात एका कवीने ‘एक कविता ही दहा कादंबरीच्या
बरोबरीची असते’ असे भंपक विधान केलेले होते. त्यावर बराच खल झाला.
परंतु अशी विधाने ही अपुऱ्या वाचनातून आलेली असतात. किंवा जो वाद्मय प्रकार प्रिय असतो त्या वाद्मयप्रकाराच्या अतिरेकी आवडीतून आलेली असतात.
वाचन परिपूर्ण नसेल तर आकलन ही परिपूर्ण होणार नाही.
वरील उदाहरणावरून त्याची प्रचिती आपणास येते. आकलनाच्या संदर्भात येथे मी काही फार
मांडणी करत नाही. यासाठी की व्यक्तीचे आकलन हे परिस्थितीवर अवलंबून असते. आकलनात केवळ कलाकृतीचा आशय येत नाही तर
कलाकृतीची संपूर्ण भाषिक संघटना ही येते आणि आकलनाची प्रक्रिया ही मूल्यमापनाच्या शेवटच्या
स्तरापर्यंत सुरू असते.
वाचन आकलनानंतर येते ती आस्वादनाची प्रक्रिया. “ललित वाडमय हा मुख्यत: आस्वादाचा विषय
आहे. या आस्वादाचे काही ज्ञानात्मक व नैतिक परिणाम होतात काय हा मात्र वादविषय
आहे.”६ आस्वादनाची
प्रक्रिया ही मुख्यतः दोन पातळीवर कार्यरत असते. एक म्हणजे मनोरंजनात्मक व दुसरी
म्हणजे जागृतीच्या पातळीवर. या दोन्ही पातळ्यांना आपल्याला पुढील उदाहरणातून समजून
घ्यावे लागते. उदाहरणार्थ कविता महाजन यांची ‘भिन्न’ही कादंबरी. या कादंबरीचे एकूण कथानक आणि मांडणी पाहता ही कादंबरी आमचे मनोरंजन करते का? की जाणीव जागृती
करते? हा प्रश्न व्यक्तीच्या मगदुरावर अवलंबून आहे. व्यक्ती हा कोणत्या सामाजिक परीवेशातून
आलेला आहे, त्यावर कोणते सामाजिक संस्कार झालेले आहेत. आणि त्यातून त्याचे विचार
नेमके कसे घडलेले आहेत. यावर आस्वादाची प्रक्रिया अवलंबून असली तरी साहित्य हे
मानवी भावनांना आवाहन करणारे असते. मन पिळवटून टाकणारे साहित्य हे सामाजिक
संस्कारांना पार करून व्यक्तीला विचार करण्यास भाग पाडते. म्हणून मग भिन्न कादंबरी
ही केवळ मनोरंजन करत नाही तर समीक्षकाला
आस्वादाच्या दुसऱ्या पातळीवर कार्यरत करते. जागृतीच्या
पातळीवर कलाकृती आस्वादणारा समीक्षक हा कलाकृतीचे अर्थनिर्णयन करत असतो. या अर्थनिर्णयातून
तो विश्लेषणाच्या पातळीवर जातो. हे विश्लेषण मानसिक पातळीवर होत असते. विश्लेषणात
समीक्षक हा तर्कसंगती लावत असतो. लेखकाने आशयाला बळकटी येण्यासाठी मुद्दामहून
केलेले भाषिक प्रयोग, प्रसंगाची योजना, कथानकाला दिलेली
कलाटणी इत्यादीच्या तर्कसंगत मांडणी नंतर कलाकृतीचे एकंदर आकलन व आस्वादन होत असते यानंतर सुरू
होते ती मूल्यमापनाची प्रक्रिया.
वरील विवेचनावरून हे निश्चित होते की, ‘अ’ हे ‘आ’वर अवलंबून आहे.
येथे आणखी एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे की, वाचन, आकलन, आस्वादन आणि
विश्लेषणाच्या प्रक्रियेतून गेलेला वाचक मूल्यमापनाकडे वळेलच याची काही शाश्वती
नाही. आणि समजा तो मूल्यमापनाकडे वळालाच तर आधीच्या सर्व प्रक्रियांचा निश्चितच त्याला फायदा होतो.
मूल्यमापनाची प्रक्रियाही समीक्षेची प्रक्रिया असते. मूल्यमापनात तार्किक विचार, संकल्पना व्यूह, लेखकाची जीवनदृष्टी, कलाकृतीचा रूपबंध, तिची अंगे उपांगे, कलाकृतीचे
अर्थसूचन, परंपरेत कलाकृतीचे स्थान, कलाकृतीने निर्माण केलेले आदर्श या अनुषंगाने विवेचन
घडत असते. समीक्षकास ही दृष्टी प्राप्त होण्यास व त्याचे विवेचन परिपूर्ण होण्यास ‘अ’ ची मदत होते म्हणजेच ‘आ’ हे ‘अ’ वर अवलंबून असते.
हे सिद्ध होत जाते.
आता या दोहोतील
आंतरसंबंधाचा विचार करू या. या दोहोतील आंतरसंबंध हा परस्परांवर अवलंबून असतो हे आपल्या वरील
विवेचनावरून सिद्ध होत जाते यात काही शंका नाही. परंतु हा आंतरसंबंध समीक्षेत नेमक्या कशा पद्धतीने
कार्यरत होतो हे समजणे गरजेचे आहे. आपण आधी म्हटल्याप्रमाणे समीक्षक हा कोर्या
मनाने हा व्यवहार करत नसतो तर तो ज्या सामाजिक पर्यावरणातून आलेला असतो त्या
सामाजिक पर्यावरणातील संकेतव्यूहानी त्याची दृष्टी तयार झालेली असते. ही दृष्टी
दृढ व निश्चयी असली तरी
संवेदनशील असते. विशिष्ट लेखकाने विशिष्ट परिघातील केलेले जीवनाचे चित्रण समीक्षकास
त्याच्या जीवनदृष्टीस छेद देणारे असू शकते किंवा अनुकूलही असू शकते. अशावेळी
तो कलाकृतीला कसा प्रतिसाद देतो? हे पाहणे रंजक आहे. साधारणपणे पहिल्या वाचनाने
त्याच्या आकलनाच्या पातळीवर काही प्रतिक्रिया उमटतात. या प्रतिक्रिया अनुकूल
असतीलच असे नव्हे. प्रतिकूल असतील तर समीक्षकाची विचारप्रक्रिया सुरू होते. एका नव्या
जीवनविश्वाचा तो आस्वाद घेतो.हा आस्वाद जागृतीच्या पातळीवर जात
असल्याने त्यासंबंधीचे विश्लेषण त्याच्याकडून घडते. व तो मूल्यमापनाच्या पातळीवर
जातो. मूल्यमापनाला सामोरे जातांना आशयाच्या मजबुतीसाठी लेखकाने केलेले विविध
प्रयोग त्याच्या लक्षात येतात. एक संपूर्ण सजीव सेंद्रिय संघटना असलेली कलाकृती
त्याच्या समोरच असल्याने कलाकृतीला प्रमाण ठेवून समीक्षक आपली काही ठाम व ठोस निष्कर्षाची
मांडणी करतो. निष्कर्ष मांडण्यापूर्वी आपल्या जीवनानुभवाशी तो कलाकृतीतल्या
जीवनानुभवाची तुलना करतो. तेव्हा कलाकृतीला उपजतच असलेल्या अनेक अर्थत्वाचे सत्य त्याला सापडते व
मूल्यमापनाची प्रक्रिया घडते. येथे कलाकृती ही एक भाषिक संघटना आहे हे ही लक्षात
घेणे गरजेचे आहे. साहित्यिक हा कलाकृतीत आशयाच्या अनुषंगाने जसे विविध प्रयोग करत
असतो तसेच तो भाषिक पातळीवरही प्रयोग करत असतो. त्याने केलेले प्रयोग हे वाचकाला
अर्थत्वाच्या सर्वोच्च पातळीवर नेण्यासाठी असतात. किंवा वाचकाच्या विचारव्युहाला
कलाटणी देणे हा त्याचा मुख्य उद्देश्य असतो. उदा. येथे ‘गोलपिठा’ या नामदेव ढसाळ
यांच्या काव्यसंग्रहातील ‘घर सोडताना’, ‘निमित्त १५ ऑगस्ट ७१’ या दोन कविता. या
दोन्ही कवितांमध्ये ढसाळ यांनी भाषिक प्रयोग केलेले आहेत. कवितेचा आशय समजून
घेतांना जाणीवपूर्वक केलेल्या भाषिक प्रयोगाला दुर्लक्षित करता येत नाही. भाषिक
पातळीवर विश्लेषण केले तर कवितेचा अर्थ अधिक गडद होतो. कवितेतील सामाजिक
परिणामाच्या संदर्भात कवीने केलेले भाष्य अधिक ठळक व उठावदार होते. एकप्रकारे
कवीच्या कृतीशिलतेचा तो परिचय असतो. म्हणजे कवी केवळ अभिव्यक्त होऊन मोकळा होत
नाही तर भाषिक पातळीवरही त्याची शारीरिक कृती अभिव्यक्त होते. ‘घर सोडताना’ या कवितेच्या
पुढील ओळीतून हे अधिक स्पष्ट होईल
“तू मूग गिळून आहेस तुला फक्त तीन मिंट दिली जातील
तू मूग गिळून आहेस बोल
बोल बोल
बोल बोल बोल”७
कविवर्य ढसाळ यांच्या या ओळीतून दिसून
येणारा भाषिक प्रयोग व्यक्तीपरत्वे भिन्न असला तरी एक मात्र निष्पन्न होते ते असे
की, कवी कृतीसाठी उतावीळ झालेला आहे त्याची शारीरिक उर्जा या ओळींच्या प्रयोगातून
दिसून येते. हे कोणीही नाकारू शकत नाही.
साहित्याच्या अभ्यासाची निकड कशासाठी असा
प्रश्न आपण सुरवातीलाच उपस्थित केला तर त्याचे उत्तर आपणास असे देता येते की,
साहित्य वाचनाने मानवी अभिरुची विकसित होत असते. मानवी जैविक उत्क्रांतीत
अभिरुचीची महत्वपूर्ण भूमिका आहे. अभिरुचीशिवाय सामाजिक संस्थांची निर्मिती अशक्य
होय. अभिरुची संपन्न झालेला माणूस मानसिक पातळीवर सक्षम, विचारी, सजग व सौंदर्यशील
बनतो चांगले वाईट जाणून घेण्याची तर्कशीलता त्यात निर्माण होते. कुठल्याही सामाजिक
तसेच तंत्र, विज्ञान शिक्षणाच्या अभ्यासासाठी ही वृत्ती विधायक असते. विकसित
अभिरुची कल्पनेला सर्जनशीलतेला वाव देते. म्हणून साहित्याच्या अभ्यासाची निकड
जाणवते.
सारांश
, साहित्यसमीक्षा व्यवहार हा परपोषी असला तरी समीक्षेने स्वतंत्रपणे आपले अस्तित्व
निर्माण केलेले आहे. समिक्षेमुळे मूल्यमापनाच्या विविध पद्धती व्यक्तीसापेक्षतेमुळे
निर्माण झाल्या असल्या तरी मूल्यमापनाची विशिष्ट चौकट असते, ती चौकट समजून
घेतल्याशिवाय समीक्षेकडे वळता येत नाही. साहित्य कलाकृतीची जाण असलेला व्यक्ती
साधारण कुवतीचा असला तरी मूल्यमापनाच्या संदर्भात महत्वाचे निरीक्षण नोंदवू शकतो
आणि स्वतःची समीक्षा पद्धती विकसित करू शकतो. साहित्याचा अनुभव घेणे यात आधी
महत्वाचे असते अनुभव नसेल तर कलाकृती नीट समजून घेता येणार नाही आणि मुल्यमापनही
नीट होणार नाही. किंबहुना असे म्हणता येते की, मूल्यमापनातून कलाकृतीला न्याय
मिळणार नाही.
संदर्भ :
१.
रसाळ सुधीर, ललित वाद्मयाचे अध्यापन : उद्दिष्टे व
स्वरूप, साहित्य अध्यापन आणि प्रकार (वा. ल. कुलकर्णी गौरव ग्रंथ), मौज प्रकशन गृह, मुंबई, पुनर्मुद्रण २०११, पृ. २९.
२.
बेडेकर दि. के., सौंदर्य आणि वाद्मय समीक्षा ,
साहित्य –विचार, लोकवाद्मयगृह प्रकाशन, मुंबई, आ. दुसरी, जानेवारी २००७ पृ. ७७
३.
तत्रेव, पृ. ७७
४.
तत्रेव, पृ.
६
५.
पाटणकर रा.
भा., समीक्षेतील वर्णन, विश्लेषण व मूल्यमापन, साहित्यविचार आणि सौंदर्यशास्त्र, मौज प्रकशन गृह, मुंबई, पहिली आ. २००१, पृ. ४
६.
रसाळ सुधीर, ललित वाद्मयाचे अध्यापन : उद्दिष्टे व
स्वरूप, साहित्य अध्यापन आणि प्रकार (वा. ल. कुलकर्णी गौरव ग्रंथ), मौज प्रकशन गृह, मुंबई, पुनर्मुद्रण २०११, पृ. ३३.
७.
ढसाळ नामदेव, घर सोडतांना, गोलपिठा, समग्र नामदेव ढसाळ भाग १ संपा.
मल्लिका अमरशेख, महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळ मुंबई, प्रथमावृत्ती २०१७, पृ.
३३.

सविस्तर माहिती.
उत्तर द्याहटवा❤️👍
उत्तर द्याहटवा