गुरुवार, २ ऑक्टोबर, २०२५

"चला आज हा आला दसरा ! " - गोविंदाग्रज (राम गणेश गडकरी) यांची कविता





चला आज हा आला दसरा !
------------------------------

चला आज हा आला दसरा !

पाउल पुढतें टाकायाला,

सीमोल्लंघन करावयाला,

आनंदानें नाचायाला,

सणांमध्यें सण हाच खरा !


चौमासांला आतां विसरा !

मुसळधार तो पाऊस वरला,

तुडवित पायांखालीं चिखला,

शेत पेरिलें येत पिकाला,

येतां आनंदाचा दसरा !


पहिल्या दुभत्या गाई विसरा !

उन्हाळ्यांत त्या उडाल्याच ना ?

त्या गाईच्या खिल्लारांना

नव्या दमानें सोडा राना,

चला खाउं द्या पहांटचारा !


करा जरासा मुखडा हंसरा !

आतां कां हीं तोंडें रडवीं ?

कडवीं बीजें करी गोडवीं,

फुटलें तुटलें पुन्हांहि जोडवी,

आला ना तो तुमचा दसरा !


चला रुढिवर आतां घसरा !

टाकुनि सीमा मृत धर्माच्या,

दंभाच्या या अंधपणाच्या,

जुनेपणाच्या, अहंपणाच्या

सीमोल्लंघनकालचि दसरा !


जुन्या मतांचा जाळा कचरा

नव्या मतांचे जे राऊत,

खरेखुरे मायेचे पूत,

येऊं द्या धैर्याला ऊत,

नका हातचा दवडूं दसरा !


नका हातचा दवडूं दसरा !

जुन्या ऋषींना सलाम ठोकुनि

करा तयारी छाती ठोकुनि

आजकालच्या ऋषींमागुनी

जा तिकडे नेइल हा दसरा !


श्रुतिस्मृतींना आतां विसरा !

अंधभक्तिचा पांगुळगाडा

मोडुनि तोडुनि उपडा पाडा !

पाताळीं तो नेउनि गाडा !

करा साजरा यापरि दसरा !


नेट धरा धीराचा जबरा !

खुल्या मनाचा अबलख घोडा

जीन नको उप्लाणी सोडा !

जेरबंद वा लगाम तोडा !

सीमोल्लंघनकालचि दसरा !


जुन्यापुराण्या चिंध्या विसरा;

जरि पटका घ्या सुधारणेचा !

भगवा शेंडा नव्या मताचा !

नव्या दमानें फडकविण्याचा

मानवधर्माचा हा दसरा !


नव आशेच्या तृणांकुरांचा

तुरा शिरावर; चढवा साज,

मढवा न्यायाचें शिरताज,

समचित्ताचे बरकंदाज

चला जमूं द्या जमाव तुमचा.!


काळाचें मैदान अफाट,

दिसतां कोठें खंदक खांचा

द्या घोडयाला अमीन टांचा

वार्‍यावरच्या करवा नाचा

कापा रस्ता आटोकाट !


चला निघूं द्या असली स्वारी;

जुनाट पोकळ नगारखाना

उंटावरला कुणी शहाणा

वाजवितां, त्या आधीं हाणा !


घ्या कृष्णाची करीं ’तुतारी’

रुढीच्या किल्ल्यावर स्वारी,

’अगरकरां’ ची झडवा नौबत !

’भागवतां’ची धराच हिंमत !

’केशवचंद्रां’ चें घ्या चिलखत !

फुंका ’कृष्णा’ चीच ’तुतारी.’!


रुढीचा गड खालीं उतरा,

पाकोळ्या घुबडांना उडवा,

जिवंत सोनें अखंड लुटवा,

कृपण मनाचा रस्ता खुटवा.

असा साजरा कराच दसरा !


कसले पूर्वज घेउनि बसलां ?

होते मोठे सोन्या भरले

त्यांचें आतां काय राहिलें ?

त्यांचें त्यांच्या मागुनि गेलें.

शिक्का कायमचा तो कसला !


उगाच खाउनि बसतां हाय !

पूर्वज आले चार पावलें,

एकसारखे पुढें सरकले,

म्हणुनिच ना ते इतके आले ?

त्यांना पूर्वज नव्हते काय ?


कुंभारासारखेच लोटे,

खोटें ठरतें तत्त्व आज तें.

पूर्वज संतत पुढें चालते

घायकूत ही नसती धरिते

बडे बापके तुम्ही बेटे !


रडत बैसले महारमांग.

दीनपणाला गर्वे छळतें,

अज्ञानाला भिउनी पळतें,

त्यां वर घ्याया नच जें वळतें

उच्चत्वा त्या लावा आग !


थांबा, ऐका देउनि कान—

सुकल्या हातीं बाला कोमल,

तशाच विधवा करिती तळमळ;

फत्तर फुटतिल येउनि कळकळ.

कुठला पोकळ गताभिमान ?


चला उठारे बांधा कंबर !

तुमच्या पुरती ही घी-शक्कर

टाकुनि, रुढीशीं द्या टक्कर !

युद्ध माजवा रे घनचक्कर !

फोडा कुजकें हेम अवडंबर !


गेल्या धर्माचें हें भूत

पाहुनि बसलां कांरे भीत ?

नव्या मतांचे भालाईत

घोडे अपुले या उडवीत,

नातरि रडते व्हा राऊत !


अनंतकाळाचें मैदान,

हिम्मतवाले चाबुकस्वार,

उत्साहाची करि तलवार,

चित्साक्षीची ढाल तयार,

घोडा फिरवा रानोरान !


सरतां काळाचें मैदान

घोडा उडवा मग आकाशी,

भिडवा नेउनि स्वर्गापाशीं

पूर्णपणाशीं ईशपदाशीं,

तरीच होईल दसरा छान !


कुणी मनाचा असेल कच्चा

करील त्यालाही मनशूर

या गाण्यांचे गाउनि सूर

’केशवपुत्रा’ चा महशूर

’गोविंदाग्रज’ चेला सच्चा !


----गोविंदाग्रज (राम गणेश गडकरी)

ऑक्टोबर, १९१३




आज दसरा निमित्ताने कवी गोविंदाग्रज यांच्या कवितेचे स्मरण !

आपणा सर्वांस विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा !



२ टिप्पण्या:

जागतिकीकरण आणि आदिवासी

  जागतिकीकरण आणि आदिवासी डॉ . अक्षय किशोर घोरपडे. ·        गोषवारा  (Abstract) :- १९९० नंतरचा कालखंड हा भारतीय समाज जीवनात फार मोठा सा...